In this Article
बीटरूट खूप पौष्टिक आहे. बीटरूट जगभर वापरले जाते. गरोदर स्त्रियांना ते विशेषकरून दिले जाते. जर तुम्ही गर्भवती असाल आणि बीटरूट खाण्याचा आनंद घेत असाल तर तुम्हाला त्याची विशेष मदत होऊ शकते. बीटरूट खाण्याचे फायदे आणि त्याचे सेवन करण्याच्या विविध पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
गरोदरपणात बीटरूट खाण्याचे फायदे
बीटमध्ये भरपूर पोषक घटक असतात ते वाढणाऱ्या बाळासाठी उपयुक्त असतात. गरोदरपणात बीटरूट खाण्याचे काही फायदे आहेत:
१. प्रतिकारशक्ती वाढते
बीटरूटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुमची प्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि गरोदरपणात संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
२. ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो
गरोदर स्त्रियांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका जास्त असतो – ह्या स्थितीमध्ये हाडे ठिसूळ आणि कमकुवत होतात. बीटरूट मध्ये सिलिका आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते त्यामुळे तुमचे दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
३. चयापचय नियंत्रित करते
बीट हा पोटॅशियमचा समृद्ध स्त्रोत आहे, म्हणून बीटरुटचे सेवन केल्यामुळे तुमचे इलेक्ट्रोलाइट्स संतुलित होऊ शकतात आणि चयापचय नियंत्रित होऊ शकते. गरोदरपणात रक्तदाबाची पातळी नियमित राखण्यास सुद्धा त्याची मदत होऊ शकते.
४. जळजळ कमी होते
बीटरूटमध्ये असलेले बेटेन हा एक दाहक विरोधी घटक आहे. हा घटक गरोदरपणात सांध्यातील जळजळ, वेदना आणि सूज प्रतिबंधित करते.
५. रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यास मदत होते
बीटरूट हे कमी ग्लायसेमिक अन्न असल्याने त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतरित होण्यास आणि ते रक्तात शोषण्यास जास्त वेळ लागतो. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी राखण्यात त्यामुळे मदत होऊ शकते.
६. गर्भाच्या विकासास मदत करते
फॉलीक ऍसिडमध्ये भरपूर प्रमाणात असलेले बीटरूट आपल्या बाळाची निरोगी वाढ आणि विकासास प्रोत्साहन देते. त्यामुळे तुमच्या बाळाच्या पाठीचा कणा आणि मेंदू विकसित होण्यास मदत होते.
७. यकृताल निरोगी राहण्यास मदत होते
बीटमध्ये असलेले बीटासायनिन हे तुमचे यकृत आणि रक्त डिटॉक्स करण्यास मदत करू शकते. हा घटक तुमच्या शरीरातून फॅटी ऍसिड आणि विषारी पदार्थ काढून टाकते,गरोदरपण निरोगी जाते.
८. व्हिटॅमिन सी मिळते
बीटरूटमधील व्हिटॅमिन सी लोह शोषण्यास मदत करते आणि निरोगी गर्भधारणा व प्रसूतीचा मार्ग मोकळा करते.
९. जन्म दोष निर्माण होत नाहीत
बीटरूटमध्ये असलेले फॉलिक ऍसिड निरोगी ऊतकांच्या वाढीस आणि बाळाच्या विकासास प्रोत्साहन देते. मणक्याचा विकास चांगला होतो, त्यामुळे स्पायना बिफिडा सारखे जन्मदोष निर्माण होत नाहीत.
गरोदरपणात बीटरूट खाण्याचे काही धोके आहेत का?
बीटरूट खाण्याचे असंख्य आरोग्यविषयक फायदे असूनही, गरोदरपणात बीटरूट खाल्ल्यास काही दुष्परिणाम सुद्धा निर्माण होऊ शकतात.
- बीटरूटमध्ये बेटेन असते आणि जर त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर उलट्या, मळमळ, अतिसार आणि इतर जठरोगविषयक समस्या होऊ शकतात.
- बीटरूटमधील नायट्रेटमुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो.
- बीटरूटचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने बीटुरिया नावाची स्थिती देखील होऊ शकते. ह्या समस्येमुळे तुमची लघवी आणि मल लाल होऊ शकतो.
- बीटरूटमधील ऑक्सलेट ह्या घटकाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास किडनी स्टोन होऊ शकतो.
तुमच्या गरोदरपणातील आहारात बीटरूटचा समावेश कसा कराल?
मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ कमी झाल्यावर, तुम्हाला उलटी न होता खाण्याची इच्छा होईल. ह्या कालावधीत तुम्ही तुमच्या आहारात इतर भाज्यांसह बीट घालू शकता. दुस-या तिमाहीत बीटरूट खाणे हा निरोगी गर्भधारणा आणि बाळंतपणाला चालना देणारा पोषक घटक आहे. बीटरूटच्या काही अनोख्या पाककृती येथे आहेत ह्या पाककृती तुम्ही करून पाहू शकता:
१. बीटरूट रस
बीटरूटच्या ज्यूस मध्ये जीवनसत्त्वे, पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. गरोदरपणात ह्याचा खूप फायदा होऊ शकतो. बीटरूट ज्यूस कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.
साहित्य
- बीटरूट (कच्चे/उकडलेले) – १-२ (लहान तुकडे)
- आले (किसलेले) – एक इंच
- लिंबाचा रस – १ टेस्पून
- आवश्यकतेनुसार पाणी
पद्धत:
- ब्लेंडरमध्ये बीटरूट घ्या, त्यात किसलेले आले आणि थोडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट करा.
- एका ग्लासमध्ये द्रव गाळून घ्या.
- त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून ढवळून प्या.
२. बीटरूट सॅलड
बीटरूट सॅलडपेक्षा अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक काहीही नाही. तुम्हाला तुमच्या गरोदरपणाच्या आहारात बीटरूट सॅलडचा समावेश करायचा असेल, तर येथे एक रेसिपी आहे आणि ती तुम्ही करून पाहू शकता.
घटक
- मध्यम आकाराचे बीटरूट (सोललेली, उकडलेली आणि चौकोनी तुकडे) – १-२
- पनीरचे चौकोनी तुकडे/ दही – १ कप
- कढीपत्ता – ४-५
- मोहरी – १/२ टीस्पून
- तेल – १ टीस्पून
- चवीनुसार काळे मिरे
- चवीनुसार मीठ
पद्धत
- एका मोठ्या भांड्यात, उकडलेले बीटरूटचे चौकोनी तुकडे आणि पनीरचे चौकोनी तुकडे/ दही घ्या.
- मीठ आणि मिरपूड घालून चांगले मिसळा.
- कढई गरम करून त्यात तेल घाला.
- तेल गरम झाले की त्यात मोहरी आणि कढीपत्ता घाला.
- मोहरी चांगली तडतडू द्या आणि १०-१५ सेकंदांनंतर हि फोडणी सॅलेड वर घाला. भांड्यावर झाकण ठेवा.
- काही मिनिटांनंतर चांगले मिसळा आणि नंतर बीटरूट-पनीर सॅलडचा आनंद घ्या.
गरोदरपणात बीटरूट खाणे जरी महत्त्वाचे असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. दिवसातून एक बीटरूट खा. तुमच्या गरोदरपणाच्या आहारात बीटरूटचा समावेश करण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ञ किंवा पोषणतज्ञाचा सल्ला घ्या.
आणखी वाचा:
गरोदरपणात डाळिंब खाणे: आरोग्यविषयक फायदे आणि ठोके
गरोदर असताना पपई खाणे: फायदे, जोखीम आणि बरंच काही