Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील पोटदुखी

गरोदरपणातील पोटदुखी

गरोदरपणातील पोटदुखी

गर्भधारणेदरम्यान पोट दुखणे खूप सामान्य आहे, पण ते भीतीदायक सुद्धा वाटू शकते. वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी गरोदर स्त्रीच्या शरीरात खूप बदल होत असतात, त्यामुळे ह्या कालावधीत पोट दुखणे हे सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान पोटदुखीची काही कारणे असतात जी हानिकारक नसतात परंतु काही वेळा त्यामागील कारणे गंभीरसुद्धा असू शकतात. काही वेळा गर्भधारणेशी संबंधित काही गुंतागुंत असल्यास पोटदुखी होऊ शकते, आणि अशावेळी तातडीची वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. गर्भधारणेदरम्यान तीव्र पोटदुखीची कारणे आणि लक्षणे समजून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गर्भधारणेदरम्यान पोट दुखणे सामान्य आहे का?

गर्भारपणाच्या ९ महिन्यांमध्ये बऱ्याच गरोदर स्त्रियांना पोट दुखणे किंवा पोटात पेटके येण्याचा त्रास होतो. जर तुम्हाला गरोदरपणात पोटदुखीचा त्रास झाला तर लगेच घाबरून जाऊ नका कारण बऱ्याच वेळेला ते नॉर्मल असते. तुमच्या गर्भाशयात बाळ असल्याने तुमच्या पोटाचे स्नायू आणि हाडांवर ताण येऊन तुम्हाला पोटात अस्वस्थ वाटू शकेल. गर्भवती स्त्रीला गर्भधारणेदरम्यान पोटात हलके दुखणे हे सामान्य आहे परंतु, जर पोटाकडील भागात तीव्र वेदना होत असतील आणि त्या खूप काळ तशाच राहिल्या तर ते गर्भधारणाविषयक गंभीर स्वरूपाच्या गुंतागुंतीचे लक्षण असू शकते आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधला पाहिजे.

गर्भधारणेदरम्यान पोट दुखणे

गर्भधारणेदरम्यान तिन्ही तिमहयांमध्ये जसजशी बाळाची वाढ होते तसे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पोटदुखी होऊ शकते. ह्या भागात तिन्ही तिमहयांमध्ये होणाऱ्या पोटदुखीची सामान्यपणे आढळणारी लक्षणे सांगितली आहेत.

. गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीमध्ये होणारी पोटदुखी

तुमच्या गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीमध्ये तुम्हाला पोटात पेटके आल्यासारखे दुखू लागेल आणि जसजशी बाळाची वाढ होईल तसे हे दुखणे वाढू लागेल. गर्भावस्थेत पेटके येणे हे सामान्य समजले जाते. गॅस होणे, पोट दुखी, बद्धकोष्ठता किंवा संभोग ह्यामुळे सुद्धा पोट दुखू शकते.

ज्या स्त्रिया गर्भधारणेसाठी IVF ची उपचारपद्धती घेतात त्यांच्यामध्ये ovarian hyperstimulation syndrome (OHS) झालेला आढळतो आणि हा प्रामुख्याने प्रजननासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या औषधांमुळे होतो. हे दुखणे गर्भधारणेच्या कालावधीत काही आठवडे होते.

. गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये होणारी पोटदुखी

गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये बऱ्याच स्त्रियांना गोल अस्थिबंधन (round ligament pain) दुखण्याचा त्रास होतो. हे अस्थिबंधन (ligament) गर्भाशयापासून ते मांडीच्या सांध्यापर्यंत असते. आणि ते गर्भाशयाला आधार देते. जेव्हा वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी गर्भाशयाचा आकार वाढतो तेव्हा ह्या गोल अस्थिबंधनावर सुद्धा ताण येतो. त्यामुळे पोटात तीव्र वेदना होतात. काही स्त्रियांना अशा प्रकारच्या वेदना, कुल्ले किंवा मांडीच्या भागात सुद्धा होतात. ह्या प्रकारच्या वेदना गर्भधारणेदरम्यान सामान्य समजल्या जातात आणि त्यामध्ये खूप गुंतागुंत झालेली आढळून येत नाही.

. गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीत होणारी पोटदुखी

तिसऱ्या तिमाही दरम्यान तुम्हाला शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना जाणवतील ह्यामध्ये पोट, पाठ आणि कुल्ल्यांचा समावेश होतो. बाळाच्या जन्माची तयारी करताना बाळाच्या शरीरातील संयोजी ऊतक (connective tissue) सैल पडतात आणि त्यामुळे प्रजनन मार्गाची लवचिकता वाढते. संयोजी ऊतक सैल पडल्यामुळे किंवा ताणले गेल्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांना कुल्ल्यांमध्ये आणि कमरेच्या खालच्या भागात वेदना जाणवतात. तिसऱ्या तिमाही मध्ये खालील दिलेल्या कारणांमुळे पोटदुखी होऊ शकते.

  • गॅस आणि बद्धकोष्ठता

बऱ्याचशा गरोदर स्त्रिया गर्भधारणेदरम्यान गॅस आणि बद्धकोष्ठतेची तक्रार करतात. ह्या समस्या प्रोजेस्टेरॉन च्या पातळीत वाढ झाल्यामुळे निर्माण होतात. संप्रेरकांच्या वाढलेल्या पातळीमुळे आतड्याचे स्नायू सैल पडतात आणि त्यामुळे आतड्यातून खूप हळू हळू अन्न पुढे सरकते. बराच वेळ अन्न आतड्यात राहिल्यामुळे गॅस होतो. भरपृर पाणी पिणे, व्यायाम आणि नियमित तंतुमय पदार्थ घेतल्याने गॅस आणि बद्धकोष्ठता यांना प्रतिबंध घालता येऊ शकतो.

  • सराव कळा ( Braxton-Hicks Contractions)

सराव कळा ह्या प्रसूती कळांसारख्याच असतात. पोटाचे स्नायू घट्ट झाल्यामुळे ह्या सराव कळांची निर्मिती होते. ह्या कळांमुळे तुमच्या पोटाचे स्नायू घट्ट होतात. ह्या कळा दुसऱ्या तिमाहीत सुरु होऊ शकतात तर काही स्त्रियांना ह्या कळा प्रसूतीच्या दरम्यान जाणवू लागतात. सराव कळा प्रसूती कळांपेक्षा खूप वेगळ्या असतात. प्रसूती कळा वारंवार येतात आणि त्या दीर्घकाळासाठी असतात आणि त्या वेदनादायी असू शकतात. ह्या कळा निर्जलीकरणामुळे येऊ शकतात त्यामुळे भरपूर पाणी पिणे आणि नियमित आराम केल्यास ही स्थिती आटोक्यात आणली जाऊ शकते.

गरोदर स्त्रियांमध्ये पोटदुखीची कारणे

सगळ्या स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान पोटदुखीचा त्रास होतो आणि ते नॉर्मल आहे. पोटदुखीचे सर्वात महत्वाचे आणि प्राथमिक कारण म्हणजे गर्भाशयाचा वाढणारा आकार. बाळ जसे वाढते तसा तो वाढत जातो. वाढणारे वजन आणि गर्भाशयाचा वाढता आहार ह्यामुळे पोटाच्या अस्थिबंधनांवर आणि स्नायूंवर खूप दाब पडतो आणि नियमित येणाऱ्या पेटक्यांमागे हे एक कारण असू शकते.

गरोदरपणात ओटीपोटात होणाऱ्या वेदनांच्या गंभीर समस्या

गर्भारपणात ओटीपोटात दुखणे हे नॉर्मल आहे, परंतु काही वेळा ती एक गंभीर समस्या होऊ शकते. लेखाच्या ह्या भागात काही गंभीर समस्यांची चर्चा केली आहे ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान गंभीर पोटदुखी होऊ शकते.

. बीजवाहिनी मध्ये होणारी गर्भधारणा

गर्भाशयाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी होणाऱ्या गर्भधारणेस ectopic pregnancy असे म्हणतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये अंड्याचे फलन बीजवाहिनी मध्ये होते. वैद्यकीय संदर्भांमध्ये अशी गर्भधारणा ५० पैकी १ आढळते. ह्या प्रकारच्या गर्भधारणेमध्ये स्त्रीला ओटीपोटात दुखते तसेच गर्भधारणेच्या ६व्या आणि १०व्या आठवड्यात रक्तस्त्राव होतो. बऱ्याचशा अशा गर्भधारणा गर्भधारणेच्या ४थ्या आणि ८ व्या आठवड्यात दिसून येतात.

गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळात बीजवाहिनीत होणारी गर्भधारणा ओळखणे कठीण असते. एक्टोपिक गर्भधारणेची काही लक्षणे खालीलप्रमाणे

  • ओटीपोटात दुखणे, तसेच पोटाच्या एका बाजूला तीव्र वेदना होणे, ह्या वेदना संपूर्ण ओटीपोटात पसरतात.
  • गर्भवती स्त्रीने हालचाल केली की ह्या वेदना वाढतात
  • हलका रक्तस्त्राव
  • योनीमार्गातून रक्तस्त्राव किंवा हलके डाग
  • चक्कर येणे अथवा बेशुद्ध पडणे
  • वारंवार लघवीला जाणे किंवा लघवी करताना वेदना होणे

खालील स्त्रियांना बीजवाहिनीमध्ये गर्भधारणेचा धोका असतो:

  • आधी बीजवाहिनीमध्ये गर्भधारणा झालेली असणे
  • आधी एन्डोमेट्रिओसिसचा त्रास असणे
  • संततिनियमनाची शस्त्रक्रिया झालेली असणे

बीजवाहिनी मध्ये गर्भधारणा झालेली असल्यास लगेच वैद्यकीय मदतीचे गरज भासते आणि अशी गर्भधारणा पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिली जात नाही. अल्ट्रासाऊंड करून अंड्यांचे रोपण गर्भाशयात झाले आहे किंवा कसे हे तुमचे स्त्रीरोगतज्ञ तपासून पाहतील.

बीजवाहिनी मध्ये होणारी गर्भधारणा

. गर्भपात

काही वेळा पहिल्या तिमाहीमध्ये ओटीपोटात दुखणे म्हणजे गर्भपाताचे लक्षण असू शकते. गर्भपात साधारणपणे गर्भधारणेच्या १३ व्या आठवड्यापर्यंत दिसून येतो आणि त्याचे प्रमाण १५२०% इतके असते.

गर्भधारणेच्या शक्यतेची खालील लक्षणे आढळून येतात:

  • पाठीत खूप दुखणे.
  • प्रत्येक १५२० मिनिटांनी कळा येणे.
  • पेटके येऊन किंवा त्याशिवाय खूप रक्तस्त्राव होणे.
  • रक्तस्त्राव किंवा हलके डाग आणि सौम्य किंवा तीव्र स्वरूपाचे पेटके येणे.
  • योनीमार्गातून रक्ताच्या गुठळ्या किंवा टिश्यू सारखे जाणे.

. अकाली प्रसूती

जर गर्भवती स्त्रीला ३७ आठवड्यांच्या आधी नियमितपणे कळा जाणवत असतील तसेच सतत पाठ दुखत असेल तर अकाली प्रसूतीची शक्यता असते. अकाली प्रसूतिकळा गर्भधारणेच्या २० व्या आणि ३७ व्या आठवड्यादरम्यान जाणवतात. ह्या आठवड्यांदरम्यान कळांमुळे श्रोणीच्या भागात किंवा ओटीपोटात वेदना जाणवतात. ह्या कळांनंतर योनीमार्गातून रक्तस्त्राव सुद्धा होतो. जर ह्या कालावधीत ओतपोटात दुखत असेल तर स्त्रीने ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

. नाळ

गर्भधारणेचा कालावधी पूर्ण होण्याआधी जेव्हा नाळ गर्भाशयापासून वेगळी होते तेव्हा त्यास इंग्रजीमध्ये ‘Placental disruption’ असे म्हणतात. ह्यामुळे बाळाच्या जीवाला धोका पोहोचतो कारण नाळेतून बाळाला ऑक्सिजन आणि पोषणाचा पुरवठा होत असतो. हे साधारणपणे तिसऱ्या तिमाहीदरम्यान होते आणि २०० पैकी एका बाळामध्ये झालेले ते आढळते. ज्या गर्भवती महिलांना हा त्रास झालेला असतो त्यांना जास्त धोका असतो तसेच ज्या स्त्रियांना उच्चरक्तदाब, प्री क्लॅम्पसिया आणि पोटाचा त्रास असतो त्यांना सुद्धा ह्याचा धोका असतो.

गर्भाशयापासून नाळ वेगळी होण्याची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे:

  • सतत आणि तीव्र पोटदुखी
  • बऱ्याच काळासाठी गर्भाशय घट्ट होणे
  • रक्तमिश्रित द्रव वाहणे किंवा अकाली गर्भजल पिशवी फुटणे
  • रक्ताचे अंश असलेला पातळ स्त्राव
  • पोट मऊ होणे

नाळ वेगळी झाल्यावर बऱ्याच स्त्रियांना प्रसूतीकळा सुरु होतात आणि अशावेळी तात्काळ सिझेरियन करून बाळाला जन्म दिला जातो. जर नाळ थोडी सैल झाली असेल तर डॉक्टर्स गर्भधारणा चालू ठेवण्याचा सल्ला देतात किंवा प्रसूती प्रेरित केली जाते किंवा नॉर्मल प्रसूती केली जाते.

. प्रीक्लेम्पसिया

ही स्थिती ५% स्त्रियांमध्ये आढळते. गर्भधारणेच्या २०व्या आठवड्यांनंतर प्रीक्लेम्पसिया

होतो आणि ह्यामध्ये उच्चरक्तदाबाचा त्रास होतो तसेच लघवीमध्ये प्रथिने आढळतात. ह्यामुळे बाळाची वाढ मंदावते कारण उच्चरक्तदाबामुळे गर्भाशयातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे गर्भाशयाकडे ऑक्सिजन आणि पोषणमूल्यांचा प्रवाह कमी होतो. ह्यामुळे नाळ गर्भाशयापासून विलग होण्याची सुद्धा शक्यता असते.

गंभीर स्वरूपाच्या ह्या स्थितीत खालील लक्षणे आढळतात :

  • पोटाच्या उजव्या बाजूला खूप दुखते
  • पोटाच्या वरच्या बाजूला दुखणे
  • मळमळ
  • डोकेदुखी
  • सूज
  • दृष्टीमध्ये समस्या

गर्भधारणेच्या २० आठवड्यांनंतर बरेच डॉक्टर्स किंवा स्त्रीरोगतज्ञ गर्भवती महिलेचा रक्तदाब तपासून पाहतात, त्यामुळे काही असामान्य असेल तर त्याचे निदान होते.

. मूत्रमार्गाचा संसर्ग

१०% गर्भवती महिलांमध्ये त्यांच्या गर्भारपणात मूत्रमार्गाचा संसर्ग झालेला आढळतो. प्राथमिक अवस्थेतील निदान झाल्यास तो प्रतिजैविकांनी बरा होतो परंतु जर दुर्लक्ष केले तर त्यामुळे किडनीला गंभीर संसर्ग होतो आणि त्यामुळे अकाली प्रसूतीची शक्यता वाढते

मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्यावर आढळणारी सर्वसामान्य लक्षणे :

  • ओटीपोटात दुःखणे
  • लघवी करताना त्रास आणि जळजळ होणे
  • सतत लघवीला जावेसे वाटणे
  • लघवीला वास येणे
  • जननेंद्रियाच्या भागात अस्वस्थता वाटणे
  • सतत ताप, थंडी आणि घाम येणे
  • बारगडीखालील कमरेचा भाग दुखणे

बरेच डॉक्टर्स आणि स्त्रीरोगतज्ञ लघवीमध्ये जिवाणू तर नाहीत ना हे बघण्यासाठी नियमित लघवीची तपासणी करतात, त्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होतो आणि प्राथमिक अवस्थेतील संसर्ग हा प्रतिजैविकांनी बरा होतो.

. अपेंडिसायटिस

गर्भधारणेदरम्यान अपेंडिसायटिसचे निदान होणे अवघड असते. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे जेव्हा गर्भाशय विकसित होते तेव्हा अपेंडिक्स वरती खेचले जाते आणि वाढणाऱ्या गर्भाशयाचा दाब त्यावर पडतो, त्यामुळे काही वेळा त्याचे निदान होत नाही.

गर्भवती महिलेला अपेंडिसायटिस झाल्यास त्याची लक्षणे खालीलप्रमाणे

  • पोटाच्या उजव्या बाजूस दुखणे
  • भूक न लागणे
  • मळमळ
  • उलट्या

अपेंडिसायटिस

. पित्ताशयातील खडे

गर्भवती स्त्रीमध्ये पित्ताशयात खडे आढळतात. पोटाच्या वरील उजव्या बाजूस हे आढळतात. काही वेळा, हे दुखणे उजव्या हाताच्या खाली पाठीवर जाणवते.

खालील गर्भवती स्त्रियांमध्ये पित्ताशयातील खडे आढळतात:

  • जास्त वजन
  • ३५ वर्षांच्यापेक्षा जास्त वय
  • पित्ताशयात खडे असण्याचा वैद्यकीय इतिहास असणे

गर्भधारणेदरम्यान पोट दुखण्याची इतर काही कारणे

ह्या स्थिती व्यतिरिक्त, खालील काही कारणे आहेत ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान पोट दुखते

  • अन्नातून विषबाधा
  • अन्नपदार्थांविषयी संवेदनशीलता
  • गर्भाशयाची वाढ
  • मूत्रपिंडातील खडे
  • कावीळ
  • पित्ताशय आणि स्वादुपिंडातील दोष आणि त्यामुळे स्वादुपिंडात होणारे खडे
  • गर्भाशयातील गाठी, ज्या गर्भधारणेदरम्यान वाढतात
  • पचनास अडथळे, तिसऱ्या तिमाहीमध्ये जास्त आढळतात

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात पोटात येणारे पेटके

बऱ्याच स्त्रियांना गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात पोटात पेटके येतात. सौम्य प्रमाणात पेटके येणे ठीक आहे आणि ते काळजीचे कारण नसते. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात पोटात पेटके येण्याची कारणे खाली दिली आहेत:

  • शारीरिक संबंध आल्यानंतर पेटके येऊ शकतात.
  • गर्भाशयाच्या भिंतींमध्ये भ्रूणाचे रोपण होत असताना स्त्रीला थोडा रक्तस्त्राव होऊ शकतो.
  • १२ आठवड्यांनंतर, विशेषकरून उभे राहिल्यावर, शरीराला ताण देताना किंवा शरीराच्या हालचालीदरम्यान ओटीपोटाच्या दोन्ही बाजूला तीव्र वेदना होऊ शकतात. गर्भाशयाला जोडले गेलेल्या अस्थिबंधाला ताण बसल्यामुळे असे होते.

जर तुम्हाला गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात जर पोटात पेटके येत असतील तर तुमच्या स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

गर्भधारणेदरम्यान पोटदुखीवर उपाय

जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुमचे डॉक्टर किंवा स्त्रीरोगतज्ञांशी त्वरित संपर्क साधा. तथापि, जर दुखणे सौम्य असेल तर तुम्ही खालील वैद्यकीय उपचार घरी करू शकता.

  • जर हे दुखणे सरावकाळांमुळे असेल तर थोडा वेळ झोपून राहिल्यास आराम मिळू शकेल
  • कोमट पाण्याने अंघोळ केल्यास ओटीपोटातील भागाचे दुखणे किंवा पेटके कमी होतील
  • गरम पाण्याची बाटली किंवा पिशवी दुखणाऱ्या भागावर ठेवल्यास दुखण्यापासून आराम मिळू शकेल

तसेच, तुम्ही पोटदुखीपासून सुटका करण्यासाठी खालील उपाय करून बघू शकता

  • विशेषकरून पहिल्या तिमाहीमध्ये हलके व्यायाम प्रकार जसे की योगा, स्ट्रेचिंग केल्यास पोटात वायू होण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल. तसेच तज्ञांशी बोलून तुम्ही तुम्हाला योग्य असतील असे व्यायामप्रकार शिकू शकता
  • दिवसभरात भरपूर पाणी प्या. निर्जलीकरणामुळे सराव कळा येऊ शकतात
  • थोडे आणि वारंवार खात रहा. तंतुमय पदार्थानी समृद्ध आहार घ्या उदा: भाज्या आणि फळे
  • वारंवार लघवीला जा आणि मूत्राशय रिकामे ठेवा. लघवीला जाण्याचे टाळू नका.
  • कधीतरी अचानक खूप हालचाल करण्यापेक्षा सतत उठबस करण्याची सवय ठेवा त्यामुळे स्नायू आखडणार नाहीत

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधाल

जर तुम्हाला गर्भधारणेच्या कुठल्याही टप्प्यावर खालील लक्षणे आढळली तर ते गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा

  • लघवी करताना रक्त येणे किंवा जळजळ होणे
  • गर्भधारणेचे १२ आठवडे होण्याच्या आधी पोट दुखणे
  • गर्भधारणेच्या प्राथमिक टप्प्यात योनीमार्गातून रक्त येणे किंवा हलके डाग पडणे
  • एका तासात ४ पेक्षा जास्त कळा येणे
  • तीव्र आणि सहन होणार नाही अशी पोटदुखी
  • तीव्र डोकेदुखी
  • सारखी उलटी होणे किंवा ताप
  • तोंड, पाय किंवा हाताला सूज येणे
  • योनीमार्गातून असामान्य स्त्राव

काही वेळा, ही लक्षणे गर्भधारणेशी निगडित नसतात तर इतर वैद्यकीय समस्येमुळे असतात. उदा: अंडाशयामध्ये सिस्ट, किडनीच्या समस्या, मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा पित्ताशयाच्या समस्या. जरी पोटात पेटके येणे ही खूप काळजी करण्याजोगी गोष्ट नसली तरी, जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल आणि तो सहनशक्तीच्या पलीकडचा असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article