In this Article
- गरोदरपणातील बेड रेस्ट म्हणजे काय?
- गरोदरपणात बेड रेस्ट का आवश्यक आहे?
- तुम्हाला सर्व वेळ अंथरुणावर राहावे लागेल का?
- गरोदरपणातील बेड रेस्टचे स्तर आणि प्रकार
- बेडरेस्ट मुळे येणारी अस्वस्थता आणि त्यास कसे सामोरे जावे?
- बेड रेस्ट – विश्रांतीसाठी सर्वोत्तम स्थिती
- बेड रेस्टचे धोके
- डॉक्टरांशी चर्चा करण्याच्या गोष्टी
- बेड रेस्ट दरम्यान निरोगी कसे रहावे?
- बेड रेस्टचा तुमच्या कुटुंबावर कसा परिणाम होतो?
- बेड रेस्टचा सर्वोत्तम वापर कसा करायचा?
- तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तूची चेकलिस्ट
गर्भारपण हा एक कठीण प्रवास आहे. ह्या प्रवासादरम्यान तुमच्या आयुष्यातील जवळपास सर्वच गोष्टी जसे की तुमचा आहार, तुमची जीवनशैली, क्रियाकलाप, प्राधान्ये इत्यादी बदलणे आवश्यक आहे. तुमच्या स्त्रीरोगतज्ञांच्या भेटी वाढतील. गरोदरपणात तुम्हाला मॉर्निंग सिकनेस, वजन वाढणे वगैरे त्रास होऊ शकतो. काही वेळा, तुम्हाला बेड रेस्टची देखील गरज असते. बेड रेस्ट म्हणजे काय असा विचार तुम्ही करत आहात का? ह्या लेखामध्ये बेड रेस्टची गरज का असते, त्याचे फायदे आणि तोटे इत्यादींविषयीची माहिती दिलेली आहे.
गरोदरपणातील बेड रेस्ट म्हणजे काय?
गरोदरपणातील बेड रेस्टची अनेक कारणे असू शकतात. दररोज काही तास अंथरुणावर पडून राहण्यापासून ते हॉस्पिटलमध्ये स्वतःची तपासणी करण्यापर्यंत, बेड रेस्टची अनेक कारणे असू शकतात. तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि तुमच्या गरोदरपणाशी संबंधित कोणतेही धोके किंवा गुंतागुंत टाळण्यासाठी बेड रेस्ट घेण्यास सांगितले जाते. बाळाच अकाली जन्म किंवा मृत बालक जन्माला येऊ नये म्हणून तुमच्या हालचाली आणि कामे प्रतिबंधित करण्यासाठी बेड रेस्ट घेण्यास सांगितले जाते. हा विश्रांतीचा कालावधी काही दिवसांपासून अनेक महिन्यांपर्यंत कितीही असू शकतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत, बहुतेक डॉक्टर कठोर म्हणजेच दिवस रात्र बेड रेस्टची शिफारस करत होते. परंतु आता केवळ वैद्यकीयदृष्ट्या गंभीर प्रकरणांसाठीच बेड रेस्ट घेण्यास सांगितले जाते. ह्याचे कारण म्हणजे बेड रेस्ट घेतल्याने अनेक क्लिष्ट गर्भधारणा सुधारण्यास मदत झालेली नाही. परंतु, तुमच्या गरोदरपणात तुमचे डॉक्टर तुम्हाला बेड रेस्ट सांगतात ह्याची इतरही अनेक कारणे आहेत. गरोदरपणात बेड रेस्ट कधी आणि का आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
गरोदरपणात बेड रेस्ट का आवश्यक आहे?
तुमच्या गर्भारपणाच्या प्रकारावर आणि तुमच्या सध्याच्या वैद्यकीय स्थितीनुसार बेड रेस्टची गरज आणि महत्त्व बदलते. ७०% गरोदर महिलांना त्यांच्या गरोदरपणात बेड रेस्ट घेण्याचा घेण्याचा सल्ला दिला जातो. गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत याची शिफारस केली जात नाही. परंतु, तुमच्या स्थितीनुसार, तुम्हाला पूर्ण किंवा थोड्या काळाकरिता डॉक्टर बेड रेस्ट घेण्यास सांगू शकतात.
१. प्लेसेंटा प्रिव्हिया
या स्थितीत, नाळ नेहमीपेक्षा खाली सरकलेली असते. त्यामुळे गर्भाशयाचे मुख झाकले जाते. ह्याच गर्भाशयाच्या मुखातून बाळ बाहेर पडते. यामुळे कधीकधी रक्तस्त्राव होऊ शकतो. बेडरेस्ट मुळे गर्भाशयाचे मुख आणि नाळेवर पडणारा अतिरिक्त दबाव कमी होतो आणि त्यामुळे रक्तस्त्राव टाळता येतो.
२. कमकुवत गर्भाशय
ह्यास इंग्रजीमध्ये सर्व्हायकल इन्सफिशिएन्सी असे म्हणतात. ह्याचा अर्थ असा आहे की गर्भाशयाच्या आत वाढणाऱ्या गर्भाला पेलण्याइतपत गर्भाशयाच्या मुखाचे स्नायू पुरेसे मजबूत नसतात, त्यामुळे तिसऱ्या तिमाहीत गर्भपाताचा धोका वाढतो. गर्भाशयाच्या मुखावरील कोणताही अनुचित दबाव टाळण्यासाठी बेड रेस्टची शिफारस केली जाते.
३. प्रीक्लॅम्पसिया
गरोदरपणाशी संबंधित सर्वात सामान्य परिस्थितींपैकी हे एक आहे. प्रीक्लेम्पसिया ही समस्या दहा टक्क्यांहून अधिक गर्भवती महिलांमध्ये आढळते. ह्या समस्येच्या लक्षणांमध्ये रक्तदाब वाढणे, लघवीमध्ये प्रथिने आढळणे, चेहरा आणि पाय यांना सूज येणे यांचा समावेश होतो. प्रीक्लॅम्पसियाच्या गंभीर प्रकरणांमुळे तुमचा आणि तुमच्या बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सतत देखरेखीसाठी हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
४. अती सक्रिय जीवनशैली
जर तुम्ही खूप सक्रिय जीवनशैली जगत असाल आणि तुमच्या पौष्टिक गरजांकडे जास्त लक्ष दिले नाही, तर तुम्हाला बेड रेस्ट घेण्यास सांगितले जाऊ शकते. विश्रांती आणि संतुलित आहार घेतल्याने गर्भाच्या निरोगी विकासास चालना मिळते.
५. ऑलिगोहायड्रॅमनिओस
ऑलिगोहायड्रॅमनिओस ह्या स्थितिमध्ये अम्नीओटिक द्रवपदार्थाचे प्रमाण आपल्या पोटातील बाळासाठी आवश्यकतेपेक्षा कमी असते. म्हणून वैद्यकीयदृष्ट्या-नियमित बेड रेस्ट घेण्यास सांगितले जाते जेणेकरून डॉक्टर गर्भाच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतील.
६. एकाधिक गर्भधारणा
जर तुम्ही एकाहून अधिक बाळांना जन्म देणार असाल, तर अंथरुणावर विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याचे कारण म्हणजे एकाधिक गर्भधारणेमध्ये जोखीम आणि गुंतागुंत होण्याची शक्यता असते आणि तुमच्या बाळाचा जन्म होईपर्यंत अंथरुणावर विश्रांती घेणे ही सर्वात सुरक्षित गोष्ट आहे.
यापैकी प्रत्येक परिस्थितीमध्ये संपूर्ण विश्रांतीची आवश्यकता नाही. काहींना दररोज काही अतिरिक्त तास लागतात, तर काहींना प्रसूतीच्या काही दिवस आधी बेड रेस्ट ची गरज भासते. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बेड रेस्टची शिफारस केली जाते हे त्यावेळच्या तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या वैद्यकीय स्थितीवर अवलंबून असते. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
तुम्हाला सर्व वेळ अंथरुणावर राहावे लागेल का?
या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे आपल्या डॉक्टरांवर अवलंबून आहे. काही वेळा, तुमचे डॉक्टर तुम्हाला काही तीव्र व्यायाम, मोठ्या वस्तू हलवणे किंवा कठीण कामे करणे ह्यासारखी कामे टाळण्यास सांगू शकतात. तर काही वेळा, तुम्हाला संपूर्ण बेड रेस्ट सांगितली जाते आणि हलण्यास सुद्धा मनाई असते. फक्त अंघोळीसाठी आणि डॉक्टरांच्या नियमित भेटींची परवानगी असू शकते.
बेड रेस्टचे वेगवेगळे स्तर आहेत. हे स्तर तुम्ही कुठले क्रियाकलाप करू शकता आणि कुठले नाही ह्यावर अवलंबून असतात. ह्या विषयी सुद्धा अधिक जाणून घेऊयात.
गरोदरपणातील बेड रेस्टचे स्तर आणि प्रकार
यापूर्वी, डॉक्टर बेड रेस्टचे चार प्रमुख श्रेणींमध्ये वर्गीकरण करत होते उदा: शेड्यूल्ड बेड रेस्ट, सुधारित बेड रेस्ट, कठोर बेड रेस्ट आणि हॉस्पिटल बेडरेस्ट. परंतु, बदलत्या काळानुसार, वर्गीकरण आणखी सोपे केले गेले आहे. आजकाल गरोदरपणात बेड रेस्टचे दोन मुख्य प्रकार आहेत. हे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
१. घरी/कामावर कमीत कमी हालचाल
जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या शेवटच्या काही आठवड्यांत असता तेव्हा बरेच डॉक्टर तुम्हाला कामावर कमी वेळ घालवण्यास सांगतील. जास्तीत जास्त विश्रांती घेण्यास सुद्धा सांगितले जाते. कार्डिओ, चालणे किंवा उभे राहणे यासारख्या अनावश्यक श्रमाची आवश्यकता असणारी कोणतीही क्रिया टाळणे महत्त्वाचे आहे. परंतु, कधी कधी थोडा वेळ चालण्याचा व्यायाम करू शकता आणि हलकी कामे सुद्धा करू शकता.
२. हॉस्पिटलमध्ये कमीत कमी क्रियाकलाप
गरोदरपणात खूप जास्त गुंतागुंत असल्यास, डॉक्टर गर्भवती स्त्रीला रुग्णालयात दीर्घकाळ राहण्याची शिफारस करतील जेणेकरून रुग्ण सतत निरीक्षणाखाली राहू शकेल. सुदैवाने, गरोदरपणात हॉस्पिटलमधील बेड रेस्टचे निष्क्रिय स्वरूप लक्षात घेता, तुमचे डॉक्टर काही साधे व्यायाम किंवा शारीरिक थेरपी सांगतील, जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहू शकाल.
बेड रेस्टच्या विविध स्तरांचा एक तक्ता असतो त्यानुसार त्यामध्ये तुम्ही दररोज किती झोप घ्यावी, अतिरिक्त बेड रेस्ट आणि विविध क्रियाकलापांची माहिती दिलेली असते. त्यामुळे, तुमचे डॉक्टर तुम्हाला कधी बेडरेस्टची शिफारस करतील हे समजते. बेड रेस्टचे फायदे पाहू या.
बेडरेस्ट मुळे येणारी अस्वस्थता आणि त्यास कसे सामोरे जावे?
आधी सांगितल्याप्रमाणे, दिवसभर आपल्या पलंगावर झोपणे कठीण वाटते ना! परंतु, हालचालींच्या अभावामुळे लवकरच सांधेदुखी, स्नायू कमी होणे, लवचिकता कमी होणे आणि रक्ताभिसरण बिघडणे इत्यादी समस्या निर्माण होतात. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी कूस बदलणे आणि संतुलित जेवण घेण्याव्यतिरिक्त, तुम्ही काही व्यायामप्रकार करू शकता.
- तुमचे हात आणि पाय मंद गोलाकार हालचालींमध्ये फिरवल्याने तुमची हालचाल होण्यास आणि स्नायू तसेच सांधेदुखी कमी होण्यास मदत होते
- स्ट्रेस बॉल्स पिळून मनगटाची आणि बोटांची सांधेदुखी टाळण्यास मदत होते
- आपले हात आणि पाय गादीवर ठेवून, हलका दाब दिल्याने लवचिकता सुधारते
- तुमच्या हातापायातील स्नायू घट्ट आणि शिथिल केल्याने रक्ताभिसरण सुधारते
पलंगावर विश्रांती घेण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल, कारण एकाच स्थितीत दीर्घकाळ पडून राहिल्याने अस्वस्थ वाटू लागेल. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळण्याची शिफारस केली जात असली तरी, तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला काही गोष्टींची शिफारस करतील. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा
बेड रेस्ट – विश्रांतीसाठी सर्वोत्तम स्थिती
आधी सांगितल्याप्रमाणे, विश्रांतीसाठी सर्वोत्तम स्थिती विविध घटकांवर अवलंबून असते. हे घटक म्हणजे तुमचा गर्भारपणाचा कालावधी, तुमची वैद्यकीय स्थिती आणि तुम्हाला भेडसावणारी कोणतीही समस्या ह्यावर आधारित असेल. ज्या स्त्रियांना बराच वेळ बेड रेस्ट घ्यावी लागते, त्यांना गर्भाशयाला शरीराच्या मोठ्या नसांवर दबाव पडू नये म्हणून गुडघे टेकून झोपण्यास सांगितले जाते. डाव्या कुशीवर झोपल्याने बाळाचा रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे डाव्या कुशीवर झोपणे श्रेयस्कर आहे.
बेड रेस्टचे धोके
अनेक दिवस किंवा आठवडे बेड रेस्ट घेण्याचे अनेक धोके सुद्धा असतात. बेड रेस्ट मुळे निर्माण होणारे धोके खालीलप्रमाणे
१. रक्ताच्या गुठळ्या
हालचालींच्या कमतरतेमुळे गर्भवती स्त्रियांच्या पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. याला डीप वेन थ्रोम्बोसिस असे म्हणतात.
२. नैराश्य आणि चिंता
दिवसभर अंथरुणावर राहिल्याने तुम्ही एक ओझे आहात असे तुम्हाला वाटू शकते आणि त्यामुळे नैराश्य किंवा चिंतेची लक्षणे दिसू शकतात.
३. कौटुंबिक तणाव
तुम्ही क्वचितच हालचाल करू शकता किंवा तुमच्यासोबत कोणीतरी नेहमी असण्याची गरज असू शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबावर तणाव वाढू शकतो.
४. आर्थिक चिंता (जेव्हा तुम्ही नोकरी करणे थांबवलेले असेल)
बर्याच कंपन्या वाढीव गर्भारपणची रजा देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पगाराच्या खर्चावर अतिरिक्त रजा घ्यावी लागेल किंवा नोकरी सोडावी लागेल. त्यामुळे आर्थिक चिंता निर्माण होऊ शकते.
५. कमकुवत हाडे आणि स्नायू
व्यायामाच्या अभावामुळे हाडे कमकुवत होतात आणि स्नायूंना शोष होतो, त्यामुळे हाडे आणि स्नायूंशी संबंधित गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
बहुतेक वेळा, रुग्णाच्या सर्वोत्तम हितासाठी बेड रेस्टची शिफारस केली जाते. तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेली असल्यास, अस्वस्थता कमी करण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारावेसे वाटतील. शक्य तितकी विश्रांती घेण्यासाठी तुमचा वेळ व्यवस्थापित करा.
डॉक्टरांशी चर्चा करण्याच्या गोष्टी
थकवा येईल अशी कामे तुम्हाला करता येणार नाहीत परंतु खाली दिलेल्या काही गोष्टी तुम्ही करू शकता. बेड रेस्ट असताना तुम्ही काय करू शकता आणि काय नाही याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी किंवा आरोग्य सेवा प्रदात्याशी बोला.
- सौम्य व्यायाम
- चालणे
- स्वयंपाक
- स्वच्छता
- संभोग करणे
- वाहन चालवणे
- आंघोळ
- घरून काम करणे
तुमच्या गरोदरपणात निरोगी राहण्यासाठी या क्रिया तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. बेड रेस्टचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. पुढील भागात, आपण बेड रेस्ट घेत असताना आपण निरोगी राहण्याच्या उपायांबद्दल थोडेसे बोलू.
बेड रेस्ट दरम्यान निरोगी कसे रहावे?
दीर्घकाळ निष्क्रियता हे केवळ कंटाळवाणे नाही तर आरोग्यासाठी देखील घातक आहे. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी तुम्हीबेड रेस्ट घेत असताना करू शकता अशा काही गोष्टी येथे दिलेल्या आहेत:
१. शारीरिक आरोग्य
- तुमचे हात, पाय, मान, पाठ इत्यादी अवयवांचे तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता, जेणेकरून ते त्यांची ताकद टिकवून ठेवतील.
- गरोदरपणात आहारावर नीट लक्ष द्या, थोडे थोडे वारंवार खा आणि अपचन होऊ शकणारे पदार्थ टाळा
- शक्य तितके आरामात झोपा आणि कोणत्याही विकसनशील स्नायूंचा सुन्नपणा किंवा त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी स्थिती बदला
२. भावनिक आरोग्य
- दूरदर्शन, पुस्तके किंवा इंटरनेट इत्यादींद्वारे स्वतःचे मनोरंजन करा. स्वतःला कंटाळा येऊ देऊ नका
- शक्य असल्यास मित्रमैत्रिणींना भेटा किंवा त्यांना तुमच्याकडे बोलवा. बाळाचा जन्म झाल्यावर तुम्हाला त्यांना भेटणे तितके सहज शक्य होणार नाही
- तुमच्या आत्ताच्या परिस्थतीचा ताण घेऊ नका. बर्याच स्त्रियाह्यातूनच गेल्या आहेत आणि त्यांचे गर्भारपण आनंदी आणि यशस्वी झालेले आहे
बेड रेस्टचा परिणाम केवळ गर्भवती स्त्रियांवर होत नाही, तर कुटुंबावर सुद्धा होतो. याचा कौटुंबिक सदस्यांवर कसा परिणाम होतो, तुम्ही त्याबद्दल काय करू शकता आणि परिस्थितीतून सर्वोत्तम मार्ग कसा काढू शकता ते पाहूयात.
बेड रेस्टचा तुमच्या कुटुंबावर कसा परिणाम होतो?
जर तुम्ही तुमचा बराचसा वेळ अंथरुणावर घालवत असाल, तर तुमच्या कुटुंबाला ह्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे हे शिकावे लागेल. तुमच्या पतीला आता घरातील सर्व दैनंदिन कामे जसे की धुणे, साफसफाई करणे, किराणा सामान खरेदी करणे आणि तुमच्या मुलांची काळजी घेणे यांसारख्या सर्व गोष्टी बघाव्या लागतील. तुमचे पती ह्या सर्व गोष्टी करत असताना, त्यांना तुमची काळजी घ्यावी लागू नये ह्याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. जर तुम्हाला लहान मुले असतील तर त्यांच्यासोबत कडक वागून चालणार नाही. त्याऐवजी, त्यांना पुस्तके वाचून दाखवा किंवा त्यांच्यासोबत दूरदर्शन पाहून त्यांचे मनोरंजन करा. शक्य असल्यास घरातील लहान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी, कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींची मदत घ्या. तुमची मुले शाळेत गेल्यास, तुम्ही त्यांना त्यांच्या गृहपाठात मदत करण्यासाठी थोडा वेळ घालवू शकता किंवा त्यांच्या शाळेच्या वेळेनंतर त्यांच्याशी बोलू शकता. चांगला विश्रांती घ्या आणि स्वतःला आनंदी ठेवा. आणि ते करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत.
बेड रेस्टचा सर्वोत्तम वापर कसा करायचा?
तुमच्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तुम्ही आणखी काही गोष्टी करू शकता:
- तुमच्याकडे बाळासाठी क्रिब, डायपर, दुधाच्या बाटल्या, मातृत्व कपडे, ब्रेस्ट पंप इत्यादी सर्व आवश्यक असल्याची खात्री करा
- तुमच्या गर्भारपणाच्या स्थितीबद्दल आणि कोणत्याही संभाव्य गुंतागुंतांबद्दल काही ऑनलाइन संशोधन करा
- लसीकरण, स्तनपान, बाळाचा विकास आणि पालकत्वाच्या इतर तंत्रांबद्दल माहिती घ्या
- फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांसारखे पौष्टिक अन्न खा
- महत्त्वाच्या प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर पूरक आहारांबद्दल वाचा
- आपले शरीर सक्रिय आणि निरोगी ठेवण्यासाठी सौम्य व्यायाम करण्यास विसरू नका
- योग्य दिनचर्या आखून घ्या
- तुमचे फोटोज नीट ठेवा,तुमची टॅक्सची कामे आणि इतर छोटी राहिलेली कामे करा
- घरात तुम्हाला तुमदत करणाऱ्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तूची चेकलिस्ट
तुमहाला तुमच्या हाताशी आवश्यक असलेल्या वस्तूंची चेकलिस्ट ठेवा जेणेकरून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना वारंवार त्रास होणार नाही किंवा हवे असलेल्या गोष्टी घेण्यासाठी आपल्याला बेड सोडावे लागणार नाही.
- पाणी आणि स्नॅक्स (फळे, भाज्या, नट इ.)
- लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईल फोन आणि लॅपटॉप
- पेन आणि कागदासारखी स्टेशनरी
- कंगवा, ब्रश, नेल कटर आणि आरसे यासारखे ग्रूमिंग आयटम्स
- स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्रे.
तुमच्या गरोदरपणात तुम्हाला मिळणारा सर्वोत्तम सल्ला म्हणजे शांत राहणे, हे तुम्हाला कितीही कठीण वाटले तरी सुद्धा ते आवश्यक आहे. हे सगळे तुमच्यासाठी आनंददायी नाही. तरीसुद्धा तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी ही सर्व खबरदारी घेत आहात. तुम्ही जितके आरामात राहाल तितकी तुम्हाला निरोगी बाळ होण्याची शक्यता वाढेल.
संदर्भ आणि स्रोत
आणखी वाचा:
गरोदरपणात झोपतानाच्या सर्वोत्तम स्थिती
गरोदरपणातील झोपेची समस्या – कारणे आणि उपाय