Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण लहान बाळांच्या आणि मुलांच्या सर्दी-खोकल्या दरम्यान आवर्जून दिले पाहिजेत आणि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ

लहान बाळांच्या आणि मुलांच्या सर्दी-खोकल्या दरम्यान आवर्जून दिले पाहिजेत आणि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ

लहान बाळांच्या आणि मुलांच्या सर्दी-खोकल्या दरम्यान आवर्जून दिले पाहिजेत आणि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ

जरी आपले मूल अगदी साध्या सर्दी आणि खोकल्याने आजारी असले, तरीही आपल्यासाठी तसेच आपल्या लहानग्यासाठी हा काळ कठीण असू शकतो. अशा वेळी खूप भूक लागलेली असताना देखील मुले खायला नकार देतात आणि त्यामुळे पुरेसे पोषण मिळत नसल्यामुळे त्यांच्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच अशावेळी आपल्या मुलासाठी कोणते पदार्थ चांगले आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.

छोटी बाळे आणि लहान मुलांमधील सर्दी खोकल्या दरम्यान शिफारस केलेले अन्नपदार्थ

सहज पचणारे पौष्टिक अन्न सर्दी खोकल्याने आजारी असलेल्या आपल्या मुलासाठी योग्य आदर्श आहार आहे. सर्दी आणि खोकला असताना मुलांसाठी योग्य असे काही चांगले खाद्यपदार्थ खालीलप्रमाणे आहेत.

१. स्तनपान

नवजात मुलांसाठी आणि सहा महिने वयाच्या आतील आजारी बाळांसाठी, स्तनपान ही सर्वोत्तम निवड असते. स्तनपान हा अँटीबॉडीजचा एक चांगला स्त्रोत आहे आणि त्यामुळे मुलांची प्रतिकार शक्ती वाढते. पाजण्याआधी बाळाला कफ झालेला आहे का हे तपासून पाहणे जरुरी असते.

स्तनपान

२. सातूचे पाणी (Barley water)

सहा महिन्यापर्यंतच्या बाळांसाठी हे उपयुक्त आहे. सातूचे पाणी ताप, सर्दी आणि खोकल्यासाठी एक चांगला उपाय आहे. तथापि, ग्लुटेन एलर्जी असलेल्या मुलांसाठी ते योग्य नाही आणि कौटुंबिक सदस्यास अशी ऍलर्जी असल्यास सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याचे कारण असे की ऍलर्जी कदाचित घरातील सदस्याकडून मुलाकडे आली असेल आणि तरीही ते अज्ञात असू शकतील.

३. ऍपल सॉस

हे पचायला हलके असून आणि बाळाला सजलीत राहण्यास मदत करते. सर्दी खोकला असताना हे काम करते आणि शरीराच्या द्रवपदार्थांची भरपाई करते.

४. तांदळाची पेज

सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांसाठी ह्याची शिफारस केली जाते, तांदळाची पेज खोकला आणि सर्दीसाठी सर्वात चांगला घरगुती उपाय आहे. तांदळाच्या पेजेमुळे मुलाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा सामना करण्यास मदत होते.

५. रताळे

रताळे पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत असतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. ते पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास शरीराला मदत करतात. रताळ्याची खीर करून तुम्ही बाळाला देऊ शकता किंवा सहा महिने व त्याहून अधिक वयाच्या आपल्या छोट्यासाठी तुम्ही रताळ्याची प्युरी करू शकता.

६. गाजर

हे सुप्रसिद्ध आहे की गाजरामध्ये औषधी गुणधर्म आहेत. गाजर रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतात आणि जीवाणू आणि विषाणू दूर ठेवू शकतात. गाजर उकडून घ्या आणि मॅश करून मुलांसाठी प्यूरी किंवा सूप बनवा. सहा वर्षांवरील मुलांसाठी हे अन्न देता येते.

७. डाळिंबाचा रस

डाळिंबाच्या रसामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे आपल्या मुलाची सर्दी कमी होण्यास मदत होऊ शकते. सहा महिन्यांपेक्षा लहान मुलांमधील सर्दी आणि खोकला घालवण्यासाठी डाळिंबाचा रस बनवा आणि मिरपूड पावडर व सुके अदरक पावडर घालून बाळाला द्या.

८. मुगाच्या डाळीची मऊ खिचडी

मुगाच्या डाळीची मऊ खिचडी हे सर्दी खोकल्याने त्रस्त बाळांसाठी पोटभरीचे अन्न आहे. हे दुपारच्या जेवणाच्या वेळी दिले जाऊ शकते. सात महिने व त्याहून अधिक वयोगटातील मुलांसाठी हा एक उपयुक्त आणि सात्विक पदार्थ आहे. आणि मुलांना हा पदार्थ नक्कीच आवडेल.

९. दही भात

दही-भात

एकदा आपले बाळ आठ महिने वयाचे झाल्यावर, जेव्हा बाळाला बरे वाटत नसेल तेव्हा त्याला आलं आणि जिऱ्याची फोडणी दिलेला दही भात देऊ शकता. आपल्या मुलाला खोकला किंवा सर्दी असेल तेव्हा दही खूप थंड आणि आंबट नसल्याची खात्री करा.

१०. इडली आणि डोसा

आपल्या मुलाला बरे वाटत नसल्यास मऊ गरम इडली आणि डोसा द्या. हे अन्न आठ महिने किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी दिवसाच्या कोणत्याही वेळी, चटणी किंवा जॅम सोबत दिले जाऊ शकते.

११. साबुदाण्याचे पदार्थ

साबुदाणा पिष्टमय पदार्थांचा एक चांगला स्त्रोत आहे आणि त्यातून आपल्या मुलाला उर्जा मिळू शकते. पचायला सोपे असल्याने, मुले आजारी असताना साबुदाण्याच्या पदार्थांना पसंती दिली जाते. आपण साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता, त्यामध्ये आपण भाज्या घालू शकता किंवा आपण फक्त पाणी वापरून खीर करू शकता. सात महिने किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी हे चांगले अन्न आहे.

१२. ब्रोकोली

भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असलेली ब्रोकोली संक्रमणांशी लढण्यासाठी एक चांगली निवड आहे. ब्रोकोली शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते व आठ महिने आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी अगदी योग्य आहे . ब्रोकोलीचे सूप आणि प्युरी हे आपल्या मुलाच्या आहारात ही भाजी समाविष्ट करण्याचे काही मार्ग आहेत.

१३. टोमॅटो सूप

सर्व वयोगटातील लोकांना टोमॅटो सूप आवडते, आठ महिने पेक्षा जास्त वयाच्या मुलांना ते दिले जाऊ शकते. हे व्हिटॅमिन सी चे निरोगी स्त्रोत आहे. आपण आपल्या बाळाला टोमॅटो सूप मध्ये मऊ केलेला भात देखील मिसळून देऊ शकता.

१४. मऊ कुस्करलेला बटाटा

शिजवून मऊ केलेले बटाटे कुस्करून त्यात थोडे चवीपुरते मीठ आणि किंचित तिखट घालून बाळाला भरवले जाऊ शकते आणि बाळासाठी ते पोटभर अन्न असून चवदार असल्याने बाळाला आवडेल. आठ महिन्यांपुढील वयाच्या बाळांना द्यावेत.

१५ . दलियाची लापशी

विशेषकरून जर आपल्या मुलाच्या घशाला संसर्ग झाला असेल किंवा वेदना होत असेल तर दलियाची लापशी हे मऊ अन्न असल्याने सहजपणे गिळून टाकले जाऊ शकते, जेव्हा बाळ आजारी असते तेव्हा पचन प्रक्रिया सुधारित करण्यासाठी दुधाशिवाय हे तयार करता येते. हे अन्न आठ महिने व त्याहून अधिक वयाच्या मुलांना दिले जाऊ शकते.

१६. लिंबूवर्गीय फळे

संत्री आणि लिंबू यासारख्या संकरित फळांपासून बनवलेले रस, पेशींचे नुकसान टाळण्यासाठी उपयोगी पडतात. कफ कमी होतो आणि श्लेष्मा बाहेर पडते. हे फळांचे रस करताना कोमट पाणी वापरा आणि त्यात थोडा मध घाला. एक वर्ष आणि त्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी ह्याची शिफारस केली जाते.

१७. हळदीचे दूध

१ वर्ष किंवा त्यापेक्षा लहान असलेल्या मुलांमधील सर्दी आणि घशाचा संसर्ग कमी करण्यासाठी एक चमचा हळद उकळत्या दुधात मिसळून बाळास दिल्यास ते नैसर्गिक प्रतिजैविक म्हणून कार्य करते.

१८. मशरूम सूप

मशरूम-सूप

मशरूमचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत आणि संसर्ग दूर ठेवण्याची क्षमता चांगली आहे. गरम मशरूम सूप सर्दी आणि खोकला असलेल्या लहान मुलांसाठी खूप सोईचे अन्न आहे. हे अन्न आपण एक वर्ष आणि त्यापेक्षा मोठ्या मुलांना देऊ शकता .

१९. पोहे किंवा हातसडीच्या तांदळाचा भात

हे मऊ अन्न सहजपणे बाळाला चावता येऊ शकते. पोहे देखील पचायला सुलभ असून जेव्हा आपल्या मुलाला बरे वाटत नसेल तेव्हा पोटभरीचे जेवण म्हणून तुम्ही आपल्या मुलास देऊ शकता. एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी हे योग्य अन्न असून त्यामध्ये थोडा सुकामेवा देखील तुम्ही घालू शकता.

२०. व्हिटॅमिन सी युक्त फळे आणि भाज्या

सर्दी खोकल्याने ग्रस्त बाळाला काय आहार द्यावा याबद्दल आपल्याला प्रश्न असेल तर आपण अँटीबॉडीज आणि पांढऱ्या पेशींचे उत्पादन वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले सर्व प्रकारची फळे आणि भाज्या समाविष्ट करू शकता. ही फळे आणि भाज्या बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

सर्दी आणि खोकला असताना टाळावयाचे अन्नपदार्थ

आपल्या मुलास सर्दी आणि खोकला असेल तेव्हा आपण काही अन्नपदार्थांपासून दूर राहणे उचित ठरते. याचे कारण असे आहे की काही फळे आणि भाज्यांमध्ये शीतकरण प्रभाव पडतो आणि श्वसन संसर्ग होऊ शकतो. यात समाविष्ट असलेले अन्नपदार्थ खालीलप्रमाणे:

१. गाईचे दूध

असा समज आहे की गाईच्या दुधामुळे कफ वाढतो. १ वर्षाच्या वरील मुलांना गायीचे दूध दिले जाऊ शकते. आपल्या मुलाच्या आजारपणाच्या काळात आपल्या मुलाला कमी दूध देऊ शकता किंवा ते पूर्णपणे थांबवू शकता. या काळात आपण त्याला इतर प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज किंवा सोया दूध देखील देऊ शकता.

२. काही फळे

काही-फळे

आपल्या मुलास घशाचा संसर्ग असल्यास, द्राक्षे, केळी, लीची, टरबूज, नारळ आणि संत्री ह्यासारखी काही फळे टाळल्यास बाळाला लवकर बरे वाटू शकते. हे सहा महिन्यांहून अधिक वयाच्या मुलांसाठी लागू आहे.

३. काही भाज्या

एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी, काकडी, दुधी भोपळा आणि लाल भोपळा सारख्या भाज्या मुख्यतः त्यांच्या शरीरावर असलेल्या शीतकरण प्रभावामुळे शिफारसीय नाहीत. त्यामुळे ह्या भाज्या छोट्या बाळांना आणि मुलांना खोकला असेल तर देण्याचे टाळा.

४. साखर आणि मिठाई

खूप जास्त साखर कोणालाही चांगले नसते. आणि बाळांसाठी आणि लहान मुलांसाठी तर नाहीच. म्हणूनच निश्चितच साखर आणि गोड़ पदार्थ टाळायला हवेत.

५. सुका मेवा

सुका-मेवा

जेव्हा आपल्या मुलाला सर्दी व खोकला असतो तेव्हा सुकामेवा खाण्याचे टाळणे उत्तम कारण एकतर ते चावायला कठीण जाते आणि विशेषत: दोन वर्षांखालील मुलांमध्ये ते खाताना खोकला आल्यास घशात तुकडे अडकण्याची जोखीम आहे.

६. मसालेदार आणि तेलकट पदार्थ

मसालेदार किंवा भरपूर प्रमाणात तेल असलेल्या अन्नामुळे घशास त्रास होऊ शकतो. आणि आपल्या मुलाचा खोकला आणि सर्दी वाढू शकतो. त्यामुळे तिखट आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहणे चांगले.

७. दही

दही शरीरावर शीतकरण प्रभाव करते त्यामुळे सर्दी आणि खोकला असताना किंवा इतर श्वसन संक्रमणांच्या वेळी दही खाणे टाळावे.

आपल्या बाळाला आणि मुलास सर्दी खोकला असताना द्यावयाच्या आहाराबद्दल सूचना

बाळांना आणि मुलांना जेव्हा बरे वाटत नसते तेव्हा त्यांची चिडचिड वाढते आणि बाळे खाण्यास नकार देतात. अशा वेळी आपल्या आजारी बाळांना आवश्यक पोषण मिळते आहे ना हे सुनिश्चित करताना आपण खालील काही गोष्टी लक्षात ठेवू शकता:

१. सहा महिने व त्याहून लहान वयाच्या बालकांना सर्दी किंवा खोकला असल्यास फक्त स्तनपान किंवा फॉर्म्युला द्यावा.

२. मोठ्या बाळांना दिवसातून तीन वेळा थोडे थोडे अन्न भरवा. आणि पचायला हलके असे अन्न द्या.

३. आपल्या बाळाच्या डॉक्टरांनी आपल्या बाळाला ओरल रेहायड्रेशन सोल्युशन (ORS) निर्धारित केले असल्यास, आवश्यकतेनुसार आपल्या मुलास ते देण्याची खात्री करा.

४. जर तुमचे बाळ खाण्याविषयी चिकित्सक असेल तर त्याला जे पाहिजे ते द्या. आपल्या आजारी मुलाला अन्न देण्यासाठी जबरदस्तीने प्रयत्न करू नका. उदाहरणार्थ, जेवण देण्याऐवजी आपण बाळाला सर्दी असताना सफरचंद देऊ शकता.

५. आपलं बाळ सजलीत असल्याची खात्री करुन घ्या. त्याला वेगळ्या प्रकारचे द्रव पदार्थ द्या. यामध्ये दूध, कोमट पाण्यात केलेला ताज्या फळांचा रस समाविष्ट असू शकतो.

जेव्हा आपल्या मुलाला सर्दी आणि खोकला असतो तेव्हा त्याचे अनुसरण करण्यासाठी ही काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत. तथापि, जर कानात वेदना असतील तर, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम आहे कारण कानात संसर्ग झालेला असू शकतो. तसेच, आपल्या बाळाला निर्जलीकरणाची शक्यता असताना कोणताही नवीनआहाराची सुरुवात करू नका कारण यामुळे लक्षणे वाढू शकतात किंवा ऍलर्जी होऊ शकते. जर आपल्या मुलाची स्थिती दोन दिवसात सुधारत नसेल तर डॉक्टरशी सल्लामसलत करण्यास टाळाटाळ करू नका. संसर्ग झाल्यामुळे निर्जलीकरण शक्य आहे, म्हणून  आपल्या मुलाच्या प्राथमिक लक्षणांवर लक्ष ठेवा. आणि गरज भासल्यास तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article