In this Article
- नूडल्सचे प्रकार
- इन्स्टंट नूडल्स हे गरोदरपणात खाण्यासाठी आरोग्यदायी अन्न आहे का?
- गरोदरपणात हानिकारक ठरू शकणारे काही घटक
- टीबीएचक्यू म्हणजे काय? इन्स्टंट नूडल्समध्ये त्याची भूमिका काय आहे?
- टीबीएचक्यूचे दुष्परिणाम
- नूडल्स पौष्टिक कसे बनवायचे?
- गरोदरपणात नूडल्स ऐवजी तुम्ही खाऊ शकाल असे स्नॅक्सचे विविध पर्याय
- आहारतज्ञ काय सांगतात?
- लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
गरोदर असण्याचा एक फायदा म्हणजे गरोदर असताना भरपूर खाण्याची परवानगी असते. गरोदर स्त्रीचे वजन वाढणे अपेक्षित असते, म्हणून “दोन जीवांसाठी खा” असे प्रोत्साहन दिले जाते. पण दोघांसाठी खाणे योग्य नाही. गर्भवती स्त्रीला तिच्या गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत दररोज 350 किलोकॅलरी आणि तिसर्या तिमाहीत 450 अतिरिक्त किलोकॅलरी दररोज आवश्यक असतात. आई खात असलेले सगळेच अन्नपदार्थ पोटातील बाळासाठी चांगले नसतात. चवीला चांगल्या असणाऱ्या अनेक अन्नपदार्थांचा विकसीनशील बाळावर वाईट परिणाम होतो आणि असे अन्नपदार्थ टाळलेच पाहिजेत. जर तुम्ही गर्भवती असाल, तर तुम्हाला अल्कोहोल आणि कॅफिन सोबत इतर काही अन्नपदार्थ सुद्धा खाणे बंद करावे लागेल (किंवा ते मर्यादित प्रमाणात खावे लागतील) त्यापैकी एक म्हणजे इन्स्टंट नूडल्स. गरोदरपणात नूडल्स खाणे का टाळावे ते जाणून घेऊयात.
नूडल्सचे प्रकार
नूडल्सचे बरेच प्रकार आहेत, परंतु इन्स्टंट नूडल्स कदाचित त्या सर्वांमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत. नूडल्सच्या इतर काही लोकप्रिय प्रकारांमध्ये रामेन, सोबा, मूग बीन्स, राईस स्टिक, हक्का आणि एग नूडल्स इत्यादींचा समावेश होतो.
इन्स्टंट नूडल्स सहज शिजवले जाऊ शकतात अशा प्रकारे तयार केलेले असतात. नूडल्सची चव वाढवणारे मसाल्याचे पॅक त्यामध्येच असतात. नूडल केक निरुपद्रवी असू शकतो, परंतु मसाल्यांच्या पॅकेटमधील काही घटक हे गरोदरपणात हानिकारक असू शकतात.
इन्स्टंट नूडल्स हे गरोदरपणात खाण्यासाठी आरोग्यदायी अन्न आहे का?
गरोदरपणात इन्स्टंट नूडल्स खाणे हा उत्तम पर्याय आहे, कारण ते चवदार,मसालायुक्त आणि पटकन शिजवले जाऊ शकतात. परंतु, गरोदरपणात हे नूडल्स खाणे पूर्णपणे सुरक्षित नाही. इन्स्टंट नूडल्स मधून कुठलेही पौष्टिक घटक मिळत नाहीत, तर केवळ काही काळासाठी भूक भागवली जाते. त्यामुळे नूडल्स खाणे टाळणे चांगले. इन्स्टंट नूडल्समध्ये असणारा आणखी एक हानिकारक पदार्थ एमएसजी. जास्त प्रमाणात सेवन केल्यास बाळाला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे गरोदरपणात नूडल्स खाणे टाळणे चांगले.
गरोदरपणात हानिकारक ठरू शकणारे काही घटक
इन्स्टंट नूडल्समध्ये असे काही घटक असतात जे तुमच्या गर्भात वाढणाऱ्या तुमच्या बाळाला धोका निर्माण करू शकतात, त्यामुळे तुम्ही त्यांचा आहारात समावेश करू नये. यापैकी काही घटक खाली दिले आहेत.
1. मैदा
मैदा हे परिष्कृत पीठ आहे आणि त्यामध्ये पौष्टिक मूल्य अजिबात नाही कारण शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान पौष्टिक घटक पूर्णपणे काढून टाकले जातात. मैदा पचायला सुद्धा जड असतो आणि त्यामुळे जास्त वेळ पचनसंस्थेत राहतो. मैद्यामध्ये फायबरचे प्रमाणही कमी असते, त्यामुळे गरोदरपणात बद्धकोष्ठता होऊ शकते.
2. मीठ
नूडल्समध्ये भरपूर मीठ असते आणि तुम्ही नूडल्स वारंवार खाल्ल्यास तुमच्या गरोदरपणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गरोदरपणात सोडियमचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला दीर्घकाळ उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते.
3. संरक्षकघटक
इन्स्टंट नूडल्समध्ये कृत्रिम रंग आणि चव जोडणारे पदार्थ असतात. नूडल्सचे शेल्फ लाईफ वाढवणे हा त्यामागचा उद्धेश असतो, हे घटक तुमच्या बाळाच्या वाढीस हानिकारक असतात.
4. एमएसजी
मोनोसोडियम ग्लुटामेट हे अनेक खाद्यपदार्थांमध्ये, विशेषतः चवदार स्नॅक्समध्ये असणारा एक सामान्य घटक आहे. त्यामुळे पदार्थाची चव वाढते. म्हणून नूडल्समध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. गर्भवती स्त्रिया एमएसजी वर नीट प्रक्रिया करू शकत नाहीत. त्यामुळे शरीरातील त्याचे प्रमाण वाढल्यामुळे बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून एमएसजी असलेले नूडल्स आणि इतर खाद्यपदार्थ टाळा.
5. ट्रान्स फॅट्स
प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, गरोदरपणात ते कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकतात. म्हणून गरोदरपणात नूडल्स आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो टाळा.
टीबीएचक्यू म्हणजे काय? इन्स्टंट नूडल्समध्ये त्याची भूमिका काय आहे?
टर्शरी ब्यूटाइलहायड्रोक्विनोन (टीबीएचक्यू) हे एक विषारी रसायन आहे आणि ते इन्स्टंट नूडल्समध्ये संरक्षक म्हणून वापरले जाते. नूडल्स व्यतिरिक्त, ते स्नॅक क्रॅकर्स आणि फ्रोझन फूडसारख्या इतर खाद्यपदार्थांमध्ये देखील आढळते. हे पेट्रोलियम डेरिव्हेटिव्ह आहे आणि पेंट्स, कॉस्मेटिक्स आणि अगदी कीटकनाशकांमध्ये देखील वापरले जाते. टीबीएचक्यू हे लहान मुलाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
टीबीएचक्यूचे दुष्परिणाम
गरोदरपणात टीबीएचक्यू असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास मळमळ, श्वास लागणे आणि टिनिटस इत्यादीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. टीबीएचक्यू शरीरातून लगेच काढून टाकले जाते, परंतु जर तुम्ही नियमितपणे इन्स्टंट नूडल्सचे सेवन केले तर ते तुमच्या शरीरात जास्त काळ राहू शकते. यामुळे पचनाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात, तसेच रक्तदाब सुद्धा कमी जास्त होऊ शकतो. लठ्ठपणा वाढून आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढू शकते. टीबीएचक्यू मुळे हृदयाच्या समस्या आणि मधुमेह देखील होऊ शकतो.
नूडल्स पौष्टिक कसे बनवायचे?
जर तुम्हाला गरम गरम वाफाळलेले नूडल्स खायची इच्छा झाली तर तुम्ही ते खाऊ शकता परंतु ते नेहमी खाऊ नका. जेव्हा तुम्ही नूडल्स खाल तेव्हा उकडलेल्या भाज्या पुरेशा प्रमाणात घालून ते पौष्टिक करा. तसेच मीठ कमी घाला.
गरोदरपणात नूडल्स ऐवजी तुम्ही खाऊ शकाल असे स्नॅक्सचे विविध पर्याय
काही स्नॅक्स जे नूडल्सला आरोग्यदायी पर्याय मानले जातात आणि ते म्हणजे ओटमील, स्प्राउट्स भेळ आणि अगदी स्मूदीज सुद्धा!. भरपूर भाज्या घालून सँडविच बनवू शकता तसेच रताळ्याचे चिप्स सुद्धा खाऊ शकता.
आहारतज्ञ काय सांगतात?
डॉक्टर आणि आहारतज्ञ गरोदरपणात मुख्य आहार म्हणून नूडल्सचे सेवन न करण्याचा सल्ला देतात, कारण त्यामधून तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला कोणतेही पौष्टिक घटक मिळत नाहीत. परंतु, कधीतरी तुम्हाला खूप खावेसे वाटले तर तुम्ही नूडल्स खाऊ शकता.
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
गरोदरपणात प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे, परंतु जर तुम्ही ते पूर्णपणे सोडू शकत नसाल, तर तुम्ही ते कधीतरी खाऊ शकता. नूडल्स पौष्टिक करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये भाज्या घालू शकता.
इन्स्टंट नूडल्स हे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आहेत आणि त्यामधून गर्भवती स्त्रीला किंवा तिच्या बाळाला कोणतेही फायदे मिळत नाहीत. गरोदर असताना, जर तुम्हाला पौष्टिक नसलेले अन्नपदार्थ खाण्याची इच्छा झाली तर तुमच्या शरीराला त्याचा काही फायदा होणार नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला हवे ते तुम्ही खाऊ शकता. परंतु गरोदरपणात ते खाणे टाळावे. तुमचे आणि तुमच्या लहान बाळाचे आरोग्य महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा. कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी गर्भावस्थेत इन्स्टंट नूडल्स आणि पौष्टिक नसलेले अन्न पदार्थ खाणे टाळा. आनंदी आणि निरोगी गर्भारपणासाठी तुम्हाला शुभेच्छा!
आणखी वाचा:
गरोदरपणात पिझ्झा खाणे हानिकारक आहे का?
गरोदरपणात मशरूम खाणे – सुरक्षित आहे की असुरक्षित?