रक्षा बंधन, हा भाऊ – बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करणारा एक भारतीय सण आहे. या वर्षी रक्षाबंधन २२ ऑगस्टला आहे. ह्या सणाची सगळे जण अगदी आतुरतेने वाट बघत असतात. मुले स्वतःच्या हाताने राखी, कार्ड्स आणि भेटवस्तू बनवत असतात.
शाळेमध्ये सुद्धा ह्या सणाच्या निमित्ताने राखी तयार करणे स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. जर तुमच्या मुलाला निबंध लिहायला सांगितला तर तुम्हाला त्याची मदत करण्याची आवश्यकता भासू शकते. तुम्ही त्याची मुळीच चिंता करू नका! ह्या लेखामध्ये दिलेल्या रक्षाबंधन ह्या विषयावरील निबंधाची तुम्हाला नक्कीच मदत होईल.
रक्षाबंधन निबंध – मुलांसाठी १० ओळी
रक्षाबंधन ह्या विषयावर खाली दहा ओळी दिलेल्या आहेत. निबंध लिहिताना त्याचा वापर मुद्दे म्हणून करता येईल
- रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो
- श्रावण महिन्यात येणारा हा सण हिंदूंचा एक पवित्र सण आहे
- ह्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते
- त्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि रक्षणाचे वचन देतो
- हा सण भाऊ – बहिणीच्या अतूट आणि पवित्र नात्याचा सण आहे
- ह्या दिवशी कुटुंबातील सर्व जण नवीन कपडे परिधान करतात
- ह्या दिवशी घरात गोड पदार्थ केले जातात
- ह्या दिवशी बहीण आपल्या भावाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करते
- ह्या सणास नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात. काही ठिकाणी जेवणात गोड नारळी भाताचा समावेश करतात
- भाऊ–बहिणीचे प्रेम, ऐक्य आणि विश्वासाचे प्रतिक असलेला हा सण त्यांच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येतो
रक्षाबंधन निबंध (नमुना १)
श्रावण महिना म्हणजे सण –समारंभाची सुरुवात! आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांचे महत्व खूप आहे. ह्याच महिन्यात भावा– बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचा सण असतो आणि तो म्हणजे रक्षाबंधन! रक्षाबंधन हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक प्रमुख असा हिंदू धर्मियांचा सण आहे. हा सण संपूर्ण देशात खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. ह्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाप्रती तिचे प्रेम व्यक्त करते आणि भाऊ तिच्या पाठीशी सदैव असेन हे वचन देतो.
ऑगस्ट महिन्यात हा सण साजरा केला जातो. ह्या दिवशी बहीण आणि भाऊ दोघेही नवीन कपडे घालतात. बहीण भावाच्या कपाळावर गंध–अक्षत लावते. भावाला औक्षण करून त्याच्या उजव्या हातावर राखी बांधते. आणि मिठाई खाऊ घालते. नंतर भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो किंवा काहीतरी भेटवस्तू देतो. बहीण भावाच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते.
सख्ख्या भावासोबत काही ठिकाणी चुलत, मावस भावांना सुद्धा राखी बांधतात. भाऊ नसेल तर बहिणी सुद्धा एकमेकींना राखी बांधून एकमेकींविषयी असणारा प्रेम, जिव्हाळा व्यक्त करताना दिसतात.
रक्षाबंधन हा दिवस भावा –बहिणीच्या पवित्र प्रेमाचा दिवस आहे. ह्या दिवशी भावाला आणि बहिणीला त्यांच्या आयुष्यात एकमेकांचे महत्व जाणवते म्हणून ह्या सणाला विशेष महत्व आहे.
उत्साह आणि आनंद घेऊन येणारा हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. सख्ख्या भावांसोबत चुलत, मावस भावांना सुद्धा राखी बांधली जाते.
प्रत्येक भाऊ ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो. साधारणपणे ऑगस्ट महिन्यात हा सण साजरा केला जातो. ह्या वर्षी रक्षाबंधनाचा सण २२ ऑगस्टला आहे.
असे म्हटले जाते की नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी देशाच्या मनगटावर राखी बांधली. भारतातील नागरिकांमध्ये समानता आणि बंधुता वाढवण्यासाठी त्यांनी असे केले होते. त्या काळापासून हा सण भारतीय लोक मोठ्या भावनेने साजरा करतात. हा सण देशभरात आणि प्रत्येक वयोगटात अगदी उत्साहात साजरा केला जातो. छोट्या मुलांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकजण हा सण साजरा करतो.
रक्षाबंधन निबंध (नमुना २)
रक्षा बंधन म्हणजे प्रेम आणि संरक्षणाचे बंधन. ‘रक्षाबंधन’ ह्याचा शब्दार्थ पुढीलप्रमाणे – ‘रक्षा‘ म्हणजे संरक्षण आणि ‘बंधन‘ म्हणजे नात्याचे बंध. अशा प्रकारे, या सणाच्या निमित्ताने बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात. भाऊ आपल्या बहिणीवर कायम प्रेम करण्याचे आणि तिला प्रत्येक धोक्यापासून संरक्षण देण्याचे वचन देतो.
भाऊ आणि बहीण यांच्यातील बंधन हे अद्वितीय आहे. ते एका क्षणी एकमेकांशी भांडतात आणि दुसऱ्याच क्षणी त्यांचे भांडण मिटते. आपल्या जीवनात भावंडांची खूप महत्वाची भूमिका असते.त्यांना एकमेकांचे गुण आणि अवगुण माहिती असतात. ते नेहमीच एकमेकांना मदत करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी तयार असतात. रक्षाबंधनाचा सण हा बंध साजरा करण्यासाठीचा एक दिवस आहे.
ह्या सणाच्या पारंपारिक पैलूंव्यतिरिक्त, हा उत्सव साजरा करणे हा देखील एक आनंददायी विधी आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी जवळचे कुटुंब आणि नातेवाईक एकत्र येतात. ते नवीन कपडे घालतात आणि बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटावर धागा किंवा राखी बांधतात. मग बहिणींना भेटवस्तू दिल्या जातात.
सणाची तयारी आठवडाभरापूर्वी सुरू होते आणि भावंडे बाजारात जातात , बहिणी राखी खरेदी करतात आणि भाऊ भेटवस्तू खरेदी करतात. अशा प्रकारे, रक्षाबंधन हा एक महत्त्वपूर्ण सण आहे जो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
निबंध लेखनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुले त्यांना निबंधासाठी दिलेल्या विषयावर विचार करतात आणि त्यांच्या कल्पना स्पष्टपणे व्यक्त करण्यास शिकतात. तसेच त्यांची लेखनशैली सुद्धा निबंध लेखनामुळे सुधारते. लिहिता येणे हे एक उत्तम कौशल्य आहे. आम्हाला आशा आहे की निबंधाचे हे नमुने तुमच्या मुलाला खूप मदत करतील.
आणखी वाचा: रक्षाबंधन मेसेजेस, कोट्स आणि शुभेच्छासंदेश