In this Article
प्रत्येकाला गरोदरपणाची लक्षणे माहिती आहेत आणि ती म्हणजे पाळी चुकणे, मॉर्निंग सिकनेस, थकवा जाणवणे इत्यादी होत. परंतु काही गर्भवती स्त्रियांना इतरही काही लक्षणे जाणवतात. ती लक्षणे सर्वसामान्य नसतात आणि अपेक्षित सुद्धा नसतात. त्यापैकीच एक लक्षण म्हणजे तोंडात लाळ साठणे. तोंडात जास्त लाळ साठणे हे एक दुर्मिळ लक्षण आहे आणि सामान्यतः ज्या गरोदर स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास आहे त्यांना हे लक्षण जाणवते. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात लाळ वाढणे ह्यास वैद्यकीय भाषेत टायलीझम ग्रॅव्हीडॅरम असे म्हटले जाते.
गरोदरपणात जास्त लाळ येणे सामान्य आहे का?
होय, गरोदरपणात नेहमीपेक्षा खूप जास्त लाळ येणे पूर्णपणे सामान्य आहे. सामान्यत: लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथी संपूर्ण दिवसात अंदाजे ४०० मिली ते १ लिटर लाळ निर्माण करतात. आम्हाला माहित आहे, हे प्रमाण तुम्हाला जास्त वाटते, परंतु आपण दिवसभर सतत लाळ गिळत राहतो म्हणून त्याकडे लक्ष जात नाही. तथापि,गरोदरपणात, जर एखाद्या स्त्रीच्या तोंडात जास्त लाळ असेल तर लाळेचे उत्पादन वाढल्यामुळे किंवा गिळण्याची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे किंवा दोन्हीमुळे असे होऊ शकते.
काही गर्भवती महिलांना मळमळ झाल्यास खूप जास्त लाळ येऊ शकते. अशा परिस्थितीत ती लाळ थुंकून टाकावीशी वाटते.
गरोदरपणात जास्त लाळेचे उत्पादन कधी सुरू होते?
जास्त लाळ हे गरोदरपणाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते असे काही स्त्रियांना वाटते. तथापि, लाळेचे जास्त उत्पादन गरोदरपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होते आणि पहिल्या तिमाहीच्या अखेरीस स्थिर होते. काही स्त्रियांसाठी, ही स्थिती संपूर्ण गरोदरपणात आणि प्रसूतीपर्यंत तशीच राहते. तोंड, घसा आणि दात ह्यांचे पोटातील आम्लाच्या परिणामांपासून संरक्षण करण्याचा हा शरीराचा एक मार्ग आहे असा तज्ञांचा असा विश्वास आहे.
गरोदरपणात लाळेची कारणे
गरोदरपणात जास्त लाळ येण्याची काही संभाव्य कारणे खाली दिली आहेत –
- तज्ञांना नक्की सांगता येणार नाही परंतु गरोदरपणात लाळ वाढण्याच्या संभाव्य कारणांपैकी एक कारण म्हणजे गरोदरपणातील संप्रेरके हे आहे. गरोदरपणात संप्रेरकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे लाळेचे उत्पादन वाढू शकते.
- मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ होत असल्यामुळे स्त्रियांना लाळ गिळावीशी वाटत नाही कारण लाळेच्या विचित्र चवीमुळे मळमळ आणखी वाढू शकते.
- गरोदरपणात जास्त लाळ निर्माण झाल्याने छातीत जळजळ होऊ शकते, आणि ही गरोदरपणातील एक सामान्य समस्या आहे. बाळाला सामावून घेण्यासाठी जसजसा गर्भाशयाचा आकार वाढू लागतो तसे पोटातील अन्नसामग्री अन्ननलिकेकडे जास्त प्रमाणात ढकलली जाते. त्यामुळे अस्वस्थता वाढून जळजळ होते. त्यामुळे पोटातील आम्ल आणि जळजळ कमी करण्यासाठी ग्रंथी अधिक प्रमाणात लाळ निर्माण करतात.
- जर गर्भवती महिलेला दात किडणे, पोकळी, दंत क्षय किंवा अशा कोणत्याही तोंडातील संसर्गाचा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत लाळ जास्त प्रमाणात तयार होण्याची शक्यता असते.
- काही विषारी रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे शरीर नेहमीपेक्षा जास्त लाळ निर्माण करून प्रतिक्रिया देऊ शकते.
- विशिष्ट औषधे जसे की अँटिकोनव्हल्सेन्ट्स, लिथियम, ट्रॅन्क्विलाइझर्स आणि अशा प्रकारच्या इतर औषधांची प्रतिक्रिया म्हणून जास्त प्रमाणात लाळ गळते.
वाढलेल्या लाळेचे फायदे
गरोदरपणात जास्त लाळ निर्मितीचे काही फायदे खाली दिले आहेत –
- पोटातील आम्लांमुळे होणारी जळजळ किंवा त्रासदायक संवेदना वाढणाऱ्या लाळेमुळे कमी होऊ शकतात.
- तोंडातील लाळ हे दातांना हानी पोहोचवणाऱ्या जीवाणूंपासूनचे नैसर्गिक संरक्षण आहे.
- लाळेचे प्रमुख कार्य म्हणजे ती तोंडात पचन प्रक्रिया सुरू करते. पोट आणि आतडे याना अन्नाचे विघटन करण्यासाठी लाळेमुळे मदत होते.
- व्हिटॅमिन सप्लीमेंट्स मुळे एखाद्याचे कोरडे तोंड येऊ शकते. लाळेमुळे तोंडाला वंगण मिळते आणि ते ओले राहण्यास मदत होते.
गर्भवती असताना जास्त लाळेचे उपचार
तोंडात जास्त लाळ येण्याची समस्या गंभीर नाही आणि तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. तसेच, यासाठी कोणताही ज्ञात उपचार नाही. पण खाली काही गोष्टी आहेत ज्या तोंडात लाळ कमी निर्माण होण्यास मदत करू शकतात.
- आपल्या आहारातून कर्बोदकांनी समृद्ध किंवा स्टार्च–आधारित अन्नपदार्थ काढून टाकण्यासारखे काही बदल करण्याचा प्रयत्न करा
- आपल्या दंतवैद्यांना भेट द्या आणि आपल्या तोंडातील संसर्गाची तपासणी करा. काही हिरड्यांशी संबंधित समस्यांमुळे लाळेचे जास्त प्रमाणात उत्पादन होऊ शकते
- जेवणाच्या वेळांचे पुन्हा नियोजन करा. थोड्या थोड्या अंतराने थोडे थोडे खात रहा
- वारंवार दात घासा आणि माऊथवॉश वापरा. दिवसभरात माऊथवॉश वापरल्याने लाळेला मदत होते
- तोंड ओले ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. एक बाटली हाताशी ठेवा आणि वारंवार लहान सिप्स घ्या. ह्यामुळे तुमचे लाळेचे प्रमाण नियंत्रित राहील आणि तुम्ही सजलीत रहाल
- लाळ गिळण्यास मदत करण्यासाठी साखर विरहीत चुविंग गम्स किंवा मिंट चावत रहा
- एक बर्फाचा क्यूब घ्या आणि थोडा वेळ चोखत रहा. तुमचे तोंड थोड्या वेळासाठी बधिर होईल आणि काही काळ कमी लाळ तयार होईल.
- लाळ कमी होण्यासाठी आले किंवा लिंबाची फोड चावून खा. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तुमच्या आहारात तंतुमय फळे आणि भाज्यांचा समावेश करा
- लाळ गिळल्याने तुम्हाला मळमळ होते आहे असे वाटत असेल तर थुंकून टाका
- कोरडी बिस्किटे खा त्यामुळे लाळ शोषण्यास मदत होईल
- जर खूप उलट्या होईपर्यंत त्रास वाढला तर जवळच्या डॉक्टरांकडे त्वरित जा आणि औषधे आणा
गरोदरपणात जास्तीच्या लाळेला तुम्ही कसा प्रतिबंध करू शकाल?
गरोदरपणात जास्त गळणारी लाळ कशी थांबवायची हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, दुर्दैवाने, लाळ उत्पादन कमी करण्यास मदत करणारी कोणतीही ज्ञात तंत्रे आणि खबदारीचे उपाय नाहीत. गरोदरपणाचा हा फक्त एक टप्पा आहे आणि तुमच्या शरीरात होणारे हे सर्व बदल कालांतराने नाहीसे होतात. याबद्दल जास्त विचार करू नका किंवा तुमचा मूड घालवू नका. जे घडते आहे त्याबद्दल वैताग करू नका हे स्वाभाविक आहे. हा एक शारीरिक प्रतिसाद आहे, म्हणून त्याची काळजी करू नका.
जास्त प्रमाणात लाळ गळणे साधारणपणे केव्हा थांबते?
जर गरोदरपणात जास्त प्रमाणात लाळ येत असेल तर तुम्ही नाराज होऊ शकता. परंतु काळजी करू नका, हे फक्त गरोदरपणाचे लक्षण आहे आणि गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीनंतर ते कमी झाले पाहिजे. तथापि, काही स्त्रियांमध्ये हे लक्षण जास्त काळ टिकू शकते. जर तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर घाबरू नका कारण बाळाचा जन्म झाल्यानंतर ते कमी होईल. परंतु जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही नेहमी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि काय करता येईल ह्याबद्दल विचारू शकता.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जास्त प्रमाणात लाळ येत असेल तर ते खूप विचित्र वाटू शकते, परंतु ते मॉर्निंग सिकनेस प्रमाणेच नैसर्गिक आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात जोपर्यंत जास्त गळणाऱ्या लाळेमुळे अडथळा येत नाही किंवा वारंवार उलट्या होण्याचा त्रास होत नाही तो पर्यंत डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. डॉक्टर आपले मन हलके करण्यास मदत करू शकतात परंतु वैद्यकीय दृष्टया, काळजी करण्यासारखे काहीही नाही.
गरोदरपणात जास्त प्रमाणात लाळ गळणे थोडे लाजिरवाणे वाटू शकते, परंतु आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, ते गरोदरपणाचे एक लक्षण आहे. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांना तो एक नैसर्गिक प्रतिसाद आहे. जास्त लाळ गळण्याचा त्रास हा अगदीच किरकोळ आहे. तुम्ही गरोदरपणातील चांगल्या बाबींवर लक्ष केंद्रित करा.
आणखी वाचा:
धनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड – टीटी) – गरोदरपणात कधी आणि का दिली जाते?
गरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस)