In this Article
तुमच्या गरोदरपणात डॉक्टरांकडून अनेक चाचण्या सुचवल्या जाऊ शकतात. काही चाचण्या नियमितपणे केल्या जातात आणि सर्व गर्भवती महिलांसाठी त्या चाचण्यांची शिफारस केली जाते, तर इतर काही चाचण्या आईचे वय, पालकांचा वैद्यकीय इतिहास किंवा अनुवांशिक विकृतींचा धोका इत्यादी वैयक्तिक घटकांवर अवलंबून असतात. अल्फा–फेटोप्रोटीन चाचणी गर्भामध्ये काही विकृती असल्यास त्या ओळखण्यासाठी केली जाते.
अल्फा–फेटोप्रोटीन चाचणी म्हणजे काय?
ही एक रक्ताची चाचणी आहे. ह्या चाचणीदरम्यान आईच्या रक्तातील अल्फा–फेटोप्रोटीनची (AFP) पातळी तपासली जाते. एएफपी हे तुमच्या पोटातील बाळाच्या यकृताद्वारे बनवले जाते. तुमच्या रक्तातील या पदार्थाच्या प्रमाणाद्वारे तुमच्या बाळाला स्पायना बिफिडा (हा एक जन्म दोष आहे ह्यामध्ये विकसित होत असलेल्या बाळाच्या पाठीचा कणा निकामी होतो) सारख्या आरोग्य समस्यांचा धोका आहे की नाही हे समजते आणि ऍनेसेफली (विकासादरम्यान बाळाच्या न्यूरल ट्यूबच्या निर्मितीमध्ये दोष) असल्यास ते सुद्धा समजते. ही चाचणी सहसा ट्रिपल स्क्रीन किंवा क्वाड स्क्रीनचा भाग म्हणून गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये केली जाते.
तुम्हाला एएफपी चाचणीची आवश्यकता का आहे?
एएफपी चाचणी तुमच्या गरोदरपणात पुढील चाचण्या किंवा स्क्रीनिंग आवश्यक आहेत का हे ठरवण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना मदत करते. ही चाचणी तुमच्या गरोदरपणाच्या १६ ते १८ आठवड्यांच्या दरम्यान केली जाते. ही चाचणी जवळजवळ अचूक असते आणि मुख्यतः तुमच्या पोटातील बाळाचे दोष ह्या चाचणीद्वारे लक्षात येतात. तुम्हाला एएफपी चाचणी करण्यास का सांगितले जाऊ शकते याची काही कारणे खाली दिलेली आहेत:
- पोटातील बाळाच्या मेंदू आणि मणक्याच्या समस्या तपासण्यासाठी
- पोटातील बाळाला डाऊन सिंड्रोम आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी (हा एक अनुवांशिक गुणसूत्र २१ विकार आहे. ह्या विकारामुळे बाळाचा शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास होण्यास विलंब होतो)
- तुमचे वय ३५ किंवा त्याहून अधिक असल्यास
- तुमच्याकडे जन्मजात दोषांचा कौटुंबिक इतिहास असल्यास
- जर तुम्ही गरोदरपणात कोणतेही हानिकारक औषध वापरले असेल तर
- जर तुम्हाला मधुमेह असेल तर
चाचणीची तयारी कशी करावी?
एएफपी चाचणी करून घेण्यापूर्वी कोणत्याही तयारीची आवश्यकता नाही. रक्त काढण्यापूर्वी तुमचे वजन लक्षात घेतले जाईल, कारण हा परिणामाचा अविभाज्य आहे. तुम्हाला तुमचा वंश, वय आणि तुम्ही किती आठवड्यांच्या गरोदर आहात ह्याचा तपशील देण्यास सांगितले जाऊ शकते.
चाचणी कशी केली जाते?
ही एक साधी रक्त चाचणी आहे. ही चाचणी बाह्यरुग्ण विभागात सामान्यतः निदान प्रयोगशाळेत केली जाते. त्याचे परिणाम एक किंवा दोन आठवड्यात उपलब्ध होतात. तुमचे रक्त काढणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे काम करू शकतील.
- शरीराच्या इच्छित भागाभोवती एक लवचिक बँड गुंडाळा. सहसा हा बँड हाताच्या वरच्या भागावर गुंडाळा. त्यामुळे हाताच्या शिरा शोधणे सोपे होईल.
- रक्त जिथून काढायचे त्या भागाला अल्कोहोल लावा.
- शिरेमध्ये सुई टोचून सुईला जोडलेली नळी पूर्ण भरेपर्यंत रक्त काढा.
- रक्त काढल्यानंतर आपल्या हातावरून लवचिक बँड काढा.
- सुईच्या जागेवर कापसाचा गोळा दाबून ठेवा आणि त्यावर पट्टी लावा.
चाचणी करताना कसे वाटते?
ही एक वेदनारहित प्रक्रिया आहे. जेव्हा सुई तुमच्या हाताला टोचते तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त डंख जाणवू शकतो. ही प्रक्रिया सहसा फक्त काही मिनिटे घेते. परिणाम काही दिवसांनंतरच उपलब्ध होणार असल्याने, प्रतीक्षा कालावधी दरम्यान तुम्ही तुमच्या बाळाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल.
एफपी चाचणीशी संबंधित जोखीम
एफपी चाचणी मुळे संबंधित जवळजवळ कोणतेही धोके नाहीत. ही चाचणी करताना किरकोळ अस्वस्थता जाणवू शकते. आपण त्याचा अनुभव घेऊ शकता.
- ज्या ठिकाणी सुई टोचली होती त्या ठिकाणी वेदना होऊ शकतात.
- त्या ठिकाणी एक लहान जखम दिसू शकते.
- क्वचित प्रसंगी, शिरा फुगून फ्लेबिटिस नावाची स्थिती उद्भवू शकते. त्यावर नियमित अंतराने उबदार कॉम्प्रेस लावून उपचार केले जाऊ शकतात.
परिणामांचा अर्थ काय आहे?
तुमच्या रक्तातील अल्फा–फेटोप्रोटीनचे प्रमाणावरून तुमच्या पोटातील बाळामध्ये काही समस्या असल्यास त्या तुमच्या डॉक्टरांना समजतील. आणि जर ह्या समस्या असतील तर त्या कुठल्या असतील हे देखील समजते. एएफपी पातळी सामान्य, उच्च आणि निम्न म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकते.
1. अल्फा–फेटोप्रोटीन सामान्य पातळी
तुम्ही ज्या लॅबमध्ये जात आहात त्यानुसार एएफपी मूल्यांची सामान्य श्रेणी काही प्रमाणात बदलू शकते. सामान्य मूल्ये देखील बाळाच्या वयावर अवलंबून असतात. खाली अल्फा–फेटोप्रोटीन च्या सामान्य श्रेणीचे रकाने दिलेले आहेत.
श्रेणी |
एएफपी श्रेणी नॅनोग्राम/मिलीलिटरमध्ये
|
सामान्य प्रौढ | ०-४० एनजी/मिली |
१५-१८ आठवड्यातील गर्भवती महिला |
१०-१५० एनजी/मिली
|
2. अल्फा–फेटोप्रोटीन उच्च पातळी
असामान्यपणे उच्च असलेल्या एएफपी मूल्यांचा विचार करण्यापूर्वी तुमची वैयक्तिक परिस्थिती आणि आरोग्य विचारात घ्यावे लागेल. एएफपीच्या उच्च पातळीचा अर्थ खालीलपैकी एक असू शकतो:
- तुम्हाला एका पेक्षा जास्त बाळे होण्याची शक्यता असते.
- तुमची गर्भधारणा विचारापेक्षा अधिक प्रगत आहे आणि देय तारीख पुन्हा मोजावी लागेल.
- बाळाला न्यूरल डिफेक्ट आहे.
- गर्भाचा मृत्यू झाला असावा.
- बाळाला आतड्यांच्या भित्तिकांचा दोष असू शकतो. ह्या स्थितीमध्ये आतडे किंवा इतर अवयव शरीराबाहेर असतात. जन्मानंतर शस्त्रक्रिया करून ही समस्या दुरुस्त केली जाऊ शकते.
3. अल्फा–फेटोप्रोटीन कमी पातळी
एएफपीच्या असामान्यपणे कमी पातळीचा अर्थ खालीलपैकी एक असू शकतो: –
- तुमच्या गर्भाचे वय चुकीचे आहे. जेव्हा प्रसूतीच्या तारखेची चुकीची गणना केलेली असते तेव्हा असे होते आणि तुम्ही सुरुवातीच्या अंदाजापेक्षा तुम्ही गरोदरपणात पुढे असता तेव्हा असे होऊ शकते.
- बाळाला डाऊन सिंड्रोम किंवा एडवर्ड्स सिंड्रोम आहे (अतिरिक्त गुणसूत्र १८ मुळे विकासास विलंब होण्याची स्थिती)
चाचणीवर काय परिणाम होऊ शकतो?
चाचणीच्या निकालावर परिणाम करू शकतात असे काही घटक असतात. त्यामुळे दिशाभूल करणारे परिणाम असू शकतात. असे होऊ शकते कारण:
- एकापेक्षा जास्त बाळांची गर्भधारणा होणे.
- तुम्हाला गरोदरपणातील मधुमेह असण्याची शक्यता असते.
- तुम्ही धूम्रपान करणारे आहात, त्यामुळे रक्तातील एएफपीची पातळी वाढू शकते.
- तुमच्या एएफपी चाचणीच्या दोन आठवड्यांच्या आत किरणोत्सर्गी ट्रेसर वापरणारी वैद्यकीय चाचणी घ्यावी लागणे.
लक्षात ठेवण्यासाठी मुद्दे
ह्या चाचणीला मॅटरनल सीरम अल्फा–फेटोप्रोटीन (एमएसएएफपी) चाचणी म्हणूनही ओळखले जाते, ही केवळ तपासणी चाचणी आहे, निदान चाचणी नाही. तुम्हाला जन्मजात दोष असलेले बाळ होण्याचा धोका जास्त आहे कि कमी आहे हे ह्या चाचणीद्वारे लक्षात येते. ह्या चाचणीचे कोणतेही निश्चित परिणाम नसतात. तुम्ही ही चाचणी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा.
- कोणत्याही असामान्य एएफपी परिणामांचा पाठपुरावा हा पुनरावृत्ती एएफपी चाचणीद्वारे केला जाईल, आणि परिणाम समान असल्यास, कारण निश्चित करण्यासाठी अल्ट्रासाऊंड केले जाऊ शकते.
- जर अल्ट्रासाऊंड असामान्य एएफपी पातळीमागील कारण प्रकट करत नसेल, तर अॅम्नीओसेन्टेसिस सारख्या आक्रमक चाचणीची शिफारस केली जाऊ शकते.
- रक्तामध्ये एएफपी ची असामान्य पातळी असलेल्या बहुसंख्य स्त्रियांच्या अम्नीओटिक द्रवपदार्थात एएफपी ची पातळी सामान्य असते. अशा स्त्रियांच्या बाबतीत दोष असलेल्या बाळाला जन्म देण्याचा फारच कमी धोका असतो.
- एएफपी चाचणीचे परिणाम जर सामान्य असतील तर तुमचे गर्भारपण सामान्य असेल किंवा जन्मलेले बाळ निरोगी असेल याची हमी घेता येत नाही.
- जर तुमचे एएफपी परिणाम असामान्य पातळी दाखवत असतील, तर तुमच्या डॉक्टरांशी याविषयी चर्चा करा किंवा तुम्हाला अनुवांशिक सल्लागाराकडे पाठवले जाऊ शकते.
- एएफपी परिणाम कोणत्याही वैध कारणाशिवाय असामान्य असण्याची शक्यता आहे. असा अंदाज आहे की प्रत्येक १,००० गर्भवती स्त्रियांपैकी, २५ ते ५० स्त्रियांच्या बाबतील असामान्य एएफपी परिणाम प्राप्त होतात. यापैकी, वास्तविक जन्मजात दोष असलेली बालके १६ पैकी १ ते ३३ पैकी १ अशी आहेत.
- एएफपी चाचणीनंतर प्रक्रियेची गरज असल्यास, निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी तपशीलवार चर्चा करा.
एएफपी चाचणीच्या निकालांची पातळी सामान्यांपेक्षा जास्त किंवा कमी असेल तर तुमच्या बाळामध्ये जन्मजात दोष आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तुमचे डॉक्टर निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंडसारख्या पुढील चाचण्या तुम्हाला करायला सांगण्याची शक्यता आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. ही चाचणी अनिवार्य नाही. तुम्हाला ती चाचणी स्वतःहून करण्याचा आणि नाकारण्याचा अधिकार आहे. तथापि, जवळजवळ ७५ % ते ९० % न्यूरल ट्यूब दोष असलेल्या बाळांना या चाचणीद्वारे ओळखले जाऊ शकते. ही चाचणी करून घेतल्याने पुढे काय करायचे हे तुम्हाला ठरवण्यास मदत होऊ शकते. अतिरिक्त चाचण्या केल्यास ह्या चाचणीच्या परिणामांना पुष्टी मिळू शकते. त्यानंतर वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज आहे का हे सुद्धा तुम्ही माहिती करून घेऊ शकता. विशेष गरज असलेल्या बाळांचे संगोपन करताना जीवनशैलीत आवश्यक बदल करण्यास तुम्ही सुरुवात करू शकता.
अस्वीकारण: ही माहिती फक्त एक मार्गदर्शक आहे आणि पात्र व्यावसायिकांच्या वैद्यकीय सल्ल्याला ही माहिती पर्याय नाही
आणखी वाचा:
गरोदर चाचणी केव्हा आणि कशी करावी?
गरोदरपणातील क्वाड्रपल मार्कर चाचणी