In this Article
आपल्या बाळाच्या मोत्यासारख्या शुभ्र दातांचे हास्य पालकांसाठी आनंददायक असू शकते. लहान मुलांचे दुधाचे दात पडून त्याजागी कायमचे दात येतात. परंतु पालक ह्या नात्याने तुम्हाला मुलांच्या पडणाऱ्या दातांबद्दल तुम्हाला अनेक चिंता असू शकतात.
मुलांचे दुधाचे दात पडण्यास केव्हा सुरुवात होते?
मुले पाच ते सात वर्षांची असताना त्यांचे दुधाचे दात पडण्यास सुरुवात होते. परंतु, जर तुमच्या चार वर्षांच्या मुलाचा सुद्धा दात हलण्यास सुरुवात झालेली असेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही. काही मुलांचे दात इतर मुलांपेक्षा लवकर पडण्यास सुरुवात होऊ शकते. सहसा, मूल तीन वर्षांचे होईपर्यंत, मुलाला वीस दातांचा संच असेल. हे दात ज्या क्रमाने येतात त्याच क्रमाने पडू लागतात.
बाळाला दात येण्याचे आणि ते पडण्याचे वय
खाली दिलेला तक्ता तुम्हाला प्रथम कोणते दात पडतात हे जाणून घेण्यास मदत करेल:
वरचा जबडा | दात येण्याचा कालावधी | दात पडण्याचा कालावधी |
मधले पटाशीचे दात | 8-12 महिने | 6-7 वर्षे |
कडेचे पटाशीचे दात | 9-13 महिने | 7-8 वर्षे |
सुळे | 16-22 महिने | 10-12 वर्षे |
दाढा | 13-19 महिने | 9-11 वर्षे |
उपदाढा | 25-33 महिने | 10-12 वर्षे |
खालचा जबडा | दात येण्याचा कालावधी | दात पडण्याचा कालावधी |
दाढा | 14-18 महिने | 9-11 वर्षे |
उपदाढा | 23-31 महिने | 10-12 वर्षे |
सुळे | 17-23 महिने | 9-12 वर्षे |
कडेचे पटाशीचे दात | 10-16 महिने | 7-8 वर्षे |
मधले पटाशीचे दात | 10-16 महिने | 6-7 वर्षे |
* वरील तक्त्यावरून तुमच्या बाळाचे सर्व दात कोणत्या वयात पडतात याची सर्वसाधारण कल्पना देते. नमूद केलेली वयोमर्यादा अंदाजे असू शकते आणि वास्तविक परिणाम भिन्न असू शकतात
काय अपेक्षित आहे?
कायमचे किंवा प्रौढ दात येण्यास सुरुवात झाल्यावर मुलाचे प्राथमिक किंवा दुधाचे दात हलू लागतात. दुधाच्या दातांची मुळे कायमच्या दातांसाठी मार्गदर्शक असतात . जर पहिला दात वयाच्या सातव्या वर्षापर्यंत पडला नसेल, तर दंतचिकित्सकाशी संपर्क साधून एक्स–रे काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. काहीवेळा दातांची अतिरिक्त वाढ किंवा जास्तीचा दात असल्यास त्यामुळे कायमचे दात येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
तुमच्या मुलाचे दात कसे काढायचे?
बहुतेक वेळा बाळाला दात येताना जास्त वेदना होत नाहीत. हलणाऱ्या दातांशी खेळू नये असा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ शकते आणि जखमा देखील होऊ शकतात. नैसर्गिक मार्ग हा नक्कीच सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्हाला बाळाचे दात येताना दिसल्यास, त्यास नेहमीपेक्षा जास्त वेळा (दिवसातून दोन ते तीन वेळा) ब्रश करण्यास प्रोत्साहित करा. दात घासणे हा हलणारा दात हाताळण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही तुमच्या मुलाला हलणाऱ्या दाताभोवती जीभ फिरवण्यास प्रोत्साहित करू शकता आणि मुलांना ते करायला आवडते. दात अगदीच लोम्बकळत असल्यास आणि तुमचे मूल तो दात काढू शकत नसेल, तर तुम्ही एक मऊ कापड घेऊन हळूवारपणे तो दात बाहेर काढू शकता.
जर मुलाचे दात पडत असतील तर ब्रश करणे आवश्यक आहे का?
तोंडाची चांगली स्वच्छता राखणे महत्वाचे आहे आणि प्रत्येक टप्प्यावर बाळाचे दात घासणे अत्यंत आवश्यक आहे. दात पडत असताना तुमच्या मुलाला दात घासण्याची चांगली सवय लावण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- निरोगी कायमस्वरूपी दात बाळाच्या दुधाच्या दातांखाली वाढत असतात.
- अन्नपदार्थ चावण्यासाठी बाळाचे दुधाचे दात आवश्यक असतात. योग्य प्रकारे चावून खाल्ल्यास पोषण चांगले होण्यास मदत होते.
- तोंडाची नीट स्वच्छता राखली नाही तर अगदी लहान मुलांच्या दातांमध्ये सुद्धा पोकळी निर्माण होते.
तुमच्या बाळाचे दात ब्रशने घासण्यास केव्हा सुरुवात करावी?
बाळाचे दात दिसू लागताच तुम्ही ते घासण्यास सुरवात करू शकता. तरीही लहान बाळांसाठी टूथपेस्ट वापरणे टाळावे. बोटाचा लहान ब्रश बाळाच्या दातांवरील अन्नाचे कण काढून टाकण्यासाठी चांगला असतो. परंतु, जेव्हा बाळ योग्यरित्या थुंकण्यास शिकेल तेव्हा दोन वर्षांनी योग्य ब्रशिंग सुरू केले पाहिजे.
आपण दंतवैद्याना कधी भेट दिली पाहिजे?
तुमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर तुम्ही त्याला दंतवैद्याकडे नेऊ शकता. परंतु, त्यापूर्वी गरज भासल्यास तुम्ही दातांच्या डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जाऊ शकता. बाळाचे दात लवकर पडणे किंवा दात वेळेवर न येणे यासारखी दातांची कोणतीही सामान्य समस्या तुम्हाला आढळल्यास , तुमच्या बाळाच्या दंतवैद्याशी संपर्क साधा. तुम्ही तुमच्या बाळाच्या तोंडाची चांगली स्वच्छता राखावी जेणेकरुन तुमचे बाळ त्याचे सुंदर स्मितहास्य दाखवू शकेल. योग्य काळजी आणि स्वच्छता राखल्यास दातांच्या समस्या हाताळल्या जाऊ शकतात, तरी सुद्धा दातांची काही समस्या उद्भवल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.
आणखी वाचा:
बाळाला दात येतानाची लक्षणे
बाळांना उशिरा दात येण्यामागची कारणे आणि गुंतागुंत