Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

गरोदरपणातील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

गरोदरपणातील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

जर तुम्ही गर्भवती असाल तर पोषक अन्न खाण्यासोबतच तुम्हाला पुरेसे पाणी देखील प्यावे लागेल. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला गरोदरपणात हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला असेलच. अर्थातच डिहायड्रेशन झाले आहे किंवा नाही हे शोधणे कठिण असू शकते परंतु यामुळे गरोदरपणात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. होय, हे कोणालाही त्रासदायक ठरू शकते, परंतु गर्भवती महिलांसाठी ते जास्त त्रासदायक असते. गरोदरपणात निर्जलीकरणाची (डिहायड्रेशनची) बहुतेक प्रकरणे सौम्य असतात, परंतु गंभीर घटनेमुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) म्हणजे काय?

जेव्हा आपल्या शरीरात जितके पाणी प्यायले जाते त्यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी कमी होते तेव्हा निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन होते. म्हणून जर तुम्ही पीत असलेल्या पाण्याने ऱ्हास झालेल्या पाण्याची पातळी भरून निघत नसेल तर तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता. डिहायड्रेशनमुळे उष्माघात, थकवा आणि स्ट्रोक यासारख्या इतर समस्या उद्भवू शकतात. शरीराचे नेहमीचे सामान्य कार्य सुरु राहण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागू शकतो. गरोदरपणात तुम्हाला जास्त पाण्याची गरज असते कारण तुमचे शरीर बाळासाठी रक्त आणि द्रव तयार करीत असते, म्हणूनच हायड्रेटेड रहाणे आवश्यक आहे.

गरोदरपणात निर्जलीकरणाची कारणे

गरोदरपणात निर्जलीकरण होण्याची अनेक कारणे आहेत. या कारणांमुळे गरोदरपणामध्ये निर्जलीकरणावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण आपण ती परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करू शकतो.

 • रक्ताचे वाढलेले प्रमाण: गर्भवती महिलेच्या शरीरात रक्ताचे प्रमाण ५०% वाढते. गरोदरपणात लवकर डिहायड्रेशन होण्याचे हे मुख्य कारण आहे. या टप्प्यावर शरीराला अधिक पाणी आवश्यक असते आणि पाणी टिकवून ठेवणे शरीराला कठीण जाते.
 • मॉर्निंग सिकनेस: सुमारे ५०% गर्भवती महिलांना मॉर्निंग सिकनेसने ग्रासलेले असते. ज्यामध्ये मळमळ, उलट्या होणे, जास्त लघवी होणे आणि घाम येणे यांचा समावेश आहे. या सर्व परिस्थितीमुळे शरीरातील पाणी कमी होते. मॉर्निंग सिकनेस सामान्यत: पहिल्या तिमाहीत होतो आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये आपोआप कमी होतो. सतत उलट्या होत असल्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होते.
 • पाण्याचे सेवन कमीः आपल्या सर्वांना माहित आहे की आपण दररोज सुमारे आठ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. परंतु गर्भवती महिलेला सजलीत राहण्यासाठी कमीतकमी बारा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. ह्यापेक्षा कमी पाणी प्यायल्यास निर्जलीकरण होऊ शकते.
 • जास्त घाम येणे: गर्भधारणेदरम्यान घाम येणे सामान्य आहे, परंतु जर शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर निर्जलीकरण होऊ शकते.
 • अतिसार: तिसऱ्या तिमाहीत तुम्हाला स्वत: ला अतिसाराच्या आजाराने ग्रस्त असल्याचे वाटेल. काही विशिष्ट पदार्थांविषयी तिटकारा वाटल्याने असे होते. हे पदार्थ आपल्या आतड्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचे असतात. तसेच संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे सुद्धा ह्यामागचे कारण आहे. यावेळी तुम्ही पुरेसे पाणी न प्यायल्यास निर्जलीकरण होऊ शकते.

 • हवामानः जर तुम्ही एखाद्या गरम किंवा दमट ठिकाणी रहात असाल तर आपल्या शरीरातील भरपूर पाणी कमी होईल. तथापि, वातानुकूलन चालू करणे उत्तर असू शकत नाही. वातानुकूलित खोलीत ओलावा कमी असतो ज्यामुळे आपल्या फुफ्फुसांमधून ओलावा कमी होऊ शकतो.
 • वयः ३५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमधील जटिलतेपैकी एक म्हणजे शरीरातील पाण्याचा ऱ्हास होतो. तुम्ही गर्भवती असल्यास आणि वय ३० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही, हायड्रेटेड राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे.

गर्भवती महिलांमध्ये डिहायड्रेशनची चिन्हे आणि लक्षणे

सामान्यत: डिहायड्रेशनचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे तहान लागणे. मात्र शरीर जास्त गरम होणे हे सुद्धा डिहायड्रेशनच्या प्रमुख लक्षणांपैकी एक असू शकते; तुम्ही पुरेसे पाणी न प्यायल्यास तुमच्या शरीरास उष्णतेचे नियमन करणे अवघड होते आणि शरीर जास्त गरम राहण्याची प्रवृत्ती तयार होते. परंतु डिहायड्रेशनची इतरही अनेक लक्षणे आहेत ज्यांच्यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. डिहायड्रेशनची लक्षणे सौम्य ते मध्यम ते तीव्र स्वरूपाची असू शकतात. चला तर मग त्या लक्षणांवर एक नजर टाकूया.

सौम्य निर्जलीकरण

 • किंचित जास्त तहान लागते
 • थोडे चिंताग्रस्त वाटते
 • हृदय गती वाढते
 • कमी वेळा लघवी होते

मध्यम डिहायड्रेशन

 • तीव्र तहान
 • थकवा
 • लघवीच्या वारंवारतेत घट
 • गडद पिवळ्या रंगाची लघवी
 • चक्कर येणे
 • डोकेदुखी
 • मळमळ
 • बद्धकोष्ठता
 • तोंड कोरडे पडणे

तीव्र निर्जलीकरण

 • अत्यधिक निर्जलीकरण
 • कोरडे तोंड आणि फडफडलेले ओठ

 • कमी प्रमाणात गडद रंगाची लघवी
 • मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी
 • पोटदुखी
 • तीव्र डोकेदुखी
 • थकवा
 • बेशुद्ध पडणे
 • गोंधळ होणे
 • हृदयाची गती वाढणे
 • श्वासाचा वेग वाढणे
 • खोल गेलेले डोळे
 • त्वचेला सुरकुत्या पडणे
 • कमी रक्तदाब

गरोदरपणात यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा तुम्हाला डिहायड्रेट झाल्यासारखे वाटत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या कारण दीर्घकाळापर्यंत डिहायड्रेशन आपल्या बाळासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.

धोके

गर्भधारणेदरम्यान डिहायड्रेशनशी संबंधित धोके खालीलप्रमाणे आहेत.

 • मळमळ
 • गर्भजल कमी होणे
 • स्तनांमधील दूध कमी होणे
 • अकाली प्रसूती

गर्भधारणेदरम्यान डिहायड्रेशनशी संबंधित गुंतागुंत

निर्जलीकरण गर्भवती महिलेला ती गरोदरपणाच्या कुठल्या टप्प्यावर आहे यावर अवलंबून असते. गर्भधारणेच्या तीन तिमाह्यांमध्ये डिहायड्रेशनचे धोके खाली स्पष्ट केले आहेत.

पहिल्या तिमाहीत डिहायड्रेशनचे परिणाम

 • तीव्र मळमळ आणि चक्कर येणे: निर्जलीकरण आणि मॉर्निंग सिकनेस हे एक दुष्टचक्र सुरु राहते. डिहायड्रेशनमुळे मळमळ होऊ शकते, तर मॉर्निंग सिकनेसमुळे डिहायड्रेशन होऊ शकते. हे चक्र तोडणे महत्वाचे आहे. डिहायड्रेशनसाठी गर्भवती महिलांना आय. व्ही. द्वारे द्रवपदार्थ द्यावे लागतील.
 • गर्भजल कमी होणे: गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये गर्भवती महिलांच्या गर्भजलाचे प्रमाण हे किती प्रमाणात द्रवपदार्थ घेतले जातात ह्यावर अवलंबून असते.पाण्याची पातळी कमी असेल तर गर्भजलाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बाळ गर्भाशयाच्या भिंतींवर चिकटून राहण्याऐवजी ते द्रवपदार्थामध्ये तरंगू शकते.

दुसर्‍या आणि तिसर्‍या तिमाहीत डिहायड्रेशनचे परिणाम

 • अकाली प्रसूती: जेव्हा गर्भवती महिलेच्या शरीरात निर्जलीकरण होते तेव्हा रक्ताचे प्रमाण कमी होते. यामुळे ऑक्सिटोसिन ह्या हार्मोनची पातळी वाढते. गर्भाशयाच्या आकुंचनासाठी ऑक्सीटोसिन थेट जबाबदार असते. डिहायड्रेशन हे अकाली प्रसूती होण्याचे एक कारण असू शकते.
 • स्नायूंच्या पेटक्यांमध्ये वाढ: डिहायड्रेशनमुळे शरीराचे तापमान वाढते आणि यामुळे स्नायूंमध्ये पेटके येतात. ह्या परिस्थितीत अत्यंत अस्वस्थता वाटू शकते.
 • थकवा: बहुतेक गर्भवती महिलांना थोड्या प्रमाणात थकवा येईल. तथापि, डिहायड्रेशनमुळे थकव्यामध्ये जास्त वाढ होईल.
 • यूटीआय: ह्या परिस्थितीत निर्जलीकरणामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाची शक्यता वाढवू शकते, ज्यामुळे मूत्रपिंडात गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि परिणामी लवकर प्रसूतीची शक्यता असते.

गरोदरपणातील निर्जलीकरणासाठी उपचार

जर तुम्हाला गरोदरपणात सौम्य ते मध्यम प्रमाणात डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर त्यास सामोरे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जास्त पाणी पिणे. जर तुम्हाला डिहायड्रेशन मळमळ आणि उलट्या झाल्याने होत असतील तर, त्यासाठीच्या औषधोपचारांवर डॉक्टरांशी बोला. ते तुम्हाला जास्त पाणी पिण्यास सांगतील आणि मळमळ सुद्धा कमी करण्यास मदत करतील. तुम्ही इलेक्ट्रोलाइट सप्लीमेंट पिऊ शकता का ह्याबाबत तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा कारण ते तुमच्या शरीरात संतुलन साधू शकतात. तथापि, तीव्र डिहायड्रेशन असेल तर तुम्हाला आपत्कालीन कक्षात जावे लागेल आणि डिहायड्रेशनसाठी आय. व्ही. द्वारे द्रवपदार्थ घ्यावे लागतील.

गर्भवती स्त्रीने किती पाणी प्यावे?

गरोदरपणात तुम्ही किती पाणी प्यावे हे ठरविण्यासाठी तुम्ही तुमच्या लघवीचा रंग तपासला पाहिजे. लघवीचा एकतर पांढरा किंवा हलका पिवळा असावा. गरोदरपणात, जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा नारिंगी असेल तर तुम्हाला दिवसभरात जास्त पाणी प्यायले पाहिजे. जर तुम्ही हलक्याफुलक्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असाल तर क्रियाकलापातील प्रत्येक तासासाठी एक कप पाणी पिणे चांगले असते. तुम्ही नियमितपणे व्यायाम केल्यास, पाण्याचा झालेला ऱ्हास भरून काढण्यासाठी तुम्ही जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.

बर्‍याच स्त्रियांना तहान लागली असल्याचे समजत नाही. जरतुम्ही पाणी पिण्यास विसरत असाल आणि बर्‍याचदा तुम्हाला तहान लागत नसेल तर तुम्ही पाण्याचे सेवन किती आणि केव्हा केले आहे हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक जर्नल ठेवणे आवश्यक आहे. हे अ‍ॅपद्वारे देखील केले जाऊ शकते, कारण ऍपमुळे तुम्हाला केव्हा आणि किती पाणी प्यावे ह्याबाबतचे रिमाइंडर येतील. जेवणाच्या आधी आणि नंतर एक ग्लास पाणी घ्या. ह्यामुळे तुम्हाला पाणी पिण्याची आठवण केली जाईल तसेच बद्धकोष्ठतेशी संबंधित कोणत्याही समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल.

गर्भधारणेदरम्यान डिहायड्रेशन कसे टाळता येईल?

असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे आपण हे सुनिश्चित करू शकता की आपण गर्भधारणेदरम्यान हायड्रेटेड रहाल

 • पुरेसे पाणी प्या आणि हळूहळू प्या (आणि वारंवार अंतराने). जास्त वेगाने पाणी प्यायल्याने तुमच्या मूत्रपिंडावर जास्त दबाव येऊ शकतो
 • तुम्ही जागे असतानाच्या प्रत्येक तासासाठी एक ग्लास पाणी प्या
 • वेगळ्या चवीसाठी तुम्ही तुमच्या पाण्याच्या ग्लास मध्ये दोन लिंबाच्या फोडी किंवा टरबूजचे काही तुकडे ठेऊ शकता
 • तुमच्या आहारात पातळ पदार्थांचा समावेश करा. सूप आणि ताज्या फळांचा रस त्यांच्यामध्ये असलेल्या पाण्याच्या उच्चपातळीमुळे चांगले स्रोत आहेत. फळांचा रस घरी केलेला आहे व तो साखर मुक्त आहे याची खात्री करुन घ्या
 • कॅफिन, सोडा किंवा जास्त साखर असलेला प्रक्रिया केलेल्या फळांचा रस घेऊ नका. हे पदार्थ लघवीचे प्रमाण वाढवणारे पदार्थ म्हणून कार्य करतात जे प्रतिरोधक असतात
 • खूप जास्त व्यायाम करणे टाळा तसेच बाहेर गरम असताना बाहेर जाणे टाळा. बाहेर उन्हात गेल्यास शरीरातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होईल आणि त्याचा शरीरावर ताण येईल

तुम्ही डॉक्टरांना कधी फोन केला पाहिजे ?

डिहायड्रेशनमुळे चिंताजनक लक्षणे उद्भवू शकतात. जर तुमची नाडी कमकुवत असेल किंवा अशक्तपणा असेल तर आपत्कालीन कक्षात त्वरित धाव घ्यावी. याशिवाय शौचातून रक्त पडत असेल किंवा हृदयाचे ठोके वेगाने पडत असतील तरी देखील डॉक्टरांची तातडीने भेट घेतली पाहिजे. जर तुम्ही आठ तासांपेक्षा जास्त वेळ लघवी केली नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

गरोदरपणातील निर्जलीकरणाबाबत नेहमी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे इथे वाचा.

. डिहायड्रेशनमुळे बाळाचा अकाली जन्म कसा होऊ शकतो?

डिहायड्रेशनमुळे रक्ताचे प्रमाण कमी होत असल्याने ऑक्सिटोसिन या संप्रेरकाची पातळी वाढते. इतर गोष्टींबरोबरच हा संप्रेरक गर्भाशयाच्या भिंतींच्या आकुंचनासाठी जबाबदार असतो. जर गरोदरपणात नंतरच्या काही महिन्यांत डिहायड्रेशन झाले तर ह्या आकुंचनामुळे तुमची अकाली प्रसूती होण्याची शक्यता असू शकते.

. डिहायड्रेशनमुळे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात पेटके येण्याचा त्रास होतो का?

डिहायड्रेशनमुळे आपल्या शरीराचे तापमान वाढेल. जेव्हा हे होते, तेव्हा तुमच्या स्नायूंमध्ये पेटके येण्यास सुरुवात होते. तुमच्या गरोदरपणात कोणत्याही अवस्थेत निर्जलीकरण होऊ शकते. नियमितपणे पुरेसे पाणी पिऊन आणि ताजे फळे खाऊन तुम्ही हायड्रेटेड रहाणे अत्यावश्यक आहे

निर्जलीकरण ही अशी स्थिती आहे जी आपल्या नकळत आपल्यावर पकड घेते. म्हणून, तुम्ही किती पाणी प्यायले आहे तसेच तुमच्या लघवीच्या रंगाचा मागोवा ठेवा. तुम्हाला दररोज सांगितलेल्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी अ‍ॅप्स किंवा रिमाइंडर्स वापरा. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त तुमच्या स्वत: साठीच नव्हे तर तुमच्या पोटात वाढणार्‍या बाळासाठी सुद्धा पाणी पीत आहात. त्यामुळे सजलीत रहा आणि ह्या काळात तुम्हाला काहीही समस्या येत असतील तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

आणखी वाचा:  गरोदरपणातील पोटदुखी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article