Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे

तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे

तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे

तुम्ही प्रसूतीसाठी हॉस्पिटल मध्ये जाण्याआधी तुम्हाला प्रसूतीच्या लक्षणांचा खरंच अनुभव येत आहे का ह्याची खात्री करणे जरुरीचे आहे, कारण बऱ्याच वेळा ती खोटी किंवा प्रसूती पूर्व लक्षणे असू शकतात. तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होत असते आणि म्हणून तुम्हाला खरंच प्रसूती कळा येत आहेत का ह्या विचाराने तुमचा गोंधळ उडू शकतो. ह्या लेखात आम्ही तुम्हाला प्रसूतीच्या लक्षणांची तसेच अशावेळी तुम्ही काय केले पाहिजे ह्याची ओळख करून देऊ.

प्रसूतीच्या सुरवातीच्या काळातील लक्षणे कोणती?

प्रसूतीच्या आधी नक्की काय होते ह्या विषयी तुम्हाला काळजी वाटत असेल, तर तुम्ही खालील लक्षणांवर लक्ष ठेवू शकता

. योनीमार्गातून गळती किंवा स्त्राव

जर योनीमार्गातून द्रवपदार्थ गळत असेल किंवा रक्तस्त्राव होत असेल किंवा वेगळ्या कुठल्या रंगाचा (तपकिरी किंवा लालसर) स्त्राव होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी लगेच संपर्क साधू शकता. तुमच्या योनिमार्गावर म्युकस प्लगचे असलेले आवरण निघाले असण्याची शक्यता असते.

. पेटके

तुम्हाला मासिक पाळी दरम्यान येतात तशा पेटक्यांचा अनुभव येऊ शकतो. तथापि, काहीवेळा त्यासोबत जुलाब होऊ शकतात किंवा नुसते पेटके येतात,

. कळा

तुमचे पोट ताणले जाऊन ते घट्ट झाल्यासारखे वाटते. जर तुम्हाला नियमित वेळाच्या अंतराने कळा येत असतील तर तुम्हाला प्रसूतीकळा सुरु झाल्या आहेत असे समजावे. तथापि सराव कळा (Braxton Hicks Contractions) येणे हे सुद्धा ह्या काळात खूप कॉमन असते परंतु त्या मधूनच येतात.

. ओटीपोटाच्या भागावर दाब जाणवेल

तुम्हाला ओटीपोटाच्या भागावर दाब जाणवेल. बाळ पोटात खालच्या बाजूने दाब देत आहे असे तुम्हाला जाणवेल.

. पाठीत दुखेल

तुम्हाला पाठदुखीचा अनुभव येईल. ही पाठदुखी सौम्य असेल आणि कमरेजवळच्या भागात जाणवेल. परंतु त्याबद्दल तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना सांगणे चांगले.

तुम्ही काय केले पाहिजे

तुम्ही शांत ठिकाणी जाऊन आरामात झोपा. दीर्घ श्वास घेऊन पुढील प्रक्रियेसाठी मानसिकरीत्या तयार रहा. सजलीत राहण्यासाठी पाणी किंवा ज्यूस पिण्यास सांगितले जाते. पाणी कमी पडल्याने किंवा निर्जलीकरण झाल्याने सुद्धा पेटके येऊन अस्वस्थ वाटू शकते. तुम्ही तुमच्या लक्षणांवर लक्ष ठेवू शकता, आणि त्यासाठी, तुम्ही तुमच्या पतीची किंवा मैत्रिणींची मदत घेऊ शकता. जर लक्षणे कमी झाली किंवा पूर्णपणे नाहीशी झाली तर तुम्ही दिवस आरामात घालवू शकता. तथापि, जर लक्षणे तीव्र झाली आणि दुखणे वाढले तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.

तुम्ही काय केले पाहिजे

प्रसूतीची लक्षणे कोणती?

जर तुमची प्रसूती होणार असेल तर खालील लक्षणे दिसतील

. तीव्र आणि नियमित कळा

तुम्हाला प्रसूतीदरम्यान तीव्र आणि नियमित कळा येऊ लागतील. ह्या कळा कमी होणार नाहीत किंवा सराव कळांसारख्या काही काळानंतर थांबणार सुद्धा नाहीत, किंबहुना बाळाचा जन्म होईपर्यंत त्या येत राहतील. ह्या कळा सुरवातीला पेटक्यांसारख्या वाटतील आणि नंतर त्या तीव्र होऊन दर ३८ मिनिटांनी येतील. ह्या कळांची सुरुवात पाठीकडून सुरु होईल आणि त्या पोटापर्यंत जाणवतील.

. गर्भजल पिशवी फुटणे

जर तुम्हाला गर्भजल पिशवी फुटण्याचा अनुभव आला आणि त्यासोबत प्रसूती कळा सुद्धा येत असतील तर लवकरच तुमची प्रसूती होणार आहे. तथापि, जर प्रसूती कळा सुरु झाल्या नसतील तर त्या सुरु होण्यासाठी तुम्हाला दोन तास वाट पहावी लागेल. गर्भजल पिशवी फुटून पाणी बाहेर येताना तुम्हाला लघवीला होते आहे असे वाटू शकेल, परंतु तुमचे त्यावर नियंत्रण नसते. फक्त १०% स्त्रियांना गर्भजल पिशवी फुटण्याचा अनुभव येतो.

. गुदद्वार आणि ओटीपोटाच्या जवळील भागावर तीव्र दाब

जेव्हा तुम्ही प्रसूतीच्या अगदी जवळ असता तेव्हा तुम्हाला ओटीपोटाच्या आणि गुदद्वाराच्या भागाजवळ तीव्र दाब जाणवेल. गुद्दद्वाराजवळचा दाब इतका तीव्र असेल की तुम्हाला शौचास होते आहे असे वाटू शकेल. जेव्हा तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तेव्हा लवकरच बाळाचे आगमन होणार असे समजावे.

जर तुम्हाला वर सांगितलेल्या प्रसूती वेदना जाणवत असतील तर तुम्ही रुग्णालयात प्रसूतीसाठी जाण्याची तयारी करू शकता.

गुदद्वार आणि ओटीपोटाच्या जवळील भागावर तीव्र दाब

प्रसूती कळा खऱ्या आहेत की सराव कळा हे कसे ओळखाल?

३७ आठवड्यांची गर्भवती झाल्याचे लक्षण म्हणजे सराव कळा जाणवू लागणे. इथे आपण सराव कळा आणि प्रसूती कळा ह्यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत.

खालील लक्षणे सराव कळांची आहेत

 • कळा अचानक सुरु होतात आणि नियमित येत नाहीत
 • फक्त ओटीपोटाच्या खालच्या भागात वेदना जाणवतात
 • थोड्या कालावधीनंतर ह्या कळा तीव्र किंवा वेदनादायी होत नाहीत
 • बोलताना तुम्हाला वेदना किंवा अस्वस्थता जाणवत नाही
 • तुम्हाला हालचाल करताना आरामदायक वाटते, आणि थोडे चालल्यानंतर वेदना कमी होतात

खालील लक्षणे खऱ्या प्रसूतीकळांची असतात

 • बाळाच्या हालचालींमध्ये बदल. नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी होतात
 • प्रसूतीकळांचा केंद्रबिंदू ओटीपोटाचा भाग असतो
 • तुम्हाला नियमित वेळच्या अंतराने कळा जाणवतील आणि प्रसूतीच्या वेळी त्या आणखी तीव्र होतील

खऱ्या प्रसूती कळांमध्ये कळा पाठीपासून सुरु होऊन पुढे ओटीपोटापर्यंत येतात. सराव कळांमध्ये दुखणे फक्त ओटीपोटाच्या भागाजवळ जाणवते. तुम्हाला प्रसूतीची लक्षणे दिसू लागताच तुमच्या डॉक्टरांना फोन करा.

तुम्ही रुग्णालयात केव्हा गेले पाहिजे?

तुमचे डॉक्टर किंवा नर्स तुम्हाला बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती देतील. दवाखान्यात केव्हा गेले पाहिजे ह्याविषयी सुद्धा तुमचे डॉक्टर तुम्हाला माहिती देतील.

तुमच्या गर्भारपणाच्या स्थितीनुसार तुम्हाला दिलेल्या मार्गदर्शक सूचना बदलू शकतात. जर तुमचा गर्भारपणाचा कालावधी नॉर्मल गेला असेल तर तुम्हाला प्रसूतीच्या आधीची आणि प्रसुतीदरम्यानची लक्षणे कशी हाताळायची ह्याबद्दलच्या नॉर्मल मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. तथापि, तुमचे गर्भारपण धोकादायक गेले असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच गर्भवती राहिला असाल किंवा तुम्हाला इतर काही समस्या असतील तर तुमचे डॉक्टर तुम्हाला विशेष मार्गदर्शक सूचना देतील.

तुम्ही रुग्णालयात केव्हा गेले पाहिजे?

जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला प्रसूतिविषयी मनात काही गोंधळ असेल तर तुमच्या डॉक्टरांना फोन करून विचारण्यास संकोच करू नका. तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत खऱ्या किंवा सराव कळांचा सामना कसा करावा ह्याविषयी तुम्हाला मार्गदर्शक सूचना मिळतील. तथापि, जर तुमचे गर्भारपणात काही गुंतागुत असेल तर तुम्ही वेळोवेळी तसेच प्रसूती कळा सुरु झाल्यावर त्याबद्दल डॉक्टरांना किंवा नर्सला माहिती दिली पाहिजे.

जर तुमच्या गर्भावस्थेत काही गुंतागुंत नसेल तर तुम्हाला प्रत्येक कळ एक मिनिटांपर्यंत राहील अशा पद्धतीने वाट पाहण्यास सांगितले जाऊ शकते. ह्या कळा एक तास प्रत्येक पाच मिनिटांनी येऊ शकतात. तुमच्या कळांच्या कालावधीवर लक्ष ठेवून त्याची नोंद ठेवणे चांगले. तुम्हाला जेव्हा प्रसूतीची खरी लक्षणे जाणवू लागतात, तेव्हा ह्या कळा अधिक तीव्र होतात आणि त्या नियमित वेळेच्या अंतराने येतात. अशा वेळी तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहणे चांगले.

तथापि, तुम्हाला खालील लक्षणे जाणवत असतील तर त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा

 • बाळाची हालचाल मंदावणे
 • तुम्हाला योनीमार्गातून रक्तस्त्राव होऊन दुखत असेल किंवा ताप येत असेल तर
 • जर तुमची गर्भजल पिशवी फाटली असेल किंवा तुम्हाला तपकिरी, हिरवट किंवा पिवळा स्त्राव निदर्शनास आल्यास ते बाळाचे शौच असू शकते किंवा बाळावर आलेला ताण असू शकतो
 • जर गर्भजल पिशवी ३७ आठवड्यांच्या आधी फाटली किंवा तुम्हाला कळा सुरु झाल्या तर ते अकाली प्रसुतीचे लक्षण आहे

काही स्त्रिया नॉर्मल प्रसूती होण्यासाठी प्रसूतीच्या तीव्र लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. परंतु तुम्हाला प्रसुतीचे कुठलेही लक्षण जाणवले तर पुढील गुंतागुत टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधणे चांगले.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article