मातृत्व हे स्त्रीसाठी आव्हाने आणि चिंता घेऊन येते. एका आईसाठी सर्वात आव्हानात्मक गोष्टींपैकी एक म्हणजे तिच्या बाळाचे आरोग्य होय. जर तुम्हाला तुमच्या बाळामध्ये असणाऱ्या अपचनाच्या समस्येची काळजी वाटत असेल तर, हा लेख तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. कारण आम्ही इथे काही प्रभावी घरगुती उपायांबद्दल चर्चा करणार आहोत. हे उपाय लहान बाळांचे आणि छोट्या मुलांचे पचन सुधारण्यास मदत करतात.
लहान मुलांच्या अपचनावर उपचार करण्यासाठी घरगुती उपाय
छोट्या बाळांची आणि लहान मुलांची पचनसंस्था पुरेशी विकसित नसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. जर तुमच्या बाळाला उलट्या होत असतील किंवा त्याला अतिसार, बद्धकोष्ठता किंवा इतर पोटाच्या समस्या असतील, तर तुमच्या बाळाला अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. परंतु, तुम्ही खालीलपैकी कोणतेही घरगुती उपाय वापरल्यास, अपचनाची समस्या कमी होण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.
1. गरम शेक
बाळांना आणि लहान मुलांना असणाऱ्या गॅसच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी गरम शेक हा एक चांगला मार्ग आहे. आपल्या लहान मुलाला शांत करण्यासाठी देखील त्याची मदत होते. त्यासाठी तुम्हाला फक्त एक मऊ वॉशक्लोथ किंवा टॉवेल आणि एक वाटी कोमट पाणी घ्यायचे आहे. कोमट पाण्यात टॉवेल भिजवा आणि जास्तीचे पाणी पिळून काढा. दोन ते तीन मिनिटे तुमच्या बाळाच्या पोटावर गरम टॉवेल हळूवारपणे ठेवा. लक्षणे दूर करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही असे दिवसातून दोन वेळा करू शकता.
2. योग्यरित्या ढेकर काढणे
तुमचे बाळ स्तनपान करताना किंवा बाटलीने दूध पित असताना भरपूर हवा आत घेते. अडकलेल्या हवेमुळे पोटदुखी आणि गॅस होतो. त्यामुळे बाळ अस्वस्थ होते. या समस्येवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अनेकदा बाळाची ढेकर काढणे. विशेषतः बाळाला स्तनपान केल्यानंतर ढेकर काढणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बाळाला सरळ स्थितीत धरून ठेवू शकता, तुमच्या एका हाताने तुमच्या बाळाच्या पाठीला आधार द्या आणि दुसऱ्या हाताने मानेला आधार द्या. किंवा, बाळाला तुमच्या मांडीवर पालथे झोपवून त्याची पाठ चोळा.
3. आईचे दूध
वर सांगितल्याप्रमाणे, तुमच्या बाळाची पचनसंस्था अपरिपक्व असते आणि म्हणून, बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत, आईचे दूध तुमच्या बाळासाठी आदर्श आहे. बहुतेक डॉक्टर बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान देण्यास सांगतात. जेव्हा तुमचे बाळ आईचे दूध घेते तेव्हा त्याला आवश्यक असलेले सर्व पोषण मिळते आणि पचनसंस्थेला सुद्धा फायदा होतो.
4. बाळाला स्तनपान देतानाची स्थिती
काहीवेळा स्तनपान करताना बाळाच्या स्थितीत बदल केल्याने देखील तुमच्या बाळाला ऍसिड रिफ्लक्सचा सामना करण्यास मदत होऊ शकते. जर तुमच्या बाळाला सतत किंवा नियमितपणे उलट्यांचा त्रास होत असेल, तर त्याला ऍसिड रिफ्लक्सची समस्या असण्याची शक्यता आहे. स्तनपान करताना किंवा बाटलीने दूध पाजताना तुम्ही तुमच्या बाळाला सरळ स्थितीत धरावे. असे केल्यास पोटातील अन्नपदार्थ पुन्हा अन्ननलिकेकडे परत फेकले जात नाहीत. तसेच, तुमच्या बाळाला कमीत कमी अर्ध्या तासासाठी सरळ स्थितीत धरून ठेवल्याने ऍसिड रिफ्लक्स कमी होण्यास मदत होते.
5. दही
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स असतात आणि ते तुमच्या लहान मुलाच्या पचन संस्थेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या बाळाला जुलाब, उलट्या किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दही खाणे उपयुक्त ठरू शकते. काही चमचे दही घ्या आणि त्यात काही चमचे पाणी घालून पातळ करा. तुमच्या बाळाला दिवसातून काही वेळा किंवा त्याला बरे वाटेपर्यंत दही द्या. परंतु, सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाला दही देऊ नका. तुमच्या बाळाला दही देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना विचारा.
6. मसाज
तुमच्या लहान बाळाची हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी मसाज हा एक उत्तम मार्ग आहे. परंतु, आपल्या बाळाला भेडसावत असलेली पचनाची समस्या कमी करण्यासाठी हा आणखी एक चांगला उपाय आहे. तुम्ही कोणतेही चांगले बेबी मसाज तेल घेऊ शकता आणि तुमच्या बाळाच्या बेंबीच्या आसपास मसाज करू शकता. हलक्या हाताने मसाज करा आणि मसाज करताना तुमचे हात घड्याळाच्या दिशेने हलवा. तुमच्या बाळाच्या पोटात कोणताही अडकलेला वायू बाहेर काढण्यासाठी देखील हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही तुमच्या बाळाचे पाय त्याच्या पोटावर हलक्या हाताने दाबून देखील मालिश करू शकता
7. केळी
तुमच्या लहान बाळाचे पचन सुधारण्यासाठी तुम्ही त्याला केळी देऊ शकता. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी केळी उत्तम आहेत. कारण केळी पचनास सोपी असतात. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने मुलांमधील बद्धकोष्ठतेवर केळी खाल्ल्याने चांगली मदत होते. जर तुमच्या बाळाला उलट्या किंवा अतिसाराचा त्रास होत असेल, तर केळी खाणे तुमच्या बाळाच्या आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु, जर बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर त्याला केळी देऊ नका
8. घरी केलेले ग्राइप वॉटर
आले, कॅमोमाइल आणि बडीशेप वापरून तुम्ही घरी ग्राइप वॉटर बनवू शकता. बहुतेक डॉक्टर कदाचित तुमच्या बाळाला स्टोअरमधून विकत घेतलेले ग्राइप वॉटर घेण्याची शिफारस करत नाहीत परंतु घरी बनवलेले ग्रिप वॉटर हे नक्कीच सुरक्षित आहे. लहान आणि मोठ्या मुलांसाठी हे ग्राईप वॉटर चांगले कार्य करते.
9. ब्रोकोली
तुमच्या लहान बाळासाठी ब्रोकोली चांगली आहे. ही हिरवी भाजी फायबर, फोलेट, कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असते. ब्रोकोली तुमच्या बाळाच्या पचनसंस्थेमध्ये निर्माण होणारी कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करण्यास मदत करते. ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठतेशी सामना करण्यास मदत होते. ब्रोकोली खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य, पोषक घटकांचे शोषण आणि तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती सुधारण्यात देखील मदत होते. परंतु, तुमच्या बाळाला खूप जास्त प्रमाणात ब्रोकोली देऊ नका कारण यामुळे बाळाच्या शरीराला सूज येणे, गॅस होणे, अशा इतर समस्या उद्भवू शकतात.
10. बडीशेप
पचनाशी संबंधित समस्यांशी लढण्यासाठी सर्वात प्रभावी आवश्यक तेलांपैकी एक म्हणजे बडीशेप तेल. तुम्ही या तेलाचे काही थेंब घेऊन ते तुमच्या बाळाच्या नियमित मसाज तेलात किंवा नारळाच्या तेलासारख्या इतर तेलांमध्ये मिसळू शकता आणि ते तुमच्या बाळाच्या पोटाभोवती हलक्या हाताने चोळा. असे केल्याने पचनाशी समस्यांशी संबंधित वेदना आणि अस्वस्थता शांत करण्यास मदत होते.
हे काही जुने घरगुती उपाय आहेत. हे उपाय लहान मुलांच्या अपचनाच्या समस्यांशी लढण्यास मदत करतात आणि तुमच्या लहान बाळासाठी हे उपाय फायदेशीर ठरतात. परंतु, यापैकी कुठल्याही उपायाचा उपयोग झाला नाही किंवा तुमच्या बाळाची प्रकृती आणखी बिघडल्यास, वैद्यकीय मदत घ्या.
आणखी वाचा:
बाळांच्या घसा खवखवण्यावर १० सर्वोत्तम घरगुती उपाय
बाळांचे आणि लहान मुलांचे नाक वाहत असल्यास त्यावर नैसर्गिक उपाय