Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य वंध्यत्वावरील उपचारासाठी इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ)

वंध्यत्वावरील उपचारासाठी इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ)

वंध्यत्वावरील उपचारासाठी  इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ)

In this Article

वैद्यकीय क्षेत्रातील ह्या जादूची घोषणा झाल्यापासून आय. व्ही. एफ. मध्ये खूप प्रगती झाली आहे. पहिल्या आय. व्ही. एफ. बाळाचा जन्म १९७८ मध्ये झाला होता. तेव्हापासून जगभरात ५ दशलक्ष आयव्हीएफ जन्म झाले आहेत आणि त्यामुळे जगभरातील पालकांना आनंद मिळाला आहे. दुर्दैवाने, बऱ्याच जोडप्यांनी त्यांचे परिणाम जाणून न घेता हा पर्याय निवडला. संपूर्ण ज्ञानाची कमतरता असलेले छोटे दवाखाने आणि तज्ञ नसलेले डॉक्टर्स स्वतःला प्रजनन तज्ञम्हणवून घेत असतात. भक्कम पाया नसलेली आयव्हीएफ उपचार पद्धती ही आई आणि बाळासाठी धोकादायक असते. त्यामुळे हा वैद्यकीय चमत्कार उलगडून बघून मूलभूत संकल्पना जाणून घेऊयात.

इन्व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय?

सर्वसाधारण्पणे, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन ही एक जैविक प्रक्रिया आहे आणि ती प्रयोगशाळेतील भांड्यात, परीक्षानळीत किंवा इतर संतुलित प्रायोगिक परिस्थितीत केली जाते. सोप्या भाषेत, इन्व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे ह्या उपचारपद्धतीमध्ये शुक्रजंतू आणि स्त्रीबीज ह्यांच्यामध्ये प्रयोगशाळेत संयोग घडवून आणला जातो आणि गर्भाशयाच्या मुखातून गर्भ गर्भाशयात सोडला जातो. अशाप्रकारे आयव्हीएक बाळाची गर्भधारणा होते. आजकाल, आयव्हीएफ उपचार हा सर्वात सामान्यतः वापरल्या जाणार्‍या प्रजननक्षमतेचा उपचार मानला जातो, आणि ही उपचारपद्धती चा सहाय्यित पुनरुत्पादक तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेत ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

आयव्हीएफ उपचारपद्धती क्रमाक्रमाने

ही क्रांतिकारक उपचारपद्धती प्रामुख्याने वंध्यत्वाची आणि जनुकीय समस्या सोडवण्यासाठी वापरली जाते आणि त्यामुळे गर्भधारणा राहण्यास मदत होते. आय.व्ही.एफ. ही उपचारपद्धती निवडण्याआधी तुम्ही कमी तीव्रतेच्या उपचारपद्धती करून बघू शकता. ह्यामध्ये स्त्रीबीजांची संख्या वाढवण्यासाठी नुसती औषधे घेणे किंवा इन्ट्रायुटेरिन इन्सेमिनेशन (ह्यामध्ये ओव्यूलेशनच्या काळात शुक्राणू गर्भाशयात सोडले जातात)ही उपचारपद्धती करून बघू शकता

परंतु गर्भधारणेसाठी सगळे प्रयत्न करून गर्भधारणा होण्यात यश न आलेल्या जोडप्यांपैकी तुम्ही एक असाल आणि तुम्हाला आयव्हीएफ उपचारपद्धती करून बघायची असेल तर तुम्हाला त्या उपचारपद्धतीविषयी माहिती असली पाहिजे. सर्वप्रथम, तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की ही प्रक्रिया तुमचे स्वतःचे स्त्रीबीज आणि तुमच्या पतीचे शुक्राणू वापरून केली जाते. ह्यामध्ये स्त्रीबीज, शुक्राणू किंवा फलित अंडे दात्याकडून घेतले जाऊ शकते. ह्यामध्ये दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात फलित अंडे रोपण केले जाऊ शकते.

आयव्हीएफ उपचारपद्धतीला सामोरे जाण्याआधी, दोघांनाही खालील चाचण्या करून घ्याव्या लागतील

. अंडाशयाचे मूल्यमापन

तुमच्या स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही चाचण्या करून घ्याव्या लागतील उदा: फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनचे प्रमाण, इस्ट्रोजेन आणि मासिक पाळीच्या पहिल्या काही दिवसांमध्ये तुमच्या रक्तातील अँटीम्यूलेरियन हॉर्मोन इत्यादी. ह्या चाचण्या अंडाशयाच्या सोनोग्राफीसोबत केल्या जातात आणि त्यावरुन प्रजनन औषधांना कसा प्रतिसाद दिला जाईल ह्याचा अंदाज लावला जातो.

. वीर्य विश्लेषण

उपचारपद्धती सुरु होण्याआधी तुमच्या पतीला वीर्य विश्लेषण चाचणी करून घेण्यास सांगितली जाते. ह्या चाचणीमध्ये शुक्राणूंचे आरोग्य आणि टिकाव धरण्याची क्षमता, त्यांची संख्या, आकार आणि हालचाल ह्यांचे विश्लेषण केले जाते. तुमच्या दोघांना एचआयव्ही सारख्या संसर्गजन्य रोगांच्या तपासण्या सुद्धा करून घ्याव्या लागतील.

. गर्भाशयाच्या पोकळीचे परीक्षण

ह्या चाचणीमुळे तुमचे डॉक्टर तुमच्या गर्भाशयाची पोकळी तपासून पाहतील. गर्भधारणा होण्यासाठी आणि गर्भारपण नीट पार पडण्यासाठी निरोगी गर्भाशयाची गरज असते.

तसेच आणखी काही महत्वाचे मुद्धे आहेत जे तुम्ही दोघांनी लक्षात घेतले पाहिजेत आणि त्याची चर्चा तुमच्या डॉक्टरांशी करून नंतरच आयव्हीएफ उपचारपद्धतीची निवड केली पाहिजे. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे

. भ्रूण हस्तांतरण

सामान्यपणे, हस्तांतरित केल्या जाणाऱ्या भ्रूणांची संख्या वय आणि स्त्रीबीज संख्या ह्यावर अवलंबून असते. जास्त वय असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत (३५ वर्षांपेक्षा जास्त वय) भ्रूणाचा रोपणदर हा कमी असतो. गर्भधारणा होण्यासाठी जास्त भ्रूण हस्तांतरित केले जातात. जिथे दात्याची अंडी वापरली जातात तिथे मात्र असे होत नाही.

तथापि, काही देशांमध्ये एका आयव्हीएफ चक्रामध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या भ्रूण संख्येवर मर्यादा आहेत. कारण काही अभ्यासाद्वारे असे निर्देशित केले आहे की एका वेळेला खूप जास्त भ्रूण रोपण केल्यास आई आणि बाळाला समस्या येऊ शकतात आणि त्यामुळे खूप गर्भधारणा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नीट चर्चा केली पाहिजे आणि प्रक्रिया सुरु होण्याआधी किती भ्रूण हस्तांतरित केले पाहिजेत हे ठरवले पाहिजे.

. एकापेक्षा जास्त गर्भधारणा

तुम्ही हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की जर एकापेक्षा जास्त भ्रूण तुमच्या गर्भाशयात सोडले गेले तर एकापेक्षा जास्त बाळांची गर्भधारणा राहण्याची शक्यता असते. ही स्थिती टाळण्यासाठी, काही वेळा लोक भ्रूणांची संख्या कमी ठेवण्याचा पर्याय निवडतात. ह्यामुळे स्त्रीच्या समस्या कमी होतात आणि ती निरोगी बाळाला जन्म देऊ शकते. तथापि, हा निर्णय खूप तात्विक, भावनिक आणि मानसिक दृष्टीने मोठा निर्णय आहे.

. जास्तीचे भ्रूण

ह्या उपचारपद्धतीदरम्यान ह्या जास्तीच्या भ्रूणांचे काय होते? तुम्ही न वापरलेले भ्रूण टाकून देऊ शकता, परंतु तुम्ही ते गोठवून भविष्यातील वापरासाठी ठेऊ शकता. तथापि, गोठवणे आणि पुन्हा वितळवणे ह्या प्रक्रियेला सामोरे जाऊन टिकणारे खूप कमी भ्रूण असतात. त्यामुळे डॉक्टरांशी चर्चा करून त्याप्रमाणे त्यांचा सल्ला घ्या.

. इतर समस्या

तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या की दात्याचे अंडे, शुक्राणू किंवा भ्रूण ह्यामुळे समस्या निर्माण होऊ शेतात. त्यामुळे तुम्ही तज्ञ सल्लागाराशी ह्याविषयी चर्चा केली पाहिजे आणि ते तुम्हाला दात्याच्या कायदेशीर हक्कांविषयी सुद्धा माहिती करून देतील. रोपण झालेल्या भ्रूणाचे तुम्ही कायदेशीर पालक आहात असे कायदेशीररित्या कोर्ट फाईल करण्यासाठी तुम्हाला वकील लागेल.

इन्व्हिट्रो फर्टिलायझेशन कसे होते?

इन्व्हिट्रो फर्टिलायझेशन कसे होते?

गर्भधारणा होण्याआधी जोडप्याना खूप वेगवेगळ्या टप्प्यांमधून जावे लागते. प्रक्रियेची गुंतागुंत समजण्यासाठी कार्यपद्धती समजून घेऊया.

. ओव्यूलेशन इंडक्शन

ही उपचारपद्धतीची पहिली पायरी आहे. जर तुम्ही तुमचे स्वतःचे स्त्रीबीज वापरत असाल तर तुम्हाला सुरवातीला कृत्रिम संप्रेरकांद्वारे उपचार केले जातील आणि अंडाशयाला एकापेक्षा जास्त स्त्रीबीज निर्मितीसाठी उत्तेजित केले जाईल. एकापेक्षा जास्त स्त्रीबीजे ह्यासाठी की गर्भाधान (fertilization) प्रक्रियेनंतर काही अंड्यांचे फलन किंवा विकास होणार नाही.

ह्यासाठी उपचारपद्धतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर डॉक्टर तुम्हाला औषधे लिहून देऊ शकतील

  • अंडाशय उत्तेजन: अंडाशयाच्या उत्तेजनासाठी तुम्हाला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा ल्युटिनायझिंग हॉर्मोनची किंवा दोघांची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. त्यामुळे एकापेक्षा जास्त अंड्याची निर्मिती एकवेळेला होण्यास मदत होते.
  • अपरिपक्व स्त्रीबीज परिपकव करणे: जेव्हा अंडी तयार होतात आणि ती काढून घेण्यासाठी तयार होतात (हे साधारणपणे ८ ते १४ दिवसांमध्ये होते) तुम्हाला अंडी परिपक्व होण्यासाठी औषधे लिहून दिली जातात.
  • लवकर ओव्यूलेशन होणे: तुम्हाला औषधे घेण्यासाठी सांगितली जाऊ शकतील आणि त्यामुळे विकसीत होणारी अंडी शरीरातून लवकर बाहेर सोडली जाणार नाहीत.
  • तुमच्या गर्भाशयाचे आवरण: स्त्रीबीज पुनर्प्राप्तीच्या वेळी किंवा भ्रूण गर्भाशयात हस्तांतरित करताना दुसरी औषधे लिहून दिली जातात. गर्भाशयाचे आवरण तयार होण्यासाठी प्रोजेस्टेरॉन पूरक औषधे दिली जातात आणि त्यामुळे रोपणासाठी त्याची मदत होते.

स्त्रीबीजे काढण्यासाठी तुमच्या शरीराला एक किंवा दोन आठवड्यांचा काळ अंडाशय उत्तेजनासाठी लागतो. परंतु औषधे घेण्याआधी, तुम्हाला दर दोन ते तीन दिवसांनी रक्तातील संप्रेरकांची पातळी तपासून पहिली पाहिजे आणि अंडाशयाचा आकार मोजण्यासाठी अल्ट्रासाऊंड करून घेतला पाहिजे. ह्यामुळे फॉलिकल्सच्या वाढीवर नजर ठेवण्यास मदत होते. फॉलिकल्स म्हणजे पाण्याने भरलेल्या पिशव्या असतात ज्यामध्ये बीजांड परिपकव होतात आणि त्यामुळे स्त्रीबीज बाहेर काढण्यासाठी तयार आहे का हे सुद्धा तपासून पहिले जाते.

. स्त्रीबीज काढणे

जेव्हा फॉलिकल्स तयार होतात, तेव्हा तुम्हाला इंजेक्शन दिले जाते त्यामुळे स्त्रीबीज पूर्णपणे परिपकव होते आणि संयोगासाठी तयार होते. इंजेक्शन दिल्यानंतर ३६ तासांनी स्त्रीबीज काढण्यासाठी तयार होते.

. ट्रान्स व्हजायनल अल्ट्रासाऊंड ऍस्पिरेशन

ट्रान्सवाजायनल अल्ट्रासाऊंड ऍस्पिरेशन (स्त्रीबीज काढून घेण्याची प्रक्रिया) तुम्हाला औषधे देऊन भूल दिली जाते. सामान्यपणे, ह्या प्रक्रियेत अल्ट्रासाऊंड प्रोब तुमच्या योनीमार्गात घालून फॉलिकल्स कुठे आहे हे शोधले जाते, त्यानंतर पातळ सुई योनीमार्गातून फॉलिकल्स मध्ये घालून स्त्रीबीजे काढून घेतली जातात.

परिपक्व झालेली स्त्रीबीजे पोषक द्रव्यात ठेवली जातात आणि नंतर उबवली जातात. जी अंडी पोषक आणि परिपक्व वाटतात त्यांचा शुक्राणूंशी संयोग होऊन भ्रूण तयार होते.

. शुक्रजंतू

आता तुमच्या पतीला वीर्याचा नमुना सकाळी काढून देण्यास सांगतील, जेव्हा स्त्रीबीज काढण्याची प्रक्रिया अपेक्षित असेल. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये आणि टेस्टिक्युलर ऍस्पिरेशन सारख्या पद्धती वापरून सुई किंवा शस्त्रक्रिया करून अंडकोषातून शुक्राणू काढले जातात. शुक्राणू प्रयोगशाळेत वीर्यातून वेगळे काढले जातात.

. गर्भाधान

गर्भाधान

आता स्त्रीबीज गर्भाधानाच्या सर्वात महत्वाच्या प्रक्रियेमधून जातील. ही प्रक्रिया दोन पद्धतीने केली जाते. पहिली म्हणजे इन्सेमिनेशन, ज्या मध्ये निरोगी शुक्रजंतू आणि परिपकव स्त्रीबीज ह्यांचा संयोग घडवून आणला जातो आणि संपूर्ण रात्र उष्मायान केले जाते. दुसरी प्रक्रिया म्हणजे इंट्रासिस्टोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) केली जाते ज्यामध्ये एक निरोगी शुक्राणू निरोगी स्त्रीबीजामध्ये इंजेकट केला जातो. ICSI ही पद्धती बऱ्याच वेळा जेव्हा वीर्याची गुणवत्ता किंवा शुक्राणूंची संख्या ह्यांची समस्या असेल तर किंवा आधीच्या आयव्हीएफ चक्रादरम्यान जर यश मिळाले नसेल तर वापरली जाते.

. भ्रूण हस्तांतरण

पुढचा टप्पा तीन दिवसांनी असतो जेव्हा काही फलित अंड्यांचे रूपांतर बहुपेशीय भ्रूणामध्ये होते, आणखी दोन दिवसांनी ते पुन्हा विकसित होऊन त्यांचे ब्लास्टोसाईट मध्ये रूपांतर होते. ह्या टप्प्यावर, द्रवाने भरलेला पेशींचा पोकळ गोळा तयार होतो, त्यामुळे नाळ आणि बाळ वेगळे दिसू लागतात.

हे सगळे टप्पे पार पडल्यानंतर, भ्रूण आता गर्भाशयात सोडण्यासाठी तयार झाले आहे. स्त्रीबीज काढल्यानंतर हे दोन ते सहा दिवसांनी केले जाते. इथे पुन्हा, तुम्हाला सौम्य उपशामक (sedative) दिले जाते. तथापि, रुग्णांसाठी ही प्रक्रिया वेदनारहित असते. डॉक्टर एक मोठी, पातळ आणि लवचिक कॅथेटर नळी योनीमार्गातून आत घालतात, नंतर गर्भाशयाच्या मुखातून ती गर्भाशयापर्यंत सोडली जाते. एका सिरिंज मध्ये द्रव्यात असलेले एक किंवा त्यापेक्षा जास्त भ्रूण कॅथेटर मध्ये सोडले जातात. जर यश मिळाले तर भ्रूणाचे रोपण गर्भाशयात होते.

वंध्यत्वावरील ही उपचारपद्धती तुमच्यासाठी का चांगली आहे?

जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करून दोन वर्षे झाली असतील आणि तुमचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले असतील तर तुम्हाला IVF ह्या उपचारपद्धतीचा विचार करण्याची गरज आहे. ओव्यूलेशन नीट न होणे, स्त्रीबीजांची गुणवत्ता, बीजवाहिनीतील अडथळा, एन्डोमेट्रिओसिस, गर्भाशयात फायब्रॉईड, काहीही कारण नसताना आलेले वंध्यत्व इत्यादी कारणे असतील तर तुम्ही ही उपचारपद्धती घेऊ शकता. ही आजची सर्वोत्तम वैद्यकीय उपचारपद्धती आहे, ज्यामुळे तुम्हाला गर्भवती राहण्यास मदत होईल आणि गर्भारपणाचे पूर्ण दिवस भरल्यावर बाळाचा जन्म होईल. ज्या स्त्रियांचे वय ४० पेक्षा जास्त आहे अशा स्त्रियांसाठी ही उपचारपद्धती सर्वात आधी सुचवली जाते. जर तुमच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा जर तुम्ही गर्भवती होण्यासाठी स्त्रीबीज दात्याकडून घेतले असेल तर ही सर्वोत्तम उपचारपद्धती आहे.

गर्भधारणेसाठी आयव्हीएफ उपचारपद्धती काय आहे?

ज्या जोडप्याना वंध्यत्वाचे प्रश्न आहेत किंवा जनुकीय प्रश्न आहेत त्यांच्यासाठी आयव्हीएफ ही सर्वात प्रसिद्ध उपचारपद्धती आहे. दोन्ही पालक समस्येनुसार उपचार घेऊन पालक होऊ शकतात.

स्त्रीसाठी ह्या उपचारपद्धतीची कशी मदत होते?

उपचारपद्धतीला सुरुवात करण्याआधी वंध्यत्वाच्या कारणांचा विचार केला पाहिजे. काहीवेळा, कारण हे संपूर्णतः माहिती नसते. स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे आणि उपचार पाहुयात:

. ओव्यूलेशनच्या समस्या

जर तुम्हाला ओव्यूलेशनची समस्या असेल आणि तुम्हाला पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम झाल्याचे निदान झालेले असल्यास काही औषधे लिहून दिली पाहिजेत ज्यामुळे तुमच्या अंडाशयातून स्त्रीबीज सोडले जाईल किंवा पॉलिसिस्टिक ओवेरिअन सिंड्रोम बरा होण्यास मदत होईल.

. वंध्यत्वाचे कारण न समजणे

जर सगळे उपचार करून सुद्धा वंध्यत्वाचे कारण समजले नाही तर तुम्हाला क्लोमोफेन, संप्रेरकांची औषधे दिली जातात.

. ब्लॉक झालेल्या किंवा खराब बीजवाहिन्या किंवा फायब्रॉइड्स

जर ब्लॉक झालेल्या किंवा खराब बीजवाहिन्या असतील तर शस्त्रक्रियेची गरज असते. जर सौम्य किंवा मध्यम प्रमाणात एंडोमेट्रोसिस असेल तर ते वंध्यत्वासाठी प्राथमिक कारण असू शकते, अशावेळी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेने ह्या वाढ झालेल्या पेशी काढून टाकल्या जातात. गर्भाशयाच्या बाहेर गर्भाशयाच्या पेशींची वाढ झालेली असल्यास किंवा रोपणामुळे एन्डोमेट्रिओसिस होतो. ह्यामुळे गर्भाशयाच्या कार्यावर, अंडाशयावर, आणि बीजवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो. तुम्हाला गर्भाशयात साध्या गाठी असू शकतात आणि त्यामुळे फलित अंड्याच्या रोपणात अडथळा निर्माण होतो.

पुरुषांसाठी ह्या उपचारपद्धतीची कशी मदत होते?

पुरुषांमध्ये, शुक्राणूंची कमी संख्या, शुक्राणूंची हालचाल मंदावणे किंवा शुक्राणूंचा आकार योग्य नसणे इत्यादींमुळे शुक्राणूंना अंड्यांचे फलन करणे आव्हानात्मक होते. जर असा काही प्रश्न आढळला तर तुम्हाला आधी इन्सेमिनेशन करण्याचा सल्ला दिला जातो जिथे तुमचे सगळे शुक्राणू गोळा केले जातात आणि नंतर त्यातील निरोगी शुक्राणू इन्सेमिनेशन साठी वापरले जातात.

आयव्हीएफ द्वारे गर्भधारणा होण्यास किती काळ लागतो?

आयव्हीएफचे एक चक्र पूर्ण होण्यासाठी चार ते सहा आठवडे लागतात. स्त्रीबीज काढून घेतल्यानंतर १२ दिवस ते दोन आठवडे इतक्या कालावधीनंतर तुम्हाला गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी रक्ताची चांचणी करून पाहण्यास सांगितली जाते.

आयव्हीएफ च्या यशाचा दर काय आहे?

आयव्हीएफ च्या यशाचा दर काय आहे?

कुठल्याही जोडण्यासाठी ज्यांनी कुटुंबाची सुरुवात करण्यासाठी आयव्हीएफ ची निवड केली आहे त्यांचा पहिला प्रश्न असतो की आयव्हीएफ किती यशस्वी आहे‘. ह्या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे कारण आयव्हीएफ च्या यशाचा दर हा वय आणि वंध्यत्व ह्यावर अवलंबून असतो. तरुण स्त्रियांमध्ये बरेचदा निरोगी स्त्रीबीजे असतात आणि यशाचा दर जास्त असतो. अलीकडच्या अभ्यासानुसार, स्त्रीचे स्वतःचे स्त्रीबीज वापरून आयव्हीएफ च्या एका चक्रात यश मिळायची शक्यता, ३४ वर्षे आणि त्याखालील वयोगटातील स्त्रियांसाठी ३०% ते ४०% असते. जेव्हा स्त्रीचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असते तेव्हा हा दर कमी होतो. ह्याव्यतिरिक्त भ्रूणाची स्थिती, प्रजननाचा इतिहास, जीवनशैली घटक उदा: धूम्रपान, लठ्ठपणा हे सुद्धा काही घटक आहेत ज्यावर आयव्हीएफ़ च्या यशाचा दर अवलंबून असतो.

इन व्हिट्रो फेर्टीलायझेशनचे फायदे आणि तोटे

केव्हाही वैद्यकीय शस्त्रक्रिया करावयाची असल्यास थोडी समस्या असतेच. म्हणून, आयव्हीएफ उपचारपद्धती घेण्याआधी चिंता वाटणे साहजिक आहे. म्हणून जेव्हा तुम्ही ह्याचे फायदे आणि तोटे समजून घेता तेव्हा ते महत्वाचे असते.

आयव्हीएफ चे फायदे

  • शास्त्रीयदृष्ट्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध: प्रयोगशाळेतील वंध्यत्वाची उपचारपद्धती हे सर्वात जुनी उपचारपद्धती आहे आणि या पद्धतीचा वापर करून गर्भधारणा झालेल्या मुलांच्या विस्तृत अभ्यासानुसार संशोधकांनी ते प्रमाणित केले आहेत.
  • सुधारित प्रक्रिया: शोध लागल्यापासून, हे तंत्रज्ञान सुधारित करण्याचा संशोधकांचा प्रयत्न सुरु असतो. उदा: जनुकीय चाचणी ज्याच नाव आहे जेनेटिक डायग्नोसिस किंवा प्री इम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग त्यामुळे तुम्हाला खात्री होते की उपचारपद्धतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या भ्रूणामध्ये कुठल्याही जनुकीय त्रुटी नाहीत.
  • नियंत्रण: ह्या नियंत्रित आणि वैद्यकीय देखभालीखाली असलेल्या उपचारमद्धतीमध्ये पालकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वचनबद्धतेतून गर्भधारणा होणे आणि बाळाचा जन्म ह्यासाठी वेळेची निवड करण्याची संधी असते.
  • कर्करोगाचा धोका: नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ओव्यूलेशन साठी च्या औषधांचा आणि कॅन्सरचा काहीही संबंध नसतो. आधीच्या अभ्यासाद्वारे प्रजनन औषधे आणि कर्करोग ह्यांचा संबंध असल्याचे सांगितले गेले होते. तथापि, हे आता चुकीचे ठरवले गेले आहे.

आयव्हीएफ चे तोटे

आयव्हीएफ ही उपचार पद्धती करताना काही धोके आहेत ते खालीलप्रमाणे:

  • अयशस्वी चक्र: जरी तुम्ही उपचारपद्धती घ्यायचे ठरवले तरी, यश येईलच अशी आशा बाळगू नका. आयव्हीएफ यशस्वी होईलच ह्याची काहीही गॅरंटी नाही आणि तुम्हाला यश मिळण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा आयव्हीएफ करावे लागेल.
  • खर्चिक प्रक्रिया: आयव्हीएफ ही खूप खर्चिक प्रक्रिया आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला उपचारांसाठी किती खर्च येणार आहे ह्याची स्पष्ट कल्पना आधी असली पाहिजे.
  • ताण: प्रक्रियेदरम्यान सर्व चाचण्या आणि प्रजनन औषधे घेणे हे भावनिकरीत्या आणि शारीरिकरीत्या ताण देणारे ठरू शकते कारण आयव्हीएफ साठी तुम्हाला डॉक्टरांकडे अनेक वेळा जावे लागते.

आयव्हीएफ उपचारांचे कुठले धोके आहेत?

आयव्हीएफ चे अनेक धोके आहेत आणि त्याबरोबर येणारे धोके खालीलप्रमाणे

1. एकापेक्षा जास्त बाळे

जर एका पेक्षा जास्त भ्रूण तुमच्या गर्भाशयात सोडले गेले, तर जुळे किंवा त्यापेक्षा जास्त बाळे होण्याची शक्यता असते. ज्या जोडप्याना जुळी हवी आहेत त्यांच्यासाठी हे चांगले असले तरी एकापेक्षा जास्त बाळे असल्यास गर्भपाताचा धोका आणि अकाली प्रसूतीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

2. एक्टॉपिक प्रेग्नन्सी

आयव्हीएफ मुळे एक्टॉपिक प्रेग्नन्सीचा धोका असतो. जेव्हा गर्भाचे रोपण गर्भाशयाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी होत असेल तर तेव्हा एक्टॉपीक गर्भधारणेचा धोका असतो. बीजवाहिनी मध्ये भ्रूणाची वाढ नीट होत नाही. खराब बीजवाहिन्या असलेल्या स्त्रियांमध्ये एक्टॉपिक गर्भधारणेचा धोका जास्त असतो.

3. ओवेरिअन हायपरस्टीम्युलेशन सिंड्रोम (ओएचएसएस)

जर स्त्रीच्या शरीराने प्रजनन औषधांना तीव्र प्रतिक्रिया दिली आणि खूप जास्त प्रमाणात स्त्रीबीज निर्मिती झाली तर ओएचएसएस होऊ शकतो. त्यामुळे अंडाशयाला सूज येऊन वेदना होतात. दुर्मिळ प्रकरणांमध्ये, ह्यामुळे जीवाला धोका उद्भवू शकतो आणि स्त्रीवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते

4. बाळाला धोका

असा समजूत आहे की आयव्हीएफ मुळे बाळांचा अकाली जन्म होऊ शकतो किंवा त्यांचे जन्मतः वजन कमी असते. तथापि, तज्ञांकडे ह्याविषयी सबळ पुरावे नाहीत. हा धोका ह्या उपचारपद्धतीमुळे आहे की वंध्यत्वाच्या इतर समस्यांमुळे आहे जसे की वय, हे मात्र अजून निश्चित माहिती नाही.

आयव्हीएफचे दुष्परिणाम

आयव्हीएफ उपचारपद्धतीचे अजिबात दुष्परिणाम होत नाहीत असे नाही. होणाऱ्या पालकांना ह्या उपचारपध्दतीच्या दुष्परिणामांची माहिती दिली पाहिजे.

उपचारांनंतर थोडे रक्तमिश्रित द्रव योनीमार्गातून येऊ शकते. आयव्हीएफ प्रक्रियेत भ्रूण गर्भाशयात सोडताना गर्भाशयाच्या मुखाला स्वच्छ केल्यामुळे असे होऊ शकते

एस्ट्रोजेनच्या जास्त पातळीमुळे तुमचे स्तन हळुवार होऊ शकतात आणि त्याचबरोबर पोट फुगणे, पोटात पेटके येणे आणि बद्धकोष्ठता सुद्धा होऊ शकते

ओव्यूलेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे ओएचएसएस होऊ शकतो, कारण त्यामुळे अंडाशयाला सूज येऊन त्यामध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला पोटात सौम्य दुखू शकते, मळमळ, उलट्या आणि जुलाब सुद्धा होऊ शकतात.

आयव्हीएफ उपचारपद्धतीला किती खर्च येतो?

आयव्हीएफ ला ६०,०००१ लाख इतका खर्च येऊ शकतो. आयव्हीएफ च्या प्रत्येक चक्रात डॉक्टरांची फी, इंजेक्शन्स आणि वैद्यकीय खर्च हा आणखी खर्च असतो. आयव्हीएफ च्या एका चक्रात यश येण्याची शक्यता फक्त ४६% आहे आणि ते सुद्धा जर स्त्रीचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असेल तर आणि ४० ते ४३ ह्या वयोगटातील स्त्रियांमध्ये ही शक्यता १२% असतो. खर्चाची अंतिम रक्कम तुम्ही कोणती उपचारपद्धती निवडता आणि त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असतो ह्यावर अवलंबून असतो.

गर्भारपणासाठी आयव्हीएफ कॅल्क्युलेटर कसा वापरावा?

आयव्हीएफ मध्ये अचूकरीत्या प्रसूतीची तारीख कशी काढावी ह्याची मदत करण्यासाठी ऑनलाईन आयव्हीएफ कॅल्क्युलेटर्स असतात. तुम्ही त्यामध्ये मासिक पाळीच्या पहिला दिवस, ओव्यूलेशनचा दिवस, स्त्रीबीज काढल्याचा दिवस किंवा इन्सेमिनेशन, ३ दिवसाच्या भ्रूण हस्तांतरणाची तारीख किंवा ५ दिवसाच्या भ्रूण हस्तांतरणाची तारीख ही माहिती भरावी भरावी लागते.

आयव्हीएफ उपचारपध्दती यशस्वी झाल्याच्या काही कथा

ह्या प्रजनन तंत्रज्ञानामुळे जगभरातील बऱ्याच जोडप्याना गर्भधारणा होऊन आयुष्याची अमूल्य भेट मिळाली आहे. जी जोडपी ही उपचारपद्धती निवडण्याचा विचार करीत असतील आणि त्यांची बाळ होण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काही यशस्वीतांच्या गोष्टी इथे देत आहोत.

ज्या जोडप्यांचे मुले होण्याचे वय निघून गेले आहे त्यांची उदाहरणे खूप सामान्य आहेत. आयव्हीएफ मुळे भारतातील एका खेड्यातील ५८ वर्षीय स्त्रीला बाळ झाले, त्यामुळे तिची मातृत्वाची इच्छा तर पूर्ण झालीच, परंतु त्यामुळे समाजात सुद्धा तिचा मानाने स्वीकार झाला कारण भारतात मातृत्वाला फार महत्व आहे.

डोवीन आणि बॅरी, हे बॉस्टन, युएसए मध्ये राहणारे जोडपे आहे आणि ते बाळासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करीत होते. इन्ट्रायुटेराइन इन्सेमिनेशन बऱ्याच वेळा करून सुद्धा त्याला यश मिळाले नाही. त्यांना आयव्हीएफ द्वारे यश मिळाले, आणि त्यांनी यशस्वीरीत्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्या जोडप्याने ज्यांना वंध्यत्वाचा प्रश्न आहे त्यांना मदत करून त्यावर वेळेवर उपचार करून घेण्यास सांगून मदतकार्य सुरु केले.

अँशले आणि जॉन ह्यांना सुद्धा ह्या उपचारपद्धतीचा फायदा झाला आणि पहिल्याच प्रयत्नात गर्भधारणा आणि निरोगी जुळ्या बाळांचा जन्म झाला. पॉलिसिस्टिक ओवेरिअन सिंड्रोम ह्या समस्येचा त्यांना अडथळा होता. पीसीओएस हे अगदी सर्रास आढळणारे वंध्यत्वाचे कारण आहे आणि आयव्हीएफची त्यासाठी मदत होऊ शकते.

म्हणून, आयव्हीएफ उपचारपद्धती घेण्याआधी स्वतःचे बाळ होण्याची आशा सोडू नका. त्यामुळे तुमचे आयुष्य बदलेल आणि तुम्हाला हवा असलेला आनंद, ज्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही अनेक वर्ष वाट पहात आहात तो तुम्हाला मिळेल.

आणखी वाचा: वंध्यत्वावरील उपचारासाठी इंट्रायुटेरिन इन्सेमिनेशन (आय.यु.आय.) प्रक्रिया

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article