In this Article
वेगवेगळ्या अभ्यासांद्वारे असे निदर्शनास आले आहे की जगातील १०–१५% लोक इरिटेबल बाउल सिंड्रोम ह्या विकाराने ग्रस्त असतात तर २०% लोकांना तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. तुमच्या बाळासाठी हे सहन करणे अवघड आणि अस्वस्थ करणारे असू असते. विशेषकरून जर बाळाची पचनसंस्था आणि उत्सर्जन संस्था जर अजूनही विकसित होत असतील तर बद्धकोष्ठता हाताळणे बाळासाठी अवघड असते. बाळांमधील बद्धकोष्ठता आणि ती कशी टाळावी हे माहित करून घेण्यासाठी पुढे वाचा.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता म्हणजे खूप कडक शौचास होते आणि ते पुढे सरकणे कठीण जाते. वैद्यकीय दृष्ट्या जर आठवड्यातून तीन पेक्षा कमी वेळा शौचास झाली असेल तर त्या व्यक्तीस बद्धकोष्ठता आहे असे म्हटले जाते. जीवनशैलीमुळे बऱ्याच प्रौढ लोकांना सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. ह्यामध्ये योग्य आहाराचा आभाव, वर्तणूक किंवा काहीवेळा इतर वैद्यकीय कारणे ह्यांचा समावेश होतो. ही स्थिती बाळांमध्ये सुद्धा आढळते.
नवजात शिशूपासून टॉडलर पर्यंत काही बाळांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. काही बाळांची ती नैसर्गिक प्रवृत्ती असते. ह्या मागे बरीच कारणे असतात त्यापैकी काही कारणे पुढीलप्रमाणे – त्यांच्या पचन संस्थेचे कार्य नीट न चालणे, काही पदार्थाना त्यांच्या शरीराने दिलेली प्रतिक्रिया किंवा द्रवपदार्थ आणि आहार इत्यादी घटक होय. जरी बद्धकोष्ठतेला आळा घालता येतो आणि त्यावर उपचार करता येतात तरी सुद्धा तुमच्या बाळाची पचनसंस्था चांगली राहण्यासाठी चांगल्या सवयी असणे अत्यंत गरजेचे आहे.
पुनःपुन्हा बद्धकोष्ठता होणे हा एक वेदनादायी अनुभव असतो. बाळाला त्याचा त्रास होत असतो पण सांगता येत नाही. जेव्हा बाळ थोडे मोठे होते तेव्हा बद्धकोष्ठता झाल्याने बाळाचे पोट नीट साफ होत नाही. त्या वेदनादायी अनुभवापासून मुले दूर राहण्याचा प्रयत्न करतात आणि शौचास वेळेवर जात नाही आणि त्यामुळे स्थिती आणखी वाईट होते.
बद्धकोष्ठता झालेले मूल सलग बरेच दिवस शौचास जात नाही. काही वेळा सततच्या बद्धकोष्ठतेमुळे गुद्धाद्वाराजवळील स्नायूंची आकुंचन पावण्याची क्षमता नाहीशी होते. गुद्दद्वाराजवळील मज्जातंतूंना हानी पोहोचते आणि वायू बाहेर सोडताना शौचाची गळती सुरु होते आणि काही वेळा संपूर्णतः नियंत्रण जाते.
बद्धकोष्ठतेची कारणे
एखाद्या बाळाने खूप दिवस शी केली नाही तर बाळाला बद्धकोष्ठता झाली आहे हे समजत नाही. परंतु जर शौचास करताना जर बाळ खूप अस्वस्थ झाले आणि किरकिर करू लागले तर पालकांनी जवळून लक्ष ठेवले पाहिजे. बाळाने शी घट्ट किंवा पातळ कशी केली आहे ह्यावरून बाळाला बद्धकोष्ठता झाली आहे किंवा नाही हे समजू शकते. बाळाने किती वेळा शी केली ह्यावर बाळाचे पचनसंस्थेचे कार्य कसे चालले आहे हे सांगणे कठीण आहे.
ह्या स्थितीला अनेक घटक कारणीभूत असू शकतात,
१.घन पदार्थ
जेव्हा बाळाच्या नाजूक पचनसंस्थेला घनपदार्थांची ओळख करून दिली जाते तेव्हा बाळाला बद्धकोष्ठता होणे नवीन नाही. बाळाला बद्धकोष्ठता होण्यास कारणीभूत असलेल्या पदार्थांमध्ये केळी, भात, सीरिअल, चीझ आणि गाजर ह्यांचा समावेश होतो, हे पदार्थ पोषक आहेत परंतु त्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असल्याने पचन चांगले होत नाही. म्हणून, हे पदार्थ कमी प्रमाणात द्या आणि बाळाला तंतुमय पदार्थ जास्त असलेले अन्नपदार्थ द्या आणि बद्धकोष्ठतेला दूर ठेवा.
२.फॉर्मुला
फॉर्मुला दुधातील प्रथिनांमुळे बाळाला बद्धकोष्ठता होते आणि काहीवेळा फॉर्मुला ब्रँड बदलून वेगळे घटक असलेला फॉर्मुला निवडल्यास परिस्थिती मध्ये बदल होण्यास मदत होऊ शकते. त्या उलट फॉर्मुला मध्ये असलेले लोह हे बद्धकोष्ठता होण्यास कारणीभूत नसते.
३. निर्जलीकरण
तुमचे बाळ प्राथमिकरीत्या द्रवपदार्थ घेते, म्हणजेच बाळ फक्त स्तनपान किंवा फॉर्मुला दुधावर असते. तरीसुद्धा बाळाला सजलीत राहण्यासाठी पुरेसे द्रवपदार्थ मिळत नाहीत. अशा वेळेला जास्तीत जास्त पाणी शरीरात शोषून घेतले जाते आणि बाळाला शौचास घट्ट होते. बाळाला पाजल्यानंतर काही चमचे पाणी किंवा ज्यूस दिल्यास बाळ सजलीत राहण्यास मदत होते. जरी सहा महिन्यांच्या पेक्षा लहान बाळांना फक्त स्तनपान किंवा फॉर्मुला दूध देण्यास सांगितले जाते तरी सुद्धा बाळाला बद्धकोष्ठता झाल्यास हा उपाय केल्यास मदत होऊ शकते.
४. दुधातील प्रथिनांची ऍलर्जी
दुग्धजन्य पदार्थांमधील घटक आईकडून बाळाकडे जातात आणि ज्या बाळांना दुधातील प्रथिनांची ऍलर्जी आहे त्यांना बद्धकोष्ठता होऊ शकते.
५. संप्रेरकांचे असंतुलन
काही वेळा जेव्हा नैसर्गिक संप्रेरके संतुलितरित्या शरीरात तयार केली जात नाहीत तेव्हा मुलांना तसेच मोठ्या माणसांना त्याच्या लक्षणांना सामोरे जावे लागते. लहान मुलांमध्ये कोरडी त्वचा, वाढीचा वेग कमी होणे, थकवा आणि काही वेळा बद्धकोष्ठता ही लक्षणे दिसून येतात.
चिन्हे आणि लक्षणे
बाळाचे किंवा लहान मुलांचे पालक म्हणून तुम्ही बाळाच्या लहान संकेतांवर सुद्धा लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे पचन.
ज्या बाळांना स्तनपान दिले जाते अशा बाळांना सहसा बद्धकोष्ठता होत नाही, परंतु बाळाला किती वेळा शौचास होते ह्याचा विचार केल्यास कोणतीही वारंवारिता सामान्य समजली जाते. स्तनपान घेणारी बाळे बरेचसे दूध पोषण म्हणून शरीरात शोषून घेतात आणि त्यामुळे त्यांना शौचास खूप कमी वेळा होते, कधी कधी तर दहा दिवसातून त्यांना एकदाच शौचास होते. हे फॉम्युला घेणाऱ्या बाळांच्या बाबतीत सत्य नाही त्यांना दिवसातून ३ ते ४ वेळेला सुद्धा शौचास होते.
तुमच्या बाळाचे रुटीन काहीही असले तरी सुद्धा तुमच्या बाळाला त्याची सवय होते. तथापि, बाळ जसजसे विकासाचे टप्पे पार करते तसे आणि वयानुसार आणि घनपदार्थांची सुरुवात केल्यानंतर ह्यामध्ये बदल होतात. काहीवेळा, तुमच्या लक्षात येईल की बाळाला शी करताना खूप जोर द्यावा लागतो आहे तसेच काही वेळा डायपर मध्ये तुम्हाला शौचाचे छोटे गोळे सुद्धा दिसतील. जर बद्धकोष्ठता सुरूच राहिली तर बाळ अस्वस्थ होऊन किरकिर करू लागते. बरेच दिवस मुलास शौचास झाली नाही तर बऱ्याच पालकांना धोक्याची सूचना मिळते. काही वेळा, शौचातून रक्त सुद्धा येते हे रक्त गुदद्वाराजवळील स्नायू फाटल्यामुळे येऊ शकते.
बाळांमधील बद्धकोष्ठता कशी रोखली पाहिजे?
आहारातील बदल, वाढीचे आणि विकासाचे टप्पे तसेच शारीरिक बदलांमुळे तुमच्या बाळाला वरचेवर बद्धकोष्ठता होते. परंतु, पालक म्हणून बद्धकोष्ठता होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घेऊ शकता
- पोषक आहार घ्या, त्यामध्ये फळे आणि पालेभाज्या ह्यांचा समावेश असुद्या तसेच भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घ्या.
- बाळ मोठे होते तसे हालचाली आणि व्यायाम ह्यांना प्रोत्साहन द्या
- बाळाला काही वेळ पोटावर झोपवा
- बाळाला टॉयलेटला जाण्याच्या सवयी लावा. जेवणानंतर बाळाला तिथे बसवून ठेवा. त्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या शौचास होण्याची सवय लागते
- ह्यामुळे बाळाला शौचास जाण्यास कंटाळा येणार नाही आणि तुम्ही बाळाचे कौतुक करून अथवा बक्षीस देऊन त्यास प्रोत्साहित केले पाहिजे. जेव्हा मुल मलविसर्जन विषयक समस्येमुळे पीडित असते आणि त्या गोष्टीचा भावनिक परिणाम होतो तेव्हा हे विशेषतः चांगले असते
तुमच्या मुलाच्या बद्धकोष्ठतेवर काय उपाय कराल?
बऱ्याच बाळांना कधी ना कधी बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो आणि जर त्यावर वेळीच उपचार केले तर बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. तुमच्या बाळासाठी हे उपाय वापरून तुम्ही बद्धकोष्ठता परत होऊ नये म्हणून त्यास प्रतिबंध घालू शकता.
१. दूध बदलून पहा
जर तुमच्या बाळाला तुम्ही फक्त स्तनपान देत असाल तर तुमच्या आहारात बदल करून पहा आणि तुमच्या मुलाला नेमका कशामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो ते तपासून पहा. फॉर्मुला घेणाऱ्या बाळांच्या बाबतीत फॉर्मुला बदलल्यास त्याची मदत होऊ शकते.
२. द्रवपदार्थ जास्त प्रमाणात घ्या
प्लम, पेअर किंवा सफरचंद ह्या फळांचा रस बाळाला थोडा थोडा द्या. जर त्याची चव बाळाला उग्र वाटत असेल तर त्यात थोडे पाणी घालून बाळाला द्या. तुम्ही बाळास दूध पाजू शकता म्हणजे बाळाची भूक भागेल.
३. व्यायाम
जर तुमच्या बाळाने रांगण्यास सुरुवात केली असेल तर बाळाला पचनास त्याची चांगली मदत होते. जर बाळाने तो विकासाचा टप्पा गाठला नसेल तर बाळ पाठीवर झोपलेले असताना बाळाचे पाय हातात घेऊन सायकलिंग सारखी हालचाल करा त्यामुळे पचनास मदत होईल.
४. मसाज
बाळाची अस्वस्थता कमी करण्यासाठी बाळाच्या पोटाला मसाज करा तसेच बाळाला पोटावर झोपवा
५. घन पदार्थांमध्ये बदल करा
बाळाच्या आहारात फळांचे दोन भाग आणि भाज्यांच्या तीन भागांचा समावेश करा. आहारातील ह्या तंतुमय पदार्थांमुळे बाळाला बद्धकोष्ठतेचा सामना करता येतो आणि बाळाच्या आतड्यांच्या हालचाली नियमित होतात
६. अन्नपदार्थांची प्युरी करून द्या
बाळांना फळे आणि भाज्यांची प्युरी करून दिल्यास, पचनास सुलभ असे तंतुमय पदार्थ मिळतात. ज्या बाळांना अजूनही घन पदार्थ नीट चावता येत नाहीत अशा बद्धकोष्ठता झालेल्या बाळांसाठी ही प्युरी उपयोगी ठरते
७. गुद्द्वार उत्तेजन
जेव्हा वरीलपैकी कोणताही उपाय आपल्या छोट्याशा बाळाला दिलासा देत नसेल, तेव्हा हा उपाय काही प्रमाणात मदत करू शकेल. आपल्या बोटाने, कापसाच्या बोळ्याने किंवा रेक्टल थर्मामीटरचा वापर करून मलाशयात थोडीशी उत्तेजन दिल्यास बाळामध्ये आतड्यांसंबंधी हालचाल उद्भवतात. अगदी हळुवारपणे व्हॅसलीनचा वापर करून उत्तेजकाला वंगण घालू शकता जेणेकरून बाळाला इजा होणार नाही
८. सपोसिटरी
आपल्या बालरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार, आपल्या बाळाला शौचास होण्यास मदत करण्यासाठी आपण सपोसिटरीज वापरू शकता. आपल्या बाळाचे वय आणि स्थिती यावर आधारित डॉक्टर डोस लिहून देऊ शकतात . हे गुदाशय मध्ये घालायचे असते आणि १५–३० मिनिटांत आतड्यांसंबंधी हालचाल होऊ शकतात. आधी शौचास घट्ट होत असल्याने मुलाला गुदद्वारासंबंधीचा त्रास होत असल्यास हे विशेषतः उपयुक्त आहेत
९. रेचक
नैसर्गिक रेचक कार्य करण्यास अपयशी ठरतात, तेव्हा दुकानातून खरेदी केलेले रेचक वापरण्यापूर्वी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. सावधगिरी बाळगा कारण लहान मुले त्वरेने डिहायड्रेट होऊ शकतात, म्हणूनच त्यांना केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखाली रेचक दिले जाणे आवश्यक आहे.
बद्धकोष्ठता हे केव्हा काळजीचे कारण होऊ शकते?
वर दिलेले बरेच घरगुती उपाय बाळांमधील बद्धकोष्ठतेस मदत करू शकतात. परंतु जर नैसर्गिक उपायांनी फायदा झाला नाही तर बाळाच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधणे योग्य ठरेल. जर तुमचे बाळ अस्वस्थ असेल किंवा त्यास ताप आला असेल तर त्यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणीची गरज असते. विशेषकरून जर खालील लक्षणे जर पुनःपुन्हा दिसत असतील तर तपासणी करणे जरुरीचे आहे
- शौचास करताना मुलास त्रास होऊन ते अस्वस्थ होत असेल तर
- जोर देऊन सुद्धा शौचास होत नसेल तर
- शौचासोबत रक्त पडत असेल आणि तुम्हाला फिशर किंवा गुद्द्वाराजवळील त्वचा फाटल्यासारखी वाटत असेल तर ते मुलासाठी खूप वेदनादायी असू शकते आणि तात्काळ मदतीची आवश्यकता भासते
- सतत बद्धकोष्ठता झाल्यामुळे शौचावर नियंत्रण रहात नसेल आणि डायपर सतत शौचने भरलेला असेल किंवा बाळ वायू सोडत असताना त्यासोबत शौच सुद्धा येत असेल तर
पालकत्व हे सोपे नाही. परंतु तुमच्या बाळासाठी काय योग्य आहे हे जेव्हा तुम्हाला समजते तेव्हा ते अवघड सुद्धा नसते. बद्धकोष्ठता हे बाळाच्या अस्वस्थतेचे कारण तर नाही ना हे तपासून पहा. साधे उपाय करून पहा आणि तुमच्या बाळाच्या बद्धकोष्ठतेच्या पूर्वलक्षणांवर लक्ष ठेवा.
आणखी वाचा:
बाळांमधील वायूची (गॅस) समस्या
बाळांमधल्या बद्धकोष्ठतेला कारणीभूत असलेले आणि त्यापासून सुटका करणारे २० अन्नपदार्थ