Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात डोळे येणे (पिंक आय)

गरोदरपणात डोळे येणे (पिंक आय)

गरोदरपणात डोळे येणे (पिंक आय)

डोळे आल्यावर ते लालसर होऊन अस्वस्थता येते. जेव्हा तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येता तेव्हा हा संसर्ग होतो. अशा प्रकारे, हा डोळ्यांचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. परंतु, गरोदरपणात डोळे आल्यास तुम्हाला बाळाच्या आरोग्याबद्दल चिंता असल्याने जास्त काळजी वाटू शकते. म्हणूनच, गरोदरपणात हा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि त्यावर कसे उपचार करू शकता हे माहिती करून घेणे नेहमीच चांगले असते. गरोदरपणात डोळे येणे ह्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

डोळे येणे म्हणजे काय?

डोळे आल्यावर, विषाणू/ जिवाणूंच्या संसर्गामुळे डोळ्यांच्या पडद्याचा दाह होतो. संसर्गाची कारणे बरीच आहेत (खाली वर्णन केलेली). परंतु, हा डोळ्यांचा संसर्ग होणे सामान्य आहे. स्पर्शाने किंवा आधी सांगितल्याप्रमाणे, संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास हा डोळ्यांचा संसर्ग सहज होऊ शकतो.

गरोदरपणात डोळ्यांना संसर्ग झाला तर?

गरोदर स्त्रियांना हा संसर्ग होणे सामान्य आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. ह्या संसर्गाकडे वेळीच लक्ष दिले आणि १ आठवड्यापेक्षा जास्त काळ हा संसर्ग न राहिल्यास त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होत नाही तसेच त्याचे कुठलेही दीर्घकालीन परिणाम होत नाहीत. डोळ्यांचा दाह साधारणपणे आठवडाभर राहतो आणि आपोआप बरा होतो. परंतु त्यामुळे येणारी अस्वस्थता गर्भवती महिलांसाठी खूप त्रासदायक असू शकते. डोळ्यांची जळजळ आणि खाज ह्यापासून सुटका मिळण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत.

गरोदरपणात डोळे कशामुळे येतात?

गरोदरपणात डोळे कशामुळे येतात?

गरोदरपणात डोळे खालील कारणांमुळे येऊ शकतात.

. जीवाणू

सहसा, जिवाणूंच्या संसर्गामुळे डोळे येतात. डोळे आल्यावर डोळ्यांना लालसरपणा येतो, खाज सुटते, सूज येऊन पिवळा स्त्राव होतो. काही वेळा जिवाणूंच्या संसर्गामुळे डोळे आल्यास सर्दी, घसा खवखवणे आणि काही वेळा श्वसनमार्गाचा संसर्ग सुद्धा होतो. जिवाणूंच्या संसर्गाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे संक्रमित कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे हे होय.

. विषाणू

विषाणूंच्या संसर्गामुळे डोळे येणे हे देखील सामान्य आहे. ह्यामुळे एकाच वेळी दोन्ही डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. संसर्ग झाल्यावर डोळे लाल होतात आणि डोळ्यांना खाज सुटते. कधीकधी डोळ्यांमधून थोडासा स्त्राव होतो. विषाणूंमुळे झालेला डोळ्यांचा संसर्ग सहज पसरतो. तसेच त्यासोबत सर्दी होणे आणि घसा खवखवणे ही लक्षणे देखील दिसू शकतात.

. हंगामी ऍलर्जी

हंगामी ऍलर्जी होणे सामान्य आहे आणि गरोदरपणात डोळे येण्यास त्या कारणीभूत आहेत. ह्या ऍलर्जी सहसा वसंत ऋतू दरम्यान होतात. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या डोळ्यातून पाणी येऊन ते लाल होतात आणि त्यांना खाज सुटते. पराग कणांची ऍलर्जी सर्वात सामान्यपणे आढळणारी ऍलर्जी आहे. त्यामुळे डोळे येतात. शिंका येतात तसेच दाह देखील होतो.

. बाहेरील घटक

जेव्हा वाळू, घाण, धूळ यासारखे बाहेरील घटक डोळ्यात जातात तेव्हा डोळ्यातून पाणी येऊ लागते. कधीकधी, त्यामुळे डोळे येऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला डोळ्यात किंचित वेदना, लालसरपणा आणि डोळ्यांमधून काही प्रकारचे स्त्राव येताना देखील जाणवतील. ह्या बाहेरील घटकांमुळे जिवाणू/ विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो आणि त्याचा दोन्ही डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

. डोळे चोळणे

सहसा, आपले स्वतःचे डोळे थोडे जास्त चोळल्याने डोळे लाल होऊ शकतात. जर तुम्ही आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या सानिध्यात आलात तर डोळे येण्याची शक्यता असते. जर तुम्ही पुरेशी स्वच्छता राखत नसाल तर डोळे येण्यास कारणीभूत असलेले जिवाणू/ विषाणू तुमच्या स्वतःच्या हातातून तुमच्या डोळ्यांमध्ये संक्रमित होऊ शकतात.

. शारीरिक संपर्क

डोळे आलेल्या व्यक्तीशी शारीरिक संपर्कामुळे तुम्हाला जिवाणू अथवा विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो, कारण तो संसर्ग सहजपणे पसरतो. उष्मायन काळ फक्त २४ ते ७२ तासांचा असतो.

डोळे येण्याची सामान्य लक्षणे

गरोदरपणात डोळे आल्यास त्याची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत

 • पाणीदार किंवा पिवळ्या स्रावासह लालसरपणा
 • डोळे लाल होणे आणि सूज येणे
 • तेजस्वी प्रकाशाप्रती वाढलेली संवेदनशीलता
 • पापण्याभोवती कठीण पापुद्रा
 • डोळ्यात काजळी
 • खाज सुटणे आणि अस्वस्थता
 • वेदनादायक डोळे

गरोदरपणात डोळे आल्यास उपचार कसे करावेत?

गरोदरपणात डोळे आल्यास त्यासाठी खाली काही उपचार दिलेले आहेत

. प्रतिजैविके

डोळ्यांचा संसर्ग कशामुळे झाला आहे हे निश्चित करण्यासाठी डॉक्टर तुमचे डोळे तपासतील आणि योग्य प्रतिजैविके लिहून देतील. डॉक्टरांनी लिहून दिलेली प्रतिजैविके घेतली पाहिजेत कारण काही प्रतिजैविके गर्भाला हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच, तुम्ही गर्भवती असल्याचे डॉक्टरांना सांगितले पाहिजे. तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असल्यास सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे.

. डोळ्यात घालायचे थेंब

डोळ्याला जिवाणूंचा संसर्ग झालेला असल्यास हे थेंब वापरले जातात. क्लॅमिडीयल कंजंक्टिव्हिटीस झालेला असल्यास हे थेंब फार प्रभावी नसतात. इतर प्रकारचा संसर्ग झाल्यास हे थेंब डोळ्यांची जळजळ कमी करून डोळे शांत करतात.

गरोदरपणात डोळे आल्यास (पिंक आय) त्यावर नैसर्गिक/ घरगुती उपचार

गरोदरपणात डोळे आल्यास घरगुती किंवा नैसर्गिक उपचारांची मदत होऊ शकते. त्यापैकी काही जाणून घेण्यासाठी वाचा.

. वॉर्म कॉम्प्रेस

वॉर्म कॉम्प्रेसमुळे डोळ्यांचा कोरडेपणा दूर होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. डोळ्यांची जळजळ आणि अस्वस्थता देखील कमी होते. तुम्ही स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. वापरलेल्या कॉम्प्रेसला स्पर्श करू नका नाहीतर त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

. गुलाबपाणी

डोळे स्वच्छ करण्यासाठी आणि कोणतेही कण किंवा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही गुलाबजल वापरू शकता. गुलाबजल डोळ्यांना शांत करते आणि थंड करते. जर तुमच्या डोळ्यांना जळजळ होत असेल तर डोळ्यांवर उपचार करण्यासाठी चांगल्या प्रतीचे गुलाबपाणी वापरा.

. ग्रीन टी बॅग्स

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी टी बॅग्स हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. विशेषतः डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आणि थकलेले डोळे शांत करण्यासाठी हा उपाय खूप परिणामकारक आहे. म्हणूनच, डोळे आल्यावर देखील ह्या उपायाची शिफारस केली जाते. काही ग्रीन टी बॅग्स उकळत्या पाण्यात बुडवा, त्या थंड होऊ द्या, पाणी पिळून घ्या आणि दररोज काही मिनिटे डोळ्यांवर ठेवा. एका डोळ्यासाठी वापरलेली टी बॅग दुसऱ्या डोळ्यासाठी वापरू नका. वापरल्यानंतर लगेच त्यांची विल्हेवाट लावा.

. योग्य स्वच्छता

डोळे आल्यावर स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. आपले हात नेहमी स्वच्छ ठेवा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळा. तसेच, स्त्राव पुसण्यासाठी स्वच्छ, मऊ टॉवेल वापरा.

. मध

मधात जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. डोळ्यांना जिवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे डोळे आल्यास मधाचा घरगुती उपाय म्हणून उपयोग होऊ शकतो. मधामुळे संसर्ग पसरण्यास प्रतिबंध होऊ शकतो आणि त्यामुळे डोळ्यांचा लालसरपणा सुद्धा कमी होतो. उकळून थंड केलेल्या पाण्यात २ टी स्पून मध घाला. हे मिश्रण संसर्ग झालेला डोळा धुण्यासाठी दिवसातून दोनदा किंवा तीनदा तुम्ही वापरू शकता.

. होमिओपॅथिक उपाय

डोळे आल्यास तुम्ही ऍलोपॅथिक औषधांऐवजी होमिओपॅथीचा पर्याय निवडू शकता. तथापि, औषधांच्या दुकानातून औषधे खरेदी करण्याऐवजी विश्वासार्ह होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. कोलाइडल सिल्वर

गरोदरपणात डोळ्यांच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी सिल्व्हर सोल्यूशन्स किंवा कोलाइडल सिल्व्हरचा वापर केला जातो. बहुतेक माता आणि डॉक्टरांनी मलमास पसंती दर्शवलेली आहे. तथापि, आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच हे मिश्रण वापरावे.

. मिठाच्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा

डोळे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुणे हा डोळे येण्यावर आणखी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. मीठात शुद्धीकरण आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म आहेत त्यामुळे डोळे आल्यावर उपचारांसाठी त्याची मदत होऊ शकते.

. कच्चे बटाटे

हा उपाय तुम्हाला कदाचित खूप वेगळा वाटेल, पण सोललेल्या ताज्या, कच्च्या आणि थंड बटाट्याचे काप डोळे आल्यावर होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. तुमच्या डोळ्यात घाण जाऊ नये म्हणून तुम्ही बटाटे नीट स्वच्छ धुवून घ्या.

१०. कोल्ड कॉम्प्रेस

डोळे आल्यावर लालसरपणा आणि अस्वस्थतेपासून थोडासा आराम मिळण्यासाठी तुम्ही कोल्ड कॉम्प्रेस वापरू शकता. संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही प्रत्येक डोळ्यासाठी वेगवेगळे वॉशक्लोथ वापरा. तुम्हाला सर्दी, ताप किंवा सायनुसायटिसचा त्रास असल्यास तुम्ही हा उपाय टाळू शकता.

११. तुळस

तुळशी किंवा पवित्र तुळस हे त्याच्या उपचार गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि ती बुरशीजन्य, जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य संसर्गाशी लढा देते. तुळशीची पाने पाण्यात १० मिनिटे उकळा आणि डोळा धुण्यासाठी वापरा, किंवा या पाण्यात काही स्वच्छ कापसाचे पॅड भिजवा, जास्तीचे पाणी पिळून काढा आणि ह्या कापसाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवा.

१२. कोरफड

कोरफड जळजळ कमी करण्यास मदत करते. तुमच्या पापण्यांवर थोडी कोरफड जेल लावा आणि काही मिनिटे तशीच ठेवा. जेल डोळे थंड करण्यास मदत करते आणि डोळ्यांभोवतीची खाज आणि सूज कमी करते.

१३. हळद

डोळे येण्यावर हळद देखील एक चांगला घरगुती उपाय असू शकतो. दोन चमचे हळद पावडर घ्या आणि एक कप उकळत्या पाण्यात मिसळा. वॉशक्लोथ किंवा कॉटन पॅड वापरुन, हे मिश्रण आपल्या पापण्यांवर लावा.

गरोदरपणात डोळे येऊ नयेत म्हणून काय कराल?

डोळे येऊ नयेत म्हणून तुम्ही खालील उपचार करू शकता

 • डोळ्याचे थेंब, डोळ्यांचे वाईप्स आणि सौंदर्यप्रसाधने इतरांशी शेअर करणे टाळा
 • संसर्ग झालेल्या लोकांशी शारीरिक संपर्क टाळा
 • डोळ्यावर चष्मा लावून डोळे संरक्षित करा. धुळीचे कण आणि घाण डोळ्यात जाऊ नये म्हणून काळजी घ्या
 • हात धुवा. स्वच्छता राखा
 • आपले डोळे नियमित स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा आणि स्वच्छ, मऊ टॉवेलने व्यवस्थित कोरडे करा

डोळे आल्यास त्याचा गरोदरपणावर परिणाम होतो का?

डोळे आल्यास त्यासाठी गैरऔषधीय उपचारांना प्राधान्य दिले जाते, कारण त्यामुळे गुंतागुंत आणि जोखीम टाळली जाते. विशेषतः गरोदरपणात स्वतःचे स्वतः औषधोपचार करू नका, कारण यामुळे गुंतागुंत होऊन धोका निर्माण होऊ शकतो.

डोळे आल्यास काही आठवड्यांत ते नैसर्गिकरित्या बरे होतात. जर ते एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा बरे होत नाहीत असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा आणि उपचार घ्या.

आणखी वाचा:

गरोदरपणात घाम येणे
गरोदरपणात डोळ्याखालील काळी वर्तुळे: कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article