Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ३६वा आठवडा

गर्भधारणा: ३६वा आठवडा

गर्भधारणा: ३६वा आठवडा

गर्भारपणाच्या ३६व्या आठवड्यात तुम्ही ह्या ९ महिन्यांच्या मॅरेथॉन मध्ये अंतिम रेषेच्या अगदी जवळ आहात. तुमचं बाळ म्हणजे आता एक व्यव्यक्तिमत्व  आहे आणि तुमचे शरीर त्यासाठी अनेक बदलांना ह्या सगळ्या आठवड्यांमध्ये सामोरे गेले आहे आणि ह्यातील सगळेच बदल काही सुखकारक नसतात. तुमचे आयुष्य नव्या बदलांना सामोरे जात आहे आणि कसे ते पाहूया!

गर्भारपणाच्या ३६व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमच्या बाळाची वाढ वेगाने होत आहे आणि बाळाचे वजन हे प्रत्येक  दिवसाला १ औंस ह्या दराने वाढत आहे. तुम्ही दिवसभर जे पोषक अन्नपदार्थ खात आहात त्यामुळे बाळाला उत्तमप्रकारे पोषण मिळते. बाळाला आच्छादित करणारी बारीक लव आता गळून पडली आहे तसेच मेणासारखा पांढरा पदार्थ सुद्धा आता नष्ट होत आहे. बाळाच्या डोक्याची हाडे अजूनही एकमेकांशी घट्ट बांधली गेलेली नाहीत त्यामुळे बाळाचे डोके जनन मार्गातून पुढे सरकते.

बाळाचा आकार केवढा असतो?

जेव्हा तुम्ही ३६आठवड्यांच्या गर्भवती असता तेव्हा  बाळाचा आकार डोक्यापासून पायापर्यंत मोजला जातो आणि तो दीड फूट इतका असतो, तसेच पुढच्या आठवड्यांमध्ये सुद्धा बाळाची वाढ होत राहते आणि ते जास्त जागा व्यापते. बाळाचे वजन ६ पौंड (२.७ किलो) इतके असते. आता बाळाच्या शरीरावरील सुरकुत्या सुद्धा कमी होऊ लागतात. आता  ह्या टप्प्यावर बाळाचे डोके खाली असण्याची शक्यता खूप जास्त असते. तथापि काही वेळेला तसे होत नाही.

ह्या स्थितीला ‘Breech position’ (पायाळू ) असे म्हणतात. जरी पायाळू बाळांची प्रसूती नैसर्गिकरित्या होत असली, तरी सुद्धा बरेच डॉक्टर्स सिझेरिअन पद्धतीने प्रसूती करण्यास प्राधान्य देतात.

शरीरात होणारे बदल

गर्भधारणेच्या ह्या टप्प्यावर बाळाला वाढीस जागा नसते परंतु लक्षात ठेवा की प्रसूती दिनांकापर्यंत बाळाची वाढ होत राहते. तुमचे वजन गर्भारपणाच्या ३६व्या आठवड्यापर्यंत कमीत कमी २४-३६ पौंड्स (११-१६ किलो) इतके वाढले आहे आणि हे खूप सामान्य आहे. जर तुम्हाला असे लक्षात आले की तोंड, हात, घोटे, पावले ह्यांना सूज आली आहे किंवा वजनात अचानक वाढ झाली आहे तर डॉक्टरांना विचारून खात्री करा कारण ती preeclampsia ची शक्यता असते. ही एकप्रकारची गर्भारपणातील गुंतागुंत असून त्यामुळे उच्चरक्तदाब, तसेच हातापायांना सूज येणे आणि लघवीमध्ये प्रथिने आढळणे ही लक्षणे दिसून येतात. त्यासाठी तातडीची वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत गरजेचे असते. ह्या काळात खूप थकल्यासारखे वाटते. गर्भधारणेदरम्यान ह्या बदलांसोबतच तुम्ही चिंताग्रस्त व्हाल आणि जवळजवळ ९ महिने बाळाला पोटात वाढवल्यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवेल.

३६व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

३६व्या आठवड्यात तुम्हाला प्रसूती कळांकडे लक्ष ठेवले पाहिजे. त्या कधी कधी सराव कळा (Braxton Hicks Contractions) सुद्धा असू शकतात. सराव कळा प्रसूती कळांच्या अगोदर येतात किंवा तुमच्या बाळाने कदाचित लवकर येण्याचे सुद्धा ठरवले असू शकेल. इतर लक्षणे जसे की बद्धकोष्ठता, गॅस होणे तसेच जळजळ ही लक्षणे सुद्धा  तुमच्या ओळखीची तिसऱ्या तिमाहीतली लक्षणे सुद्धा तुम्ही अनुभवाल.

स्तनांमधून स्त्राव गळणे: तुम्हाला स्तनांमधून पातळसर, पिवळा स्त्राव गळत असल्याचा अनुभव येईल. ह्या स्रावाला कोलोस्ट्रम असे म्हणतात. ह्यामुळे बाळाला पहिल्या काही दिवसांसाठी पोषण मिळते.

कळा: जर तुमच्या बाळाने ह्या जगात लवकर यायचे ठरवले असेल तर तुमच्या  कळांकडे लक्ष ठेवा. ह्या कळा म्हणजे गर्भाशयात आणि पाठीत तीव्र वेदना होतात. मासिक पाळीदरम्यान जसे पेटके येतात तशाच ह्या वेदना असतात. ह्या सराव कळा (Braxtom-Hicks ontractions) सुद्धा असू शकतात.

जर कळांची तीव्रता वाढत असेल तर त्याकडे लक्ष ठेवा. कळ येऊन हळू हळू त्याची तीव्रता कमी होत गेली तर त्या खऱ्या कळा असू शकतात.

वारंवार लघवीला होणे: जसजसे बाळ ओटीपोटाकडे सरकू लागते तसे मूत्राशयावरचा दाब वाढतो आणि त्यामुळे वारंवार बाथरूमला जावे लागते. जरी संपूर्ण गर्भारपणात तुम्हाला ह्यास सामोरे जावे लागले असेल तरी सुद्धा ह्या टप्प्यावर परिस्थिती खूप वाईट होते.

ह्या व्यतिरिक्त, जळजळ आणि थकवा ही सामान्यपणे आढळणारी लक्षणे सुद्धा ३६ व्या आठवड्यात दिसून येतात.

गर्भधारणेच्या ३६व्या आठवड्यात पोटाचा आकार

तुम्हाला ह्या आठवड्यात तुमचे पोट खूप भरल्यासारखे वाटेल कारण तुमचे बाळ अजून मोठे झाले आहे आणि त्याला जागा अपुरी पडत आहे. जर तुमच्या बाळाच्या हालचालींचा नमुना बदलला असेल किंवा हालचाल मंदावली असेल तर त्याचे कारण बाळाला हालचालींसाठी आधी इतकी जागा मिळत नाही. आता तुम्हाला बाळाच्या हळुवार हालचाली नव्हे तर बाळाची जोरदार लाथ बसेल. जर तुम्हाला हालचाली मंदावल्यासारख्या वाटत असतील तर त्या पडताळून पाहण्यासाठी किंवा पुन्हा सुरु होण्यासाठी काही तरी थंड प्या किंवा पोटावर हलकेच थोडा दाब द्या. असे करून सुद्धा हालचाल सुरु झाली नाही तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्या. तुमचे डॉक्टर बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांवर आणि तब्ब्येतीवर लक्ष ठेवतील.

आता बाळ खाली ओटीपोटाकडे सरकण्यास तयार असल्याने तुम्हाला थोडे हलके वाटेल कारण गर्भाशयाचा छातीच्या पिंजऱ्यावर पडणारा दाब लक्षणीय रित्या कमी होईल. तुमच्या पोटामुळे तुम्हाला चालायला त्रास होऊ शकतो परंतु अस्वस्थता कमी करण्यासाठी  तुम्ही ‘Baby Sling’ वापरू शकता.

तुमच्या पोटाची त्वचा खूप जास्त ताणली गेल्यामुळे खूप खाज सुटते आणि परिस्थिती खूप जास्त वाईट होते. संप्रेररकांच्या वाढत्या पातळीमुळे त्वचा खूप कोरडी होते आणि अस्वस्थता वाढते. तुम्ही नियमितपणे मॉइश्चरायझर वापरत आहात ह्याची खात्री करा. खाजणाऱ्या पोटासाठी थंड पॅक लावणे हा सर्वात चांगला उपाय आहे.

गर्भधारणेच्या ३६व्या आठवड्यातील सोनोग्राफी

आता ३६व्या आठवड्यात तुमचं वाट पाहणे जवळजवळ संपले आहे आणि तुम्ही तुमच्या बाळाला लवकरच भेटणार आहात. बाळाने ह्या जगात पाय ठेवण्याआधी तुम्ही अल्ट्रासाऊंडद्वारे बाळाला बघू शकता त्यामुळे तंत्रज्ञान हे तुमच्या सारख्या बाळाची आतुरतेने वाट बघणाऱ्या पालकांसाठी एक वरदानच आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांना बाळाचा आकार समजतो तसेच जन्माला येण्याअगोदर बाळाची स्थिती समजते. एक्स रे पेक्षा अल्ट्रासाऊंड हे जास्त सुरक्षित आहे कारण त्यामुळे बाळ हानिकारक किरणांपासून दूर राहते तसेच तुम्ही थ्री डी इमेजद्वारे तुमचे बाळ प्रत्यक्ष कसे दिसते हे सुद्धा बघू शकाल.

ह्या आठवड्यात सर्वात महत्वाची चाचणी म्हणजे Group B Strep (GBS) ही होय. सामान्यपणे योनी मध्ये आढळणारा जिवाणू म्हणजे GBS, आणि त्याचा संसर्ग बाळाला प्रसूती दरम्यान होऊ शकतो. त्यामुळे जरूर पडल्यास योग्यवेळी त्याची चाचणी करून उपाययोजना करणे जरुरीचे आहे. ह्याचे निदान योनीमार्गातील जिवाणूंचे परीक्षण करून किंवा लघवीच्या चाचणीद्वारे होते. गर्भवती महिलांमधील GBS वर उपाय म्हणजे प्रसूतीच्या वेळी IV मधून किंवा प्रतिजैविकांच्या गोळ्या घेऊन केला जातो.

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या ३६व्या आठवड्यात, अन्नपदार्थ आणि त्यांची निवड ही गोष्ट तुमच्या मनातही येणार नाही कारण मनात इतका गोंधळ उडालेला असतो तसेच चिंताही खूप वाटत असते. तथापि, बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढण्यासाठी तसेच बाळाला लागणारी सगळी पोषणद्रव्ये मिळण्यासाठी तुमचा आहार आरोग्यपूर्ण असणे अत्यंत जरुरीचे आहे. तुम्हाला हे सुद्धा लक्षात येईल की तुम्हाला आवडणारा अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाणे तुमच्या साठी कठीण होईल आणि हे फक्त तुमच्या बाबतीत नव्हे तर सगळ्या आई होणाऱ्या स्त्रियांमध्ये दिसून येते. तुमचे जेवण ५-६ छोट्या भागांमध्ये विभाजित करा, त्यामुळे तुम्हाला आणि बाळाला लागणारी पोषणमूल्ये मिळतील. भरपूर द्रव्ये घेऊन तुम्ही स्वतःला सजलीत ठेवले आहे ह्याची खात्री करा. हे प्रसूतीसाठी अत्यंत जरुरीचे आहे.

खूप मसालेदार अन्नपदार्थ, चॉकलेट्स आणि लिंबूवर्गीय फळे खाणे टाळा. पालक, मेथी, कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली, तसेच द्राक्षे, अंजीर आणि डाळिंब अशा फळांचा समावेश करा. तसेच व्हिटॅमिन के ने समृद्ध असलेल्या अन्नपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा. कारण बाळाचे पहिले अन्न ‘कोलोस्ट्रम’ हे व्हिटॅमिन के ने समृद्ध असते तसेच व्हिटॅमिन के मुळे जखमा भरून यायला मदत होते आणि बाळाची हाडे मजबूत होण्यास त्यामुळे मदत होते.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

हे करा

  • तुमच्या बाळाचे बालरोगतज्ञ कोण असणार आहेत ते ठरवून ठेवा. (बालरोगतज्ञ शक्यतोवर जिथे तुमची प्रसूती होते तिथलेच असतात) कारण बाळाच्या जन्मानंतर लगेच बाळाची तपासणी करणे महत्वाचे असते.
  • स्वच्छता करताना तुम्ही जर फिनाईल किंवा तत्सम रसायने हाताळत असाल तर, हातमोजे घाला आणि तोंडाला मास्क लावा.
  • तुम्ही बाळाला कुठे जन्म देणार आहात ते ठरवून ठेवा. जरी घर किंवा हॉस्पिटल ह्यामधील कुठलाही पर्याय निवडलात तरीसुद्धा तुम्हाला प्रसूतीदरम्यान मदतीची गरज भासणार आहे. तुम्हाला आणीबाणीच्या काळात लागणारे फोन नंबर्स जवळ ठेवा तसेच तुमची आणि बाळाची हॉस्पिटल बॅग तयार ठेवा.
  • प्रसूतीकळा कशा ओळखाव्यात ह्या विषयी वाचा आणि तशी तयारी करा. त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे प्रसुतीपूर्व वर्गांमध्ये नाव नोंदविणे, तिथे तुमची प्रसूती विषयी तयारी करून घेतातच शिवाय नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी ह्या विषयी सुद्धा माहिती देतात.

हे करू नका

  • जिथे हवा खेळती नाही अशा बंद खोली मध्ये काम करू नका त्यामुळे जीव घाबरला जाण्याची शक्यता असते.
  • जेवण करण्यास टाळाटाळ करू नका, तसेच बाळाच्या तुमच्या पोटातील शेवटच्या काही दिवसात त्याला पोषणमूल्ये मिळतील ह्याची काळजी घ्या.
  • तंबाखू खाणे टाळा तसेच धूम्रपान आणि कॅफेन घेणे टाळा कारण त्यामुळे हृदय आणि मेंदूला उत्तेजना मिळते आणि बाळाच्या तब्बेतीसाठी ते हानिकारक ठरू शकते.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

प्रसूतीची पहिली काही लक्षणे दिसताच, गर्भवती आई आणि येणाऱ्या बाळाचे बाबा, जवळच्या मॉम अँड बेबी स्टोर मध्ये धाव घेतात आणि खरेदीस सुरुवात करतात. तथापि शॉपिंग सुद्धा समजूतदारपणे करायला हवी आणि उगाचच आत्ता न लागणाऱ्या गोष्टी खरेदी करणे टाळायला हवे. खाली एक यादी दिली आहे त्यानुसार तुम्ही खरेदीचे नियोजन करू शकता

१. ब्रेस्ट पम्प: एक ब्रेस्ट पंप आणून ठेवा कारण प्रसूतीनंतर तुम्हाला तो लागण्याची शक्यता आहे.

२. बाळाला पाजताना लागणाऱ्या गोष्टी: नर्सिंग ब्रा आणि पाजताना झाकून घेण्यासाठी कव्हर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या खरेदीच्या यादीत समाविष्ट करू शकता.

३. सॅनिटरी पॅड्स: तुम्हाला हॉस्पिटल मध्ये मिळणारे सॅनिटरी पॅड्स वापरायचे नसतील तर तुम्हाला ते आणून ठेवले पाहिजेत.

४. बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी: बाळासाठी बाबागाडी तुम्हाला आत्ता किंवा नंतर लागणारच आहे, तसेच नवजात बाळाला कार मधून नेण्यासाठी कर सीट लागणार आहे, त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टींचा तुमच्या खरेदी यादीत समावेश करा.

५. गोड बातमी: तुमच्या डोहाळेजेवणासाठी जी मंडळी हजार होती तसेच तुमच्या ह्या संपूर्ण प्रवासात जी मित्रमंडळी तुमच्यासोबत होती त्यांचे आभार मानण्यासाठी आभारपत्रे आणून ठेवा.

बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी तिसरी तिमाही हा महत्वाचा काळ आहे आणि म्हणून तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. आई आनंदी असेल तर ताणविरहित आणि सुलभ प्रसूती होते, त्यामुळे आरामात राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अतिशय महत्वाचे आहे.

मागील आठवडा: गर्भधारणा: ३५वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३७वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article