In this Article
तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाला आता अधिकाधिक शब्द समजू लागले आहेत. ‘तुझे नाक कुठे आहे?’ किंवा ‘तुझे डोळे कुठे आहेत?’ असे प्रश्न विचारलेले त्याला आवडतील. त्याला कदाचित ह्या प्रश्नांची अचूक उत्तरे देता येणार नाहीत परंतु त्याला हा खेळ आवडेल. ह्या टप्प्यावर, बाळाचा मेंदू देखील क्रम आणि खेळ ओळखण्यास सुरवात करेल आणि तो सभोवतालच्या वातावरणाचा अधिकाधिक शोध घेईल. ह्या टप्प्यावर तुमचे बाळ जास्तीत जास्त हालचाल करत असल्याने ह्या कालावधीत बाळाला दुखापत होण्याची जास्त शक्यता असते. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी उचलून ठेवण्यात आणि बाळापासून दूर ठेवण्यात व्यस्त असाल. तुमचे उत्साही बाळ कशावर तरी चढून किंवा ओढून त्या वस्तू घेतील त्यामुळे तुम्ही सदैव बाळावर लक्ष ठेवा!
तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाचा विकास
रांगत असताना कशाचा तरी आधार घेऊन तुमच्या बाळाला चालताना पाहणे आश्चर्यकारक आहे आणि ते ह्या टप्प्यापासून सुरु होईल. जेव्हा बाळ स्वतंत्रपणे चालण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते अनेकदा अडखळते आणि पडते. बाळाची काही पावले डळमळीत असू शकतात. परंतु बाळ सतत त्याच्या शरीराची स्थिती, तोल आणि स्नायूंची ताकद टिकवून ठेवते. ४७ व्या आठवड्यात बाळाला त्याच्या खेळण्यांपेक्षा मोबाईल फोन, रिमोट कंट्रोल किंवा कटलरी यांसारख्या गोष्टी आवडण्याचा कल वाढेल. ह्याचे कारण म्हणजे त्याने तुम्हाला ह्या वस्तू वापरताना पाहिले असेल आणि त्याला तुमचे अनुकरण करावेसे वाटेल. तुमचे बाळ एक वर्षाचे होताना त्याचे वजन थोडे कमी होऊ लागेल. कारण बाळ आता खायला त्रास देऊ लागते तसेच जेवणाच्या वेळी इकडे तिकडे पळत असते. बाळ जर झोपताना पॅसिफायर वापरत असेल तर तो सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याऐवजी तुम्ही बाळासाठी एखादे नवीन खेळणे किंवा ब्लॅंकेट आणू शकता.
आणखी वाचा: तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
४७ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे
४७ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे काही टप्पे खाली दिलेले आहेत
- तुमचे बाळ आता स्वतःची खेळणी ओळखू लागेल आणि विशिष्ट खेळण्यांसाठी प्राधान्य दर्शवेल.
- तुमचे बाळ त्याच्या हातांनी सगळ्या वस्तू उचलू लागेल.
- तुमचे बाळ स्वतंत्रपणे उभे राहून चालू लागेल.
- तुमचे बाळ ‘ममा‘ आणि ‘पप्पा‘ म्हणू शकेल.
- तुमचे बाळ आणखी काही वेगळे शब्द बोलू लागेल.
- तुमचे बाळ खेळण्यांचा बॉक्स किंवा कंटेनर रिकामा करेल किंवा भरेल.
- जेव्हा तुम्ही बाळाचे हात धरून त्याला कपडे घालाल तेव्हा बाळ सहकार्य करेल. सहकार्य करण्याची संकल्पना बाळ आता आत्मासात करू लागेल.
- तुमच्या बाळ काही गोष्टींसाठी स्वतःचे वेगळे शब्द वापरेल.
बाळाला आहार देणे
तुमच्या बाळाच्या आहारात आता घन पदार्थ अधिक महत्त्वाचे असतील, परंतु बाळ त्याच्या गरजेनुसार स्तनपान करत राहील. ह्याला इंग्रजी मध्ये ‘बेबी– लेड ब्रेस्टफीडिंग‘ असे म्हणतात. जर तुम्ही दुस–या वर्षीही बाळाला स्तनपान देणार असाल तर तुम्हाला तुमच्या बाळाच्या आहार पद्धतीत बदल करण्याची गरज नाही. पहिल्या वर्षात, आईचे दूध हे तुमच्या बाळासाठी पोषणाचा मुख्य स्त्रोत असतो, परंतु बाळ जसजसे घन पदार्थ खाण्यास सुरुवात करते तसे फक्त बरे वाटावे म्हणून बाळ स्तनपान घेते. तुमच्या बाळाला अन्न, हायड्रेशन, आराम आणि रोगप्रतिकारक समर्थनाचा स्रोत म्हणून स्तनपानाचा फायदा होत राहील. बाळ मोठे झाल्यानंतर फक्त संक्रमणांपासून लढा देण्यासाठी स्तनपानाचा उपयोग होतो. आईच्या दुधातील पोषक घटकांमुळे स्तनपान करणा–या बालकांना आणि लहान मुलांना आजारी पडण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाला स्तनपान थांबवण्याची घाई नसेल, तर तुम्ही तुमची इच्छा असेल तोपर्यंत स्तनपान चालू ठेवू शकता.
आणखी वाचा: ११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय
बाळाची झोप
शेवटी, ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाच्या झोपेचा त्रास कमी होईल आणि बाळाच्या झोपेच्या विशिष्ट वेळा ठरतील. बाळ दिवसापेक्षा रात्री अधिक झोपायला सुरुवात करेल. हा बदल वेगाने होणार नाही, तुमच्या बाळाची झोपेची पद्धत सुरुवातीला बदलेल. बाळ अधिक सहजपणे झोपेल आणि पुन्हा जागे होण्यापूर्वी जास्त वेळ झोपेल. तुमच्या बाळाच्या नवीन पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या दिवसाचे प्लॅनिंग करू शकता. तुमचे बाळ जर अजूनही चालायचे शिकत असेल, तर तुमच्या झोपेमध्ये अजूनही थोडा काळ व्यत्यय येणे सुरु राहणार आहे. जसजसे बाळ चालायला लागते, तसतसे शरीराला पोषणाची गरज जास्त असते. हिमोग्लोबिनच्या कमी पातळीचा बाळाला त्रास होऊ शकतो. दिवसभर सक्रिय राहिल्यामुळे बाळाला रात्री स्नायूंचा थकवा जाणवतो आणि वेदना अधिक जाणवतात. अशावेळी बाळाच्या हातापायांना मसाज करा आणि हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर लोह सप्लिमेंट सुरू करा.
तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी टिप्स
तुम्ही तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाची खालील प्रकारे काळजी घेऊ शकता:
- तुमच्या बाळाला मदत करायला शिकवा. बाळाला ‘कृपया‘ आणि ‘धन्यवाद‘ म्हणजे काय आणि ते कधी वापरायचे ते शिकवा. बाळाला सुरुवातीला कल्पना येत नसेल, पण हळूहळू येईल.
- तुमच्या बाळाशी बोलत रहा. वस्तू आणि नावे यांच्यात संबंध निर्माण करा. तुमच्या बाळाची शब्दसंग्रह विकसित करण्याची हीच वेळ आहे.
- पायऱ्या मोजा किंवा जेव्हा तुम्ही खरेदीला जाता तेव्हा तुमच्या बाळाला फळे आणि भाज्यांची नावे सांगा जेणेकरून बाळ त्या भाज्या उचलू शकेल.
- ‘तुला कुठला ड्रेस घालायचा आहे?’ किंवा ‘तुला कुठल्या खेळण्यासोबत खेळायचे आहे?’ असे त्यांचे मत वेळोवेळी विचारा. जर बाळाला प्रश्न समजला तर बाळ त्याची आवड सांगेल.
- तुमच्या बाळासाठी ओले, कोरडे, गरम आणि थंड या संकल्पना वापरून पहा आणि शिकवा. त्यामुळे बाळाच्या संवाद कौशल्य सुधारण्यास मदत होईल.
चाचण्या आणि लसीकरण
सहसा, डॉक्टर या महिन्यात बाळांची नियमित वैद्यकीय तपासणी करत नाहीत.
१. चाचण्या
तुमच्या बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन, लोह आणि शिसे यांची पातळी सामान्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तसेच बाळामध्ये ऍनिमिया किंवा इतर कोणत्याही विकाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टर त्याची रक्त तपासणी करू शकतात.
२. लसीकरण
ह्या वयात, जपानी एन्सेफलायटीस, हिपॅटायटीस ए, व्हॅरिसेला आणि इन्फ्लूएंझा, ह्या लशी वैकल्पिक आहेत, बालरोगतज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्या घ्याव्यात.
खेळ आणि उपक्रम
तुम्ही तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळासोबत खालील खेळ आणि क्रियाकलाप खेळू शकता:
- तुम्ही तुमच्या बाळाला अनब्रेकेबल प्लेट्स आणि भांडी देऊ शकता म्हणजे बाळ त्यांच्यासोबत आनंदाने खेळेल.
- जुन्या बरण्यांमध्ये पास्ता किंवा बीन्स भरा, बरण्या घट्ट बंद करा. आणि त्या तुमच्या बाळाला द्या. बाळ ह्या बरण्या हलवून आवाज करू शकते.
- बाळ उचलू शकेल असा वाळूने भरलेला एक छोटा ट्रे आणि छोटी खेळणी बाळाला द्या. असे केल्याने तिच्या निपुणतेच्या कौशल्यांना मदत होईल.
- हातापायाच्या बोटांनी ‘दिस लिटल पिगी वेंट टू मार्केट’ खेळा. पॅटर्न आणि प्रेडिक्टेबिलिटीचा समावेश असलेल्या ह्या खेळांमुळे बाळाचे समन्वय आणि मोटर कौशल्ये विकसित करण्यात मदत होऊ शकते.
- तुमच्या बाळासोबत संगीतावर नाचा आणि गा. ह्या वयातील बाळांना त्यांचे शरीर गाण्याच्या तालावर हलवणे आवडते.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
खालील कारणांसाठी तुम्ही तुमच्या ४७–आठवड्याच्या बाळाच्या विकासासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता:
- मोठ्या मुलांचे डोके जड असते आणि त्यामुळे जेव्हा ते चालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते पडण्याची जास्त शक्यता असते. यामुळे तोंडाला दुखापत होऊ शकते. जर तुमच्या बाळाच्या तोंडाला मार लागला आणि रक्तस्त्राव होत असेल तर बाळाला शांत करा आणि बाळाला लागले तर नाही ना ते तपासून पहा. जर दुखापत किरकोळ असेल आणि रक्तस्त्राव त्वरीत थांबला तर, थंड कॉम्प्रेस वापरा आणि वेदना कमी करणारे औषध बाळाला द्या. जर रक्तस्त्राव थांबत नसेल किंवा दात तुटला असेल, तर तुमच्या बाळासाठी डॉक्टर/दंतवैद्याचा सल्ला घ्या.
- जर तुमच्या बाळाला २४ तासांपेक्षा जास्त काळ टिकणारी एखाद्या गोष्टीवर ऍलर्जीची प्रतिक्रिया दिसून आली किंवा जर तिच्या चेहऱ्यावर, पायांवर किंवा हातावर सूज आली असेल, तिला ताप असेल, उलट्या झाल्या असतील किंवा पुरळ असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- जर तुमचे बाळ कुठेतरी खाली पडले आणि तुम्हाला तिच्या डोक्यावर किंवा शरीराच्या इतर भागावर जखम दिसली आणि काही दिवसांनंतरही तिला वेदना होत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या बाळाला मुका मार किंवा कोणतेही संभाव्य फ्रॅक्चर आहे की नाही हे डॉक्टर तापासून बघतील.
- ह्या अवस्थेत, तुमच्या बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. अशावेळी, तुमच्या बाळाच्या आहारात सफरचंद, भाज्या, ओटचे जाडे भरडे पीठ किंवा वाळलेल्या जर्दाळू इत्यादींचा समावेश करू शकता. तुम्ही दिवसातून एकदा सिप्पी कपमध्ये प्रुन ज्यूस देखील देऊ शकता.
काळजी करू नका, तुमचे बाळ आता ४७ आठवड्यांचे झाले आहे. तुमचे बाळ आता ज्या टप्प्यावर आहे तो टप्पा बाळासाठी खूप रोमांचक आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या लहान बाळासाठी, आतापासून आयुष्य अधिक मजेदार होईल! म्हणून, ह्या काळात आपल्या बाळासोबत आनंद घ्या!