In this Article
गर्भवती स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अॅनिमिया) असामान्य नाही. रक्तक्षयाची सौम्य स्थिती चिंतेचे कारण नाही आणि सुरुवातीच्या टप्प्यावर आढळल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. परंतु, उपचार न केल्यास ते आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते.
रक्तक्षय म्हणजे काय?
शरीरातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनचे एकूण प्रमाण कमी झाल्यास त्या वैद्यकीय स्थितीला रक्तक्षय (अॅनिमिया) म्हणतात. परिणामी, गर्भवती महिलांच्या शरीरात आवश्यक ऑक्सिजन ऊती आणि गर्भापर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेशा लाल रक्तपेशी नसतात.
इतर पोषक तत्वांव्यतिरिक्त, गर्भवती स्त्रीला बाळाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी अधिक रक्त निर्माण करण्यासाठी लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन बी १२ समृध्द आहार आवश्यक असते. जेव्हा ही गरज पूर्ण होत नाही, तेव्हा तुम्हाला रक्तक्षय होऊ शकतो.
साधारणपणे, एका स्त्रीच्या शरीरात सुमारे ५ लिटर रक्त असते. गरोदरपणात, वाढत्या गर्भाची गरज पूर्ण करण्यासाठी, हे प्रमाण तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी ७-८ लिटर इतके वाढते.
गर्भवती स्त्रियांना अॅनिमिया होण्याची अधिक शक्यता असते कारण शरीरात नेहमीपेक्षा जास्त रक्त निर्माण होते. निरोगी लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी अतिरिक्त लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन बी १२ आवश्यक आहे. आपण आपल्या आहाराची काळजी न घेतल्यास, आपणास लोहाची कमतरता होऊ शकते.
गरोदरपणातील रक्तक्षयाचे (अॅनिमिया) प्रकार
तुम्हाला माहित आहे का की ४०० पेक्षा जास्त प्रकारचे अॅनिमिया आहेत? यापैकी काही गरोदरपणात होतात. गर्भवती महिलांमध्ये आढळणारे रक्तक्षयाचे सर्वात सामान्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
1. लोहाची कमतरता असल्यामुळे होणारा रक्तक्षय
हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील एक प्रथिन आहे आणि फुफ्फुसातून शरीराच्या इतर भागात ऑक्सिजन वाहून नेते. जेव्हा शरीरात आवश्यक प्रमाणात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी पुरेसे लोह नसते तेव्हा लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा रक्तक्षय होतो.
लोहाच्या कमतरतेमुळे, रक्त शरीराच्या विविध भागांमध्ये आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेत नाही. याचा परिणाम आईवर तसेच गर्भावर होतो.
2. फोलेटच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा रक्तक्षय
फोलेट हे एक प्रकारचे व्हिटॅमिन बी आहे आणि ते शरीराला नवीन पेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते. फोलेट हे निरोगी लाल रक्तपेशी तयार करण्यास देखील मदत करते. गरोदरपणात, फोलेटची रोजची गरज वाढते. फोलेटच्या कमतरतेमुळे निरोगी लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी होते.
फोलेट-कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयामुळे गंभीर जन्म दोष होऊ शकतो. उदा: न्यूरल ट्यूब विकृती (स्पाइना बिफिडा) आणि बाळाचे जन्मतः कमी वजन असणे इत्यादी.
3. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यामुळे निर्माण होणारा रक्तक्षय
कोबालामिन किंवा व्हिटॅमिन बी १२ लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. ज्या स्त्रिया त्यांच्या आहारात दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, अंडी, पोल्ट्री, मांस यांचा समावेश करत नाहीत त्यांना व्हिटॅमिन-बी१२ च्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. या स्थितीत, आवश्यक प्रमाणात लाल रक्तपेशींचे उत्पादन बिघडते.
काहीवेळा, गर्भवती आई आवश्यक जीवनसत्व बी १२ घेत असेल, परंतु शरीर व्हिटॅमिनवर प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे आईला अशक्तपणा येऊ शकतो.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अकाली प्रसूती किंवा गंभीर जन्म दोष निर्माण होऊ शकतात. ह्यास न्यूरल ट्यूबल विकृती म्हणून ओळखले जाते.
गर्भवती असताना रक्तक्षयाची लक्षणे
रक्तक्षयाच्या सौम्य प्रकरणांमध्ये, एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जसजशी ही समस्या तीव्र होते, तसतसे खालील लक्षणे विकसित होऊ शकतात:
- थकवा आणि अशक्तपणा
- चक्कर येणे
- धाप लागणे
- त्वचेचा रंग फिकट होणे
- जलद किंवा अनियमित हृदयाचा ठोका
- छाती दुखणे
- थंड हात पाय
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण किंवा चिडचिड
सुरुवातीला, गरोदरपणातील रक्तक्षयाची लक्षणे सौम्य असू शकतात; परंतु, ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कालांतराने, लक्षणे आणखी तीव्र होऊ शकतात आणि नंतर समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपचार करावे लागतील. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ही लक्षणे सामान्यत: लोहाच्या गोळ्या, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी१२ सारखी पूरक औषधे घेऊन नियंत्रित केली जातात.
लक्षात ठेवा, शरीरातील वाढत्या गर्भामुळे काही प्रमाणात थकवा आणि अशक्तपणा अटळ आहे आणि सामान्य देखील आहे. घाबरून चिंता करू नका. डॉक्टर तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील.
गरोदरपणात रक्तक्षय कशामुळे होतो?
गरोदर स्त्रियांमध्ये अशक्तपणा निर्माण करणारे अनेक घटक आहेत. धोका जास्त असतो जेव्हा:
- स्त्री एकापेक्षा जास्त बाळांसह गर्भवती असते
- मॉर्निंग सिकनेसमुळे गर्भवती महिलेला जास्त उलट्या होतात
- गर्भधारणेपूर्वीच स्त्रीला रक्तक्षयाचा त्रास असेल
- गरोदर माता लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन बी १२ समृद्ध आहार घेत नसेल
- दोन गर्भारपणांमधील अंतर कमी असेल
- एक किशोरवयीन मुलगी गर्भवती असेल
रक्तक्षयाचा धोका
लोह, फोलेट किंवा व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे गरोदरपणात रक्तक्षयाची समस्या निर्माण होऊ शकते. बाळावर आणि आईवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
उपचार न केलेल्या रक्तक्षयामुळे खालील समस्या निर्माण होऊ शकतात:
- मुदतपूर्व किंवा कमी वजनाचे बाळ
- पोस्ट-पार्टम डिप्रेशन
- मुलाच्या विकासात विलंब
- अशक्त बाळ
फोलेट किंवा व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आणि त्यावर उपचार न केल्यास खालील गुंतागुंत निर्माण होऊ शकते:
- मुदतपूर्व किंवा कमी वजनाचे बाळ
- मेंदू किंवा मणक्यातील न्यूरल ट्यूब दोष किंवा जन्मजात दोष
गर्भारपणातील रक्तक्षयाचे निदान कसे करावे?
गरोदरपणात, तुमचे डॉक्टर रक्तक्षय आहे का हे तपासण्यासाठी वेळोवेळी तुमचे निरीक्षण करतील. रक्त चाचण्या केवळ पहिल्या तिमाहीतच नव्हे तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये देखील केल्या जातात. गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यातही रक्तक्षय होण्याची शक्यता नाकारण्यासाठी हे केले जाते. अशक्तपणाचे निदान करण्यासाठी खालील रक्त चाचण्या केल्या जातात:
- हिमोग्लोबिन चाचणी:ही चाचणी शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजण्यासाठी केली जाते.
- हेमॅटोक्रिट चाचणी:या चाचणीचा उद्देश रक्तातील लाल रक्तपेशींची टक्केवारी मोजणे हा आहे.
गर्भवती महिलांच्या रक्तक्षयावर उपचार कसा केला जातो?
गरोदरपणात रक्तक्षयावर उपचार करण्यासाठी तुमचे डॉक्टर खालील पूरक औषधे लिहून देऊ शकतात.
- लोह आणि फॉलिक ऍसिड: शरीरात लोह आणि फोलेटचे प्रमाण आहे हे पाहण्यासाठी ही चाचणी केली जाते. तुम्हाला लोह आणि फोलेटयुक्त पदार्थांचे सेवन वाढवण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
- व्हिटॅमिन बी १२: तुम्हाला व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचा सामना करण्यास मदत करण्यासाठी मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांसारख्या पदार्थांव्यतिरिक्त व्हिटॅमिन बी १२ आहार घेण्यास सांगितले जाऊ शकते.
रक्तक्षय कसा टाळता येईल?
गरोदरपणात शक्यतोवर रक्तक्षयाची समस्या टाळणे हे सर्व गर्भवती मातांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही निरोगी आणि पौष्टिक खाणे आवश्यक आहे. लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
- पालक, मेथी ह्यासारख्या गडद हिरव्या पालेभाज्या आणि ब्रोकोली
- बीन्स, मसूर, टोफू
- लाल मांस, पोल्ट्री
- मासे
- नट्स आणि बिया
- अंडी
- तृणधान्ये आणि धान्ये
लक्षात ठेवा की व्हिटॅमिन सी शरीराला लोह चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करते. म्हणून, जेव्हा तुम्ही लोहयुक्त आहार घेण्याचा विचार करत असाल तेव्हा व्हिटॅमिन सी असलेली जसे कि लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, किवी, स्ट्रॉबेरी आणि भोपळी मिरची इत्यादींचा सुद्धा आहारात समावेश करा.
तुमच्या डॉक्टरांना कधी फोन कराल?
सर्व गर्भवती स्त्रियांनी गरोदरपणात शरीरातील कोणतीही कमतरता जाणीवपूर्वक टाळली पाहिजे. शिवाय, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत रक्तक्षयाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. रक्तक्षयाची लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.
रक्तक्षयावर उपचार न केल्यास ते हानिकारक ठरू शकते. लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता योग्य आहार आणि पूरक आहाराने नियंत्रित केली जाऊ शकते. अशा कमतरतेवर लवकर उपचार केल्यास आई आणि बाळाचा बराच त्रास वाचू शकतो. तपासणीसाठी नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
आणखी वाचा:
गरोदरपणातील रक्तक्षय (आयर्न-डेफिशिएन्सी अॅनिमिया)
गरोदरपणातील अतिउष्णता (हायपरथर्मिया) – कारणे, धोके आणि उपाय