कोरोनाव्हायरसचा नुकताच सगळीकडे उद्रेक झाल्याने अख्ख्या जगाने त्याच्यापुढे हात टेकले आहेत. कोरोनाविषाणूचा जगभरातील लोकांना संसर्ग होतो आहे तसेच ह्या विषाणूने लोकांना त्यांच्या घरातच थांबून स्वतःच्या जीवनासाठी प्रार्थना करण्यास भाग पडले आहे. कोविड-१९ विषाणूचा संसर्ग कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. डब्ल्यूएचओ आणि सीडीसीसारख्या आरोग्य संस्थांनी हे स्पष्ट केले आहे की वृद्धांना त्याचा सर्वाधिक धोका असतो. तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक असल्यास, म्हणजेच तुमचे आई वडील, सासू सासरे किंवा आजी आजोबा असल्यास तुम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेऊ शकता.
आम्हाला तुमची काळजी वाटते आणि म्हणूनच आम्ही तुमच्या मदतीसाठी येथे आहोत. कोरोनाव्हायरस पासून तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठांचे संरक्षण कसे करावे हे ह्या लेखाद्वारे जाणून घ्या आणि त्यांना सुरक्षित ठेवा.
सर्वाधिक जोखीम कुणाला आहे?
वयस्क प्रौढ ज्यांचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना सर्वात जास्त कोविड-१९ कोरोनाव्हायरसचा धोका असतो. मधुमेह, फुफ्फुसाचे रोग आणि हृदयरोग यासारख्या मूलभूत वैद्यकीय परिस्थिती असलेल्या वृद्धांनाही कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाल्यास गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. वयोवृद्ध लोकांची जोखीम कमी करण्यासाठी आपल्याकडे कोणताही उपाय नसला तरी आम्ही त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी निश्चितच प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो. कसे ते येथे दिलेले आहे!
१ वृद्धांची काळजी घेताना आणि इतर वेळी सुद्धा स्वच्छतेच्या मूलभूत पद्धतींचे अनुसरण करा
तुम्ही कोरोनाव्हायरसच्या बातम्या नियमितपणे पहात आणि वाचत असल्याने तुम्हाला कोरोनाविषाणुचा संसर्ग होऊ नये म्हणून काय करावे ह्याविषयी माहिती आहे. सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे ह्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत करू लागलेले असाल. स्वच्छता पाळल्याने तुम्ही स्वतःचे आणि घरातील ज्येष्ठ नागरिकांचे ह्या विषाणूपासून संरक्षण करू शकता. साबणाने आणि पाण्याने तुम्ही तुमचे हात किमान २० सेकंद धुतले पाहिजेत. जर तुम्ही घरातील ज्येष्ठांची काळजी घेत असाल तर हे नक्की केले पाहिजे. तुम्ही त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्याआधी आणि जेवायला वाढण्याआधी साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत. तसेच त्यांना स्पर्श करताना किंवा बिछान्यावर झोपवायला मदत करताना सुद्धा तुम्ही हात स्वच्छ धुतले आहेत ना ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना सुद्धा सुरक्षित राहण्यासाठी सतत हात धुण्यास सांगा.
२. वस्तुस्थिती समजून घ्या आणि ती ज्येष्ठ नागरिकांना सांगा
कोरोनाव्हायरसशी संबंधित बरीच चुकीची माहिती व्हॉट्सऍप वर आणि इतर सोशल मीडियावर फिरत असते, त्यामुळे बऱ्याच लोकांना ह्या साथीच्या आजाराचे गांभीर्य समजलेले नाही. संबंधित माहितीसाठी, डब्ल्यूएचओ साइटला भेट द्या आणि आपल्या वडीलधाऱ्यांना आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येकास सावधगिरी बाळगण्यास सांगा आणि त्याप्रमाणे उपाययोजना करा.
३. सामाजिक अंतराचा सराव करा
जर आपल्या कुटुंबातील एखादी वयस्कर व्यक्ती खूप सामाजिक असेल, तर आम्ही खरोखरच समजू शकतो की लोकांच्या नियमित भेटीगाठीसाठी घेण्यापासून त्यांना रोखणे तुमच्यासाठी खूप वेदनादायी ठरेल. तरीही, त्यांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील – त्याशिवाय इतर कोणताही मार्ग नाही. सामाजिक अंतराचे महत्त्व, विशेषत: कोरोनाव्हायरसच्या उद्रेकादरम्यान जाणून घेणे जरुरीचे आहे. जगातील सर्व नागरिकांनी व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक अंतर राखणे. घरातच राहिल्याने एखाद्याला हा जीवघेणा संसर्ग होण्यापासून रोखता येते तसेच एकूण संक्रमित लोकांची संख्या कमी होण्यास मदत होते. रुग्णालयांमध्ये गंभीर प्रकरणांवर उपचार करण्याकरिता इतरांना जागा उरते आणि मृत्यूची संख्याही कमी होते.
४. घरातील वृद्ध व्यक्तींच्या जास्त जवळ जाऊ नका
मुलांकडून आणि नातवंडांकडून मिठी मिळाल्यास वृद्ध मंडळींना छान वाटते. परंतु कोरोनाचा उद्रेक कमी होईपर्यंत मिठी टाळा. ज्येष्ठ मंडळींना शेक हॅन्ड करणे किंवा त्यांना विनाकारण मिठी मारणे टाळा. विशेषकरून तुम्ही कामासाठी बाहेर जात असाल तर हे प्रकर्षाने पाळा. तुमचे त्यांच्याविषयीचे प्रेम तुम्ही नक्कीच इतर प्रकारे व्यक्त करू शकता. गोड शब्द आणि हावभावांद्वारे तुम्ही व्यक्त होऊ शकता.
५. निरोगी खात असल्याची खात्री करा
ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका असण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची कमी प्रतिकारशक्ती हे आहे. वय वाढल्यानंतर, एखाद्या विशीतल्या तरुणासारखी रोगप्रतिकारक शक्ती असू शकत नाही, परंतु ज्येष्ठ व्यक्ती पौष्टिक आहार घेऊन त्यांच्या प्रतिकारशक्तीची पातळी कायम ठेवण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून आपल्या कुटुंबातील वृद्ध मंडळी फक्त निरोगी खाद्यपदार्थ खात आहेत ना याची खात्री करा आणि तुम्ही देखील निरोगी आहार घ्या! आपल्या शरीराला आतून निरोगी ठेवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे नाही का?
६. त्यांचे कपडे वेगळे धुवा आणि ते नेहमी धुतलेले कपडे घालत आहेत ह्याची खात्री करा
घरातील ज्येष्ठांचे कपडे स्वतंत्रपणे धुवा, शक्य असल्यास जंतुनाशक वापरा. त्यांचे आंघोळीचे टॉवेल्स आणि हात पुसायचे टॉवेल्स वेगळे ठेवा. त्यांच्या खोल्या आणि त्यांच्याकडून वारंवार वापरल्या जाणार्या वस्तू स्वच्छ ठेवा.
७. तुमचे घर निर्जंतुक करा
तुमच्या घरातील वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग आणि वस्तू निर्जंतुक करा. अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यासाठी वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभाग आणि वस्तू स्वच्छ ठेवून त्यांचे निर्जंतुकीकरण करा.
८. तुम्ही आजारी असल्यास वृद्धांची काळजी घेऊ नका
जरी तुम्हाला हलका खोकला किंवा ताप असेल, तरी सुद्धा घरातील वडिलधाऱ्यांची काळजी घेणे टाळा. स्वतःचे विलगीकरण करा आणि स्वतःची तपासणी करा कारण ह्या काळात सौम्य फ्लूसारखी लक्षणे कोरोनाविषाणू सारख्या गंभीर संसर्गाचे लक्षण असू शकते. आपल्या वडीलधाऱ्यांना भेटणे टाळा आणि त्याचे संरक्षण करा.
९. तुमच्या ज्येष्ठांच्या डॉक्टरांच्या सर्व अनावश्यक भेटी रद्द करा
कोणत्याही वैद्यकीय भेटी शक्य असल्यास रद्द कराव्यात. आवश्यक असल्यास, ज्येष्ठ नागरिकांना बाहेर घेऊन जाण्याऐवजी डॉक्टरांना घरी बोलावा.
हे काही उपाय आहेत जे आपण आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी वापरू शकता. हट्टी ज्येष्ठ नागरिकांना घरात ठेवणे तुम्हाला कठीण वाटू शकते परंतु प्रेमासाठी काही वेळा कठोर होणे आवश्यक असते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याशी हळूवारपणे बोला आणि त्यांचा नियमित दिनक्रम त्यांनी तसाच ठेवल्यास त्याचे परिणाम काय होतील हे त्यांना धैर्याने समजावून सांगा. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि यावेळी योग्य निर्णय घेण्यास त्यांना कठोरपणे मार्गदर्शन करा. सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यास,भावनांचे कार्ड वापरा. तुम्हाला काही झाले तर आम्हाला त्याची भीती वाटते हे त्यांना सांगा आणि ह्यावर नक्कीच ते विचार करतील.
आणखी वाचा:
कोरोना विषाणू आणि सामान्य फ्लू – डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून तुम्हाला हे माहित असावे
कोविड-१९ कोरोनाविषाणूचा संसर्ग वाढत आहे. तुम्ही (आणि तुमचे कुटुंबीय) कसे सुरक्षित राहू शकाल ह्याविषयी माहिती इथे दिली आहे