In this Article
- आययूआय गर्भधारणा म्हणजे काय?
- आययूआय उपचारपद्धती कधी केली जाते?
- आययूआय किती यशस्वी आहे?
- तुम्हाला गर्भधारणेची लक्षणे कधी जाणवू लागतात?
- आययूआय प्रक्रियेनंतर गर्भधारणेची लक्षणे
- आययूआय (इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन) नंतरची इतर लक्षणे
- तुम्ही गर्भधारणा चाचणी कधी करावी?
- आययूआय (इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन) नंतर गर्भधारणेची पुष्टी कशी करावी?
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न
तुम्ही इंट्रायूटरिन रेसेमिनेशन प्रक्रियेतून गेलेल्या असल्यास, त्यानंतरचे वाट बघणे किती चिंता वाढवणारे असू शकते हे तुम्हाला माहितीच असेल. परंतु, गर्भवती असल्याचे कळल्यास तो क्षण त्याहूनही अधिक आनंददायक असू शकतो. गरोदरपणातील प्रत्येक टप्पा तुम्ही आणि तुमचे बाळ एकत्र सोबत असल्याच्या अविश्वसनीय प्रवासाची आठवण करून देतो.
इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (आययूआय) प्रक्रियेनंतर, संभाव्य गर्भधारणेच्या लक्षणांबद्दल उत्सुक असणे स्वाभाविक आहे. तुम्ही आययूआय नंतर गर्भधारणा चाचणी घेऊ शकता आणि गर्भवती असल्याची खात्री करून घेण्यासाठी परिणाम तपासून पाहू शकता. प्रत्येक स्त्रीचा अनुभव वेगळा असू शकतो. परंतु गर्भारपणाच्या काही सामान्य चिन्हांकडे लक्ष द्यावे लागते. ही लक्षणे यशस्वी गर्भधारणा आणि गर्भाचे रोपण झाल्याचे सूचित करू शकतात. आययूआय-संबंधित तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
आययूआय गर्भधारणा म्हणजे काय?
आययूआय द्वारे गर्भधारणा, हा नैसर्गिकरित्या गर्भधारणेची समस्या असलेल्या जोडप्यांसाठी एक पर्याय आहे. या प्रक्रियेत, बीजांडाची तयार होण्याची शक्यता वाढवण्यासाठी शुक्राणू थेट गर्भाशयात सोडले जातात. स्त्रीच्या गर्भाशयात शुक्राणू ठेवण्यासाठी कॅथेटरचा वापर केला जातो. ही पद्धत बर्याच प्रकरणांमध्ये यशस्वी झाली आहे आणि उपलब्ध कृत्रिम गर्भाधानाच्या सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे. आययूआय केल्यानंतर बहुतेक स्त्रियांची गर्भधारणा चाचणी सकारात्मक असते.
आययूआय उपचारपद्धती कधी केली जाते?
आययूआय (इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन) उपचार हे गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी विविध परिस्थितींमध्ये वापरले जाणारे प्रजनन तंत्र आहे. खालील परिस्थितीत आययूआय उपचारांची शिफारस केली जाऊ शकते:
- कुठलेच स्पष्टीकरण देता न येणारे वंध्यत्व: जेव्हा जोडप्याच्या वंध्यत्वाचे कोणतेही कारण ओळखता येत नाही, तेव्हा अधिक प्रगत उपचारांचा विचार करण्यापूर्वी कमी आक्रमक पर्याय म्हणून आययूआयचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
- पुरुष घटक वंध्यत्व: शुक्राणूंची कमी संख्या किंवा गतिशीलता यासारख्या काही पुरुष प्रजनन समस्यांवर मात करण्यासाठी शुक्राणू थेट गर्भाशयात ठेवून आययूआय मदत करू शकते.
- गर्भाशयाच्या मुखाकडील घटकांमुळे येणारे वंध्यत्व: जर शुक्राणूंना फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचण्यात अडथळा येत असेल, तर आययूआय ही प्रक्रिया शुक्राणूंना थेट गर्भाशयात ठेवून हा अडथळा दूर करते.
- सौम्य एंडोमेट्रिओसिस: सौम्य एंडोमेट्रिओसिस असलेल्या स्त्रियांसाठी, गर्भधारणेची वेळ अनुकूल करून गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आययूआय हा एक व्यवहार्य पर्याय असू शकतो.
आययूआय किती यशस्वी आहे?
आययूआय द्वारे गर्भधारणेच्या यशाचा दर हा स्त्रीचे वय, निदान न झालेल्या प्रजननक्षमतेशी संबंधित गंभीर समस्या, प्रजननक्षमतेची औषधे वापरली गेली होती किंवा नाही इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असते. म्हणून, यशाचा दर प्रत्येक स्त्रीमध्ये भिन्न असतो. तरीही सरासरी 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रीची, प्रत्येक आययूआय नंतर गर्भवती होण्याची शक्यता 10-20% असते. दुसरीकडे, 40 वर्षांच्या आसपासच्या स्त्रीची आययूआय केल्यानंतर गर्भवती होण्याची शक्यता 9.8% असते.
तुम्हाला गर्भधारणेची लक्षणे कधी जाणवू लागतात?
काही स्त्रियांना उपचारानंतर गर्भारपणाच्या सुरुवातीला चिन्हे किंवा लक्षणे दिसू शकतात. परंतु, सहसा असे प्रोजेस्टेरॉन असलेल्या औषधांच्या सेवनामुळे होते. ह्या औषधांमुळे स्तनांमध्ये कोमलता, सूज येणे आणि थकवा येणे ही लक्षणे जाणवतात. वास्तविक गर्भधारणेची लक्षणे सहसा दोन आठवड्यांनंतर दिसतात.
आययूआय प्रक्रियेनंतर गर्भधारणेची लक्षणे
आययूआय प्रक्रियेनंतर रोपणाची लक्षणे सामान्य गर्भधारणेसारखीच असतात. आययूआय यशाच्या काही लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो.
1. रोपण रक्तस्त्राव
रोपण झाल्याच्या पहिल्या लक्षणांपैकी एक म्हणजे रक्तस्त्राव. प्रत्येक स्त्रीला याचा अनुभव येत नसला तरी, रोपणानंतर रक्तस्त्राव झाल्यास तो सामान्य मानला जातो. रोपण झाल्यामुळे योनीतून स्त्राव होतो त्याला सहजपणे मासिक पाळी समजले जाऊ शकते. यासोबत अनेकदा पेटके येऊ शकतात. गर्भधारणेनंतर साधारणतः सहा ते बारा दिवसांनी हा रक्तस्त्राव दिसू शकतो. स्पॉटिंग आणि क्रॅम्पिंग ही आययूआय यशस्वी झाल्याची सर्वात स्पष्ट लक्षणे आहेत.
2. मासिक पाळी उशिरा येणे
मासिक पाळी येण्यास उशीर होणे हे गर्भधारणा झाली असल्याचे मोठे लक्षण आहे. दरम्यान हलके डाग किंवा हलका रक्तस्त्राव झालेला आढळला तरीही काळजी करण्यासारखे काहीही नाही. चिंता वाटेल असा कोणताही असामान्य रक्तस्त्राव दिसल्यास तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
3. स्तनांमध्ये कोमलता
तुमचे स्तन जड, संवेदनशील झाले असल्यास आणि किंचित दुखत असल्यास गर्भधारणा झाली असल्याची शक्यता असते. स्तनांमध्ये सूज येणे आणि स्तन कोमल आणि नाजूक होणे ही लक्षणे मासिक पाळी दरम्यान सुद्धा आढळतात. परंतु, मासिक पाळी येण्यास उशीर होऊनही लक्षणे कायम राहिल्यास, गर्भधारणा चाचणी करून घ्या.
4. मळमळ
सामान्य लक्षणांमध्ये मळमळ किंवा मॉर्निंग सिकनेस ह्या लक्षणांचा देखील समावेश होतो. तीव्र वासामुळे, विशिष्ट खाद्यपदार्थाचा तिरस्कार वाटू शकतो किंवा काहीवेळा कुठलेच कारण नसताना सुद्धा असे होऊ शकते. तुमच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे असे होते.
5. थकवा
तुमच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे तुम्हाला ह्या काळात खूप थकवा जाणवू शकतो, कारण ह्या संप्रेरकांमुळे झोप येऊ शकते. ह्याशिवाय तुमचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळीही कमी होते. त्यामुळे भरपूर ऊर्जा खर्च होते आणि थकवा जाणवू शकतो.
6. लालसा आणि तिरस्कार
तुम्हाला विशिष्ट पदार्थांची तीव्र, लालसा निर्माण होऊ शकते. तसेच काही विशिष्ट वास सहन होत नाहीत. हे गर्भधारणेचे लक्षण प्रसूती होईपर्यंत जाणवू शकते. तुम्हाला वेळी अवेळी भूक लागल्यामुळे तुम्ही अनेकदा विषम वेळी अन्न शोधत असाल! शरीरातील संप्रेरकांच्या बदलांमुळे काही विशिष्ट वास सहन होत नाहीत तर काही खाद्यपदार्थांविषयी घृणा निर्माण होते.
7. सातत्याने शरीराचे तापमान उच्च राहते
प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढल्याने तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते. जर तुम्हाला तुमच्या शरीराच्या तापमानात 20 दिवसांपेक्षा जास्त काळ वाढ झाल्याचे लक्षात आले असेल, तर ते एक चांगले लक्षण आहे आणि तुम्ही कदाचित गर्भवती असाल.
आययूआय (इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन) नंतरची इतर लक्षणे
जरी आययूआयचे जवळजवळ काहीच दुष्परिणाम होत नसले, तरीही काहीतरी समस्या असल्याचे दर्शवणाऱ्या लक्षणांचा तुम्ही शोध घेत असाल. दिवसेंदिवस आययूआयनंतर काय होते हे जाणून घेण्याबद्दल तुम्ही उत्सुक असाल. आययूआय मुळे होणारी गुंतागुंत जरी असामान्य असली तरी ती तुम्हाला त्याची लक्षणे जाणून घेण्यास मदत होऊ शकते.
- योनीतून लाल पाळीसारखा रक्तस्त्राव
- ओटीपोटात तीव्र क्रॅम्पिंग किंवा मान आणि पाय दुखणे
- ताप येणे
- चक्कर येणे
हे ट्यूबल गर्भधारणा किंवा संसर्गाची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत, आपण ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य उपचार घ्यावेत.
तुम्ही गर्भधारणा चाचणी कधी करावी?
जरी आययूआय प्रक्रियेमुळे शुक्राणू थेट गर्भाशयात टाकले जात असले तरी, अंड्याचे फलन झाल्यानंतर, फलित अंडे गर्भाशयात पोहोचण्यासाठी सुमारे चार ते सहा दिवस लागतात. रोपण होण्यासाठी आणखी पाच दिवस किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. गर्भधारणा चाचणीत गर्भधारणेची पुष्टी करणारी एचसीजी पातळी वाढण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. म्हणून, प्रक्रियेनंतर किमान दोन आठवडे किंवा 14 दिवसांनी गर्भधारणा चाचणी घेणे चांगले.
आययूआय (इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन) नंतर गर्भधारणेची पुष्टी कशी करावी?
इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (आययूआय) नंतर गर्भधारणेची पुष्टी करणे गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी रोमांचक असू शकते. अनिश्चितता दूर करण्यासाठी, आययूआय प्रक्रियेनंतर गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. येथे विचार करण्यासाठी चार ते पाच मुद्दे आहेत:
- मासिक पाळीयेण्याची वाट पहा – आययूआय नंतर गर्भधारणेची पुष्टी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे चुकलेल्या मासिक पाळीची प्रतीक्षा करणे. जर तुमची मासिक पाळी सामान्यत: नियमित असेल, तर तुमची मासिक पाळी येण्यास उशीर होणे हे गर्भधारणा दर्शवू शकते.
- घरगुती गर्भधारणा चाचणी करा – घरगुती गर्भधारणेच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि आययूआय प्रक्रियेनंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर घेतल्या जाऊ शकतात. या चाचण्यांमध्ये मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिन (एचसीजी) ची उपस्थिती आढळते हे संप्रेरक गरोदरपणात तयार होते. अचूक परिणामांसाठी चाचणी किटवरील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.
- रक्त चाचणी करून पुष्टी करा – रक्त चाचणीला परिमाणात्मक एचसीजी चाचणी सुद्धा म्हणतात. घरगुती गर्भधारणा चाचणीपेक्षा ह्या चाचण्या अधिक अचूक परिणाम देतात’. ही चाचणी तुमच्या रक्तातील एचसीजी च्या पातळीचे मोजमाप करते. रक्तचाचणी अगदी सुरुवातीच्या काळात गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे दर्शवू शकते.
- गर्भधारणेच्या लक्षणांचे निरीक्षण करा – तुम्हाला जाणवणाऱ्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष द्या. ही लक्षणे म्हणजे स्तनाची कोमलता, थकवा, मळमळ किंवा वारंवार लघवी होणे इत्यादी होय. जरी ही लक्षणे गर्भधारणेचा निश्चित पुरावा नसली तरी ती उत्साहवर्धक चिन्हे असू शकतात.
- अल्ट्रासाऊंड करा -सामान्यत – आययूआय प्रक्रियेनंतर सुमारे सहा ते आठ आठवडयांनी अल्ट्रासाऊंड केले जाते. अल्ट्रासाऊंड प्रक्रिया गर्भधारणेची पुष्टी करू शकते. ह्या इमेजिंग तंत्राद्वारे डॉक्टर गर्भपिशवी आणि विकसनशील गर्भ बघू शकतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. आययूआय बाळ निरोगी असते का?
होय, इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (आययूआय) द्वारे गर्भधारणा झालेल्या बाळांमध्ये चांगल्या आरोग्याची क्षमता नैसर्गिकरित्या जन्मलेल्या बाळांइतकीच असते. बाळाचे आरोग्य प्रामुख्याने विविध घटकांवर अवलंबून असते. हे घटक म्हणजे, पालकांचे संपूर्ण आरोग्य, कोणतीही वैद्यकीय समस्या आणि गरोदरपणात घेतलेली प्रसूतीपूर्व काळजी इत्यादी होत.
2. तुम्हाला आययूआय ह्या प्रक्रियेद्वारे जुळी मुले होऊ शकतात का?
होय, जुळ्या किंवा एका पेक्षा जास्त बाळांसह गर्भधारणेची शक्यता नैसर्गिक गर्भधारणेच्या तुलनेत आययूआय ह्या प्रक्रियेद्वारे होणाऱ्या गर्भधारणेत किंचित जास्त आहे. कारण प्रक्रियेदरम्यान एकाधिक भ्रूण हस्तांतरित केले जाऊ शकतात. जननक्षमता औषधे आययूआय सह एकाधिक गर्भधारणेची शक्यता वाढवू शकतात.
3. अयशस्वी आययूआयची लक्षणे काय आहेत?
आययूआय अपयशाची लक्षणे नियमित मासिक पाळीच्या लक्षणांसारखीच असतात. यामध्ये क्रॅम्पिंग, स्तनाची कोमलता, मूड बदलणे आणि मासिक पाळी सारखा सामान्य रक्तप्रवाह इत्यादी लक्षणांचा समावेश असू शकतो. ही लक्षणे आढळल्यास आययूआय अयशस्वी झाले आहे असे नाही, कारण गर्भधारणेची लक्षणे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलू शकतात.
4. आययूआयच्या पहिल्या चक्रात मी गर्भवती होऊ शकते का?
होय, आययूआयच्या पहिल्या चक्रात गर्भधारणा होणे शक्य आहे. आययूआयचे यशाचे दर स्त्रीचे वय, वंध्यत्वाचे कारण आणि जोडप्याचे एकूण आरोग्य ह्या सारख्या घटकांवर अवलंबून असतो. तुमच्या डॉक्टरांशी बोलून तुमच्या परिस्थितीशी संबंधित यशाचा दर आणि विशिष्ट घटकांवर चर्चा करण्याची शिफारस केली जाते.
5. आययूआयनंतर कोणतीही लक्षणे नसताना गरोदर राहणे सामान्य आहे का?
होय, आययूआय नंतर कोणतीही लक्षणे नसताना गरोदर राहणे शक्य आहे. सर्व स्त्रियांना गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भधारणेची लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे लक्षणे जाणवत नसल्यास गर्भधारणा झाली नाही असे नाही. प्रत्येक स्त्रीचा गर्भधारणेचा अनुभव वेगळा असतो आणि लक्षणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.
6. आययूआयनंतर प्रवासाचा गर्भधारणेवर परिणाम होतो का?
साधारणपणे, आययूआय नंतर प्रवासाचा गर्भधारणेवर लक्षणीय परिणाम होत नाही. परंतु तुम्हाला कुठली आरोग्यविषयक समस्या असेल आणि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला प्रवास टाळण्यास सांगितले असेल तर प्रवास करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. तुमच्यासाठी तसेच तुमच्या गर्भारपणासाठी प्रवास करणे सुरक्षित असल्याची खात्री करा.
आययूआय प्रक्रियेनंतर आपल्या गर्भधारणेबद्दल पुष्टी होण्याची प्रतीक्षा करणे तणावपूर्ण आणि भावनिक असू शकते. परंतु तुम्ही शांत राहून तणाव टाळणे आवश्यक आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यात तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि एकमेकांना धीर द्या. किमान दोन आठवडे घरगुती गर्भधारणा चाचणी घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा योग्य वेळ असेल, तेव्हा तुम्ही गर्भवती आहात की नाही हे जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्त तपासणी करणे हा आहे. कारण त्याचे परिणाम अचूक असतात.
आणखी वाचा:
वंध्यत्वावरील उपचारासाठी इंट्रायुटेरिन इन्सेमिनेशन (आय.यु.आय.) प्रक्रिया
संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेनंतर (ट्युबल लिगेशन) गर्भधारणा – हे शक्य आहे का?