एसआयडीएस (SIDS) आणि बाळाला झोपवताना घ्यावयाची काळजी

SIDS आणि बाळाला झोपवताना घ्यायची काळजी

प्रत्येक आई आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. अगदी साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा नवजात बाळासाठी धोका निर्माण करू शकतात. बाळाच्या सुरक्षिततेविषयी असाच एक प्रश्न म्हणजे SIDS. SIDS विषयी सत्यता जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा, त्यामुळे तुम्हाला SIDS ची कारणे माहित होतील आणि तो टाळण्यासाठी मदत होईल.

SIDS काय आहे?

Sudden Infant Death Syndrome, नावाप्रमाणेच, अचानक काही कारण नसताना बाळाचा झोपेतच मृत्यू होतो. सामान्यतः निरोगी बाळांमध्ये कुठल्याही कारणास्तव SIDS आढळतो.

SIDS संबंधित अशीही एक शक्यता असू शकते की, बाळाच्या मेंदूच्या कुठल्या तरी भागात अचानक दोष निर्माण होतो, त्यामुळे बाळास श्वसनास त्रास होतो. काही बाह्य घटकांमुळे सुद्धा SIDS होऊ शकतो. त्यामुळे बाळ जेव्हा झोपते तेव्हा बाळाची सुरक्षा तपासून पाहणे अतिशय गरजेचे आहे.

बाळांमध्ये आढळणाऱ्या SIDS ची कारणे

SIDS होण्यामागचे निश्चित कारण खरंतर अजूनही एक गूढ आहे. पण आनंदाची गोष्ट अशी की बाळांचा SIDS मुळे मृत्यू होण्याच्या घटनांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ह्याचे मुख्य कारण असे आहे की ह्या परिस्थितीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि नवजात बालकांच्या झोपेच्या सुरक्षिततेवर व्यापक भर देण्यात आला आहे. तरीसुद्धा SIDS मुळे अर्भकांचे मृत्यू होत आहेत, आणि त्याची कारणे वेगवेगळी आहेत. ती कारणे काय आहेत ह्याचा अंदाज बांधणे कठीण असते. SIDS विषयी माहिती जाणून घेतल्यास त्याचे धोके टाळण्यास नक्की मदत होईल. एक गोष्ट आपल्याला नक्की माहित आहे की SIDS होण्यामागे फक्त शारीरिक कारणे नाही तर काही बाह्य घटक, जसे की झोपेची स्थिती सुद्धा आहेत.

१. मेंदूचे काही भाग अजूनही अपरिपक्व असणे

सामान्यतः जन्माच्या वेळी बाळाचा मेंदू परिपक्व असतो आणि शरीराची मूलभूत कार्ये नियंत्रित करीत असतो. पहिल्या काही महिन्यात तो विकसित होतो. परंतु काही बाळांमध्ये जन्माच्या वेळी मेंदूचे काही भाग पूर्णपणे विकसित झालेले नसतात. जर बाळाचा जन्म अकाली झाला असेल तर किंवा बाळे जुळी किंवा तिळी असतील तर असे असण्याची शक्यता जास्त असते.

जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे हा सुद्धा एक धोकादायक घटक आहे. अशा परिस्थितीत, बाळाच्या मेंदूचे स्वायत्त तंत्रिका प्रणालीवर (Autonomous Nervous System) नियंत्रण कमी असण्याची शक्यता असते. याचा अर्थ असा आहे की बाळाचा मेंदू श्वासावर पूर्ण नियंत्रण घेऊ शकत नाही. यामुळे बाळाला झोपण्याच्या वेळेस धोका निर्माण होतो, आणि बाळाच्या उत्साहजनक प्रतिसादास अडथळा येतो. प्रामुख्याने अर्भकांमध्ये, जेव्हा शरीरात काही असामान्यता निर्माण होते तेव्हा प्रतिसाद देणे ही शरीराची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.

उदा: नॉर्मल स्थितीमध्ये झोपताना चेहरा नीट ठेवला न गेल्यामुळे जर बाळाला श्वसनास त्रास होत असेल तर, बाळाला झोपेतून जाग आली पाहिजे आणि त्याने आपोआप श्वास घेता येईल अशाप्रकारे चेहरा नीट ठेवायला हवा. पण ज्या बाळांचा मेंदू नीट विकसित झालेला नसतो त्यांच्या बाबतीत असे होत नाही. आणि त्यामुळे SIDS ची शक्यता वाढते.

२. श्वसनाचे आजार आणि संसर्ग

सर्दी व श्वसनमार्गाच्या संसर्गाच्या काही प्रकरणांमध्ये श्वासोच्छवासास त्रास होऊ शकतो. जेव्हा मूल झोपते तेव्हा या समस्या वाढतात.

श्वसनाचे आजार आणि संसर्ग

३. असामान्य प्रतिबंधात्मक पश्चवाह प्रतिसाद ( Abnormal Preventive Reflux Responses)

हे अगदी साहजिक आहे की शरीराच्या श्वसन प्रणालीमध्ये कोणत्याही अतिरिक्त द्रवपदार्थाचा समावेश असता कामा नये (यामुळे जीव गुदमरू शकतो आणि कधीकधी त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो). जेव्हा श्वसन प्रणालीच्या श्लेष्म पृष्ठभागाच्या संपर्कात द्रव येतो तेव्हा प्रतिबंधात्मक पश्चवाह सुरु होतो, ज्यामुळे ती व्यक्ती तो द्रव गिळते किंवा नाकातून अथवा घशातून तो द्रव बाहेर टाकते. अशाप्रकारे श्वसनमार्गातून, श्वसनास अडथळा आणणारा तो द्रव बाहेर टाकला जातो. जर जन्मतः बाळाचा मेंदू अविकसित असेल तर असे होत नाही. त्यामुळे स्लीप अप्निया ( Sleep Apnea) होतो आणि सर्वात वाईट परिस्थितीत SIDS होतो.

४. शरीराची वाढलेली उष्णता

बाळाला उबदार वातावरणात छान झोप लागते. पण वातावरण खूपच उबदार झाले तर बाळाच्या शरीरास ही परिस्थिती कशी हाताळावी हे समजत नाही. कपड्यांच्या चुकीच्या निवडीमुळे हायपोथर्मिया (Hypothermia) होतो. एकावर एक असे खूप कपडे घातल्याने बाळाच्या शरीराचे तापमान वाढते आणि SIDS चा धोका सुद्धा वाढतो. जास्त तापमानामुळे चयापचयाची पातळी वाढते आणि त्यामुळे श्वसनावरील नियंत्रण कमी होते.

शरीराची वाढलेली उष्णता

५. चुकीची झोपण्याची स्थिती

बाळाला पाठीवर झोपवा असं लोक नेहमी सांगतात, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल हो ना? जेव्हा बाळ पोटावर झोपते तेव्हा बाळाच्या श्वसनावर त्याचा हानिकारक परिणाम होतो. बाळाचा चेहरा बिछान्यावर दाबला जाण्याचीही शक्यता वाढते, त्यामुळे बाळाच्या श्वासोच्छवासास अडथळा निर्माण होतो. बाळाला कुशीवर झोपवल्यास बाळ पालथे पडून पुन्हा पोटावर झोपण्याची शक्यता असते. त्यामुळे धोका कमी करण्यासाठी कायम बाळाला पाठीवर झोपवलं पाहिजे. जी बाळे पाठीवरून पोटावर आणि पोटावरून पाठीवर वळू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही काळजी जास्त घेतली पाहिजे.

चुकीची झोपण्याची स्थिती

म्हणजे सारांश असा की हवामानाप्रमाणे बाळाला कपडे घालून त्याच्या शरीराचे तापमान वाढू न देता बाळाला पाठीवर झोपवल्यास SIDS ची शक्यता खूप कमी होते.

कोणत्या बाळांना SIDS चा धोका जास्त असतो?

 • जरी ह्याचे नक्की कारण माहिती नसले तरी स्त्री अर्भकांपेक्षा पुरुष अर्भकांना SIDS चा धोका जास्त असतो.
 • ही स्थिती प्रामुख्याने अर्भकांमध्ये आढळते. बऱ्याच प्रकरणांमध्ये बाळाचे वय २-४ महिन्यांच्या आसपास असते. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे लहान बाळे अजून जास्त हालचाल करायला शिकलेली नसतात. त्यामुळे त्यांची बिछान्यामध्ये गुदमरण्याची शक्यता जास्त असते.
 • निरीक्षणाद्वारे असे दिसून आले आहे की उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये SIDS मुळे जास्त मृत्यू होतात, ह्याचे कारण म्हणजे थंडीमध्ये बाळाला उबदार ठेवण्यासाठी जास्त कपडे आणि ब्लँकेट्स वापरले जातात.

कोणत्या बाळांना SIDS चा धोका जास्त असतो?

 • जर बाळाच्या कुटुंबातील अन्य बाळाचा SIDS मुळे मृत्यू झालेला असल्यास बाळाची जास्त काळजी घेतली पाहिजे.
 • जर बाळाचा जन्म, प्रसूतीच्या तारखेच्या काही आठवडे आधी झाला असेल आणि बाळाचे जन्माच्या वेळी वजन कमी असेल तर बाळ कमी विकसित असल्याचा धोका असतो.
 • जर घरात कुणी धूम्रपान करत असेल तर सिगारेटच्या धुरामुळे बाळाला SIDS चा धोका वाढतो.
 • २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मातेच्या बाळाला जास्त धोका असतो. ह्यामागे स्पष्ट कारण माहित नसले तरी बाळाची काळजी घेण्याइतकी क्षमता ह्या कमी वयाच्या आईमध्ये नसते.
 • ज्या आजारी माता स्वतःची तसेच बाळाची काळजी घेत नाहीत, तसेच त्यांच्याकडे असलेला निरोगी जीवनशैलीचा अभाव, तसेच काही स्त्रिया मद्यपान आणि ड्रग्सचा वापर करतात. अशा माता SIDS चा जास्त धोका असलेल्या बाळांना जन्म देतात.

नवजात बाळांमध्ये आढळणाऱ्या SIDS ची लक्षणे

SIDS ही अशी स्थिती आहे जी अचानक घडते. या प्रक्रियेदरम्यान बाळ रडत नाही.

याचा अर्थ असा की आपल्याला कोणत्याही लक्षणांद्वारे पूर्वसूचना दिली जाऊ शकत नाही. म्हणूनच, SIDS कधी होतो आणि तो टाळण्यासाठी आपण कोणती कारवाई करू शकता हे जाणून घेणे आणखी कठीण आहे. सर्वसाधारणपणे, जर आपल्या बाळाला श्वासोच्छवासास त्रास होत असेल किंवा प्रत्येक वेळी पाजल्यानंतर ओकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. जर काही आरोग्याचे प्रश्न असतील तर ती शक्यता काढून टाकली जाईल. काही बाळांना SIDS च्या आधी काही दिवस श्वसनाचा आजार होण्याची शक्यता असते. पण बऱ्याच वेळा बाळ जागे असताना निरोगी आणि क्रियाशील असल्याचे समजते.

बाळाचे SIDS आणि झोपेशी निगडित धोके कसे टाळावेत?

जरी आपल्याला SIDS ची कारणे माहित नसली तरी, त्याच्याशी निगडित धोक्यास कारणीभूत असलेले घटक आपल्याला माहित असल्यास आपण बाळांमधील SIDS चा शक्यता नक्कीच कमी करू शकतो.

१. झोपण्याची अचूक स्थिती

बाळाला योग्य स्थितीत झोपवण्यास सुरुवात करा. अमेरिकन सोसायटी ऑफ पेडिऍट्रिकस हे नॅशनल चाईल्ड केअर आणि हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या संयोगाने “BACK TO SLEEP CAMPAIGN” २००३ मध्ये आयोजित केली होती. ह्याचा मुख्य उद्देश बाळाला पाठीवर झोपवण्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता. SIDS आणि अर्भकांची झोपेदरम्यान सुरक्षितता ह्यासाठी हे आयोजित करण्यात आले होते.

दुपारची झोप असो किंवा रात्रीची गाढ निद्रा असो, पाठीवर झोपणे ही बाळांसाठी सर्वात सुरक्षित स्थिती आहे. अकाली जन्मलेली बाळे जी निओनॅटल केअर मध्ये ठेवलेली असतात त्यांना पाठीवर झोपवलेच पाहिजे कारण त्यांना SIDS चा सर्वात जास्त धोका असतो.

२. बाळाचा बिछाना आणि झोपेच्या वेळचे वातावरण सुधारित करा

बहुतेक झोपेसंबंधित समस्या प्रामुख्याने बाळांना देण्यात आलेल्या चुकीच्या झोपेच्या वातावरणामुळे येतात. स्वतःला बाळाच्या झोपेच्या सुरक्षिततेच्या शिफारशीबद्दल जागरूक करणे हे SIDS आणि आणि त्यासंबंधित धोके कमी करणे हे पहिले पाऊल आहे.

उदाहरणातून शिकून स्वत: ला शिक्षित करा. SIDS च्या अनेक दुःखदायक कथा जगभरातील पालकांना पूर्वसूचना म्हणून सांगितल्या जातात. ह्यामुळे पालकांना हे समजण्यास मदत होते की बाळाच्या झोपण्याच्या सुरक्षिततेतील सर्वात लहान तपशील सुद्धा अगदी महत्वाचा आहे.

तुमच्या झोपी गेलेल्या बाळास सुरक्षित कसे ठेवावे

बाळ झोपलेला असताना तो सुरक्षित आहे ह्याची खात्री कशी कराल? जरी तुम्ही रात्रभर बाळाकडे लक्ष ठेवलत तरीही हे SIDS केव्हा होईल हे सांगणे खूप कठीण असते कारण त्याची कुठलीही बाह्यलक्षणे नसतात. बाळ झोपल्यावर ते सुरक्षित आहे की नाही ह्याची खात्री करण्यासाठी खाली काही मार्ग दिले आहेत.

१. बाळाला तुमच्या खोलीत झोपवा

जन्मानंतर पहिले वर्षभर बाळाला तुमच्याच खोलीत झोपवणे हा सर्वात सुरक्षित मार्ग तुम्ही असा पाळणा निवडा की जो तुम्ही तुमच्या बिछान्यापाशी ठेऊन, रात्रीच्यावेळी बाळाकडे लक्ष ठेऊ शकता. असे करणे पहिले ६ महिने अतिशय महत्वाचे आहे.

बाळाला तुमच्या खोलीत झोपवा

२. बेबी मॉनिटर्स वर अवलंबून राहू नका

बाळ नर्सरी मध्ये असताना तुम्हाला असे वाटेल की बेबी मॉनिटर च्या साहाय्याने तुम्ही बाळावर लक्ष ठेऊ शकता. बेबी मॉनिटर्स चांगले आहेत, पण SIDS चा धोका टाळण्यासाठी तुम्ही बेबी मॉनिटर्स वर अवलंबून राहू शकत नाही. ते तुम्ही मोठ्या मुलांसाठी वापरू शकता. जेव्हा बाळ दुसऱ्या वर्षात पदार्पण करतो तेव्हा तुम्ही मॉनिटर्स वापरले तरी चालू शकते. पण पहिल्या वर्षासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे बाळाला तुमच्या खोलीत झोपवणे हा होय.

३. कार्डीओरेस्पिरेटरी मॉनिटर्स वर अवलंबून राहू नका

आम्हाला माहित आहे की मुख्यत्वे श्वास घेण्यात अडथळा झाल्यामुळे SIDS होतो. परंतु याचा अर्थ असा नाही की कार्डीओरेस्पिरेटरी मॉनिटर्स किंवा सर्वसाधारणपणे श्वास मॉनिटर्स किंवा SIDS साठी असलेले बेबी मॉनिटर्सवर आपण विश्वास ठेवू शकता. ह्याचा कुठलाही पुरावा नाही की हे मॉनिटर्स पालकांना SIDS ची पूर्वसूचना देतील.

४. योग्य कपडे निवडा

जेव्हा आपण रात्री आपल्या बाळाला झोपवता तेव्हा त्याला उबदार कपडे घाला जेणेकरुन त्याला आरामदायक वाटेल. आपण खूप थंड प्रदेशात रहात नसल्यास, एकावर एक बरेच कपडे घातल्यामुळे बाळाला खूप गरम होऊ शकते. बाळ गुदमरणार नाही तसेच आणि बाळाला थंडीत उबदार ठेवतील एवढेच कपडे बाळाला घालावेत. बाळ पाळण्यात झोपलेले असेल तेव्हा टोपी असलेले कपडे बाळाला घालू नयेत. तसेच गळ्याशी बीब (bib) तसेच ठेवून बाळाला झोपवू नये.

योग्य कपडे निवडा

५. बाळाला चोखणी द्या

जर बाळाला चोखणी आवडत असेल तर, झोपताना त्याला द्या. परंतु गळ्याभोवती असलेल्या पट्ट्यासह असणारी चोखणी टाळा. SIDS बऱ्याच प्रमाणात टाळण्यासाठी चोखणीची मदत होते.

शिशुच्या झोपण्याच्या सुरक्षिततेसाठी शिफारसी

SIDS प्रकरणांच्या सामूहिक नोंदीमुळे अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने झोपेच्या सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम शिफारसी दिल्या आहेत. SIDS शी संबंधित नवीन निष्कर्ष रेकॉर्ड केल्यामुळे हे सतत अद्ययावत केले जात आहे. येथे शिफारसींचा सारांश आहे

 • बाळाला पाठीवर झोपवा
 • बाळाचा बिछाना खूप मऊ नसावा
 • तुम्ही ज्या खोलीत झोपता तिथेच बाळास झोपवा
 • बाळाला जिथे धूम्रपान, ड्रग, आणि मद्यपान केले जाते तिथून दूर ठेवा
 • बाळाला चोखणी द्या
 • लसीकरण टाळू नका
 • मॉनिटर्स वर अवलंबून राहू नका

बाळाला SIDS पासून सुरक्षित ठेवण्यासाठी आईने काय केले पाहिजे

SIDS फारसा सामान्य नाही आणि जोखीम घटक कमी केल्याने SIDS ची शक्यता कमी होते. पण आई म्हणून, तुम्हाला तुमच्या मुलाची संपूर्ण सुरक्षा हवी असते. लहान मुलांमध्ये SIDS टाळण्यासाठी आपण करू शकता अशा काही गोष्टी येथे आहेत

१. पोटावर झोपलेल्या बाळाला एकटे सोडू नका

बाळांच्या स्नायूंना बळ देण्यासाठी थोडावेळ पोटावर झोपवणे आवश्यक आहे. पण त्यावेळी बाळाकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. पोटावर झोपवण्याचा कालावधी शिशुच्या वयानुसार आणि बाळाला पोटावर झोपायला आवडते का यावर अवलंबून असते. बाळ किती वेळ पोटावर झोपले आहे हे महत्वाचे नाही, आपण सतत त्याचे निरीक्षण केले पाहिजे. तसेच, जेव्हा बाळ जागे आणि सक्रिय असते तेव्हा त्याला पोटावर झोपवा आणि जेव्हा तो थकलेला आणि झोपेत असतो तेव्हा पोटावर झोपवणे टाळा.

२. जेव्हा बाळाला सर्दी किंवा श्वसनासंबंधी आजारांची लक्षणे दिसतात तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या

लहान मुलांमध्ये सुरुवातीच्या काही महिन्यांत सौम्य सर्दी सुद्धा खूप तीव्र होऊ शकते. जेव्हा बाळाला श्वासोच्छवासाच्या त्रासाची कोणतीही लक्षणे दिसतात तेव्हा आपल्या मुलाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

३. जीवनशैलीत बदल

आपण गर्भवती असताना आणि प्रसवानंतर देखील धूम्रपान टाळा. अल्कोहोल आणि इतर औषधे वापरल्याने बाळाच्या जन्मावेळी त्रास होऊ शकतो. विशेषत: आपण स्तनपान करत असल्यास कोणालाही बाळाजवळ धूम्रपान करण्याची परवानगी देऊ नका. मद्यपान करून कोणालाही बाळाजवळ झोपू देऊ नका.

४. स्तनपान आणि SIDS

असे दिसून येते की, जन्मापासून स्तनपान दिले गेलेल्या बाळांना SIDS चा धोका कमी असतो. बाळाला पहिले ६ महिने सतत स्तनपान दिल्यास बाळाची तब्येत चांगली राहते तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये सुद्धा मेंदूचा विकास चांगला होतो.

बाळासाठी झोपेच्या वेळी सुरक्षित वातावरण

काही शारीरिक कारणामुळे होणाऱ्या SIDS च्या घटना आपण टाळू शकत नाही, परंतु जर बाह्य घटकांमुळे SIDS होत असेल तर आपण ते नक्कीच सुधारू शकतो. असे केल्याने SIDS चा धोका खूप कमी होतो. इथे काही टिप्स आहेत ज्यामुळे झोपेच्या वेळी बाळ सुरक्षित रित्या झोपत आहे ह्याची खात्री होते.

१. बाळासाठी योग्य पाळणा निवडा

सर्वप्रकारे सुरक्षित असलेला पाळणा निवडा. पाळणा बाळाचे वजन पेलू शकेल इतका मजबूत असला पाहिजे. जेव्हा तुम्ही पाळणा निवडाल तेव्हा त्याचा कठडा उंच असेल असा निवडा, म्हणजे झोपेत असताना खाली पडण्याची शक्यता कमी होते.

२. बाळासाठी योग्य गादी निवडा

गादी निवडताना ती खूप मऊ नसावी. तसेच ती बाळाच्या वजनानुसार घ्यावी. पाळण्यासाठी गादीचा आकार अगदी योग्य निवडावा. पाळण्यापेक्षा लहान गादी असल्यास गॅप राहतो तसेच मोठी असल्यास घड्या पडतात. त्यामुळे योग्य आकाराची थोडी टणक गादी निवडावी त्यामुळे बाळाला झोपवल्यानंतर सुद्धा गादीचा आकार आधीसारखाच नीट राहील.

३. उशा आणि ब्लॅंकेट टाळा

पहिले काही महिने बाळाला रात्रीच्यावेळी पाळण्यामध्ये झोपवताना उशा वापरण्याचे टाळा. फॅन्सी उशा, छोटी मऊ खेळणी, ब्लँकेट्स मुळे पाळण्याला शोभा येत असली तरीही बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते खूप हानिकारक आहे. ह्यामुळे बाळाचा चेहरा किंवा मान दाबली जाऊ शकते आणि त्यामुळे श्वसनास अडथळा येऊ शकतो. पहिले काही महिने फक्त साधी गादी आणि त्यावर मऊ कापड एवढेच फक्त पाळण्यात असावयास हवे.

४. तुमच्या बाळाला नीट गुंडाळा

बाळाला मऊ कपड्यामध्ये गुंडाळल्याने छान झोप लागते. पण जेव्हा तुम्ही बाळाला गुंडाळता तेव्हा त्याला पाठीवर झोपवा. तसेच कापडाची टोके नीट खोचली गेली आहेत ना ह्याची खात्री करा.

५. पाळण्याबाबत घ्यायची दक्षता

बाळाचा पाळणा तयार करताना खाली काही मुद्दे आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत:

 • Crib चे बंपर पॅड बाळासाठी फायद्यापेक्षा नुकसानकारक जास्त आहेत. त्यामुळे गुदमरण्याचा धोका उद्भवू शकतो.
 • पाळण्याला योग्य अशीच गादी निवडावी. जी पाळण्याच्या बाहेर ओघळणार नाही तसेच गादी आणि पाळण्याचा कठडा ह्यामध्ये अंतर राहणार नाही ह्याची खात्री करा.
 • पाळणा मजबूत असल्यास तो बाळासाठी सुरक्षित असेल.
 • जर पाळण्याला प्लास्टिकचा किंवा रंगाचा उग्र वास येत असेल तर बाळासाठी असा पाळणा घेणे टाळा.
 • जिथे बाळाची सुरक्षितता लक्षात घेऊन पाळणा तयार केला जातो अशा प्रसिद्ध ब्रँड चा पाळणा निवडा.
 • पाळणा खिडकीच्या जवळ ठेवणे टाळा.
 • पाळणा विजेची बटनांपासून दूर ठेवा.
 • तर तुम्हाला जुळी बाळे असतील तर योग्य आकाराचा पाळणा निवडा,ज्यामुळे बाळाला चांगली झोप लागेल आणि SID चा धोका कमी होईल.

६. बाळाबरोबर एकाच बिछान्यावर झोपू नका

बाळाबरोबर एकाच बिछान्यावर झोपल्याने SID चा धोका वाढतो. जर तुम्ही धूम्रपान किंवा मद्यपान करत असाल तर बाळाबरोबर एकाच बिछान्यावर झोपणे टाळा.

७. खोलीचे तापमान नियंत्रित ठेवा

बाळासाठी मोकळी हवा असलेली खोली निवडा. घरातील वातानुकूलित यंत्रणा नीट सुरु आहे ना ह्याची खात्री करा. खोली उबदार राहण्यासाठी योग्य तापमान निवडा. पण त्याचवेळी रात्रीच्यावेळी तापमान खूप जास्त होणार नाही ह्याची खात्री करा. तसेच खूप जास्त थंड सुद्धा होणार नाही हे सुद्धा बघा. खोलीचे योग्य तापमान बाळाला नीट झोप लागण्यास मदत करते.

त्यामुळे सुरक्षित झोप लागण्यासाठी गादीची आणि पाळण्याची योग्य निवड, पाळण्याची जागा इत्यादी अतिशय महत्वाचे आहे. बाळाला सोफ्यावर किंवा खुर्चीवर झोपवणे टाळा.

बाळाच्या सुरक्षित झोपेसाठी काही टिप्स

 • रिबन किंवा दोरे असलेले बेडशीट्स काढून टाका.
 • प्राण्याच्या कातडीपासून बनवलेले मऊ बेडशीट टाळा. त्याऐवजी मऊ कापड निवडा ज्यामुळे बाळाला श्वसनास अडथळे येणार नाहीत.
 • Crib मोबाइल सुरक्षितरित्या बसवला आहे ह्याची खात्री करा, आणि जिथे बाळ पोहोचू शकत नाही इतक्या उंचीवर तो ठेवला आहे ना हे सुद्धा पहा.
 • पाळण्यात बाळाच्या दुधाच्या बॉटल्स असतील तर त्या काढून ठेवा.
 • पाळणा खिडकीपाशी ठेऊ नका, तसेच जिथे ऊन येत असेल असा कोपरा पाळणा ठेवण्यासाठी निवडू नका.
 • बाळाला डोक्याला टोपडं बांधून झोपवू नका.
 • Feet-to-foot ही स्थिती बाळाच्या सुरक्षिततेसाठी सर्वात योग्य आहे कारण ह्यामध्ये बाळाचे पाय पाळण्याच्या कठड्यांना टेकतात.

जर तुम्ही वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यात आणि स्वतःला SIDS विषयी शिक्षित केलंत तर तुम्ही थोडं निवांत राहू शकाल, कारण तुम्हाला माहित असेल की तुमच्याजवळ SIDS च्या प्रश्नाविषयी सगळी माहिती आहे. आणि डॉक्टरांची वेळीच मदत घ्याल कारण बाळाचे आरोग्य हे निश्चितच सर्वात जास्त महत्वाचं आहे.