In this Article
- कांजिण्या म्हणजे काय?
- कांजिण्या हा संसर्गजन्य आजार आहे का?
- कारणे
- कांजिण्यांची लक्षणे
- कांजिण्यांमुळे होणारी गुंतागुंत
- नागीण
- कांजिण्या झाल्याचे निदान
- मुलांमधील कांजिण्यांवर उपचार कसे करावेत?
- प्रतिबंध
- कांजिण्यांची लस
- कांजिण्यांच्या लसीचे प्रकार
- तुम्ही बाळाला कांजिण्यांची लस केव्हा दिली पाहिजे?
- कांजिण्यांची लस सुरक्षित आहे का?
- कांजिण्यांच्या लसीचे दुष्परिणाम
- जर कांजिण्या झाल्या असतील तर मुलाला शाळेत पाठवावे का?
इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की ‘Prevention is better than cure’ आणि ते अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाला होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्हाला त्याविषयी संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. बाळाच्या तब्येतीविषयी आईला खूप काळजी असते आणि कांजिण्या म्हणजे पालकांसाठी एक दुःस्वप्न ठरू शकते. ह्या लेखामध्ये कांजिण्यांविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. कांजिण्या होण्याची कारणे, लक्षणे आणि तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावरील उपचार ह्याची माहिती इथे दिलेली आहे.
कांजिण्या म्हणजे काय?
कांजिण्या म्हणजे एक प्रकारचा विषाणूंचा सुंसर्ग आहे आणि त्यास इंग्रजीमध्ये ‘vericella’ असे म्हणतात. सगळ्या शरीरावर लहान छोटे खाजणारे फोड येतात तसेच फ्लूसारखी लक्षणे दिसून ताप येतो. जेव्हा संसर्ग वाढतो तेव्हा ह्या रॅशचे पाण्याने भरलेल्या फोडांमध्ये रूपांतर होते. जेव्हा हे फोड सुकतात तेव्हा त्यांच्यावर खपली धरली जाते. काही मुलांच्या अंगावर फक्त रॅश येते तर काही मुलांना संपूर्ण शरीरावर फोड येतात. ही रॅश सामान्यपणे चेहरा, कान, हात, छाती, पोट आणि पायांवर येते. कांजिण्या हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि आणि संसर्ग झालेल्या मुलाच्या सान्निध्यात आल्यावर लगेच संसर्ग होऊ शकतो. १२ वर्षाखालील मुलांमध्ये हा रोग सामान्यपणे आढळतो.
कांजिण्या हा संसर्गजन्य आजार आहे का?
कांजिण्या हा खूप संसर्गजन्य आजार आहे आणि तो एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरतो. हा आजार खालीलप्रकारे पसरतो
- प्रत्यक्ष संपर्क
- अप्रत्यक्ष संपर्क
प्रत्यक्ष संपर्क म्हणजे चुंबन किंवा लाळेद्वारे हा संसर्ग पसरतो. म्हणून, जर तुमच्या मुलाला कांजिण्या झालेल्या असतील तर तुमच्या बाळाचे चुंबन घेऊ नका. अप्रत्यक्ष संपर्क म्हणजे फोडांमधील पाण्यामुळे संसर्ग पसरतो. हा संसर्ग मुलाचा खोकला आणि शिंकांद्वारे सुद्धा पसरतो. माणसांसाठी हा आजार संसर्गजन्य असला तरी कुत्र्यांना आणि मांजरांना संसर्ग होत नाही.
कारणे
Varicella zoster किंवा VZV नावाच्या विषाणूमुळे कांजिण्या होतात. ह्या विषाणूमुळे शरीरावर वेदनादायी रॅशेस येतात. लहान बाळे किंवा मुलांना त्यामुळे लगेच संसर्ग होतो. बऱ्याच वेळा, आपल्या बाळाला केव्हा आणि कसा संसर्ग झाला हे शोधणे कठीण होते. कारण शरीरावर पहिला फोड येण्याआधी हा विषाणू शरीरभर पसरलेला असतो. म्हणून, जर कुणाला ह्या विषाणूचा संसर्ग झाला असेल आणि त्याच्या संपर्कात बाळ आले तर लगेच संसर्ग होऊ शकतो. एकदा संसर्ग झाल्यावर लवकरात लवकर एका आठवड्याच्या आत किंवा उशिरात उशिरा २ ते ३ आठवड्यात बाळाच्या शरीरावर फोड दिसू लागतात.
कांजिण्यांची लक्षणे
कांजिण्यांचा संसर्ग झाल्यावर फ्लू सारखी लक्षणे दिसू लागतात. बाळांमध्ये आणि मुलांमध्ये दिसणारी कांजिण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे
- ताप
- डोकेदुखी
- मळमळ
- पोटदुखी
- अंगदुखी
- भूक न लागणे
संसर्ग झाल्यावर रॅश दिसण्यास सुरुवात होईल. हे छोटे फोड आधी बाळाच्या चेहऱ्यावर दिसतील आणि नंतर ते शरीराच्या इतर भागावर पसरतील. ह्यामध्ये हात, पोट आणि पायांचा समावेश होतो. काही बाळांना अगदी थोडे आणि तुरळक फोड येतात परंतु काही बाळांना खूप फोड येतात आणि ते समूहांमध्ये येतात. तोंड, डोकेआणि मांडी इत्यादी जवळील नाजूक भागांमध्ये वेदनादायी फोड येतात. हे फोड खूप वेदनादायी असल्याने तुमच्या बाळाला सैल कपडे घाला. रॅश दिसून येण्याआधी संसर्ग सगळीकडे पसरलेला असतो,
कांजिण्यांमुळे होणारी गुंतागुंत
जर कांजिण्या झाल्यावर योग्य काळजी घेतली गेली नाही तर लहान मुलांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ह्यामध्ये खाली गोष्टींचा समावेश होतो:
- त्वचेचा संसर्ग: सतत खाजवल्याने त्वचेला संसर्ग होऊ शकतो
- जखमांचे डाग
काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये गंभीर गुंतागुंत होऊ शकते
- मेंदूला सूज येऊ शकते, त्यास इंग्रजीमध्ये ‘Encephalitis’ असे म्हणतात. त्यामुळे स्नायूंच्या समन्वयावर परिणाम होऊ शकतो.
- फुफुसांना सूज येते त्यास ‘varicella pneumonia’ असे म्हणतात
- मूत्रपिंडांना सूज येते
- अपेंडिसायटिस
- हृदयाच्या स्नायूंना सूज येते
- सांध्यांना सूज येते
जरी अश्या प्रकारची गुंतागुंत होणे खूप दुर्मिळ असले तरी असे होऊ नये म्हणून योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
नागीण
नागीण हा एक त्वचाविकार आहे. कांजिण्या ज्या विषाणूंमुळे होतात त्याच विषाणूमुळे नागीण होते. जर तुमच्या मुलाला कांजिण्या होऊन गेल्या असतील तर विषाणू मज्जातंतूंच्या पेशींमध्ये राहतात. जरी त्यामुळे मज्जातंतूंच्या कार्यावर परिणाम होत नसतील तरी त्यामुळे आयुष्याच्या नंतरच्या काळात नागीण होण्याची शक्यता असते. १२ वर्षाखालील मुलांमध्ये नागीण होणे खूप दुर्मिळ असते. लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांमध्ये नागीण होण्याचे प्रमाण जास्त असते.
कांजिण्या झाल्याचे निदान
सुरुवातीच्या काळात कांजिण्या झाल्याचे समजत नाहीत कारण लक्षणे सगळी फ्लू सारखीच असतात. लहान मुलांना ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला होतो आणि त्यांना खूप थकल्यासारखे वाटते. त्यांची भूक सुद्धा मंदावते. काही दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात. उदा: चेहरा, जननेंद्रिय आणि शरीराच्या इतर भागात ते दिसू लागतात. काही मुलांच्या अंगावर तुरळक फोड येतात तर काही मुलांना खूप प्रमाणात येतात. कांजिण्यांमुळे वेदना होतात आणि खाज सुटते. जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलामध्ये ही लक्षणे दिसतील तेव्हा संसर्ग इतरत्र पसरू नये म्हणून तात्काळ वैद्यकीय मदत घेतली पाहिजे.
मुलांमधील कांजिण्यांवर उपचार कसे करावेत?
तुमच्या मुलाची प्रतिकार प्रणाली कांजिण्यांच्या विषाणूशी प्रतिकार करते. मुलाच्या वेदना आणि अस्वस्थता कमी व्हावी म्हणून डॉक्टर उपचार करतात. त्याव्यतिरिक्त, खालील गोष्टींमुळे सुद्धा कांजिण्यांमुळे होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात.
- ताप: ताप कमी व्हावा म्हणून मुलाला योग्य औषधे दिली जातात. सर्वात प्रसिद्ध औषध जे सामान्यपणे वापरले जाते ते म्हणजे असायक्लोव्हीर. चांगले परिणाम दिसण्यासाठी पहिल्यांदा रॅश आल्यावर २४ तासांच्या आत ते दिले गेले पाहिजे.
- फोड आणि पुटकुळ्या : खाज येऊ नये म्हणून क्रीम आणि मलम लिहून दिली जातात. तसेच जखम भरून येण्यास मदत होते. कलामायीन हे एक लोशन आहे ज्यामुळे खाज सुटत नाही नाही मुलांच्या त्वचेला त्यामुळे छान वाटते.
- आरामदायक कपडे: मुलांना आरामदायक कपडे घातले पाहिजेत. त्यांना हलके कपडे घातल्याने खूप आरामदायक वाटते आणि त्यामुळे शरीराचे तापमान वाढत नाही.
- नखे कापणे: मुलाने अंगावरील फोड खाजवू नयेत म्हणून वेळोवेळी नखे कापली पाहिजेत.
- बाळाला भरपूर पाणी आणि योग्य आहार देत रहा: निर्जलीकरण होऊ नये म्हणून मुलाला पुरेसे द्रवपदार्थ द्या. त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करा आणि मसालेदार पदार्थ किंवा कोला अथवा मिल्कशेक सारखे गोड द्रवपदार्थ देणे टाळा. जर तोंडात सुद्धा कांजिण्या झाल्या असतील तर ही काळजी घ्या कारण अशा अन्नपदार्थांमुळे आणि द्रव्यांमुळे वेदना वाढतात. तुम्ही तुमच्या मुलाला अंडी, चिकन किंवा कुठलेही मांस देऊ शकता कारण त्यामुळे जखम भरून येण्याच्या प्रक्रियेस मदत होते. लसूण, नारळाचे तेल आणि ऍपल सिडर व्हिनेगर ह्यासारखे पदार्थ सुद्धा घेण्यास सांगितले जातात.
- लिंबाची पाने: जखमांमुळे वेदना होतात त्यापासून आराम मिळण्यासाठी लिंबाची पाने हा उत्तम उपाय आहे. तुम्ही ती पाने वाटून त्याची पेस्ट करून लावू शकता किंवा ही पाने पाण्यात उकळून त्या पाण्याच्या पट्ट्या ठेऊ शकता.
- मऊ कापडाच्या घड्या: पाण्यात बायकार्बोनेट सोडा घालून त्यात मऊ कापडाच्या घड्या घालून त्यांना जखमेवर ठेवल्यास खाज कमी होते.
- हातमोजे आणि पायमोजे: तुमच्या मुलाला हातात आणि पायात मोजे घातल्यास त्यांना त्वचा खाजवण्यापासून तुम्ही प्रतिबंध घालू शकता नाही तर डाग पडण्याची शक्यता असते.
प्रतिबंध
कांजिण्यांची लस दिल्यास कांजिण्या होऊ नयेत म्हणून प्रतिबंध घालता येतो. ज्या मुलांना कांजिण्यांची लस दिली आहे अशा मुलांना संसर्ग होण्यापासून ८०–९० टक्के संरक्षण मिळू शकते. लसीकरणानंतर कांजिण्या होऊ शकतात का?
काही मुलांना ह्या विषाणूपासून संपूर्ण संरक्षण मिळत नाही. तथापि, अशा मुलांमध्ये कांजिण्या सौम्य असतात, रॅश खूप कमी येते आणि ताप येत नाही. कांजिण्यांची लस १२ महिने ते १५ महिने वयाच्या कालावधीत दिली जाते. बुस्टर डोस ४–६ वर्षे वयात दिला जातो.
कांजिण्यांची लस वेगळी दिली जाते किंवा इतर लसींसोबत दिली जाते ती एमएमआरव्ही (मम्प्स, मीझल्स, रुबेला, व्हेरिसेला) म्हणून ओळखली जाते.
हा आजार होऊ नये म्हणून तुमच्या मुलाला संसर्ग झालेल्या मुलाच्या सानिध्यात येऊ देऊ नका कारण हा आजार पसरू शकतो. तुमच्या मुलाला परिस्थिती समजली पाहिजे कारण त्याला ह्या नाजूक कालावधीत एकटे वाटू शकते. तसेच स्वच्छता राखण्यास बाळाची प्रतिकार प्रणाली मजबूत होते आणि अशा आजारांचा बाळाला सामना करता येतो. तथापि, सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मुलाला कांजिण्यांची लस देणे हा होय.
कांजिण्यांची लस
काही पालकांना असे वटते की छोट्या बाळाला कांजिण्यांची लस देण्याची काही गरज नाही. कारण मोठ्यांच्या तुलनेत बाळाला येणाऱ्या कांजिण्यांचे स्वरूप सौम्य असते. त्यांचे शरीर त्या संसर्गाचा सामना कुठल्याही अडचणीशिवाय सहज करू शकते. परंतु बऱ्याच वैद्यकीय तज्ज्ञांचे असे मत आहे की कांजिण्याची लस टोचून घेणे चांगले कारण काहीवेळा कांजिण्यांमुळे गुंतागुंत निर्माण होऊन जीवाला धोका उद्भवू शकतो. काही वेळा मेंदू, यकृत, मूत्रपिंड किंवा शरीराच्या इतर भागात गंभीर स्वरूपाचा संसर्ग होतो.
ही लस बऱ्याच दवाखान्यात सहज उपलब्ध असते. छोट्या बाळांना कांजिण्यांची लस देणे खूप सुरक्षित आहे. जरी ही लस महाग असली तरी त्यामुळे तुमच्या बाळाला संरक्षण मिळते.
कांजिण्यांच्या लसीचे प्रकार
ह्या विषाणूंच्या संसर्गावर कांजिण्यांची लस ही खूप परिणामकारक असते. जरी बऱ्याच वेळा लस दिल्याने आजारापासून संरक्षण मिळते तरी सुद्धा काही वेळेला बाळाला सौम्य प्रमाणात संसर्ग होतोच. लस दिलेल्या मुलांना कांजिण्या झाल्यास लक्षणे खूप सौम्य असतात आणि मुलांना खूप अस्वस्थता येत नाही. म्हणून, मुलांना संसर्गाशी प्रतिकार करू देण्यापेक्षा कांजिण्यांची लस देणे खूप चांगले असते. कांजिण्यांची लस दोन प्रकारची असते.
- वारिसेला – ह्या लसीपासून फक्त कांजिण्यांपासून संरक्षण मिळते.
- एमएमआरव्ही – ही लास गालगुंड, गोवर, रुबेला आणि वारिसेला ह्या सगळ्यांसाठी एकत्र असते आणि कांजिण्यांशी प्रतिकार करण्यासाठी परिणामकरीत्या काम करते.
तुम्ही बाळाला कांजिण्यांची लस केव्हा दिली पाहिजे?
बाळाच्या जन्मानंतर एक वर्षांनी बाळाला कांजिण्यांची लस द्यावी. ही लस दोन वेळेला तीन महिन्यांच्या अंतराने द्यावी. त्यामुळे पहिली लस बाळाच्या वयाच्या १२ ते १५ महिने वयाच्या कालावधीत द्यावी. आणि दुसरी बुस्टर लस ४ वर्षे ते ६ वर्षे ह्या वयाच्या कालावधीत द्यावी. जर काही कारणाने हे वेळापत्रक पाळले गेले नाही तर १३ वर्षे वयाच्या मुलाला १ महिन्याच्या अंतराने दोन डोस द्या.
कांजिण्यांची लस सुरक्षित आहे का?
कांजिण्या होऊ नयेत म्हणून ही लस बाळांसाठी सुरक्षित आहे. शरीरात अँटीबॉडीज तयार करून ही लस बाळाला कांजिण्यांशी प्रतिकार करण्यास मदत करते. ह्या लसीमध्ये अशक्त स्वरूपाचा हा विषाणू शरीरात सोडला जातो. जरी त्यामुळे थोड्या वेदना झाल्या आणि तो भाग लालसर झाला तरी हळूहळू ते कमी होते.
बाळाला कांजिण्यांची लस द्यावी की न द्यावी हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून असले तरी ही लस देण्याची शिफारस वैद्यकीय तज्ञांद्वारे केली जाते. ज्या मुलांना लस दिली जाते त्यांना सौम्य स्वरूपाच्या कांजिण्या होतात आणि खूप जास्त अस्वस्थता येत नाही.
कांजिण्यांच्या लसीचे दुष्परिणाम
कांजिण्यांची लस ही संपूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. परंतु काही मुलांमध्ये लस दिल्यावर काही परिणाम दिसू न येतात. दुसऱ्या कुठल्याही औषधासारखे, कांजिण्यांच्या लसीमुळे मुलांमध्ये काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते जसे की:
- घसा दुखणे, सर्दी
- स्नायू दुखी किंवा सांधे दुखी
- ताप
- जिथे लसीचे इंजेक्शन दिले जाते तो भाग लाल होऊन सूज येते किंवा वेदना होतात
- त्वचेवर रॅश
- थकवा
- डोकेदुखी
- झोप न येणे
वर दिलेल्या समस्यांव्यतिरिक्त खालील गंभीर समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात परंतु त्या दुर्मिळ असतात जसे की:
- खूप जास्त ताप
- श्वास घेण्यास त्रास
- छातीत अस्वस्थता
- लवकर रक्तस्त्राव होणे
- वर्तणुकीत बदल
- फिट येणे
जर वरील कुठलीही लक्षणे आढळली तर वैद्यकीय सल्ला घ्या त्यामुळे पुढील गुंतागुंत टळेल
जर कांजिण्या झाल्या असतील तर मुलाला शाळेत पाठवावे का?
कांजिण्या हा खूप संसर्गजन्य आजार आहे आणि तो एका मुलापासून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरू शकतो. म्हणून जर तुमच्या मुलाला कांजिण्या झाल्या असतील तर त्यास शाळेत पाठवू नका. मुलाला रॅश येण्याआधीच शरीरात संसर्ग झालेला असतो. म्हणून जेव्हा तुम्हाला मुलाच्या शरीरावर रॅश किंवा फोड दिसतील तेव्हा लगेच बाळाला शाळेत पाठवू नका. जर त्यासोबत ताप सुद्धा आला असेल तर तो विषाणूच्या संसर्गाचा पहिला टप्पा असेल. हा संसर्ग खोकला किंवा शिंकांमधून सहज पसरू शकतो. जोपर्यंत सगळे फोड सुकत नाहीत आणि नवीन फोड येणे बंद होत नाही तो पर्यंत मुलाला शाळेत पाठवू नका. जोपर्यंत संसर्ग कमी होत नाही तोपर्यंत मुलाला घरीच आराम करू द्या.
निष्कर्ष: कांजिण्या खूप संसर्गजन्य आजार आहे परंतु नीट काळजी घेतल्यास हा संसर्ग दूर राहू शकतो. तुमच्या मुलाला ह्या आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी कांजिण्यांची लस द्या आणि हा विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता कमी करा.
आणखी वाचा: बाळ किंवा मुलांच्या डोक्यातील उवांपासून सुटका कशी करून घ्याल?