In this Article
जेव्हा तुम्ही ८ आठवड्यांचे गरोदर असता तेव्हा तुमच्या पहिल्या तिमाहीचा २/३ काळ पालटलेला असतो. तुम्ही गरोदर आहे हे तुमच्या पोटावरून जरी समजले नाही तरी तुमच्या स्त्रीरोगतज्ञांना ह्या आठवड्यात भेट द्याल. तुम्हाला सोनोग्राफी करून घेण्यास सांगितले जाऊ शकते, त्यामुळे तुमच्या गर्भारपणाची प्रगति समजते. तुम्ही तुमच्या सोनोग्राफीच्या वेळी बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकाल.
गर्भारपणाच्या ८व्या आठवड्यातील तुमचे बाळ
७व्या आठवड्यात बाळाच्या विकासात लक्षणीय प्रगती झालेली असते. बाळाची वाढ प्रत्येक दिवशी १ मिमी इतकी होत असते. हाडे, मज्जारज्जू आणि आतड्याच्या विकासास सुद्धा सुरुवात झालेली असते. ८व्या आठवड्याच्या दरम्यान डोळ्याचा पडदा तयार होण्यास सुरुवात झालेली असते. सोनोग्राफीच्या वेळी भ्रूण अगदी स्पष्ट दिसते आणि बाळाचे नाक, ओठ आणि पापण्या ह्यांच्या विकासास सुरुवात झालेली असते. आता बाळाच्या हृदयाचे ठोके १५०/१७० ह्या दराने पडताना दिसतात.
बाळाचा आकार केवढा असतो?
तुमचे बाळ अजूनही आकाराने खूप छोटे आहे परंतु प्रत्येक दिवशी बाळाचा वेगाने विकास आणि वाढ होते. जेव्हा तुम्ही ८ आठवड्यांचे गरोदर असता तेव्हा तुमच्या बाळाचा आकार हा २ सेंमी असतो. बाळाची त्वचा पारदर्शक असते. तसेच बाळाच्या शरीराच्या आतील आणि बाहेरील अवयव विकसित होण्यास सुरुवात होते.
शरीरात होणारे बदल
गर्भारपणादरम्यान तुमच्या शरीरात बदल होत असतात आणि तुम्हाला तुमच्या शरीरात खालील बदल जाणवतात
- तुमच्या स्तनांच्या आकारात वाढ होते आणि बाळाला स्तनपानासाठी ते तयार होतात.
- तुमच्या गर्भाशयाच्या आकारात वाढ होते आणि त्यामुळे मूत्राशयावर दाब पडल्यामुळे वारंवार लघवीला जाण्याची भावना होते.
- गर्भाशयाच्या वाढीमुळे तुमच्या ओटीपोटामध्ये थोडे दुखू शकते.
- स्तनांमध्ये वाढत्या रक्ताभिसरणामुळे वेरीकोस व्हेन्स होऊ शकतात. तुमच्या स्तनाग्रांभोवतीचा भाग नेहमीपेक्षा गडद होतो कारण इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकांमुळे रंगद्रव्यांमध्ये वाढ होते.
- स्तनाग्रे ठळक होतात आणि कोलोस्ट्रमची निर्मिती होते.
८व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे
गर्भारपणाच्या ८व्या आठवड्यात खालील लक्षणे आढळतात
१. वासाविषयी वाढलेली संवेदना
तुमची वासांविषयीची संवेदना वाढलेली असल्याचा अनुभव तुम्ही घ्याल कारण तुमच्या मेंदूला खूप रक्त पुरवठा होतो, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया तीव्र असतात. तथापि ज्या वासांकडे तुमचे लक्ष कधीही गेलेले नसते अशा वासांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे मळमळ वाढू शकते.
२. मळमळ आणि मॉर्निग सिकनेस
वेगवेगळ्या कारणांमुळे जसे की ताणतणाव, इस्ट्रोजेन आणि नाजूक पचनसंस्थेमुळे तुम्हाला उलटी होणार असल्याची भावना होऊ शकते.
३. दुखरे स्तन
तुमचे स्तन मोठे होत असल्याने आणि स्तनपानास तयार होत असल्यामुळे तुम्हाला स्तनांमध्ये दुखू शकते.
४. बद्धकोष्ठता
गर्भारपणाच्या ८व्या आठवड्यात बद्धकोष्ठता होणे हे खूप सामान्य आहे कारण प्रोजेस्टेरॉन मुळे पचन क्रिया मंदावते आणि त्यामुळे शौचास त्रास होतो. खूप द्रव पदार्थांचे सेवन करा त्यामुळे बद्धकोष्ठता दूर राहील
५. थकवा जाणवणे
संप्रेरकांची पातळी वरखाली होत असल्याने खूप थकवा जाणवू शकतो. पुरेसा आराम घेणे हे होणाऱ्या आईसाठी खूप महत्वाचे आहे.
६. पेटके
गर्भारपणाच्या ८ व्या आठवड्यात तुम्हाला पेटके जाणवतील. हे खूप सामान्य आहे कारण तुमचे ओटीपोटाचे स्नायू आणि गर्भाशय ह्यांचा विकास होत असतो.
गर्भधारणेच्या ८व्या आठवड्यात पोटाचा आकार
आता तुमचे थोडे पोट दिसू शकेल किंवा अजिबात दिसणार नाही. हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जर तुम्हाला जुळे किंवा तिळे होणार असेल तर ८व्या आठवड्यात तुमचे पोट दिसू लागेल. तथापि जर एकच बाळ असेल तर तुमचे पोट आलेले दिसणार नाही. गर्भाशयाचे आणि पोटाचे स्नायू विस्तारित होत असतात त्यामुळे होणाऱ्या आईच्या वजनात एका आठवड्याला १ पौंड इतकी वाढ होते. ह्याचा अर्थ ८व्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही वजनात ४-६ पौंड इतकी वाढ अपेक्षित धरू शकता. जर तुम्हाला मळमळ किंवा मॉर्निंग सिकनेस चा त्रास होत असेल तर तुमचे तेवढे वजन वाढणार नाही, तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे अतिशय गरजेचे आहे.
गर्भधारणेच्या ८व्या आठवड्यातील सोनोग्राफी
८व्या आठवड्याच्या आसपास तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमचा पहिला अल्ट्रासाऊंड करण्यास सांगू शकतात. तुम्ही तुमचे बाळ सोनोग्राफीदरम्यान पाहू शकता. तुम्हाला सोनोग्राफीमध्ये तुमचे बाळ शोधणे कठीण जाऊ शकते कारण ते खूप छोटे असते. परंतु तुम्ही बाळाच्या हृदयाची स्पंदने नक्कीच ऐकू शकता. तुमचे बाळाचे छोटे हात आणि बोटे सुद्धा विकसित होत असतात.
आहार कसा असावा?
जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असेल तर तुम्हाला अन्नपदार्थांचा तिटकारा वाटू शकतो. परंतु गरोदरपणात स्वतःच्या आहाराकडे आणि पोषणाकडे लक्ष देणे हे खूप महत्वाचे आहे. एकदाच खूप खाण्यापेक्षा तुम्ही थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने थोडे खात राहावे. आपल्या आहारात खूप द्रवपदार्थांचा समावेश करावा, त्यामुळे निर्जलीकरण (Dehyadration) होणार नाही. तुमच्या गर्भारपणाच्या ८व्या आठवड्यातील आहारात खालील गोष्टींचा समावेश असणे जरुरीचे आहे.
- तुम्ही दिवसभरात ३-४ वेळा फळे आणि भाज्या खायला हव्यात, कारण तंतुमय पदार्थामुळे बद्धकोष्ठता टाळली जाऊ शकते. हवाबंद डब्यातील फळे आणि भाज्या खाणे टाळा कारण त्यामध्ये जास्त साखर आणि मीठ असते.
- सीरिअल आणि धान्याचा तुमच्या आहारात समावेश असणे जरुरी आहे. संपूर्ण धान्य खाणे चांगले. पिष्टमय पदार्थ आणि भाताचा समावेश आपल्या आहारात करा, त्यामुळे बाळाच्या वाढीदरम्यान लागणारी ऊर्जा मिळेल.
- तुम्ही प्रथिनांचा समावेश तुमच्या आहारात केला पाहिजे कारण बाळाच्या वाढीसाठी ते गरजेचे आहे.
- चिकन, मांस, मासे अंडी ह्यासारख्या पदार्थांचा त्यामध्ये समावेश होतो. शाकाहारी स्त्रिया त्याऐवजी डाळींचा समावेश त्यांच्या आहारात करू शकतात.
- तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली व्हिटॅमिन्स सुद्धा तुम्ही घेणे जरुरीचे आहे . सामान्यपणे कॅल्शिअम आणि फॉलीक ऍसिड ह्यांचा त्यात समावेश असावा.
काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
होणाऱ्या आईने आपल्या तब्बेतीची अतिशय काळजी घेतली पाहिजे. खाली काही गोष्टी दिल्या आहेत, त्या त्यांनी पाळल्या पाहिजेत.
हे करा
- मळमळ होऊ नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने हलका आहार घ्यावा.
- खूप द्रव्यपदार्थ घेऊन स्वतःला सजलीत ठेवा.
हे करू नका
- खूप मसालेदार पदार्थ खाऊ नका त्यामुळे जळजळ होऊ शकते.
- तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नका तसे केल्यास तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?
खाली काही गोष्टी दिल्या आहेत त्या तुम्हाला ह्या काळात लागू शकतात,
- गर्भारपणाविषयीची पुस्तके: तुम्हाला गर्भारपणाच्या प्रत्येक टप्प्याविषयीची माहिती असावी म्हणून गर्भारपणाविषयी पुस्तके आणून ठेवा.
- आरामदायक ब्रा: दुखऱ्या आणि हळुवार स्तनांसाठी तुम्ही आरामदायक ब्रा आणून ठेऊ शकता.
- चांगले मॉइश्चराझर्स: त्वचेच्या कोरडेपणापासून आराम मिळावा म्हणून चांगले मॉइश्चरायझर आणून ठेवा.
- आरामदायक पँट्स: तुमच्या पोटाचा आकार वाढत असतो त्यामुळे तुम्ही सैल आणि ताणल्या जाणाऱ्या कापडापासून बनवलेल्या पँट्स आणून ठेऊ शकता त्यामुळे वारंवार बदलणाऱ्या पोटाच्या आकाराशी जुळवून घेता येईल.
प्रत्येक दिवसागणिक तुम्ही नवीन भावनांचा आणि संवेदनांचा अनुभव घेत असतो. प्रत्येक आठवड्याला तुम्ही गर्भारपणाच्या एक नवीन टप्पा गाठत असता. गर्भारपणाच्या ८व्या आठवड्यात तुमच्या बाळाची लक्षणीय वाढ आणि बदल होत असतात.
मागील आठवडा: गर्भधारणा: ७वा आठवडा
पुढील आठवडा: गर्भधारणा: ९वा आठवडा