Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: २रा आठवडा

गर्भधारणा: २रा आठवडा

गर्भधारणा: २रा आठवडा

आई होण्याची चाहूल लागणे हा खरंतर रोमांचक अनुभव असतो पण मनात थोडी भीती सुद्धा असते. कधी कधी गर्भारपण हे अज्ञात आणि अनपेक्षित असं साहस वाटू शकतं. प्रत्येक आठवड्याला तुम्ही तुमच्या शरीरातील बदलांविषयी आणि आजूबाजूच्या परिस्थितीविषयी नव्याने जाणून घेत असता. आम्ही ह्या लेखमालिकेतून तुमच्या आनंदाच्या वाटेवर तुमच्या सोबत आहोत तसेच तुमच्या मनातली भीती घालवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देणार आहोत.

गर्भारपणाच्या २ ऱ्या आठवड्यातील तुमचे बाळ

एक नवीन सुरुवात आणि त्यात तुमचं स्वागत. हो, हे अगदी खरंय, तुम्ही एका रोमांचक प्रवासास सुरुवात करणार आहात. ज्यामध्ये उत्कंठा आहे, कधी रडू कोसळणार आहे, तर कधी चेहऱ्यावर हास्य उमटणार आहे. इथून पुढचा प्रत्येक क्षण आठवणींमध्ये ठेवावा असा असणार आहे. आणि पुढचा येणारा नवा क्षण तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे.

गर्भारपणाच्या दुसऱ्या आठवड्यात स्त्रीबीजाचे शुक्रजंतूबरोबर फलन होऊ शकते. ह्याचा अर्थ तुम्ही अजून गरोदर नाही का? विचारात पडलात ना? आपण ह्याविषयी नीट जाणून घेऊयात.

तुमची प्रसूतीची तारीख तुमच्या चुकलेल्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजली जाते. त्यामुळे तुम्ही जर बाळासाठी प्रयत्न करत असाल तर दुसऱ्या आठवड्यात तुम्ही गरोदर असण्याची शक्यता असते. दुसऱ्या आठवड्यात स्त्रीबीज फलनासाठी तयार होते. गर्भाशय सुद्धा फलित बीजाला सामावून घेण्यास तयार होते.

ओव्यूलेशनचा दिवस नक्की कोणता हे सांगणे कठीण असते परंतु तो ९ व्या दिवसापासून ते २१ व्या दिवसापर्यंत तो कुठलाही दिवस असू शकतो. स्त्रीबीजकोषातून स्त्रीबीज सोडल्यानंतर, जो शुक्रजंतू बीजवाहिनी मधून लवकरात लवकर स्त्रीबीजापर्यंत पोहोचतो, त्या शुक्रजंतूसोबत स्त्रीबीजाचे फलन होते. स्खलनानंतर सोडलेल्या लाखो शुक्रजंतूंपैकी फक्त शंभराच्या पटीत काही शुक्रजंतू बीजवाहिनी पर्यंत पोहोचतात.

संयोगानंतर १०-३० तासांनंतर, स्त्रीबीज आणि शुक्रजंतूच्या केंद्रकांचा संयोग होतो आणि तुम्हाला मुलगा होणार आहे की मुलगी हे ठरते. (जर शुक्रजंतूच्या ‘x’ गुणसूत्राचा स्त्रीबीजाच्या ‘x’ गुणसूत्राबरोबर संयोग झाला तर तुमचे बाळ मुलगी असेल आणि ‘y’ गुणसूत्राबरोबर संयोग झाल्यास तुमचे बाळ मुलगा असेल)

पुढच्या ३-४ दिवसात, युग्मज (Zygote) १६ पेशींमध्ये विभाजित होते, जेव्हा ते गर्भाशयात पोहोचते त्यास मोरूला (Morula) असे म्हणतात. मोरूला हा पेशींचा छोटासा चेंडू असतो, गर्भाशयाच्या आवरणात तो घट्ट चिकटतो आणि भ्रूण आणि नाळ अशा विभाजनाच्या प्रक्रियेस सुरुवात होते.

तुम्हाला शेवटची पाळी येऊन आता दोन आठवडे झालेले असतात, आणि काही जणींसाठी आता रोमांचक अनुभवास सुरुवात होणार असते. जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत नसाल तर गर्भारपणची पूर्वलक्षणे तुमच्या लक्षात येणार नाहीत किंवा तुम्ही PMS किंवा पाळीला उशीर झाला म्हणून दुर्लक्ष करू शकाल.

बाळाचा आकार केवढा असतो?

बऱ्याच स्त्रियांना लक्षात येत नाही की २ ऱ्या आठवड्यात स्त्रीबीज फलित झालेले नसते. जर तुमचे मासिक पाळी चक्र २८ दिवसांचे असेल तर आपण असे म्हणू शकतो की पाळीच्या १५ व्या दिवशी ओव्यूलेशन होते आणि जर ते नसेल तर तुम्हाला ओव्यूलेशन साठी आणखी काही दिवस लागू शकतात. बऱ्याच स्त्रियांना २ आठवड्यांच्या गरोदरपणाबद्दल चुकीची माहिती असते. बाळाचा आकार, तब्येत आणि विकास हा अजून २-३ आठवड्यानंतर कळणार असतो.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणात तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. काही बदल, जसे की, स्तनांचा आकार वाढणे हे सार्वत्रिक बदल आहेत आणि सामान्यपणे सर्व गरोदर महिलांमध्ये आढळतात. परंतु काही बदल उदा: केसांचा पोत बदलणे, ह्या सारखे बदल प्रत्येक स्त्री साठी वेगवेगळे असतात.

दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे शरीर, बीजकोष उत्तेजक संप्रेरकाची (Follicle stimulating hormone) निर्मिती करते. हे संप्रेरक सर्वात प्रभावी बीजकोष फोडणास मदत करते. फुटलेल्या बीजकोषाला ‘कॉर्पस ल्युटूम’ असे म्हणतात आणि ते प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन च्या निर्मितीस मदत करते. ही संप्रेरके फक्त गर्भधारणा टिकवून ठेवायला मदत करत नाहीत, तर जी लक्षणे तुम्ही अनुभवत आहात त्यासाठी सुद्धा ही संप्रेरके कारणीभूत असतात.

गर्भारपणाच्या दुसऱ्या आठवड्यात, जेव्हा फलन झालेले नसते तेव्हा तुम्हाला मासिक पाळीदरम्यान जी लक्षणे जाणवतात तशीच लक्षणे दुसऱ्या आठवड्यात जाणवतात. उदा: दुखरे स्तन, थोडंसं ओटीपोटात दुखणे आणि संभोगाची इच्छा वाढणे इत्यादी.

२ ऱ्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

२ ऱ्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

पाळीच्या दुसऱ्या आठवड्यात ओव्यूलेशन होत असते. जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल आणि तुम्हाला तुम्ही केव्हा गर्भवती होऊ शकाल ह्याविषयी लक्षणे जाणून घ्यायची असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

  • पांढरा चिकट स्त्राव: शुक्रजंतू नीट प्रवाहित होण्यासाठी गर्भाशयाचे चिकट आवरण बदलते. त्यामुळे योनीमार्गातून पांढरा चिकट स्त्राव येतो.
  • वासाची संवेदना वाढते: बाकीच्या गर्भारपणाच्या लक्षणांप्रमाणेच हे सुद्धा लक्षण वाढलेल्या इस्ट्रोजेनच्या पातळीमुळे आढळते, आणि त्यामुळेच मॉर्निंग सिकनेस होतो.
  • हलके डाग: जेव्हा अंडे फुटते, तुम्हाला तुमच्या अंतःवस्त्रांवर हलके डाग दिसतील. परंतु जर रक्तस्त्राव खूप होत असेल तर ते परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षण असू शकते. तुम्हाला अशा लक्षणांची काळजी वाटत असल्यास तुमच्या डॉक्टरांशी ताबडतोब संपर्क साधा.
  • शरीराचे मूलभूत तापमान: गर्भारपणाच्या पहिल्या दोन आठवड्यात शरीराचे मूलभूत तापमान कमी असते आणि हळूहळू वाढते.

ह्या सगळ्या लक्षणांवरून ओव्यूलेशन केव्हा होणार ते कळते. तुमची मासिक पाळी चक्र जर २८ दिवसांचे नसेल तर तुम्ही एक नोंदवही ठेऊ शकता. गर्भधारणेसाठी योग्य वेळ जाणून घेण्यासाठी तुम्ही बाजारात मिळणारे ओव्यूलेशन किट किंवा फर्टीलिटी मॉनिटर्स सुद्धा वापरू शकता. जेव्हा तुम्ही गर्भवती व्हाल तेव्हा तुम्ही गर्भारपणाच्या लक्षणांकडे लक्ष द्या आणि तुमच्या डॉक्टरांशी ताबडतोब संपर्क साधा.

गर्भधारणेच्या २ ऱ्या आठवड्यात पोटाचा आकार

फलित बीज अजून गर्भाशयाच्या आवरणाला चिकटलेले नसते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या पोटामध्ये काही बदल दिसणार नाहीत. काही स्त्रिया ओव्यूलेशन दरम्यान ओटीपोटामध्ये दुखत असल्याची तक्रार करतात, परंतु हा त्रास ह्या कालावधीत तुमच्यापैकी बऱ्याच जणींना होत असावा.

गर्भधारणेच्या २ ऱ्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भारपणाची चाचणी ४ आठवड्यांनंतर विश्वासार्ह होते. ह्याच कारणामुळे २ आठवड्यानंतर सोनोग्राफी केली जात नाही. जर केलीत तर तुम्हाला छोटंसं स्त्रीबीज बीजवाहिनी मधून जाताना दिसेल जे शुक्राणूंशी संयोग होऊन फलित होण्याच्या मार्गावर असेल. परंतु हे स्त्रीबीज मिठाच्या दाण्यापेक्षा लहान असेल त्यामुळे तुम्हाला कदाचित ते दिसणार सुद्धा नाही. गर्भाशयाचे आवरण जाड होण्यास सुरुवात झाली आहे किंवा कसे हे सोनोग्राफी करणारे तंत्रज्ञ तुम्हाला कदाचित सांगू शकतील.

आहार कसा असावा?

आहार कसा असावा?

पोषक आहार घेऊन तुम्ही तुमचे शरीर जास्तीत जास्त कार्यरत राहील तसेच ते गर्भारपणासाठी सुद्धा तयार राहील ह्याची काळजी घेत आहात. तथापि नेहमीच्या चौरस आहाराव्यतिरिक तुम्हाला गर्भारपणाच्या दुसऱ्या आठवड्यात काही विशेष आहाराची गरज नसते.

गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळात पोषक आहार घेतल्यास तुमच्या बाळाची वाढ आणि विकास नीट होईल. जर तुम्ही गर्भारपणासाठी उत्सुक असाल तर प्रजनन वाढवण्यासाठी कारणीभूत असलेले अन्नपदार्थांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता. उदा: हिरव्या पालेभाज्या, अंजीर, वेगवेगळ्या बेरीज वगैरे. कॅफेन घेणे टाळा त्यामुळे गरोदर राहण्याची शक्यता कमी होते. फॉलीक ऍसिड जास्त असलेले अन्नपदार्थ निवडणे चांगले. उदा: पालक तसेच तुमच्या डॉक्टरांशी फॉलीक ऍसिड च्या गोळ्यांविषयी सुद्धा बोलून घ्या. त्यामुळे जन्मतः बाळास व्यंग असण्याची शक्यता कमी होते.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

तुमच्या ह्या आनंदाच्या आणि रोमांचक काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला गोंधळात टाकणारं असू शकते कारण त्याविषयी खूप माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेट वर माहिती वाचून कुठल्याही गोष्टीचा प्रयॊग प्रयोग स्वतःवर करण्याआधी तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी बोला. पाळीनंतरच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही लक्षात ठेऊन कराव्यात अशा काही गोष्टी खाली देत आहोत.

हे करा

  • तुमच्या मासिक पाळीची नोंद ठेवा.
  • ओव्यूलेशन किट चा वापर करा.
  • एक दिवसाआड शारीरिक संबंध ठेवा.
  • तुमची जनुकीय चाचणी करून घ्या जेणेकरून तुमच्या होणाऱ्या बाळाला सिकल सेल ऍनिमिया, हंटिंगटोन्स डिसीज होणार नाहीत.

हे करू नका

  • उत्साहाच्या भरात लगेच गरोदरपणाची चाचणी करू नका. कारण निदान चुकीचे असण्याची शक्यता जास्त असते. अजून एक आठवडा वाट बघून मग गरोदर चाचणी करावी.
  • व्हिटॅमिन्स व्यतिरिक्त कुठलेही औषध तुमच्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेऊ नका.
  • तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशिवाय इतर कुणाचाही कसलाही सल्ला विचारात घेऊ नका.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

आत्ता फक्त गरोदर चाचणी किट ची तुम्हाला गरज भासणार आहे, आणि ती तुम्ही पुढच्या आठवड्यात वापरणार आहात.

गर्भारपण हा एक आनंदी आणि उत्साहाने भारलेला प्रवास आहे. चांगले स्त्रीरोगतज्ञ तुमचा आत्मविश्वास वाढतील आणि तुमची सगळी भीती नाहीशी होईल. तुम्हाला जेव्हा गरज भासेल तेव्हा तुमच्या डॉक्टरशी संपर्क साधा. त्यांचा संपर्क क्रमांक लवकर सापडेल अशा ठिकाणी ठेवा. तसेच त्यांच्याशी संवाद साधून तुमच्या ज्या काही शंका असतील त्यांची उत्तरे त्यांच्याकडून जाणून घ्या. तुमच्या इथून पुढच्या आनंदमयी प्रवासासाठी आमच्याकडून तुम्हाला अनेक शुभेच्छा.

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३रा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article