In this Article
मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असल्याचे म्हटले जाते. ही सामूहिक ऐतिहासिक आणि सामाजिक विचारसरणी स्त्रियांमध्ये जोपासली जाते. परंतु आता आर्थिक स्थैर्य मिळवणे, करिअर, इतर शहरांमध्ये/देशांमध्ये जाणे इत्यादी वाढत्या प्राधान्यांमुळे हा विचार बाजूला टाकला जाऊ लागला आहे. जरी पालकत्व जगातील सर्वात महत्वाची भूमिका असली तरी सुद्धा काही जोडपी आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर पालकत्वाची निवड करू शकतात शकतात, किंवा कदाचित आयुष्यात कधीही ते पालक होऊ इच्छित नाहीत.
एक स्त्री अनेक कारणांमुळे गर्भारपण थांबवू शकते: कदाचित ती स्वतः त्यासाठी तयार नसेल किंवा गर्भारपणाचे तिचे नियोजन नसेल. तिचे वय लहान असणे, अथवा आर्थिक वा वैवाहिक संकटे असणे अशीही कारणे त्यामागे असू शकतात. कदाचित तिच्या तब्येतीच्या समस्यांमुळे ती निरोगी, पूर्ण–मुदतीच्या गर्भधारणेसाठी अनुकूल नसेल. गर्भपाताचा नेमका अर्थ काय आहे आणि आपल्या गरोदरपणाच्या टप्प्यावर अवलंबून गर्भपाताच्या विविध पद्धती कोणत्या असू शकतात यावर एक नजर टाकूया.
गर्भपात म्हणजे काय?
गर्भपात म्हणजे गर्भाशयातून गरोदरपणास कारणीभूत असलेले घटक (गर्भ, गर्भाचा पडदा, गर्भधारणेचे ऊतक आणि प्लेसेंटा) काढून टाकले जातात. हा गर्भपात वैद्यकीय किंवा नैसर्गिकरित्या होऊ शकतो. तो अचानक देखील होऊ शकतो आणि त्यास इंग्रजीमध्ये मिसकॅरेज असे म्हणतात.
गर्भपात प्रक्रियेचे प्रकार
गरोदरपणाच्या तिमाही वर आधारित, गर्भपात प्रक्रियेचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते:
पहिल्या तिमाहीत गर्भपात प्रक्रिया (१ – ३ महिने)
दुसऱ्या तिमाहीत गर्भपात प्रक्रिया (४–६ महिने)
तिसऱ्या तिमाहीत गर्भपात प्रक्रिया (७–९महिने)
वापरलेल्या तंत्राच्या आधारे, या प्रक्रियांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते:
- वैद्यकीय गर्भपात प्रक्रिया: गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रक्रियांमध्ये, गर्भारपणाच्या समाप्तीसाठी काही औषधे, हार्मोन्स इत्यादी, इंजेक्शन किंवा गोळ्याच्या स्वरूपात वापरली जातात. मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टोल ही सामान्यपणे गर्भपातासाठी वापरली जाणारी दोन औषधे आहेत आणि ती आरयु ४८६– गर्भपाताची गोळी किंवा मिफेप्रेक्स म्हणून उपलब्ध आहेत. या पद्धती सहसा पहिल्या ते दुसऱ्या तिमाहीच्या गर्भपातासाठी वापरल्या जातात.
- शस्त्रक्रियेद्वारे गर्भपात: मॅन्युअल व्हॅक्यूम ऍस्पिरेशन, डायलेशन आणि क्युरेटेज, आणि डायलेशन आणि इव्हॅक्युएशन ह्या पद्धती दुसऱ्या तिमाहीतील गर्भपातासाठी किंवा अयशस्वी वैद्यकीय गर्भपातासाठी वापरले जातात.
आता, तिमाहीनुसार गर्भपाताची प्रक्रिया पाहू
पहिल्या तिमाहीतील गर्भपात प्रक्रिया
पहिल्या तिमाहीत वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया तंत्राने गर्भपात केला जाऊ शकतो. तथापि, सुरुवातीच्या टप्प्यात किंवा नऊ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याच्या पद्धती जवळजवळ नेहमीच वैद्यकीय असतात.
गर्भपात प्रवृत्त करण्यासाठी साधारणपणे दोन पद्धती वापरल्या जातात:
१. मेथोट्रेक्झेट (एमटीएक्स) आणि मिसोप्रोस्टॉल कॉम्बिनेशन
गर्भपाताची ही वैद्यकीय पद्धत गर्भधारणेच्या पहिल्या ७ आठवड्यांत केली जाते. मेथोट्रेक्झेट हे कर्करोगासाठीचे औषध आहे, हे औषध कर्करोगाच्या पेशींचा गुणाकार थांबवते. गर्भपातासाठी घेतल्यावर, ते गर्भाच्या पेशींना गुणाकार थांबवेल. मिसोप्रोस्टोल एक प्रोस्टाग्लॅंडिन आहे, हे औषध प्रसूती कळाना प्रेरित करते , परिणामी गर्भधारणेच्या ऊतींना बाहेर काढले जाते (ते गरोदरपणाच्या पहिल्या ८ आठवड्यांतील गर्भधारणेचे उत्पादन आहे)
२. मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल कॉम्बिनेशन
पहिल्या १० आठवड्यांत गर्भारपण समाप्त करण्यासाठी वापरली जाणारी ही सर्वात सामान्य वैद्यकीय पद्धत आहे. मिफेप्रिस्टोन हे एक रसायन आहे. हे रसायन प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर ब्लॉकर म्हणून काम करते. (प्रोजेस्टेरॉन हे एक अतिशय महत्वाचे संप्रेरक आहे. हे संप्रेरक गरोदरपणाची आवश्यक असते) हे औषध प्रोजेस्टेरॉनचे रिसेप्टर्स ब्लॉक करून गर्भावस्थेतील प्रोजेस्टेरॉनचा प्रभाव कमी करते, आणि म्हणूनच गर्भाशयाला प्रोस्टाग्लॅंडिनच्या प्रभावांना संवेदनशील बनवते, आणि ते मिसोप्रोस्टोलद्वारे प्रदान केले जाते. मिफेप्रिस्टोन नंतर काही तासांनी हे औषध घेतले पाहिजे.
पहिल्या तिमाहीच्या शेवटी किंवा वैद्यकीय गर्भपात अपयशी झाल्यास, गर्भपातासाठी खालील शस्त्रक्रिया वापरल्या जाऊ शकतात:
१. मॅन्युअल ऍस्पिरेशन
मॅन्युअल व्हॅक्यूम ऍस्पिरेशन किंवा एमव्हीए, गरोदरपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात गर्भारपणाच्या समाप्तीसाठी वापरले जाणारे शस्त्रक्रिया तंत्र आहे. गर्भाला गर्भाशयातून बाहेर काढण्यासाठी सक्शन ट्यूबचा वापर केला जातो. यात वेदना कमी करण्यासाठी स्थानिक भूल दिली जाते.
२. डायलेशन अँड क्यूरेटेज (डी अँड सी)
क्युरेट किंवा स्टीलच्या बनलेल्या चमच्याच्या सहाय्याने, गर्भाशयाच्या पोकळीतून गर्भाचे घटक बाहेर काढले जातात, त्यानंतर नाळ काढून टाकली जाते. ह्या तंत्राचा वापर ३ महिन्यांच्या गर्भारपणाच्या समाप्तीसाठी केला जाऊ शकतो आणि ह्या पद्धतीमध्ये एमव्हीए च्या तुलनेने जास्त रक्त जाऊ शकते.
दुसऱ्या तिमा हीतील गर्भपात प्रक्रिया
शस्त्रक्रिया पद्धती
१. डायलेशन आणि एव्हक्युएशन (डी अँड ई)
डी अँड ई प्रक्रिया डायलेशन आणि क्यूरेटेज (डी अँड सी) सारखीच असते आणि साधारणपणे २४–आठवड्यांपर्यंत दुसऱ्या–तिमाहीच्या गर्भपातासाठी ही पद्धती वापरली जाते. बाळ खूप लहान असल्यामुळे ही पद्धती वापरली जाते. गर्भाशयाचे मुख उघडून आणि गर्भाशयातील सामग्री, म्हणजेच गर्भ आणि नाळ, एस्पिरेटर किंवा फोर्सेप वापरून काढली जाते. राहिलेली सामग्री व्हॅक्युमच्या साहाय्याने काढली जाते.
२. इन्स्टिलेशन पद्धती
जरी शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय पद्धतींपेक्षा रासायनिक गर्भपात पद्धती कमी सामान्य असली तरीसुद्धा, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (५ ते ६ महिन्यांच्या गर्भपातासाठी) ही पद्धती वापरली जाऊ शकते. इंस्टिलेशन पद्धतीमध्ये गर्भाशयाच्या मुखातून गर्भजल पिशवीमध्ये काही औषधे किंवा रसायनांचे इंजेक्शन सोडले जाते त्यामुळे गर्भाचा मृत्यू होतो आणि त्यानंतर गर्भ गर्भाशयातून बाहेर काढला जातो.
१. मीठ विषबाधा (४ महिन्यांपेक्षा मोठ्या बाळांसाठी)
ही पद्धती “सलाईन अम्नीओसेंटेसिस” किंवा “हायपरटोनिक सलाईन गर्भपात” म्हणूनही ओळखली जाते. ही पद्धत सामान्यतः गरोदरपणाच्या १६ आठवड्यांनंतर वापरली जाते. मिठाचे द्रावण गर्भाशयात सोडले जाते आणि ते बाळासाठी विषारी असते.
२. युरिया (५–८ महिने)
जर हायपरटोनिक सलाईन धोकादायक असेल तर ऑक्सिटोसिन किंवा प्रोस्टाग्लॅंडिन इत्यादींनी पूरक असे युरिया फॉर्म्युलेशन वापरल्यास गर्भपात सुलभ होऊ शकतो.
३. प्रोस्टाग्लॅंडिन (४–९ महिने)
प्रोस्टाग्लॅंडिन हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे पदार्थ आहेत जे सामान्यतः बाळाच्या जन्मासाठी आवश्यक असतात. प्रोस्टाग्लॅंडिनचे इंजेक्शन गर्भाशयाचे आकुंचन किंवा प्रसूतीच्या वेदनांना उत्तेजन करेल आणि त्यामुळे गर्भपात होईल. ही पद्धत सामान्यतः दुसऱ्या तिमाहीत वापरली जाते. ५–६ महिन्यांचे गर्भारपण संपवण्यासाठी ही पद्धती वापरली जाते.
तिसऱ्या तिमाहीतील गर्भपाताची प्रक्रिया
गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाचा महत्वपूर्ण शारीरिक विकास होतो. गरोदरपणाच्या या अवस्थेत गर्भपात दुर्मिळ आहे. तथापि, जर बाळामध्ये काही विसंगती आढळली, किंवा मज्जातंतू किंवा विकासात्मक समस्या किंवा अनुवांशिक रोग ह्याचे निदान उशिरा झाले तर तिसऱ्या तिमाहीच्या गर्भपाताची आवश्यकता असू शकते. यासाठी केवळ शस्त्रक्रिया पद्धती लागू केली जाऊ शकते.
१. आंशिक–जन्म गर्भपात (५–८ महिने)
५ ते ८ महिन्यांच्या गर्भवती महिलांमध्ये गर्भपातासाठी हे तंत्र वापरले जाते. सोनोग्राफीची मदत घेऊन फोर्सेपने बाळाला जन्मकालव्यातून बाहेर काढले जाते. जर बाळाचा आकार मोठा असेल आणि बाळ अडकले असेल तर मेंदूची सामग्री बाहेर काढली जाऊ शकते.
२. हिस्टेरोटॉमी (६–९ महिने)
गर्भाशयाची पोकळी शस्त्रक्रियेने उघडली जाते आणि गर्भ, नाळ आणि त्यातील सामग्री काढून टाकली जाते. ही प्रक्रिया सिझेरिअन प्रक्रियेसारखी आहे. बाळाचा पोटात मृत्यू झाल्यास किंवा जन्मजात विकृत गर्भांच्या बाबतीत ही पद्धती अवलंबिली जाते.
नैसर्गिक गर्भपात पद्धती
जेव्हा एखादी गर्भवती स्त्री डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ओव्हर–द–काउंटर औषधे किंवा गैर–औषधीय पदार्थ वापरून तिची गर्भधारणा संपवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तो गर्भपात स्वयं–प्रेरित गर्भपात म्हणून ओळखला जातो . डॉक्टर गर्भपातास प्रवृत्त करण्यासाठी वैद्यकीय तंत्र वापरू शकतात आणि त्यास इन क्लिनिक गर्भपात प्रक्रिया असे म्हणतात. सुरुवातीच्या महिन्यांत स्वयं–गर्भपात पद्धती सोप्या जातात आणि अधिक यशस्वी होतात. तथापि, जर त्या वापरल्या गेल्या नाहीत, किंवा गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यांत ह्या पद्धतींचा अवलंब केला तर, स्त्रीच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आणि गंभीर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. ह्या पद्धती बहुतेकवेळा नीट उपयोगी पडत नाहीत म्हणून ह्या पद्धती टाळणे चांगले आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय गर्भपाताची निवड करा.
नैसर्गिकरित्या गर्भपात किंवा गर्भपात प्रवृत्त करण्याच्या काही सामान्य पद्धती खालीलप्रमाणे आहेत.
टीप: या पद्धती बेकायदेशीर आहेत आणि त्या कधीही वापरल्या जाऊ नयेत. खाली दिलेल्या गोष्टी केवळ माहितीसाठी आहेत, तसे करण्याचा प्रयत्न करू नये.
१. अति शारीरिक श्रम
जड वजन उचलल्याने ओटीपोटावर दाब वाढू शकतो, त्यामुळे गर्भपात होतो.
२. गर्भपात होऊ शकतो अशा उत्पादनांचा वापर
काही पदार्थ आणि उत्पादने जसे मटन मॅरो, वाळलेली मेंदी पावडर, गाजर बियाणे सूप, पपई, व्हिटॅमिन सी समृध्द अन्न इत्यादी खाल्ल्याने गर्भपात होऊ शकतो.
3. ओटीपोटावर मालिश
ओटीपोटावर मालिश किंवा ओटीपोटाच्या भागावर काही शारीरिक आघात झाल्यास गर्भपात होऊ शकतो.
४. तीक्ष्ण किंवा आक्रमक साधनांचा वापर
गर्भाशयात सुया, हुक, सेफ्टी पिन इत्यादी तीक्ष्ण पदार्थ टाकल्याने गर्भाला आघात होऊ शकतो. गर्भाची सामग्री बाहेर येण्यासाठी गर्भाशयाच्या पोकळीत कॅथेटर किंवा व्हॅक्यूम उपकरणे घातली जाऊ शकतात. लक्षात ठेवा की हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक आणि हानिकारक असू शकते.
५. हानिकारक रसायनांचा वापर किंवा डौचिंग
टर्पेन्टाइन ऑइल, इसेन्शिअल ऑईल्स हे योनिमार्गासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे अचानक गर्भपात होऊ शकतो.
गर्भपात केल्याने स्त्रीच्या जीवनावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. ही प्रक्रिया योग्य वेळेत वैद्यकीय देखरेखीखाली केली जाणे आवश्यक आहे. जर एखाद्या स्त्रीला गर्भपात करण्यास प्रवृत्त करण्यासाठी नैसर्गिक किंवा घरगुती उपचारांचा पर्याय निवडायचा असेल तर तिने कोणतीही प्रक्रिया निवडण्यापूर्वी डॉक्टर किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा केली पाहिजे.
स्रोत अणि सन्दर्भ:
आणखी वाचा:
गर्भपातानंतर लैंगिक संबंध ठेवण्याआधी किती वेळ वाट पाहावी?
गर्भपातानंतर गर्भधारणेची शक्यता