In this Article
- तुम्ही गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड का केले पाहिजे?
- गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील स्कॅनची तयारी कशी करावी?
- अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी किती वेळ लागतो?
- अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?
- तुमच्या गरोदरपणाच्या दहाव्या आठवड्यात तुम्ही स्कॅनवर काय पहाल?
- १० व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंडमध्ये कोणतीही हालचाल नाही – हे सामान्य आहे का?
- स्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास काय?
जर तुम्ही हा लेख वाचत असाल तर तुम्ही १० आठवड्यांच्या गर्भवती आहात असे आम्ही समजतो. अभिनंदन! आता तुम्ही १० आठवड्यांच्या गरोदर आहात. तुमचे पोट अजून कसे दिसत नाही अशी काळजी करणे आता थांबवा कारण गरोदरपणाच्या ह्या टप्प्यावर आता ते दिसू लागेल. बाळ निरोगी आहे का किंवा त्याची वाढ सामान्यपणे होते आहे ना हे जाणून घेण्यासाठी तुमचे डॉक्टर अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्यास सांगतील. अल्ट्रासाऊंड, ज्याला सोनोग्राम देखील म्हणतात, ध्वनी लहरींच्या मदतीने मॉनिटरवर तुमच्या बाळाची प्रतिमा तयार करण्यास मदत करते. तुमच्या गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यात तुम्हाला अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का आहे आणि ते कसे केले जाते हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
तुम्ही गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड का केले पाहिजे?
गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यांत अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
१. बाळाची वाढ तपासण्यासाठी
तुमच्या बाळाची प्रगती किंवा वाढ तपासण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यास सुचवू शकतात. स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना तुमच्या बाळाची निरोगी वाढ होते आहे किंवा नाही हे समजू शकेल. गरोदरपणाच्या १०व्या आठवड्यात, गर्भाचे वजन सुमारे ४ ग्रॅम असते आणि लांबी ३.१ सेंमी असते. अल्ट्रासाऊंड केल्यावर तुमच्या बाळाचा विकास कसा होत आहे हे समजेल. या मोजमापांच्या आधारे बाळाचे गर्भाशयातील वय देखील समजेल आणि प्रसूतीच्या तारखेचा अंदाज सुद्धा लावता येईल.
२. कोणतीही विकृती तपासण्यासाठी
तुमच्या गरोदरपणाच्या १० ते १४ आठवड्यांच्या दरम्यान, डाऊन सिंड्रोम आणि इतर गुणसूत्र विकृतींची चाचणी करण्यासाठी नुकल ट्रान्सलुसेन्सी स्कॅन (NTS) केले जाईल. यामध्ये, न जन्मलेल्या बाळाचा न्युकल फोल्ड, म्हणजेच मानेच्या मागचा पारदर्शक भाग, मोजला जाईल. ही चाचणी सहसा गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यात घेतली जाते.
३. बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी
तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ८व्या आठवड्यांच्या दरम्यान अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले असतील. परंतु तुम्ही ते १० व्या आठवड्यात देखील ऐकू शकता. तुमच्या बाळाचे हृदय सामान्यपणे कार्य करते याची खात्री करण्यासाठी तुमचे डॉक्टर ही चाचणी करतील.
४. बाळाचे अवयव सामान्यपणे कार्यरत आहेत याची खात्री करण्यासाठी
गरोदरपणाच्या १०व्या आठवड्यात, गर्भाची त्वचा अर्धपारदर्शक असते. याचा अर्थ अल्ट्रासाऊंड स्कॅनवर सर्व अंतर्गत अवयव दिसू शकतील. अशा प्रकारे तुमचे डॉक्टर सर्व अवयव सामान्यपणे विकसित होत आहेत आणि योग्यरित्या कार्य करत आहेत की नाही हे तपासू शकतील.
५. पाठीचा कणा कसा विकसित होत आहे हे पाहण्यासाठी
गरोदरपणाच्या १०व्या आठवड्यात पाठीचा कणा अल्ट्रासाऊंड मध्ये दिसला पाहिजे. पाठीचा कणा सामान्यपणे विकसित होत आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर अल्ट्रासाऊंड करतील.
६. बाळाची स्थिती निश्चित करण्यासाठी
जर हा तुमचा पहिला अल्ट्रासाऊंड असेल, तर डॉक्टर तुम्हाला गर्भाचे गर्भाशयातील स्थान म्हणजेच तुमच्या बाळाची स्थिती सांगतील. अल्ट्रासाऊंड केल्यानंतर एक्टोपिक गर्भधारणेची शक्यता तपासून पहिली जाईल.
गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील स्कॅनची तयारी कशी करावी?
गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील स्कॅनसाठी तुमचे मूत्राशय संपूर्ण भरलेले असणे आवश्यक आहे. मूत्राशय संपूर्ण भरलेले असताना स्कॅन केल्याने अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञांना बाळ, प्लेसेंटा, गर्भाशय, अंडाशय आणि गर्भाशय ग्रीवाची स्पष्ट प्रतिमा मिळण्यास मदत होईल. अल्ट्रासाऊंड करण्याच्या एक तास अगोदर मूत्राशय संपूर्ण भरण्यासाठी तुम्हाला ३ ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता आहे.
अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी किती वेळ लागतो?
एका सामान्य अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी १५ ते ३० मिनिटे लागू शकतात. सोनोग्राफरला बाळाची चांगली प्रतिमा मिळवावी लागते. तुमचे गर्भाशय, प्लेसेंटा आणि अंडाशय देखील तपासावे लागतात. जर बाळ खूप सक्रिय असेल आणि फिरत असेल किंवा अस्ताव्यस्त स्थितीत असेल, तर सोनोग्राफरला स्पष्ट प्रतिमा मिळण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. आणि जर स्पष्ट प्रतिमा मिळाली नाही तर स्कॅन पुन्हा कधीतरी करावा लागेल.
अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?
अल्ट्रासाऊंड करण्यासाठी, सोनोग्राफर तुम्हाला टेबलवर झोपण्यास सांगतील आणि तुमचे पोट आणि बेंबीकडील भाग उघडा ठेवण्यास सांगतील. त्यानंतर ते तुमच्या पोटावर थोडे जेल लावतील आणि त्वचेवर ट्रान्सड्यूसर दाबून धरतील. ह्या कांडीद्वारे अल्ट्रासाऊंड लहरी पाठवल्या जातील त्यामुळे मॉनिटरवर तुमच्या बाळाची प्रतिमा तयार होईल. बाळाची स्पष्ट प्रतिमा दिसण्यासाठी तंत्रज्ञ कांडीने तुमच्या पोटावर थोडासा दाब देतील. स्कॅन वेदनादायक नसून त्याचा काहीही त्रास होत नाही. काही वेळा, ओटीपोटाच्या स्कॅन नंतर स्पष्ट प्रतिमा मिळाली नाही तर योनिमार्गाद्वारे स्कॅन केले जाऊ शकते. परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही – योनिमार्गाची तपासणी देखील वेदनादायक नाही.
तुमच्या गरोदरपणाच्या दहाव्या आठवड्यात तुम्ही स्कॅनवर काय पहाल?
तुमच्या १०–आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये तुम्हाला काय दिसेल ते खाली दिलेले आहे.
- १० आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंडमध्ये तुम्ही बाळाची हालचाल पाहू शकता. तुम्हाला तुमच्या बाळाचे हात, पाय आणि डोके स्पष्टपणे दिसू शकते
- तुमच्या बाळाची त्वचा पारदर्शक असल्याने तुम्हाला अंतर्गत अवयव देखील दिसू शकतात
- मॉनिटरवर, तुम्हाला तुमच्या बाळाचे हृदय धडधडताना दिसेल आणि तुम्हाला ते ऐकूही येईल
- तुम्हाला तुमच्या बाळाचे कपाळ फुगलेले दिसेल. वाढत्या मेंदूला सामावून घेण्यासाठी हे सहसा असे होते. तथापि, कपाळ हळूहळू सपाट होईल
- तुम्ही तुमच्या बाळाची बोटे देखील पाहू शकता. तुम्हाला त्याचे नाक आणि कान सुद्धा दिसू शकतील. तुम्हाला तुमच्या बाळाच्या पापण्या दिसतील पण त्या बंद असतील
- बाळाचा सांगाडा पूर्ण झाला आहे आणि मणक्याचे फ्रेमवर्क सुद्धा तुम्हाला दिसू शकते
१० व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंडमध्ये कोणतीही हालचाल नाही – हे सामान्य आहे का?
तुमच्या अल्ट्रासाऊंडच्या १० व्या आठवड्यात तुम्हाला तुमचे बाळ हलताना दिसत नसेल तर काळजी करू नका. तुमचे बाळ गर्भाशयात झोपले असण्याची शक्यता आहे. बाळाची वाढ, विकास आणि हृदयाचे ठोके सामान्य आहेत अशी खात्री तुमच्या सोनोग्राफर ने तुम्हाला दिल्यावर तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही.
स्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास काय?
१० आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये काही विकृती आढळल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला त्याची माहिती देतील. अशा वेळी, डॉक्टर पुढील चाचण्यांची शिफारस करू शकतात जसे की कोरिओनिक विली सॅम्पलिंग, रक्त चाचण्या आणि अम्निओसेन्टेसिस इत्यादी. निष्कर्षांच्या आधारे, डॉक्टर तुमच्याशी पुढे काय करायचे ह्याविषयी बोलतील आणि त्यानंतर ते तुम्हाला एखाद्या विशेष तज्ञांकडे पाठवू शकतील.
१० आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनला डेटिंग स्कॅन असेही म्हणतात, कारण तो बाळाचे गर्भधारणेचे वय निर्धारित करण्यासाठी आणि प्रसूती तारखेचा अंदाज लावण्यासाठी वापरला जातो. न्यूचल ट्रान्सलुसेन्सी टेस्ट हा या स्कॅनचा भाग आहे. काही पालकांना आठवणी जतन करण्यासाठी स्कॅनची प्रिंट कॉपी हवी असते. काही देशांमध्ये, तंत्रज्ञ बाळ मुलगा आहे कि मुलगी हे सांगू शकतात. तथापि, भारतात लिंग निर्धारण बेकायदेशीर आहे. गर्भाचा विकास सामान्य आहे आणि बाळ निरोगी आहे याची खात्री करण्यासाठी १० आठवड्यांचा अल्ट्रासाऊंड केला जातो. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी सुचवले असल्यास हा अल्ट्रासाऊंड चुकवू नका. नियमित चाचण्या करा. तुम्हाला निरोगी गरोदरपणासाठी शुभेच्छा!
मागील आठवडा: गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन
पुढील आठवडा: गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन