In this Article
गरोदरपणात स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक (प्रसूतीनंतरचे शरीरातील बदल) स्तरावर खूप बदल होत असतात. आणि हे बदल प्रत्येक स्त्रीसाठी वेगळे असतात.
एका नवीन आयुष्याला जन्म देणे हा खूप अनमोल क्षण असतो परंतु त्यामुळे भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या थकवा सुद्धा येतो. त्यासाठी प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर खूप काळजी घेणे जरुरी असते, कारण संप्रेरकांच्या पातळीत बदल होत असतात. ह्याविषयी ज्ञान आणि जागरूकता असल्यास स्त्री, बाळाच्या जन्मासाठी आणि त्यासोबत येणाऱ्या बदलांसाठी तयार होईल.
प्रसूतीनंतर सामान्यपणे शरीरात होणारे बदल
बाळाच्या जन्मानंतर स्त्रीच्या शरीरात आणि जीवनशैलीत खालील बदल होतात. समजूतदारपणा, धैर्य आणि स्वीकृती असेल तर हे बदल चांगले हाताळता येतात.
१. केसांमधील बदल
प्रसूतीनंतर अचानक केस गळणे हे खूप सामान्य आहे आणि ते वर्षभर किंवा त्यापेक्षा कमी काळ सुरु राहते. गरोदरपणात जास्त असलेली इस्ट्रोजेन पातळी बाळाच्या जन्मानंतर कमी होते आणि ही पातळी हळू हळू नॉर्मल होते आणि केसांची वाढ पुन्हा पाहिल्यासारखीच होऊ लागते. हे बदल खूप सामान्य आहेत आणि त्याची काळजी करण्याचे काहीच कारण नाही. किंबहुना, चेहऱ्यावरचे आणि शरीरावरील जास्तीचे केस सुद्धा गरोदरपणानंतर गळू लागतील. बाळाच्या जन्मानंतर ३–४ महिने केस खूप प्रमाणात गळतात आणि नंतर केस गळण्याचे प्रमाण नॉर्मल होते.
२. स्तनांमधील बदल
आईच्या पहिल्या दुधाला ‘कोलोस्ट्रम‘ असे म्हणतात. हे दूध प्रतिपिंडांनी समृद्ध असते. ‘कोलोस्ट्रम‘ हे बाळासाठी खूप गरजेचे आणि महत्वाचे असते त्यामुळे बाळाची प्रतिकार प्रणाली मजबूत होते आणि बाळाला संसर्गापासून संरक्षण मिळते. कोलोस्ट्रम हे कमी प्रमाणात असते आणि प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात बाळाला दूध देणे सुद्धा अवघड असते कारण स्तनांना सूज आलेली असते तसेच ते दुखरे आणि हळुवार झालेले असतात. दूध येण्यास सुरुवात झाल्यानंतर सूज कमी होते आणि स्तनपान करणे सोपे आणि आरामदायक होते. स्तन खाली ओघळणे हे अगदी सर्रास आढळते. बाळाचे स्तनपान सोडवल्यानंतर सुद्धा बरेच आठवडे दूध गळत राहते आणि ते नॉर्मल आहे.
३. योनीच्या रचनेत बदल
गरोदरपणात ओटीपोटाचा भाग अगदी तीव्रतेने ताणला गेल्यामुळे, योनीचे स्नायू सैल होतात आणि या भागात ताण जाणवतो. प्रसूतीनंतर मूत्राशय, गुदद्वार आणि गर्भाशय खाली सरकल्यामुळे ते आधीसारखे होत नाही. नीट होण्यासाठी काही आठवडे लागतील. ‘केगल‘ व्यायामामुळे आपल्या मुलाच्या जन्मानंतर शरीराच्या जलद पुनर्प्राप्ती प्रक्रियेस मदत होते.
४. शरीराचे वजन
प्रसूतीनंतरच्या काळात शरीराचा गरोदरपणानंतरचा आकार बदलतो, गरोदरपणात वाढलेले जास्तीचे वजन म्हणजेच ११ किलो हे हळूहळू कमी होते. शरीरातून सगळे जास्तीचे पाणी, जे गर्भारपणात शरीरात धरून ठेवलेले असते ते कमी होते. सुरुवातीला, आईला सतत लघवीला होत असते तसेच घाम येतअसतो. प्रसूतीनंतरच्या पहिल्या आठवड्यात वजन बरेचसे कमी असते कारण गर्भजल, नाळ आणि बाळाचे वजन नसते. नंतर, नियमित वजनातील घट दिसून येते.
५. त्वचेमधील बदल
पालक झाल्यावर आयुष्यात खूप बदल होत असतात. नवीन जबाबदारीमुळे आलेला ताण आणि थकवा ह्यामुळे तुमच्या फक्त तब्येतीवर नव्हे तर त्वचेवर सुद्धा परिणाम होतो. संप्रेरकांच्या पातळीतील चढ उतार ह्यांची त्यामध्ये अनपेक्षितरित्या भर पडते. ज्या स्त्रियांची त्वचा स्वच्छ आणि चमकदार असते अशा स्त्रियांना प्रसूतीनंतरच्या काही महिन्यात त्वचेच्या समस्या येतील. बऱ्याच स्त्रिया ‘क्लोअस्मा फासिअर‘ किंवा ‘मेलासमा‘ म्हणजेच गडद चट्टे (ओठांच्या आजूबाजूस, नाक, गाळ आणि कपाळावर) झाल्याची तक्रार करतील. हे गडद भाग हळू हळू फिकट होत जातात फक्त आईने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण केले पाहिजे. स्ट्रेच मार्क्स हे गरोदरपणात होतातच आणि त्यासाठी विशेष तेल किंवा लोशन लावल्यास ते बरे होऊ शकतात. स्ट्रेच मार्क्स सुद्धा नंतर फिकट होतात.
६. पोटातील बदल
प्रसूतीनंतर गर्भाशय अर्धवट संकुचित आणि तुलनेने वजनदार असते (वजन एक किलोग्रॅम वजनाचे असते) आणि ओटीपोटाच्या खालील भागात ते लहान गोलाकार ढेकूळ म्हणून जाणवते. सुमारे ६ आठवड्यांनंतर त्याचे वजन केवळ एक किंवा दोन औंस असेल आणि यापुढे ते आधीइतके स्पष्ट दिसणार नाही. लाईना निग्रा किंवा गर्भधारणेदरम्यान बहुतेक स्त्रियांच्या पोटावर विकसित होणारी गडद रेखा काही महिन्यांत फिकट होईल.
तथापि, पोटावरील स्ट्रेच मार्क्स खूप काळ राहतात. पोटाच्या आकारात लक्षणीय बदल झाल्यामुळे स्ट्रेच मार्क्स विकसित होतात. (अचानक किंवा हळू हळू). गरोदरपणात हे गडद लाल रंगाचे असतात, जे कालांतराने रंगाने सिल्वर आणि चमकणारे होतात. सामान्यपणे, बऱ्याच स्त्रियांना प्रसूतीनंतर काही प्रमाणात पोटावर चरबी राहते. पोटाचे साधे व्यायाम केल्यास ती कमी होण्यास मदत होते.
प्रसूतीनंतर, कळांमुळे गर्भाशय आकुंचन पावते. ह्या कळांमुळे गर्भाशयाच्या आतील आवारणापासून प्लासेंटा विलग होतो. नाळ बाहेर पडल्यानंतर, गर्भाशय आकुंचन पावते आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात त्यामुळे रक्तस्त्राव कमी होतो आणि जिथून नाळ विलग झालेली असते त्याजागी रक्तस्त्राव बंद होतो. ह्या कळांना ‘प्रसूतीनंतरच्या वेदना‘ असे म्हणतात.
प्रसूतीनंतर, गर्भाशयाचा उंची हळूहळू कमी होते, पहिले काही दिवस ते बेंबीपर्यंत असते. एका आठवड्यानंतर गर्भाशयाचे वजन एका पौंडाच्या आसपास असते – म्हणजेच प्रसूतीनंतर ते वजन अर्धे असते. दोन आठवड्यांच्या आसपास, ते श्रोणीच्या भागात असते आणि वजन फक्त ११ औंस इतके असते. आणि लवकरच त्याचा आकार गरोदरपणाच्या आधी होता तसा होतो आणि वजन साडेतीन औंस होते. ह्यास इंग्रजीत ‘युटेराइन इन्व्होल्युशन‘ असे म्हणतात.
७. मूत्रमार्गात आणि आतड्यांसंबंधी समस्या
मूत्राशयाचे स्नायू जास्त ताणल्यामुळे, नवीन मातांना सामान्यत: असंयम (मूत्रमार्गातून अनैच्छिक लघवी होणे ) जाणवतो आणि मूत्राशयाचे स्नायू अधिक मजबूत झाल्यावर हे कमी होते. काही मातांना रक्तस्त्राव (शौचामध्ये रक्त), असुविधाजनक आतड्यांसंबंधी हालचाली किंवा बद्धकोष्ठता जाणवू शकते कारण प्रसुति दरम्यान आपल्या आतड्यांमधून अन्न हळूहळू पुढे सरकते. जीवनशैली बदलणे – भरपूर तंतुमय पदार्थांसह निरोगी आहार आणि पुरेशी झोप घेणे ह्यामुळे नवीन मातांना या समस्यांना सामोरे जाण्यासाठी मदत होते.
८. लैंगिक इच्छा
प्रसूतीच्या पश्चात एक त्रासदायक बदल म्हणजे कदाचित दोघांनाही शाररिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होईल. नव्याने आई झालेल्या स्त्रियांमध्ये कामेच्छा कमी असलेली आढळून येते आणि ह्यामागील कारण म्हणजे ‘इस्ट्रोजेन‘ हे संप्रेरक होय. इस्ट्रोजेनची पातळी, एल एच (ल्युटिनायझिंग हॉर्मोन) आणि एफएसएच (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) ह्या संप्रेरकांद्वारे नियंत्रित केली जाते. इस्ट्रोजेनद्वारे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नियंत्रित केली जाते. ही इच्छा गरोदरपणात हळूहळू वाढते आणि बाळाच्या जन्मानंतर ती सर्वात कमी असते. ह्या संप्रेरकांच्या पातळ्या कालांतराने नियमित होतात त्यामुळे त्याविषयी काळजी करण्याचे काही कारण नाही. तसेच इच्छा कमी होण्याच्या कारणांमध्ये जननेंद्रियांचे दुखणे आणि ताण ही सुद्धा कारणे असू शकतात. तसेच वेळ न मिळणे आणि बाळाची जबाबदारी ही सुद्धा इतर कारणे आहेत.
९. औदासिन्य
पोस्ट–नेटल डिप्रेशन किंवा औदासिन्य हे बाळाच्या जन्मानंतर आढळते परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि ह्या प्रश्नावर चर्चा सुद्धा केली जात नाही. हे खूप सामान्य आहे आणि त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत.
- संप्रेरकांची पातळी वर खाली होणे: पी एम एस (प्री–मेन्स्ट्रुअल सिंड्रोम) प्रमाणे काही स्त्रियांना संप्रेरकांमधील बदल प्रसूतीनंतर जाणवतात आणि त्यामुळे औदासिन्य येते.
- जीवनशैलीमधील बदल: बाळाच्या जन्मानंतर बऱ्याच स्त्रियांना स्वतःसाठी आणि पतीसाठी वेळ मिळत नाही त्यामुळे असमाधानाची आणि औदासिन्याची भावना बळावते.
- विश्रांतीचा अभाव: जबाबदारी वाढल्यामुळे स्त्रियांना आरामासाठी आणि विश्रांतीसाठी वेळ मिळत नाही
- प्रसूतीनंतरच्या वेदना: बाळाच्या जन्मानंतर स्त्रियांना वेदनेचा अनुभव येतो आणि ह्यामुळे नाराजी येऊ शकते
पोस्ट नेटल डिप्रेशन म्हणजे बदलाचा काळ असतो. आईने स्वतःला तसेच कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. तसेच नव्याने आई झालेल्या स्त्रीला जो आधार किंवा मदत हवी असेल तर ती मिळाली पाहिजे
१०. पाठदुखी
गरोदरपणामुळे पोटाच्या आणि पाठीच्या स्नायूंवर खूप जास्त ताण येतो. पोटाच्या ताणल्या गेलेल्या स्नायूंना ते नैसर्गिकरित्या आधीसारखे होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. शरीराचा पावित्रा जर ठीक नसेल तर दुखणे आणखी वाढते आणि ते असह्य होऊ शकते.
११. वेदना
बाळाच्या जन्मानंतर गर्भाशय आधीच्या आकारात येण्यासाठी आकुंचन पावत असते. त्यामुळे अचानक येणाऱ्या ह्या कळांमुळे वेदना होतात. ह्या कळा साधारण प्रसूतिकाळांसारख्याच असतात किंवा त्यापेक्षा सौम्य असतात आणि स्तनपान करताना त्या वारंवार जाणवतात. ह्याचे कारण म्हणजे स्तनपान करताना ओक्सिटोसीनची निर्मिती होते आणि त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते.
१२. असामान्य रक्तस्त्राव
बाळाच्या जन्मानंतर योनीमार्गातून असामान्य स्त्राव येणे हे सामान्य आहे. ह्या स्रावामध्ये रक्त, जिवाणू, गर्भाशयाच्या आवरणातील टिश्यू असतात. ह्यामध्ये सुरुवातीला रक्त असते आणि ते मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या स्रावासारखे असते. हा स्त्राव कालांतराने कमी होतो आणि स्त्रावाचा रंग फिकट होतो आणि दोन ते चार आठवड्यात तो कमी होतो. ४–६ आठवड्यांच्या रक्तस्त्रावानंतर कधीतरी काहींच्या बाबतीत हलके डाग दिसतात.
निष्कर्ष
बाळाच्या जन्मानंतर स्त्रीच्या शरीरात काही बदल होतात आणि ते नीट हाताळले गेले नाहीत तर ते त्रासदायक होतात. हे बदल केस, त्वचा, वजन, स्तन, जननेंद्रिय, पोट आणि लघवी आणि शौचाच्या सवयी इत्यादींमध्ये दिसून येतात. हे माहिती असणे महत्वाचे आहे की हे बदल नैसर्गिक आहेत आणि ते ४–६ आठवड्यांमध्ये नॉर्मल होणार आहेत आणि बऱ्याचदा त्यासाठी वैद्यकीय मदतीची गरज भासत नाही. संतुलित, पोषक आहार आणि नियमित व्यायाम, योग किंवा एरोबिक्स केल्यास बाळाच्या जन्मांनंतर शरीरात होणारे हे बदल सहज हाताळता येतात.
आणखी वाचा:
प्रसूतीनंतर त्वचेची काळजी
प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी उपाय