In this Article
आपण सगळ्यांनी लहानपणी दलिया खाल्लेला आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांना आजही तो खायला आवडतो. आपण गोड किंवा चटपटीत दलिया करतो. दलियाची चव स्वादिष्ट लागते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दलिया लहान मुलांसाठी आरोग्यदायी देखील आहे. परंतु जर तुम्ही नवीन पालक असाल तर लहान बाळाला दलिया द्यावा कि नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर ह्या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. तुम्ही बाळाला दलिया देऊ शकता. खरं तर, तुम्ही तुमच्या लहान बाळाच्या आहारात समाविष्ट करू शकता अशा दलियाच्या बऱ्याच पाककृती आहेत.
व्हिडिओ: लहान बाळांसाठी दलिया – आरोग्यविषयक फायदे
दलिया म्हणजे काय?
दलिया म्हणजे फोडलेला गहू. दलिया बाजरी, गहू किंवा मका ह्यासारख्या वेगवेगळ्या धान्यांपासून बनवता येते. परंतु भारतातील अनेक राज्यांमध्ये दलिया गव्हापासून तयार केला जातो. प्रौढांसाठी आणि लहान मुलांसाठी, तुम्ही घट्ट दालिया बनवू शकता. परंतु तुमच्या लहान बाळासाठी दलिया बनवताना तो पातळ आणि सरसरीत असू द्या. जर तुम्ही तुमच्या बाळाला नुकतीच घनपदार्थांची सुरुवात केलेली असेल, तर पातळ दलिया गिळायला आणि पचायला सोपा जाईल.
तुम्ही बाळांना दलिया देणे कधी सुरू करू शकता?
पालक आपल्या बाळाला दलिया देण्यास उत्सुक असतात ह्याचे प्राथमिक कारण म्हणजे दलियामुळे बाळाचे पोट भरते. दलिया खूप पौष्टिक आहे आणि त्यामुळे बाळांना भरपूर ऊर्जा मिळते. दलिया खाल्ल्याने पचनसंस्थेचे कार्य सुद्धा सुरळीत होते. त्यामुळेच अनेक पालक बाळ ७–८ महिन्यांचे झल्यावर त्यांना दलिया देण्यास सुरुवात करतात. परंतु, आपल्या बाळाच्या आहारात दलियाचा समावेश करण्यासाठी सर्वोत्तम कालावधी हा तुमच्या बाळाचे वय जेव्हा १० ते १२ महिन्यांचे असेल तेव्हा असतो. ह्या कालावधीत तुमचे बाळ घनपदार्थ पचवण्यास सक्षम असेल आणि त्यामुळे त्याला दलियाचे जास्तीत जास्त फायदे मिळू शकतील.
लहान बाळांच्या आरोग्यासाठी दलियाचे फायदे
लहान बाळांना घनपदार्थांची सुरुवात करताना ज्या घनपदार्थांपासून बाळाला आरोग्यविषयक फायदे मिळतील अश्या घनपदार्थांपासून सुरुवात करा. दलियापासून बाळाच्या आरोग्याला महत्वाचे फायदे होतात. ते खालीलप्रमाणे.
- लहान बाळांची भूक वाढण्यास मदत होते हा दलियाचा सर्वात मोठा फायदा आहे. तुमच्या बाळाला स्तनपानासोबतच, तुम्ही दलिया देण्यास सुरुवात करू शकता. त्यामुळे बाळाचे पोट भरलेले राहण्यास मदत होते. एक प्रकारे, तांदूळ किंवा पिठावर आधारित पाककृतींपेक्षा हा एक चांगला पर्याय आहे.
- दलिया हा खनिजांचा चांगला स्रोत आहे, प्रामुख्याने फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह ही खनिजद्रव्ये दलियामध्ये मुबलक प्रमाणात असतात. ह्या सर्व गोष्टी मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि निरोगी व्यक्ती बनण्यासाठी मदत करतात.
- संपूर्ण गहू तोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान विशिष्ट संयुगे आणि पदार्थ सोडले जातात त्यामध्ये तंतुमय पदार्थ आणि विविध पोषक तत्वे देखील असतात. ही पोषक तत्वे पाचन तंत्रास आवश्यक शक्ती प्रदान करू शकतात आणि त्यामुळे चयापचय देखील सुधारू शकते.
बाळांसाठी दलियाच्या पौष्टिक पाककृती
तुम्ही तुमच्या लहान बाळासाठी बनवू शकता अशा दलियाच्या अनेक पाककृती आहेत. दलियाच्या काही चविष्ट पाककृती आम्ही येथे दिलेल्या आहेत.
१. व्हेज दलिया/ दलिया उपमा
तुमच्या लहान बाळाने अधिक घन पदार्थ खाण्यास सुरुवात केल्याने, तुम्ही दलियामध्ये काही पौष्टिक भाज्या घालू शकता आणि त्याला भाज्या खाण्याची सवय लावू शकता.
साहित्य
- दालिया – १ कप
- मटार – १/२ कप
- गाजर (बारीक चिरून) – १
- मध्यम आकाराचा बटाटा (लहान तुकडे करून) – १
- कांदा (बारीक चिरलेला) – १/२ कप
- उडदाची डाळ – १/४ कप
- कढीपत्ता – ४–८
- मोहरी – १/२ टीस्पून
- मिरची (पर्यायी)
- तेल – १ टीस्पून
- चवीनुसार मीठ
- हळद – १/२ टीस्पून
- आवश्यकतेनुसार पाणी
कृती
- दालिया एका पॅनमध्ये सोनेरी तपकिरी होईपर्यंत किंवा खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्या. एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा.
- दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदे घाला. नंतर उडीद डाळ घालून थोडा वेळ परतून घ्या.
- नंतर त्यात भाज्या आणि हळद घालून मिक्स करा.
- चिमूटभर मीठ टाका. झाकण ठेवून पॅन झाकून ठेवा आणि काही मिनिटे शिजू द्या.
- भाजलेल्या दलिया मध्ये थोडे पाणी घाला आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून ढवळा.
- सर्व पाणी शोषले जाईपर्यंत उकळवा आणि मग ते तुमच्या बाळाला द्या.
२. दलिया खीर
जर तुम्हाला तुमच्या बाळासाठी काहीतरी गोड करायचे असेल तर दलिया खीर बनवा. दलिया खीर ही लहान बाळांसाठी छानशी अशी गोड दलिया रेसिपी आहे. सध्याच्या पिढीतील बहुतेक मुलांना दलियाची ओळख झाली आहे.
साहित्य
- दालिया – १ कप
- काजू – ४–५
- बदाम – ४–५
- वेलची – १/४ टीस्पून
- चवीनुसार गूळ
- दूध – २ कप
- तूप – १–२ चमचे
कृती
- कढईत थोडं तूप गरम करून त्यात काजू आणि बदाम घालून भाजून घ्या. नीट परतून घ्या आणि बाजूला ठेवा.
- आता कढईत दलिया घालून काही मिनिटे भाजून घ्या. भाजताना नीट ढवळून घ्या.
- खमंग वास यायला लागला की त्यात दूध घालून थोडा वेळ ढवळत राहा. पॅनवर झाकण ठेवून उकळी येऊ द्या.
- साधारण १५ मिनिटे मंद आचेवर शिजवा. ढवळत राहा आणि नंतर पाणी व दूध घाला.
- पूर्ण शिजल्यावर त्यामध्ये काजू आणि वेलची पूड मिक्स करून एका भांड्यात सर्व्ह करा.
३. दलिया लापशी
बाळाला घनपदार्थांची सुरुवात करताना बाळाला पहिल्यांदा दिल्या जाणाऱ्या पदार्थाची रेसिपी तुम्ही करून पाहिली पाहिजे!
साहित्य
- दालिया – १ कप
- तूप – १ टीस्पून
- गूळ – १ टीस्पून
- आवश्यकतेनुसार पाणी
कृती
- प्रेशर कुकरमध्ये थोडं तूप गरम करून त्यात दलिया घाला. दलियाचा रंग थोडासा बदलेपर्यंत आणि चांगला सुगंध येईपर्यंत नीट परतून घ्या.
- एका पातेल्यात गूळ घेऊन त्यात पाणी घाला. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत उकळू द्या.
- गूळ विरघळला की कुकरमध्ये गुळाचे पाणी घालून नीट ढवळून घ्यावे. कुकर बंद करून आच मध्यम ठेवा. तीन शिट्ट्या होऊ द्या.
- शिजलेली लापशी एका भांड्यात काढा आणि गरम असताना तुमच्या बाळाला सर्व्ह करा.
तुमच्या बाळाला घन पदार्थांचा परिचय करून देणे हा एक छान अनुभव असतो. तुमचे बाळ १० महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याला नक्कीच दलिया देऊ शकता. दलिया चविष्ट आणि पौष्टिक आहे. दलिया झटपट तयार करता येतो. त्यामुळे तुमच्या बाळासाठी चविष्ट दलिया बनवा आणि तुमचे बाळ त्याचा आनंद घेताना पहा!
आणखी वाचा:
बाळांसाठी डाळीचे पाणी (वरणाचे पाणी) : फायदे आणि पाककृती
बाळाच्या आहारात पनीरचा समावेश करणे – फायदे आणि पाककृती