In this Article
बाळाला पोटशूळ झाल्यावर त्याला वेदना होतात आणि त्यामुळे बाळ रडू लागते. बाळाला रडताना बघणे निराशाजनक आहे. आईला अनेकदा काय करावे हे माहित नसते, परंतु जर आम्ही तुम्हाला सांगितले की बाळाच्या पोटदुखीवर उपाय तुमच्या स्वयंपाकघरात आहे तर? हिंग एक भारतीय पदार्थ आहे आणि पचन सुधारण्याच्या गुणधर्मामुळे तो प्रसिद्ध आहे. भारतीय स्वयंपाक घरात हा पदार्थ सहज उपलब्ध असतो आणि बऱ्याच अन्नपदार्थांमध्ये वापरला जातो. ह्या पदार्थाला इंग्रजी मध्ये ‘द फूड ऑफ द गॉड्स‘ म्हणून ओळखले जाते. पोटदुखीसाठी हा पदार्थ नैसर्गिक उपाय म्हणून वापरला जातो.
चला तर मग तुमच्या लहान बाळासाठी हिंगाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
हिंग लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का?
हिंग लहान मुलांसाठी सुरक्षित आहे, परंतु हा पदार्थ बाळाला तोंडाने खायला घालू नये कारण बाळाची पचनसंस्था खूपच नाजूक असते. हिंगाची चव आणि औषधी गुणधर्म तीव्र असल्याने,हिंगाची पेस्ट करून लावली जाते. हिंगाची पेस्ट लावताना हलक्या हाताने मसाज केले जाते किंवा बाळाच्या पोटावर चोळले जाते. हिंगाची पेस्ट पोटावर लावताना फक्त नाभीभोवती लावा. १० महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांची रोगप्रतिकारक शक्ती अविकसित असते, त्यामुळे अगदी कोमट पाण्यासोबत सुद्धा बाळांना हिंग देऊ नये. हिंगामुळे बाळांना रक्ताचे विकार सुद्धा होऊ शकतात.
तुमच्या बाळाच्या आहारात हिंगाचा कधी आणि कसा समावेश करावा?
बाळ १० महिन्यांचे झाल्यावर त्याच्या आहारात हिंग घालण्याची शिफारस केली जाते. जर तुमच्या बाळाचे वय १० महिन्यांपेक्षा कमी असेल आणि पोटात गॅस होत असेल तर बाळाला हिंग खायला देऊ नका. हिंगाची पेस्ट करून नाभीभोवती घड्याळाच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करा आणि थोडा वेळ तसेच राहू द्या. एकदा ते सुकल्यानंतर,बाळ ढेकर येऊ लागतील आणि पोटदुखीपासून आराम मिळेल. त्यानंतर, ओल्या वॉशक्लोथचा वापर करून पोटाकडील भाग पुसून टाका. तुम्ही तुमच्या बाळाला काही वेळानंतर किंवा झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ घालू शकता.
१० महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांसाठी, तुम्ही त्यांच्या जेवणात, सूप, सॅलड्स, प्युरी, मसूर आणि अगदी ताक ह्या सारख्या पेयांमध्ये एक चिमूटभर हिंग घालू शकता.
हिंग – लहान बाळांसाठी उपयोग आणि फायदे
आता हिंगाचे काय फायदे आहेत ते पाहूया. हिंगाच्या गुणधर्मांमुळे बाळाला काय उपयोग होतो ते खाली दिलेले आहे –
१. पोटदुखी दूर करते
जर तुम्ही बाळाला औषधे गोळ्या देण्याबद्दल साशंक असाल, तर तुमच्या बाळाच्या पोटावर हिंगाची पेस्ट लावा. पोटदुखीमुळे तुमचे बाळ अनियंत्रितपणे खूप रडते. हिंगामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात त्यामुळे पोटाचे असंतुलन कमी होते. गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळू शकतो.
२. मुखाचे आरोग्य सुधारते
लाखो सूक्ष्मजंतू तुमच्या मुलाच्या मुखात प्रवेश करून तोंडाचे आरोग्य बिघडवू शकतात. हिंगाचे जंतुनाशक आणि प्रतिजैविक गुणधर्म दातदुखी, पोकळी यांवर उपचार करण्यास मदत करतात तसेच हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव आणि श्वासाची दुर्गंधी रोखू शकतात.
३. पचन सुलभ होते
हिंगामुळे पचन सुलभ होते. आतड्याची हालचाल चांगली झाल्यावर पचनसंस्था निरोगी होते. त्यासाठी नाभीभोवती थोडी हिंगाची पेस्ट लावा. हा घरगुती उपाय बाळांमध्ये बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यास देखील मदत करू शकतो.
४. भूक सुधारते
हिंग हा एक औषधी पदार्थ आहे आणि प्राचीन आयुर्वेदानुसार, हिंगाचा उपयोग अतिक्रियाशील पाचन तंत्र संतुलित करण्यासाठी केला जातो. हिंगामध्ये अँटी–ऑक्सिडायझिंग आणि अँटी–इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हिंगामुळे आतडी स्वच्छ होऊन पचन संस्थेतून अस्वच्छ अन्न काढून टाकले जाते. आतड्यांच्या अस्तरावर हिंगाचा सुखदायक प्रभाव होतो आणि त्यामुळे भूक वाढते, उबळ कमी होते आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.
५. पोटदुखीवर उपचार करते
सुरुवातीच्या किंवा सौम्य पोटदुखीवर हिंग वापरून उत्तम उपचार केले जाऊ शकतात. हिंगाची पेस्ट लावून पोटाला मसाज करून पहा. त्यामुळे वेदनांपासून आराम मिळतो. परंतु पोटदुखीचे स्वरूप गंभीर असेल तर त्यावर तात्काळ उपचार होण्यासाठी हिंगाचा उपयोग होणार नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या बाळाला संपूर्ण तपासणीसाठी बालरोगतज्ञांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.
६. नैसर्गिक संप्रेरक म्हणून काम करते
बाजारात हल्ली हजारो एंझाइम सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत. पण ग्रीक वैद्य हिप्पोक्रेट्सने एकदा सांगितले होते तसे ‘अन्न हे आपले औषध का होऊ देऊ नये?’ तुमच्या डिशमध्ये इतर मसाल्यांसोबत एक चिमूटभर हिंग घाला आणि ह्या सुपरफूडला त्याची किमया दाखवू द्या.
७. प्रतिकारशक्ती वाढवते
लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होणे ही आरोग्याची मुख्य समस्या आहे. बाळांची रोगप्रतिकारक प्रणाली विकसनशील अवस्थेत असल्याने बाळांना विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. हिंगामध्ये अँटी–बॅक्टेरियल, अँटी–व्हायरल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत, त्यामुळे हिंग तुमच्या बाळाच्या दैनंदिन आहारात असणे आवश्यक आहे.
८. सर्दी, खोकला, दमा आणि न्यूमोनियावर उपाय
बाळांचा खोकला कमी करण्यासाठी देखील मसाल्याचा वापर केला जाऊ शकतो. सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी हिंग आणि पाण्याची कोमट पेस्ट बाळाच्या छातीवर लावावी. मोठ्या मुलांसाठी, दमा, न्यूमोनिया आणि डांग्या खोकल्यावरील उपाय म्हणून देखील हिंगाचा वापर केला जाऊ शकतो. गरम पाण्यात थोडासा हिंग घालून, श्वसनाच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्यांना लहान मुलांना त्याची वाफ येते. युनानी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये हिंग हा महत्त्वाचा घटक आहे. हिंग बाहेरून सुद्द्धा लावता येतो आणि अन्नपदार्थांमध्ये सुद्धा घालता येतो.
तुमच्या लहान बाळाला हिंगाचा कसा फायदा होतो हे तुम्हाला आता माहिती आहे. पण, हिंगाची पेस्ट कशी बनवायची ह्याचा तुम्ही विचार करत आहात का ? हिंगाची पेस्ट कशी बनवायची ते खाली दिलेले आहे.
हिंगाची पेस्ट कशी तयार कराल?
हिंगाची पेस्ट बनवणे सोपे आहे – फक्त एक चमचा हिंग थोड्या कोमट पाण्यात घालून चांगले मिक्स करा. तुमच्याकडे तुमची पेस्ट आता तयार आहे! पेस्ट तयार करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, तूप किंवा मोहरीचे तेल वापरू शकता आणि तेच परिणाम मिळवू शकता. १० महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांसाठी, तुम्ही ताकामध्ये थोडे हिंग घालून तुमच्या बाळाला खायला देऊ शकता.
हिंग हा जादुई मसाला मानला जात असला तरी पालकांनी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. खाली काही मुद्दे दिलेले आहेत. तुमच्या बाळासाठी हिंग वापरताना योग्य ती खबरदारी घेण्यास त्यामुळे मदत होईल.
बाळासाठी हिंग वापरताना लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे
तुमच्या बाळाला हिंग देण्यापूर्वी येथे काही घटकांचा विचार केला पाहिजे:
- हा उपाय वापरल्यानंतर तुमचे बाळ रडायला लागले तर डॉक्टरांना कॉल करा किंवा तुमच्या बालरोगतज्ञांना त्वरित भेट द्या.
- नेहमी कोमट पाणी, तूप आणि दुधात हिंग मिसळा आणि तुमच्या बाळाच्या अन्नपदार्थांमध्ये एक चिमूटभरच हिंग घाला त्यापेक्षा जास्त हिंग घालू नका.
- नाभीचा भाग झाकण्यासाठी ओल्या कॉटन बॉलचा वापर करा. तेथे पेस्ट लावू नका. विशेषत: जेव्हा नाळ ओली असते आणि खाली पडलेले नसते तेव्हा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.
- १० महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांना हिंग खायला किंवा चघळायला देऊ नका. तसेच हिंग त्यांना गिळू देऊ नका. त्यांची पचनसंस्था अविकसित असते आणि हे मसाल्याचे पदार्थ पचवण्यास सक्षम नसते.
- तुमच्या बाळाला रक्त पातळ करणारी किंवा रक्तदाबाची औषधे असल्यास त्याला हिंग देऊ नका आणि त्याऐवजी पर्यायी उपायांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
खोकला, पोटदुखी आणि पोटशूळ ह्यावर हिंग हा नैसर्गिक उपचार आहे. हिंगाचा वापर दीर्घकाळ केल्यास हिंग आश्चर्यकारकरित्या काम करते. जर तुमच्या बाळाचे वय १० महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही पोटशूळ, पोटात वायू होणे आणि पचनाशी संबंधित इतर समस्यांवर नैसर्गिक उपचार म्हणून हिंग वापरू शकता.
आणखी वाचा:
बाळांसाठी हळद: फायदे आणि दुष्परिणाम
बाळांसाठी बडीशेप – फायदे, खबरदारी आणि रेसिपी