In this Article
- कारणे
- बाळाला अतिसार झाल्याची चिन्हे आणि लक्षणे
- उपचार
- ओआरएस सोल्युशन देऊन बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी कशी पूर्ववत कराल?
- प्रतिबंध
- स्तनपान घेणाऱ्या बाळांना जुलाब होण्याची शक्यता कमी असते का?
- बाळाला मोठ्या माणसांचे जुलाबाचे औषध दिले तर ते सुरक्षित आहे का?
- बाळाला घनपदार्थ दिले तर चालतील का?
- तुमच्या बाळाला वैद्यकीय मदतीची केव्हा गरज आहे?
अतिसार म्हणजे बाळाला पातळ आणि चिकट शी होते. बऱ्याचदा जिवाणू किंवा विषाणू किंवा काही पदार्थाविषयी संवेदशीलतेमुळे बाळाला जुलाब होतात. नवजात बालकांना अतिसार झाल्यास ते खूप गंभीर असते कारण त्यामुळे बाळाच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते. जर असे झाले तर तुम्हाला बाळाला रुग्णालयात ठेवावे लागेल. परंतु तुम्ही योग्य काळजी घेतल्यास अतिसार आणि त्यामुळे होणारे निर्जलीकरण तुम्ही टाळू शकता.
कारणे
बाळांमध्ये अतिसार होण्याची काही कारणे आहेत आणि त्यामध्ये सूक्ष्मजीवांमुळे संसर्ग हे कारण आहे. बाळांमध्ये जुलाब होण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे:
१. जिवाणूंमुळे संसर्ग
सालमोनेला, स्टेफायलोकोकस, शिंगेला, काम्फयलोबॅक्टर आणि ई. कोलाय ह्या जिवाणूंमुळे संसर्ग होऊन अतिसार होऊ शकतो. जर संसर्ग जिवाणूंमुळे झाला असेल तर अतिसारासोबत पोटात पेटके येणे, ताप आणि शौचातून रक्त पडणे अशी लक्षणे दिसतात.
२. विषाणूंमुळे संसर्ग
विषाणूंमुळे बाळांमध्ये अतिसार होतो. उलट्या, ताप, थंडी वाजून येणे, पोटात दुखणे, अंगदुखी अशी इतर लक्षणे दिसतात. काही विषाणूंची नावे पुढीलप्रमाणे रोटाव्हायरस, कॅल्सीव्हायरस, अडिनोव्हायरस, ऍस्ट्रोव्हायरस आणि इन्फ्लुएंझा.
३. परजीवी
काही परजीवी जीवांमुळे सुद्धा अतिसार होतो. उदा: गिआरडिआसिस हे सूक्ष्म परजीवामुळे होते. ह्याची लक्षणे म्हणजे गॅस होणे, जुलाब, पोट फुगल्यासारखे वाटणे, शौचास चिकट होणे. समूहांमध्ये अशा प्रकारचे संसर्ग लवकर पसरतात.
४. अन्नपदार्थांची ऍलर्जी
अन्नपदार्थांमधील हानिकारक नसलेल्या प्रथिनांना बाळाची प्रतिकार प्रणाली प्रतिकूल प्रतिक्रिया देते. सर्वात सामान्यपणे आढळणारा अन्नपदार्थांमधील ऍलर्जिक घटक म्हणजे दुधामधील प्रथिने आणि दुग्धनजन्य पदार्थ असलेले बाळाचे फॉर्मुला दूध होय.
५. अन्नपदार्थांविषयी असहिष्णुता
अन्नपदार्थांविषयी असहिष्णुता जिथे असते तेव्हा ऍलर्जिक प्रतिक्रियांसारखे, त्याचा प्रतिकार प्रणालीशी संबंध नसतो. ह्याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे लॅकटोज इंटॉलरन्स. लॅक्टेज नावाच्या द्रव्याची निर्मिती शरीरात कमी प्रमाणात झाल्यामुळे लॅकटोज इंटॉलरन्स होतो. गायीच्या दुधात आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये असलेली लॅकटोज नावाच्या साखरेचे विघटन करण्यासाठी लॅक्टेज ची गरज असते. ह्यामध्ये जुलाब, पोट फुगणे, पोटात पेटके येणे आणि गॅस इत्यादी लक्षणे आढळतात.
६. प्रतिजैविके
प्रतिजैविके घेतल्यानंतर जर बाळाला जुलाब होत असतील तर त्याचे कारण म्हणजे प्रतिजैविकांमुळे पोटातील चांगले जिवाणू सुद्धा मारले जातात.
७. जास्तीचा कृत्रिम ज्यूस
फ्रुकटोज आणि सॉर्बिटॉल सारखे गोडी वाढवणारे कृत्रिम घटक घातलेली द्रव्ये बाळास दिल्यास बाळाचे पोट बिघडून बाळाला जुलाब होऊ शकतात.
बाळाला अतिसार झाल्याची चिन्हे आणि लक्षणे
नवजात बाळाला सारखी शी होत असते आणि जर बाळाला तुम्ही स्तनपान देत असाल तर बाळाची शी मऊ असते. जर बाळाला फॉर्मुला दिला जात असेल तर ती घट्ट असते. तथापि, जुलाब वेगळे दिसतात. इथे काही जुलाबाची लक्षणे दिली आहेत.
- बाळाला नेहमीपेक्षा जास्त वेळा शी होणे
- बाळाची शी पातळ, चिकट आणि दुर्गंधी युक्त असणे
- बाळाला ताप येऊन बाळाचे वजन घटणे
- बाळ किरकिर करते आणि बाळाची भूक कमी होणे
- तुम्ही बाळाच्या शरीरात पाणी कमी तर होत नाही ना ह्या लक्षणांकडे लक्ष ठेऊ शकता. ही लक्षणे म्हणजे डोळे खोल जाणे, तोंड कोरडे पडणे, लघवीला पिवळी होणे आणि बाळ रडू लागल्यावर अश्रू न येणे
- बाळाला ताप येऊन उलट्या सुरु होणे
उपचार
जुलाबाची समस्या बरी होण्यास आणि बाळाचे पोट पूर्ववत होण्यास काही दिवस लागतात. बाळाला नीट पाणी आणि पोषण दिल्यास बाळ लवकर बरे होण्यास मदत होते. इथे बाळांच्या अतिसारावर काही घरगुती उपचार दिले आहेत.
१. भरपूर द्रवपदार्थ द्या
जुलाबामुळे बाळाच्या शरीरातील पाणी कमी होणे ही खूप गंभीर बाब आहे आणि जर त्याच्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर बाळाला कदाचित रुग्णालयात दाखल करावे लागेल. शरीरातील पाण्याची पातळी पूर्ववत करणे ही पहिली स्टेप आहे. जर बाळ दूध किंवा फॉर्मुला प्यायल्यानंतर उलटी करत नसेल तर बाळाला दूध पाजणे सुरु ठेवा. मोठ्या मुलांना थोडे थोडे पाणी, इलेकट्रोलाईट सोल्युशन किंवा ओरल रेहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) देत रहा. नारळाचे पाणी सुद्धा इलेक्रोलाइटचा समृद्ध स्रोत आहे. तुमच्या बाळाला मध्ये मध्ये नारळाचे पाणी देत रहा.
२. गोड पेय देणे टाळा
बाळाला गोड द्रव्य किंवा फळांचा रस देणे टाळा. साखरेमुळे आतड्यांमध्ये खूप पाणी शोषून घेतले जाते आणि अतिसाराचा त्रास वाढतो.
३. तुमच्या मुलाला संतुलित आहार द्या
ज्या मुलांनी फिंगर फूड किंवा टेबल फूड खाण्यास सुरुवात केली आहे त्यांना जुलाब होत असताना घन पदार्थ द्या. बाळाला पोषक आहार दिल्यास, पोषक घटकांमुळे संसर्गाशी सामना करता येतो आणि जुलाबाच्या त्रासाचा कालावधी कमी होतो. ब्रेड, सीरिअल, भात, योगर्ट, फळे आणि भाज्या कमी प्रमाणात दिवसभर दिले जाऊ शकते.
४. योगर्ट द्या
योगर्ट लॅकटोबॅसिलसने समृद्ध आहे. हे जिवाणू आतड्यांसाठी गरजेचे असतात. अतिसारामुळे ज्या चांगल्या जिवाणूंचा ऱ्हास होतो ते योगर्ट मुळे पुन्हा मिळतात. बाळाला गोड नसलेले आणि संपूर्ण दुधापासून तयार झालेले योगर्ट भरवा.
५. स्वतःच्या मनाने औषध देणे टाळा
तुमच्या बाळाला कुठलेही हर्बल किंवा चाचणी न केलेले औषध देऊ नका. तसेच औषध देण्याआधी बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. १२ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाला डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय जुलाबाचे औषध देऊ नका.
बाळाला तंतुमय पदार्थ देऊ नका, त्याऐवजी पिष्टमय अन्नपदार्थ द्या. तसेच चीझ आणि दुधासारखे दुग्धजन्य पदार्थ तसेच तेलकट पदार्थ देऊ नका. ह्या पदार्थांमुळे बाळाचा जुलाबाचा त्रास वाढेल.
ओआरएस सोल्युशन देऊन बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी कशी पूर्ववत कराल?
बाळाच्या शरीरातील इलेकट्रोलाईट्सचा झालेला ऱ्हास रोखण्यासाठी ओआर एस सोल्युशन हा सर्वात सोपा उपाय आहे. ओआरएस हे सगळ्या मेडिकलच्या दुकानात उपलब्ध असते. ते तुम्ही घरी सुद्धा करू शकता. ८ चमचे साखर आणि एक टेबलस्पून मीठ उकळलेल्या पाण्यात घाला. बाळाला देण्याआधी हे मिश्रण संपूर्णतः गार झाले असल्याची खात्री करा.
- बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी पूर्ववत होण्यासाठी बाळाला चार तासाच्या कालावधीत वारंवार ओआरएस देत रहा.
- जर बाळाला तुम्ही स्तनपान देत असाल तर दोन स्तनपानाच्या मध्ये बाळाला ओआरएस द्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळाला कुठलेच द्रव्य देऊ नका.
- बाळाला ओआरएस देत असताना दुसरे कुठलेही अन्न देऊ नका.
प्रतिबंध
बाळाला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छता पाळणे हे खूप महत्वाचे आहे. जर स्वच्छता पाळली तर बाळांमध्ये अतिसाराचा धोका टाळला जाऊ शकतो.
- ज्या सूक्ष्मजीवांमुळे संसर्ग होतो ते हातांद्वारे तोंडापर्यंत पोहोचतात. म्हणून बाळाला घेण्याआधी तुमचे हात अँटीबॅक्टेरिअल साबणाने धुवा.
- किचन मधील सामान स्वच्छ ठेवा आणि अन्नपदार्थ सुद्धा स्वच्छ वातावरणात तयार करा
- जुलाब होत असताना तुमच्या बाळाला खेळाच्या मैदानावर किंवा बाहेर नेऊ नका. जुलाब थांबल्यावर सुद्धा बाळाला ४८ तास कुठेही नेऊ नका.
- तुमच्या बाळाचे हात नॉनअल्कोहोलिक वाईप्सने वारंवार पुसून घ्या. विशेषकरून बाळ रांगू लागल्यावर हे करणे जास्त जरुरी आहे.
- बाळाला भरवण्याआधी मांस अगदी चांगले शिजवून घेतले पाहिजे तसेच फळे आणि भाज्या सुद्धा स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत.
- जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी बाथरूमच्या भिंती आणि फारशी स्वच्छ ठेवली पाहिजे.
स्तनपान घेणाऱ्या बाळांना जुलाब होण्याची शक्यता कमी असते का?
हो, पाणी पिण्याच्या किंवा दुधाच्या बाटलीतून होणारा संसर्ग स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये होत नाही. तसेच स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये जुलाबाचा कालावधी कमी असतो कारण त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखणारे काही घटक असतात तसेच स्तनपानामुळे बाळाची प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते.
बाळाला मोठ्या माणसांचे जुलाबाचे औषध दिले तर ते सुरक्षित आहे का?
नाही, १२ महिन्यांच्या खालील वयाच्या बाळाला जुलाबाचे औषध देणे सुरक्षित नाही. विशेष करून जर ते औषध मोठया माणसांसाठीचे असेल तर ते अजिबात सुरक्षित नसते. त्यामुळे बाळावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
बाळाला घनपदार्थ दिले तर चालतील का?
हो जर तुमचे बाळ घनपदार्थ खाण्याइतपत मोठे असेल आणि बाळाला वारंवार उलट्या होत नसतील तर घनपदार्थ देणे सुरु ठेवले पाहिजे. ६ महिन्यांपेक्षा मोठ्या वयाच्या बाळांना केळी, सफरचंदाची प्युरी, भात, टोस्ट आपण देऊ शकतो. मोठ्या मुलासाठी, सूप, कुस्करलेला बटाटा, पास्ता, भात, मुगाच्या डाळीचे वरण देता येईल. जुलाब होत असताना बाळाची भूक कमी असेल तरी हरकत नाही, बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य रहावी म्हणून शरीरात योग्य प्रमाणात द्रवपदार्थ जाणे महत्वाचे आहे.
तुमच्या बाळाला वैद्यकीय मदतीची केव्हा गरज आहे?
जर तुमच्या बाळाचे वय ३ महिन्यांपेक्षा कमी असेल आणि बाळाला जुलाब होत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. जर बाळ ३ महिन्यांपेक्षा मोठे असेल आणि ही स्थिती २४ तासांपेक्षा जास्त काळ उलटून सुद्धा सुधारली नाही तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. जर जुलाब होत असताना खालील लक्षणे दिसत असतील तर तुम्ही वैद्यकीय मदत घेतली पाहिजे
- वारंवार उलट्या होणे
- काही तासांमध्ये ३–४ वेळा पातळ शी होणे
- कोरडे तोंड, अश्रू विरहित रडणे, डोळे खोल जाणे, सलग ६ तास नॅपी ओली न होणे. टाळू खोल जाणे इत्यादी लक्षणे दिसत असतील तर
- हात आणि पाय निस्तेज होणे
- २४ तासांपेक्षा जास्त काळ ताप राहणे
- दूध, पाणी किंवा इतर द्रव पदार्थ पिण्यास नकार देणे
- शौचातून रक्त पडणे
- आणि आतड्याना सूज येणे
बाळाला जुलाब होणे हे सर्वसामान्य आहे. जर बाळाला जुलाब होत असतील तर बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होत नाही ना ह्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. काही साधे घरगुती उपाय केल्यास जुलाब होण्यास प्रतिबंध घालता येईल तसेच त्यावर उपचार करता येतील.
आणखी वाचा:
बाळांमधील हिरवे शौच
बाळांमधील अतिसारावर (जुलाब) १५ घरगुती उपाय