Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

गरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

गरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

गरोदर स्त्रीच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बरेच बदल होत असतात. संप्रेरकांचे असंतुलन, वाढणारा पोटाचा आकार, बदलणारी शारीरिक स्थिती आणि हालचाल नसणे यामुळे मानदुखी होऊ शकते. आणि ह्या मानेच्या दुखण्याच्या वेदना पाठ व खांद्यांपर्यंत देखील वाढू शकतात.

गरोदरपणात, पहिल्या तिमाहीत एखाद्या स्त्रीला तिच्या मानेकडील भागात कडकपणा वाटू शकतो आणि गर्भारपणात जसे दिवस पुढे जातात तशा वेदना जाणवतात. मानेचे दुखणे जेव्हा खांदे आणि आजूबाजूच्या स्नायूंपर्यंत पोहोचते तेव्हा अधिक अस्वस्थता जाणवते. यामुळे स्नायू आखडणे, डोकेदुखी, बधिरपणा किंवा अगदी मानेमध्ये सूज सुद्धा येते. बर्‍याच गर्भवती स्त्रियांना असे वाटते की वेदनेतून सुटका होण्याचा कोणताही मार्ग नाही आणि त्यांना ते शांतपणे सहन करावे लागेल. पण ते खरं नाही! काही महिला डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यावर पेनकिलर घेतात पण काही जणींनी घरगुती उपचारांचा प्रयत्न केला आहे. मानेच्या वेदनेचा प्रतिकार करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे घरगुती आणि सोप्या उपायांचा अवलंब करणे. जर तुम्हाला गरोदरपणात मानेमध्ये वेदना होत असतील तर तुम्हाला त्याबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

गरोदरपणात मान दुखण्याची कारणे

गरोदरपणात मानदुखीची काही सामान्य कारणे खाली नमूद केली आहेत.

 • संप्रेरकांमध्ये बदलः गर्भधारणेनंतर गरोदरपणाच्या काळात होणारे संप्रेरकांमधील बदल हे मान दुखीला कारणीभूत ठरू शकतात. संप्रेरकांच्या वाढलेल्या पातळीमुळे मानेचे स्नायू सुस्त होतात आणि यामुळे त्या भागात वेदना होते.
 • स्नायूंवर अत्याधिक दबावः गरोदरपणात, मानेचे अस्थिबंधन वाढू लागतात. पाठीच्या आणि पाठीच्या कण्याच्या स्नायूंवर जास्त दबाव येतो कारण एखाद्या स्त्रीच्या उदरात वाढत्या गर्भाला सामावून घेण्यास सुरुवात होते. यामुळे मानदुखी होते.
 • शारीरिक स्थिती बदल: गर्भवती स्त्रियांना त्यांच्या डाव्या बाजूला झोपायचा सल्ला देण्यात येत असल्याने, शरीराच्या डाव्या भागावर सतत दबाव पडल्याने मानेचे स्नायू घट्ट होतात आणि वेदना होतात.
 • हालचालीचा अभाव: गरोदरपणात दीर्घ कालावधीसाठी एकाच स्थितीत राहिल्यास आपल्या स्नायूंना सूज येते आणि ते कडक होऊ शकतात. तुम्ही गर्भवती असल्यास, तुमच्या स्नायूंना उबदार ठेवण्यासाठी तुम्हाला पुरेशा हालचालींची आवश्यकता आहे. गतीशीलतेचा अभाव असल्यास स्नायू कडक होतात आणि गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात मान दुखू शकते .

गरोदरपणात मानदुखीवर घरगुती उपचार

जर तुम्हाला गरोदरपणात मानदुखीचा त्रास जाणवत असेल तर, डॉक्टरांनी सांगितल्याखेरीज वेदना कमी करणारी किंवा इतर कोणतीही औषधे घेण्याचे टाळा. तथापि, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ह्या वेदनांसोबत जगावे. असे बरेच घरगुती उपचार आहेत जे योग्यरीत्या वापरल्यास मान दुखणे कमी करण्यास मदत करू शकतात. खाली काही सोपे उपचार आहेत ज्यामुळे गरोदरपणात मान, खांदा आणि पाठदुखीपासून मुक्त होण्यास मदत होईल.

 • गरम शेक

शेकण्यामुळे मानदुखी कमी होण्यास काही प्रमाणात मदत होते. एक उबदार कॉम्प्रेस घ्या आणि दररोज मानेच्या वेदना होणाऱ्या भागावर लावा. आवश्यक असल्यास नियमित अंतराने त्याचा वापर करा.

 • थंड शेक

गरम शेक घेण्यासारखेच, बर्फाने शेकण्याने देखील आपल्याला वेदना कमी करण्यास मदत होऊ शकते. फक्त, एक आईसपॅक घ्या आणि मानेच्या दुखऱ्या भागावर ठेवा. ह्यामुळे वेदनांपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळण्यास मदत होईल.

 • उशी बदला

आपल्या डोक्याला आधार देण्यासाठी चुकीची उशी वापरल्यामुळे मान दुखणे आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून एखाद्या चांगल्या, आरामदायक उशामध्ये गुंतवणूक करा, शक्यतो मॅटर्निटी पिलोघ्या. मानेच्या दुखण्यापासून हळूहळू आराम मिळेल. आपल्या गुडघ्यांना आधार देण्यासाठी देखील तुम्ही मॅटर्निटी पिलोवापरू शकता. झोपतानाही स्थिती योग्य राहण्यासाठी उशी आपल्या गुडघ्यात ठेवा.

 • स्ट्रेचिंग करा

स्ट्रेचिंगमुळे गरोदरपणात मान आणि पाठदुखीपासून आराम मिळतो. म्हणून जर आपण गर्भवती असाल तर तुम्ही गरोदरपणासाठी सुरक्षित असलेले स्ट्रेचिंग करा. गर्भवती असताना स्ट्रेचिंग केल्याने स्नायू ताणले जातात आणि त्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो आणि तणाव देखील कमी होऊ शकेल. ताणण्याव्यतिरिक्त, तुम्ही हलका योग आणि गरोदरपणात सुरक्षित असा व्यायाम सुद्धा करू शकता.

स्ट्रेचिंग करा

 • हायड्रोथेरपी वापरुन पहा!

हायड्रोथेरपीमुळे मानदुखीपासून आराम मिळू शकतो. जेव्हा आपण शॉवर घेत असाल तर दुखऱ्या भागावर पाणी पडू द्या. ३ ते ४ मिनिटे मानेवर पाणी पडू द्या. आणखी ६० सेकंदासाठी थंड पाणी पडू द्या. असेच आणखी काही वेळा करत रहा, तुम्हाला बरे वाटेल. गरम पाण्यामुळे रक्ताभिसरण सुलभ होते आणि ताठर स्नायू सैल होतात तर थंड पाण्यामुळे सूज कमी होते. तथापि, ही हायड्रोथेरपी देखरेखीखाली वापरुन पहा!

 • पोहण्याचा प्रयत्न करा!

मानेच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी आपण जलआधारित खेळांमध्येही सामील होऊ शकता. पोहणे मान दुखणे कमी करण्यासाठी चांगले आहे, परंतु पोहणे किंवा इतर पाण्यावर आधारित खेळ खेळण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 • टेनिस बॉल वापरा

आपण वेदना कमी करण्यासाठी आपण टेनिस बॉल वापरू शकता. तुमची पाठ आणि भिंतीच्या दरम्यान मऊ बॉल ठेवा आणि एका बाजूने हळू हळू हलवा आणि इच्छित प्रमाणात दबाव मिळविण्यासाठी आपल्या शरीराचे वजन वापरा.

 • मानेची मालिश करा

आपल्या पतीस किंवा कुटुंबातील एखाद्यास व्यक्तीस मानेची मालिश करण्यास सांगा. मानेची मालिश केल्याने स्नायूंना आराम मिळेल. चांगल्या परिणामांसाठी, गरम पाण्याने आंघोळीनंतर मालिश करा. तुम्ही जन्मपूर्व मसाजची निवड देखील करू शकता. चांगले परिणाम मिळवण्यासाठी लैव्हेंडर तेल, नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने मालिश करण्याचा प्रयत्न करा.

मानेची मालिश करा

मान दुखणे टाळण्यासाठी टिप्स

इंग्रजी मध्ये म्हण आहे ‘Prevention is better than cure’ . म्हणून गरोदरपणात मानदुखीचा त्रास रोखण्याचे काही मार्ग येथे आहेतः

 • चांगला पावित्रा(पोश्चर)ठेवा: वजन वाढल्यामुळे आपल्या मणक्यावर खूप दबाव येईल आणि तुम्हाला मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपण एक सरळ आणि ठाम शरीरस्थिती राखणे आवश्यक आहे. खाली मान घालून बसणे टाळा कारण यामुळे केवळ मानेवर दबाव येईल आणि परिणामी वेदना होतील.
 • आपण आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर पोहणे किंवा इतर जलआधारित व्यायाम करू शकता यामुळे गरोदरपणात मान दुखणे टाळण्यास मदत होईल!
 • गोष्टींकडे पहात असताना नेहमीच डोळ्यांची पातळी राखून ठेवा आणि मान खाली करू नका. स्क्रीनसमोर काम करणार्‍या महिलांसाठी हे महत्वाचे आहे. जर तुम्ही मान खाली केली तर आपल्या मानेवर दबाव येऊन मान दुखू शकते.
 • झोपताना योग्य उशी वापरा. उशी कठोर आणि अस्वस्थ करणारी असेल तर मानेच्या स्नायूंना ताण येऊ शकतो. तर त्यासाठी चांगली उशी घ्या.

गरोदरपणात मानदुखी कमी होण्यासाठी साधे व्यायाम

तुम्ही गरोदरपणात विशेषत: पहिल्या त्रैमासिकात घरी करता येण्याजोगा व्यायाम करून मानेच्या वेदनांचा सामना करू शकता. वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर हे व्यायाम करून पहा. वेदना कायम राहिल्यास, ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.

 • जमिनीवर ताठ बसा आणि पुढे पहा. मग आपले डोके डावीकडे वळवा आणि सुमारे १५ सेकंद या स्थितीत रहा. मग हळूहळू आपले डोके मूळ स्थितीकडे वळवा. मग आपले डोके उजवीकडे वळवा. सुमारे १५ सेकंद ह्या स्थितीत रहा नंतर हळूहळू आपले डोके मूळ स्थितीकडे वळवा.
 • हळू हळू आपल्या हनुवटीस छातीवर टेकवून या स्थितीत पंधरा सेकंद रहा, नंतर आपल्या मूळ स्थितीत परत या. यामुळे आपल्या मानेच्या स्नायूंना आराम मिळेल आणि मानदुखीपासून सुटका होईल.

गरोदरपणात मान दुखणे सामान्य आहे परंतु त्यावर घरगुती उपाय आणि गरोदरपणात सुरक्षित असलेल्या व्यायामाद्वारे उपचार केला जाऊ शकतो. जर वेदना जास्त असेल आणि घरगुती उपचार काम करत नसतील तर घरी कोणतीही तंत्रे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नाही ना हे डॉक्टर सांगू शकतील.

आणखी वाचा:

गरोदरपणातील बधिरता: कारणे आणि उपाय
गरोदरपणात पायांवर सूज येण्याच्या समस्येवर १७ परिणामकारक घरगुती उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article