In this Article
एक नविन आयुष्य ह्या जगात आणताना, स्त्री खूप प्रकारच्या भावनिक आणि शारीरिक बदलांमधून जात असते. गर्भारपणात आणि प्रसूतीनंतर तुमच्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य खूप बदलते. त्यांचे आरोग्य पुन्हा पहिल्यासारखे होणे म्हणजे काही वेळा स्वप्नासारखे वाटू लागते. परंतु आनंदाची बातमी म्हणजे हे बदल काही कायमस्वरूपी नसतात. स्वतःची योग्य काळजी घेतल्यावर कालांतराने पुन्हा स्त्री पहिल्यासारखी दिसू लागते. ह्या लेखामध्ये प्रसूतीनंतर स्त्रीच्या त्वचेत काय बदल होतात ह्याची यादी दिली आहे आणि थोडी काळजी घेतली तर त्यावर कशी मात करता येते हे सुद्धा सांगितले आहे.
प्रसूतीनंतर तुमच्या त्वचेमध्ये होणारे बदल
प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीरात खूप बदल होत असतात. काहींसाठी त्वचेमध्ये होणारे हे बदल सकारात्मक असतात, तर इतरांसाठी ते फारसे काही आनंददायी नसतात. तर काही स्त्रिया भाग्यवान असतात आणि प्रसूतीनंतर त्यांच्या त्वचेवर आलेला ग्लो आयुष्यभर तसाच राहतो. काही जणींना मुरमे, डाग, स्ट्रेच मार्क्स, डोळ्याखाली काळी वर्तुळे इत्यादींचा अनुभव येतो. थोडी काळजी किंवा अजिबात लक्ष न दिल्यास ते वाढते आणि त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर औदासिन्य येऊ शकते.
बाळाच्या जन्मानंतर स्वतःची काळजी घेतली पाहिजे हा विचार दुय्यम ठरतो कारण सगळं लक्ष नवजात बाळाची काळजी घेण्याकडे लागलेले असते. तथापि, स्वतःसाठी फक्त १० मिनिटे काढल्याने जादुई फरक होतो आणि त्यामुळे आईला त्वचेवरचा ग्लो आणि आत्मविश्वास मिळवण्यास मदत होते.
प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या
प्रसूतीनंतर त्वचेच्या काही समस्या खालीलप्रमाणे
१. स्ट्रेच मर्क्स
गर्भारपणात खूप वाढलेले आणि नंतर कमी झालेले वजन हे स्ट्रेच मार्क्स दिसण्याचे कारण असते. प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात स्ट्रेच मार्क्स दिसतात. हे स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे जात नाहीत परंतु काही काळानंतर ते फिकट होतात. सुरुवातीला, ते गुलाबी किंवा लालसर तपकिरी रंगाचे असतात. परंतु नंतर हे डाग जाऊन ते हलक्या रंगाचे होतात.
२. गडद डाग
मातृत्वासोबत येणाऱ्या ताणामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम होतात. तपकिरी रंगांचे ठिपके हे त्यापैकी एक आहे. हे गडद रंगांचे ठिपके वाढू नयेत म्हणून तुम्ही दिवसातून दोनदा सौम्य क्लिन्झरने त्वचा स्वच्छ केली पाहिजे.
३. गडद चट्टे
काहीवेळा, गरोदरपणात, चेहऱ्यावर गडद चट्टे तयार होतात. त्यांना इंग्रजीमध्ये कोलासमा किंवा मेलासमा म्हणतात. गरोदरपणातील संप्रेरकांच्या वाढलेल्या पातळीमुळे हे चट्टे उमटतात. गर्भारपणानंतर ही संप्रेरके हळूहळू कमी होतात. काही डाग कालांतराने फिकट होतात परंतु इतर कायमसाठी राहतात. ज्यांना असे डाग असतील त्यांनी सूर्यकिरणांपासून दूर राहिले पाहिजे.
४. डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि फुगीर भाग
काळी वर्तुळे आणि फुगीर डोळे हे संप्रेरकांमधील बदलांमुळे होतात तसेच बाळाच्या जन्मानंतर झोप मिळाली नाही तर असे होते. प्रसूतीनंतर शरीराचा थकवा डोळ्यावर दिसू लागतो. सतत बाळाला पाजण्यासाठी उठल्याने आईला नीट झोप मिळत नाही त्यामुळे काळी वर्तुळे तयार होतात.
५. मुरमे
प्रसूतीनंतर चेहऱ्यावर मुरमे येणे हे खूप सामान्य आहे. प्रसूतीनंतर प्रोजेस्टेरॉन च्या वाढलेल्या पातळीमुळे जास्त मुरुमे येतात. जर तुमच्या संपूर्ण गर्भारपणाच्या कालावधीत तुमची त्वचा चांगली राहिली तर तुमच्यासाठी हे एक नवीन आश्चर्य असेल.
६. अतिसंवेदनशीलता
गर्भारपणानंतर त्वचा संवेदनशील झाल्याचा अनुभव बऱ्याच जणींना येत असेल. कशामुळेही तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. उदा: थोडा वेळ जरी उन्हात गेले तरी तुमच्या त्वचेवर सनबर्न येऊ शकतात. काहीवेळा तुमच्या त्वचेला क्लोरीन किंवा साबणाने सुद्धा त्रास होऊ शकतो.
आधी सांगितल्याप्रमाणे, त्वचेचे काही प्रश्न काही काळानंतर कमी होतात तर काही ऍलर्जीकडे लक्ष द्यावे लागते.
बाळ झाल्यानंतर त्वचेचा पोत का बदलतो?
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्वचेमध्ये होणारे बदल स्वीकारणे अवघड आहे विशेषकरून जर गरोदरपणात तुमची त्वचा चमकणारी असेल तर जास्त कठीण जाते. परंतु बाळाच्या जन्मानंतर ताण, थकवा, मुरमे, स्ट्रेच मार्क्स, त्वचेवरील डाग, त्वचेचा रंग बदलणे हे काही सामान्यपणे आढळणारे बदल आहेत. जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि योग्य आहार घेऊन बाळाच्या जन्मानंतर त्वचेची काळजी घेण्याची सवय लावून घेतलीत तर हे सगळे लवकर कमी होईल.
त्वचेच्या समस्या कशा कमी करायच्या
गरोदरपणानंतर त्वचेच्या समस्या येण्यास सुरुवात होते. निरोगी जीवनशैली अंगीकारल्यास ह्या समस्या कमी होण्यास मदत होते. परंतु तुम्हाला खूप काळ त्वचेच्या समस्यांचा त्रास असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. प्रसूतीनंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स इथे दिल्या आहेत
- उन्हापासून दूर राहिल्यास त्वचेचे आणखी नुकसान होत नाही. जर तुम्हाला उन्हात जायचे असेल तर तुम्ही स्कार्फने स्वतःला नीट झाकले पाहिजे किंवा सन स्क्रीन क्रीम लावले पाहिजे.
- खूप पाणी प्यायल्याने तुमची त्वचा सजलीत राहण्यास मदत होईल आणि तुमच्या त्वचेची चमक पुन्हा येईल. जर तुम्ही दिवसाला ८ ग्लास पाणी प्यायले तर तुमची संप्रेरके संतुलित राहण्यास मदत होईल.
- प्रसूतीनंतर त्वचेच्या काळजीचा महत्वाचा भाग म्हणजे त्वचा नीट स्वच्छ करून, नियमित मॉइश्चराइझिंग केले पाहिजे. तुमचा चेहरा दिवसातून काही वेळा धुवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाण्यास मदत होईल. नियमितपणे अशी काळजी घेतल्यास चांगले रिझल्ट्स मिळतील.
- अनियमित झोपेमुळे त्वचेवर परिणाम होतो. आठ तासांची चांगली झोप मिळाल्यास बाळ झाल्यानंतरच्या त्वचेच्या समस्यांना सामोरे जाणे सोपे होईल. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झोप घ्या.
- हिरव्या पालेभाज्यांमधून मिळणारे लोह त्वचेसाठी चांगले असते आणि त्यामुळे गर्भारपणानंतरच्या त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेची चमक परत येण्यास मदत होते आणि त्वचेचा मऊपणा सुद्धा तसाच राहतो
- स्ट्रेच मार्क्स कमी होण्यासाठी व्हिटॅमिन ई युक्त ऑइल आणि कोको बटर वापरल्यास ते कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
- प्रसूतीनंतर व्हिटॅमिन्सची कमतरता होणे हे खूप कॉमन आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन पूरक औषधे घेतल्यास त्वचेमध्ये आणि शरीरात खूप बदल होऊ शकतात.
- पोषक आणि वेळेवर आहार घेतल्यास आईची त्वचा गरोदरपणानंतर पूर्ववत होण्यास मदत होतेतुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये हलक्या व्यायामाचा समावेश करा उदा: चालणे, योग इत्यादी. ह्यामुळे त्वचेची रंध्रे मोकळी होऊन त्वचेची चमक परत येते.
त्वचेवर उपचार
प्रसूतीनंतर जर त्वचेची समस्या तशीच राहिल्यास उपचारांची गरज भासू शकते. कुठलीही उपचारपद्धती सुरु करण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधणे जरुरीचे आहे. कोरडी त्वचा असेल आणि त्याबरोबर इतरही समस्या असतील तर ते थायरॉईडचे लक्षण असू शकते. जर त्वचेमध्ये झालेल्या बदलांमुळे तुम्हाला त्रास होत असेल आणि वरील सगळ्या टिप्स करून बघून सुद्धा त्यामध्ये काही फरक पडत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.
तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सोपे मार्ग
त्वचा काळी पडणे किंवा प्रसूतीनंतर त्यावर मुरुमे येणे हे सर्वज्ञात आहे. तुम्ही तुमच्या त्वचेची चमक खालील टिप्स च्या आधारे परत आणू शकता
मुरमे
- क्लिन्झर वापरून तुम्ही तुमचा चेहरा दिवसातून दोनदा स्वच्छ करू शकता
- सकाळी आणि रात्री त्वचेला तेलविरहित मॉइश्चरायझर वापरा
रंगद्रव्ये
- तुमच्या त्वचेची रंगद्रव्ये नियंत्रित राहावीत म्हणून तुम्ही नियमितपणे सनस्क्रीन लावले पाहिजे आणि उन्हात जाणे टाळले पाहिजे
- तुम्ही घरात किंवा बाहेर असाल, सनस्क्रीन वापरणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही घरात असाल तर SPF १५ असलेले सनस्क्रीन वापरा. जर तुम्ही थोड्या काळासाठी बाहेर पडणार असाल तर SPF ३० लोशन वापरा त्याने मदत होईल. जर तुम्ही खूप जास्त काळासाठी बाहेर असाल तर SPF ५० असलेले सनस्क्रीन वापरा
डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि फुगीर भाग
- भरपूर पाणी आणि पोषक आहार हे काळी वर्तुळे आणि फुगीर डोळ्यांवरील उपाय आहेत
- बाळासोबत थोडा वेळ झोप काढा. ह्या मार्गाने तुमच्या बाळाला लागणारी झोप मिळेल
- डोळ्यांखाली लावण्याची क्रीम झोपण्याआधी वापरा. त्यामुळे काळी वर्तुळे आणि फुगीर डोळे कमी होण्यास मदत होईल.
स्ट्रेच मार्क्स
- गर्भधारणेनंतर बऱ्याचशा स्त्रियांमध्ये स्ट्रेच मार्क्स आढळतात. तुम्ही गर्भार राहिल्यानंतर लगेच व्हिटॅमिन ई किंवा अँटीस्ट्रेचमार्क क्रीम वापरण्यास सुरुवात करा, गर्भारपणात आणि नंतरसुद्धा नियमितपणे त्याचा वापर करा. त्यामुळे पोटाची आणि स्तनांची त्वचा स्ट्रेच मार्क्स विरहीत राहील.
- बाळाच्या जन्मानंतर, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्ट्रेच मार्क्स आलेल्या भागावर चांगले स्ट्रेच मार्क क्रीम लावा
- प्रसूतीनंतर, पोषक आहार आणि व्यायामामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होतील. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून चालणे आणि बेसिक योगा ह्या व्यायामास सुरुवात करा.
- तुम्ही भरपूर पाणी पीत आहात ना ह्याची खात्री करा. त्वचेच्या मृत पेशी नियमितपणे काढून टाका
- तसेच तुम्ही पोषक आहार घेत आहात ना ते पहा. त्यामुळे त्वचा पूर्ववत होण्यासाठी लागणारी पोषणमूल्ये त्वचेस मिळतील
वर सांगितलेली त्वचेची काळजी घेतल्याने तुम्हाला लगेच त्याचे परिणाम दिसणार नाहीत परंतु कालांतराने ते दिसू लागतील. ह्या उपायांसोबतच चांगला आहार, आराम केल्यास प्रसूतीनंतरच्या त्वचेच्या समस्या कुठल्याही अडथळ्याशिवाय दूर होण्यास मदत होईल. मातृत्वाचा आनंद घ्या, परंतु स्वतःवर प्रेम करायला विसरू नका.
आणखी वाचा:
प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी उपाय
प्रसूतीनंतर खावेत असे २० भारतीय अन्नपदार्थ