Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी गर्भपातानंतर गर्भधारणेची शक्यता

गर्भपातानंतर गर्भधारणेची शक्यता

गर्भपातानंतर गर्भधारणेची शक्यता

बाळाची चाहूल लागताच सगळ्या कुटुंबात आनंद पसरतो. पण जेव्हा गर्भधारणा गर्भपातात परावर्तित होते तेव्हा हा आनंद फक्त थोड्या काळासाठी टिकतो. परंतु त्यामुळे तुम्ही निराश होण्याचे काहीच कारण नाही तुम्ही बाळासाठी नक्कीच पुन्हा प्रयत्न करू शकता.

गर्भपातानंतर पुन्हा गर्भधारणा  होणे सोपे आहे का?

गर्भपातामुळे प्रजननक्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही कारण शरीरात ओव्युलेशनची प्रक्रिया सुरूच राहते. ह्याचा अर्थ एखादी स्त्री गर्भपातानंतर पुन्हा गर्भवती होऊ इच्छित असेल तर तांत्रिकदृष्टया ती गर्भवती होऊ शकते. परंतु, बेकायदेशीर गर्भपातामुळे मुत्राशयाला किंवा आतड्यांना हानी पोहोचू  शकते आणि  गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे प्रजनन संस्थेचे सुद्धा दीर्घकालीन  नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा गर्भपात करणारे सर्जन कौशल्यपूर्ण नसल्यामुळे किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरेशी संसाधने नसल्यामुळे ही गुंतागुंत होते.

गर्भपातानंतर लवकरात लवकर मला केव्हा गर्भधारणा होऊ शकते?

“गर्भपातानंतर मला गर्भधारणा केव्हा होईल? ” तुम्ही असाच विचार करत आहात ना?, ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगू. ओव्युलेशन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. गर्भपातानंतर जितक्या लवकर नॉर्मल ओव्युलेशनचे चक्र सुरु होईल तितक्या लवकर तुम्हाला गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही गर्भनिरोधक वापरले नसतील तर गर्भपातानंतर तुम्हाला गर्भधारणा होण्याची शक्यता असते. जरी रक्तस्त्राव सुरु असला तरी सुद्धा तुम्ही गर्भपातानंतर ७-१० दिवसांमध्ये पुन्हा गर्भवती होऊ शकता. लगेच गर्भधारणा होणे शक्य आहे पण तसे करणे योग्य नाही कारण तुमच्या शरीराला झालेली झीज भरून निघण्यासाठी वेळ आवश्यक आहे.

पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्याअगोदर कमीत कमी ३ महिने वाट पाहणे जरुरीचे आहे. हे बाळाच्या आणि आईच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. गर्भपाताच्या धक्क्यातून सावरण्यासाठी तुमच्या शरीराला सुद्धा वेळ पाहिजे. तुमच्या शरीराचा झालेला पोषणाचा ऱ्हास आणि तोटा भरून निघण्यासाठी थोडे थांबणे जरुरीचे आहे. पुन्हा गर्भपात टाळण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला काही तपासण्या सांगतील तसेच गर्भधारणेपूर्वी काय काळजी घ्यायला हवी ते सुद्धा सांगतील.

जर तुमचा गर्भपात सर्जिकल पद्धतीने  झाला असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला कमीत कमी एक महिना थांबण्याचा सल्ला देतील त्यामुळे गर्भाशय दुरुस्त होण्यास वेळ मिळेल. जर तुमचा गर्भपात दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत झाला असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला जास्त वेळ वाट बघण्याचा सल्ला देतील त्यामुळे शरीरास आराम  मिळेल आणि झालेली झीज भरून निघेल. तुम्हाला फॉलीक ऍसिड सारखी पूरक औषधे डॉक्टर्स देतात. त्यामुळे पुढच्या गर्भधारणेत न्यूरल ट्यूब मध्ये काही व्यंग आढळणार नाही. जर काही वैद्यकीय गुंतागुंत नसेल तर गर्भपातानंतर गर्भारपण सुरक्षित असते.

गर्भपातामुळे वंध्यत्व येऊ शकते का?

गर्भपातामुळे ताण वाढतो. गेलेल्या जीवाची अपराधीपणाची भावना तुमच्यावर खूप परिणाम करते. बऱ्याच स्त्रिया खूप गर्भपातांना सामोऱ्या जातात आणि त्यांना निराशा येते. जर कुशल सर्जन द्वारे कायदेशीर गर्भपात झाला असेल तर तुम्हाला पुन्हा गर्भधारणा होण्यासाठी काहीच प्रश्न येणार नाही. परंतु जर गर्भपात बेकायदेशीर रित्या किंवा अकुशल डॉक्टर्स, सुईणीकडून किंवा अस्वच्छ परिस्थितीत झाला असेल तर पुनश्च गर्भधारणेची शक्यता कमी होते. त्यामध्ये संसर्ग, किंवा अर्धवट गर्भपात होणे ह्यामुळे आरोग्याला मोठा धोका होण्याचा संभव असतो आणि पुन्हा गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.

वंध्यत्वाचा प्रश्न खालील परिस्थितीत निर्माण होतो:

 • जर अपुरा गर्भपात झाला तर, म्हणजेच जिथे गर्भधारणा संपुष्टात येते परंतु गर्भाचे काही अंश तसेच राहतात तेव्हा संसर्गाची शक्यता वाढते आणि गुंतागुंत होते.
 • काही वेळा क्युरेटीनची प्रक्रिया योग्यरीत्या तसेच काळजीपूर्वक केली जात नाही. त्यामुळे  गर्भाशयाची स्वच्छता करताना त्यास हानी पोहोचण्याची शक्यता खूप जास्त असते.
 • पेल्विक इन्फ्लामेंटरी डिसीज: (पी.आय.डी.) गर्भपाताच्या प्रक्रियेस हा संसर्ग होऊ शकतो, जर त्यावर वेळीच इलाज केला नाही तर एक्टॉपिक गर्भधारणेचा धोका वाढतो.
 • गर्भाशयात किंवा गर्भाशयाच्या मुखात जखमांच्या खुणा असण्याची शक्यता असते. जर तुमची मासिक पाळी चुकली किंवा तुम्हाला गर्भपातानंतर हलका रक्तस्त्राव झाला तर तो ह्यामुळे असू शकतो. तुमचे डॉक्टर्स ते हिस्टेरोस्कोपीने तपासून पाहू शकतात. ह्या प्रक्रियेमध्ये गर्भाशयाच्या मुखातून एक सूक्ष्म कॅमेरा गर्भाशयाच्या मुखातून गर्भाशयात सरकवला जातो त्यामुळे त्या खुणा तपासून पहिल्या जातात. तसेच ते करत असताना डॉक्टर्स त्यावर उपचार देखील करतात. असामान्य खुणा ह्या प्रक्रियेदरम्यान गर्भाशय खरवडले गेल्यामुळे होतात. जर त्यांचे प्रमाण खूप जास्त असेल तर त्यामुळे वंध्यत्वाची शक्यता असते आणि त्यास इंग्रजीमध्ये ‘Asherman’s Syndrome’ असे म्हणतात. सिद्धांतानुसार, ‘मॅन्युअल व्हॅक्युम ऍस्पिरेशन’ मुळे धोका नष्ट होतो, कारण ह्या प्रक्रियेत खरवडून काढण्याची प्रक्रिया होत नाही. तसेच, सक्शन गर्भपात/सक्शन क्युरेटीन केल्यास गर्भाशयाला जखमा होण्याचा धोका कमी होईल. तथापि, ह्या सिद्धांताला पूरक असे संशोधन आढळत नाही.
 • जर तुमचा गर्भपात अनेक वेळा झाला असल्याचा इतिहास असेल  तर गर्भाशयाचे मुख खूप वेळा उघडले गेल्यामुळे गर्भाशयाच्या मुखाला अशक्तपणा येऊ शकेल आणि अशावेळी गर्भाशयाचे मुख बंद ठेवण्यासाठी टाके घालावे लागतात. त्यामुळे गर्भाशयाचे मुख बंद रहाते.

आधी झालेल्या गर्भपातामुळे पुन्हा गर्भधारणा होणे अवघड होईल का?

एकदा किंवा अनेकदा झालेल्या गर्भपातामुळे भविष्यात गर्भधारणेला अडथळा येतो ह्याचा कुठलाही पुरावा नाही. जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल आणि तुमचे गर्भाशय गर्भधारणेसाठी तयार असेल तर काळजीचे काही कारण नाही.

काही जोडपी कुटुंबाची सुरुवात करण्यास तयार नसल्याने किंवा वैद्यकीय कारणामुळे गर्भपात करण्याचा निर्णय घेतात. गर्भपातानंतरच्या गर्भधारणेसाठी दक्षता घेतली पाहिजे आणि नियोजन सुद्धा केले पाहिजे. गर्भपातानंतर पुन्हा गर्भधारणा राहील का ह्या विचाराने जोडपी चिंताग्रस्त होतात.

 • वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे, गर्भपात ही सुरक्षित प्रक्रिया झाली आहे. योग्य वैद्यकीय नियमानाखाली तज्ञ व्यक्तीकडून ही प्रक्रिया केल्यास भविष्यात गर्भधारणेवर त्याचा परिणाम होत नाही. जर गर्भपात शिकाऊ डॉक्टरकडून बेकायदेशीर रित्या आणि चुकीच्या पद्धतीने करून घेतल्यास संसर्गाची शक्यता असते आणि प्रजनन प्रणालीच्या वेगवेगळ्या अवयवांना म्हणजेच बीजवाहिनी, अंडाशय आणि गर्भाशयाच्या आवरणाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते.
 • सततच्या गर्भपातामुळे गर्भाशयाचे मुख मोठे होऊन अशक्तपणा येतो. आणि ते अकाली उघडते. त्याव्यतिरिक्त बऱ्याच वेळा क्युरेटीन झाल्यास गर्भाशयात व गर्भाशयाच्या मुखाजवळ जखमांचे व्रण राहतात.

जोखीम घटक कुठले असतात?

जर गर्भपात योग्य तंज्ञाकडून नीट हाताळला गेला असेल तर त्यामध्ये काही धोके नसतात आणि स्त्रीला दुसऱ्या वेळेला सामान्य गर्भधारणा होते. काही वेळा, गर्भपातानंतर गर्भधारणेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नीट काळजी घेतल्यास आणि सावधगिरी बाळगल्यास तो प्रश्न हाताळता येऊ शकतो.

एकापेक्षा जास्त वेळा गर्भपात झाला असेल तर मला धोका आहे का?

ज्या स्त्रियांचे एकापेक्षा जास्त वेळा गर्भपात झाले असतील तर त्यांना त्यानंतर संसर्गाचा धोका असतो. अगदी सर्वात वाईट परिस्थितीत, बीजवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, आणि त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा अशक्य होते.

गर्भपातानंतर गर्भधारणा होताना

गर्भपातानंतर लगेच गर्भधारणा होण्यासाठी:

 • गर्भपातानंतर सुरक्षित गर्भधारणा होण्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे.
 • निरोगी जीवनशैली पाळा. तसेच धूम्रपान, मद्यपान आणि कॉफी घेणे टाळा. फिटनेस तुमचा जितका चांगला असेल तितकी निरोगी गर्भधारणा होते.
 • चांगल्या  लैंगिक आरोग्यामुळे तुमच्या गर्भधारणेची शक्यता वाढेल.
 • तुमच्या ओव्यूलेशनच्या कालावधीवर  लक्ष ठेवा आणि ओव्यूलेशनच्या दरम्यान वारंवार शारीरिक संबंध ठेवा. तुम्ही ओव्यूलेशन किट खरेदी करू शकता किंवा ओव्यूलेशन ट्रॅकर अँप तुमच्या फोनवर डाऊनलोड करू शकता.
 • शारीरिक संबंधांनंतर  खाली उशी घेल्याने पाय आणि कुल्ल्यांचा भाग उंचावण्यास मदत होते आणि त्यामुळे शुक्रजंतू स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्यास मदत होते.

गर्भपातानंतर गर्भधारणा झाली आहे हे कसे निश्चित कराल?

 

गर्भधारणा झाली आहे किंवा कसे हे समजण्यासाठी एका साध्या गर्भधारणा किटची तुम्हाला मदत होऊ शकते. जरी तुम्हाला गर्भधारणा झाली नसली तर गर्भपातानंतर ही चाचणी सकारात्मक निकाल दाखवू शकते. जर तुम्ही साशंक असाल तर एक आठवड्यांनंतर पुन्हा चाचणी करून पहा.

गर्भपातानंतर पुन्हा बाळाचा विचार करताना तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी

जर तुम्ही पुन्हा गर्भधारणेचा विचार करीत असाल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

 • तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी किंवा प्रजनन तज्ञांशी सविस्तर चर्चा करा. तुम्हाला तुमच्या प्रजनन प्रणालीची तपासणी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो आणि गर्भारपण हाताळण्यासाठी तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी असली पाहिजे.
 • एकपेक्षा जास्त वेळेला जर गर्भपात झाला असेल तर त्यामुळे गर्भाशयाचे मुख कमकुवत होऊ शकते. तुमच्या गर्भाशयात वाढणारे बाळ सुरक्षित राहावे म्हणून तुम्ही एखादा टाका सुद्धा घालून घेऊ शकता. श्रोणीच्या भागातील स्नायू बळकट व्हावेत म्हणून तुम्ही तुमच्या दररोज kegel व्यायाम करू शकता.
 • जर तुमचा गर्भपात नुकताच झाला असेल तर तुमच्या शरीराची झालेली झीज भरून निघण्यास थोडा वेळ द्या, आणि मग पुढच्या गर्भधारणेचा विचार करा. गर्भपातानंतर लगेच बाळाचा विचार केल्यास शरीरावर ताण येऊ शकतो. आपलं बाळ गमावल्याच्या भावनेमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे गर्भाच्या आरोग्यपूर्ण विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
 • जर तुमची पुन्हा गर्भधारणेसाठी तयारी नसेल तर तुम्ही संतती नियमनाची साधने वापरत आहात ना ह्याची खात्री करा.
 • बाळ होण्यासाठी तुमची मनाची तयारी हवी कारण तुम्हाला गर्भपातानंतर संप्रेरकांमधील बदल, अनियमित मासिक पाळी आणि गर्भपातानंतर मनःस्थितीतल्या  बदलांचा सामना करावा लागेल.
 • जर प्रयत्न करूनही गर्भधारणा झाली नाही तर प्रजननतज्ञांची मदत आणि सल्ला घेऊन आय. व्ही. एफ. आणि आय. यू. आय. ह्या पर्यायांचा विचार करू शकता.

गर्भपात झाला म्हणजे त्याचा अर्थ पुन्हा गर्भधारणा होणार नाही असे नाही. हा विषय थोडा निषिद्ध असल्याने बऱ्याच लोकांना गर्भपाताविषयी गैरसमज आहेत. गर्भपात अधिकृत दवाखान्यातून केला गेला असल्यास, तो सुरक्षित असतो आणि त्याचा आईच्या आरोग्यावर परिणाम होत नाही.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article