Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ७वा आठवडा

गर्भधारणा: ७वा आठवडा

गर्भधारणा: ७वा आठवडा

७ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची तुमच्या पोटात वेगाने वाढ होत असते. परंतु तुमच्या पोटाच्या आकाराकडे पाहून तसे वाटत नाही. ह्या काळात तुमच्या शरीरामध्ये महत्वाचे बदल होत असतात, कारण तुमचे शरीर बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सज्ज होत असते. बऱ्याच स्त्रियांना ह्या आठवड्यात आपण आई होणार आहोत हे समजलेले असते. ह्या आठवड्यात तुमच्या वजनात वाढ झालेली नसते. तुम्हाला मॉर्निंग सिकनेस जाणवू लागतो.

गर्भधारणेच्या ७व्या आठवड्यातील तुमचे बाळ

ह्या आठवड्यात बाळाचे हात आणि पाय ह्यांचा विकास होऊ लागतो. भ्रूणाला एक छोटी शेपटी दिसू लागते आणि पुढे ती माकडहाडामध्ये विकसित होते. बाळाचा आकार मागच्या आठवड्यापेक्षा दुप्पट झालेला असतो. तुमच्या बाळाचा वेगाने विकास होत असतो, बाळाच्या मेंदूचे दोन भाग विकसित होत असतात. बाळाचे छोटेसे यकृत, अस्थिमज्जा (Bone Marrow) तयार होईपर्यंत तांबड्या पेशी तयार करण्याचे कार्य करत रहाते. पचनक्रियेत सक्रिय सहभाग असलेले अवयव जसे की स्वादुपिंड आणि अपेंडिक्स तयार होण्यास सुरुवात होते. आता तुमच्या बाळाला तुम्ही ‘भ्रूण’ म्हणू शकता.

बाळाचा आकार केवढा असतो?

तुमचे बाळ आता ब्लूबेरी च्या आकाराएवढे असते. ७ व्या आठवड्यातील बाळ हे १/४ इंच एवढे असते.

गर्भधारणा झाल्यापासून ते ह्या आठवड्यापर्यंत तुमच्या बाळाचा लक्षणीय विकास झालेला असतो, म्हणजेच जवळ जवळ १०,००० पट. आता मेंदूच्या पेशींची वाढ होऊ लागते.

शरीरात होणारे बदल

शरीरात होणारे बदल

गर्भारपणात तुमच्या शरीरात बदल घडत असतात आणि तुम्हाला ७ व्या आठवड्यात खालील बदल जाणवू लागतील.

  • मळमळ आणि अन्नपदार्थांचा तिटकारा: तुम्हाला मळमळ आणि विशिष्ट अन्नपदार्थांचा तिटकारा वाटू शकेल. काही वासांमुळे तुम्हाला मळमळ होऊ शकेल. आणि दुसरीकडे तुम्हाला लोणचं खावंसं वाटेल.
  • जास्त प्रमाणात लाळेची निर्मिती: तुम्हाला जास्त लाळेची निर्मिती झालेली लक्षात येईल. साखरविरहित च्युईंगम खाल्ल्यास तुमच्या तोंडात जास्त प्रमाणात लाळेची निर्मिती होणार नाही.
  • स्तनांमध्ये बदल: ह्या आठवड्यात तुमच्या स्तनांचा आकार वाढेल. रक्ताभिसरण वाढल्यामुळे आणि चरबीची निर्मिती झाल्यामुळे स्तनांचा आकार वाढतो.
  • जास्त वेळा लघवीला होणे: hCG ह्या संप्रेरकामुळे तुमच्या ओटीपोटाजवळ रक्तप्रवाह वाढेल आणि त्यामुळे जास्त वेळा लघवीची भावना होते.
  • तारुण्यपिटिका: तुमच्या चेहऱ्यावर तारुण्यपिटिका आलेल्या तुम्हाला दिसतील. तुमच्या शरीरातील संप्रेरकांमधील बदलांमुळे असे होते.

७ व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

७ व्या आठवड्यात कुठलेही शारीरिक बदल दिसणार नाहीत परंतु तुम्हाला ह्या आठवड्यात खालील लक्षणे दिसतील.

  • तुम्हाला सकाळी मॉर्निंग सिकनेस जाणवेल.(मळमळ आणि उलट्या). तुम्हाला डोकेदुखी आणि अंगदुखीचाही अनुभव येईल. थकवा वाटेल, आळस येईल.
  • तुमचे स्तन हळुवार आणि दुखरे होतील तसेच स्तनाग्रांभोवतीचा भाग नेहमीपेक्षा जास्त गडद होईल.
  • तुम्हाला काही पदार्थ खावेसे वाटतील तर काही पदार्थांविषयी तिटकारा निर्माण होईल.
  • तुमच्या जुन्या पँटस तुम्हाला आता बसणार नाहीत. हे वजन वाढल्यामुळे नाही तर पोट फुगल्यामुळे होते.
  • तुम्हाला ओटीपोटात थोडे दुखू शकते आणि कधी कधी हलके डाग सुद्धा दिसतात.
  • ह्या काळातील तुमच्या शरीरातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे, योनीमार्गात घट्ट चिकट स्त्राव तयार होतो त्यास इंग्रजीमध्ये ‘mucous plug’ असे म्हणतात.
  • ‘mucous plug’ गर्भाशयाचे मुख बाळाच्या जन्मापर्यंत बंद करण्यास मदत करते.
  • तुमच्या मनःस्थितीतील बदल हाताळताना तुम्हाला कठीण होईल.

गर्भधारणेच्या ७व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भारपणाच्या ७ व्या आठवड्यात तुम्ही गरोदर आहात हे कळत नाही परंतु तुमच्या शरीरात खूप बदल होतील. ७व्या आठवड्यात तुमचे बाळ खूप छोटंसं असतं त्यामुळे पोटाच्या आकारावरून तुम्ही गरोदर आहात हे समजत नाही. बऱ्याच आई होणाऱ्या स्त्रियांचे पोट दुसऱ्या तिमाहीच्या मध्यावर दिसू लागते. परंतु तुम्हाला जुळे होणार असतील तर मात्र थोडे आधीपासूनच तुमचे पोट दिसू लागेल.

गर्भधारणेच्या ७व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भधारणेच्या ७व्या आठवड्यातील सोनोग्राफी

७ व्या आठवड्यात तुम्ही पहिली सोनोग्राफी करण्यास तयार असलात तरी बरेचसे डॉक्टर्स ८ व्या ते १० व्या आठवड्यापर्यंत वाट बघायला सांगू शकतात. हे मुख्यतः तुमचा वैद्यकीय इतिहास आणि तुमचे डॉक्टर्स काय सांगतात ह्यावर अवलंबून असते, डॉक्टर्सना बाळाच्या शरीराची वेगवेगळी मापे घेण्यास मदत होते, आणि त्यामुळे बाळाचा विकास कसा होतो आहे हे समजण्यास मदत होते. जरी तुमचे बाळ अल्ट्रासाऊंड मध्ये खूप छोटे दिसत असले तरी ते भ्रूण एका मिनिटात १०० मेंदूच्या पेशी तयार करीत असते. भ्रूणाचे मेंदू, ह्रदय, मूत्रपिंड आणि हात पाय विकसित होत असतात. तुम्हाला तुमच्या लघवीचे, रक्ताचे आणि गर्भाशयाच्या पेशींचे काही नमुने वेगवेगळ्या तपासणी साठी द्यावे लागतील. जुळे आणि तिळे असलेल्या मातांमध्ये hCG ची पातळी जास्त वाढलेली दिसते, आणि त्यामुळे जास्त मॉर्निंग सिकनेस जाणवतो.

आहार कसा असावा?

आहार कसा असावा?

गर्भारपणात आरोग्यपूर्ण पोषक आणि चौरस आहार घेणे हे फार महत्वाचे असते. तुमच्या गर्भारपणाच्या ७ व्या आठवड्यात तुम्ही खालील अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत.

  • दिवसातून तुम्ही भाज्यांचे ३-५ वेळा खाल्ल्या पाहिजेत. हिरव्या, लाल, पिवळ्या आणि नारिंगी भाज्यांचे मिश्रण तुमच्या शरीरासाठी चांगले असते, पालक, ब्रोकोली, टोमॅटो, लाल भोपळी मिरची, भोपळा, गाजर आणि पिवळ्या मिरच्या आणि मका ह्या काही ताज्या भाज्या आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता.
  • हवाबंद डब्यातील अन्न पदार्थांऐवजी, ताजी फळे खाणे सुचवले जाते. कारण हवाबंद डब्यातील अन्नपदार्थांमध्ये काही हानिकारक जिवाणू असू शकतात त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला हानी पोहोचू शकते. तुम्ही दिवसातून ३-४ वेळा ताजी फळे खाल्ली पाहिजेत.
  • तुम्ही तुमच्या शरीराला कॅल्शिअम मिळावे म्हणून दूध, चीझ, दही तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थ खाल्ले पाहिजेत. ते दिवसातून ३ वेळा खाण्याचा सल्ला दिला जातो.
  • तुम्ही तुमच्या आहारात अंडी, मांस आणि चिकनच्या स्वरूपात, दिवसातून २-३ वेळा प्रथिने घेतली पाहिजेत. डाळी, बीन्स, बिया, सुकामेवा हे शाकाहारी मातांसाठी प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत.
  • तुम्ही रिफाईंड पदार्थांऐवजी संपूर्ण धान्याला प्राधान्य दिले पाहिजे. संपूर्ण धान्यामुळे तुमच्या शरीराला तंतूंचा पुरवठा होतो, दिवसातून संपूर्णधान्याची ३ वेळा खावीत असे सांगितले जाते.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

मॉर्निग सिकनेस आणि मळमळ ह्यामुळे तुमच्या तब्ब्येतीवर परिणाम होतो. खालील काही टिप्सची तुम्हाला मदत होऊ शकते.

हे करा

  •  कमी तिखट अन्न खा आणि वरचेवर थोडे थोडे खा त्यामुळे ते पचायला हलके जाईल.
  •  भरपूर पाणी प्या.
  • लेमोनेड प्या आणि मळमळ नाहीशी होण्यासाठी कलिंगड खा.
  • दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुरेशी झोप घ्या.
  • स्तनांचे दुखणे कमी होण्यासाठी चांगली आणि आरामदायक ब्रा घाला.
  • व्हिटॅमिन घेत रहा.

हे करू नका

  • मसालेदार अन्न पदार्थ खाऊ नका.
  • मद्यपान आणि धूम्रपान टाळा.
  • जेवण वेळच्या वेळी घ्या.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमची ७व्या आठवड्यातील खरेदीची यादी खालीलप्रमाणे:

  • गर्भारपणातील नोंदवही: गरोदरपणतील भावना लिहून ठेवण्यासाठी नोंदवही ठेवा
  • चांगली लोशन्स: तुम्ही तुमच्या त्वचेसाठी चांगली लोशन्स किंवा तेल विकत आणू शकता कारण ती आधीपेक्षा कोरडी झालेली आहे.
  • आरामदायक ब्रा: स्तन हळुवार आणि दुखरे झाल्यामुळे आरामदायक ब्रा घातल्याने मदत होते.
  • आरामदायक पायजमा: ताणले जाऊ शकेल अशा कापडाचे आरामदायक पायजमे घाला, कारण तुमचा साईझ आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये वाढत जाणार आहे.
  • गर्भारपणाविषयीची पुस्तके: गर्भारपणाविषयीच्या माहितीसाठी तुम्ही गर्भारपणाविषयी पुस्तकांची खरेदी करू शकता

गर्भारपणाच्या ७ व्या आठवड्यात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. गर्भधारणेपासून तुमच्या गर्भाशयाच्या आकार दुप्पट झालेला असतो. तुम्हाला मळमळ, थकवा आणि आळस जाणवेल. तुम्हाला जराही अस्वस्थता आणि वेगळं काही जाणवलं तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

मागील आठवडा: गर्भधारणा: ६वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ८वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article