Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण बालदिन 2023: मुलांसाठी बालदिनाविषयी छोटे आणि मोठे निबंध

बालदिन 2023: मुलांसाठी बालदिनाविषयी छोटे आणि मोठे निबंध

बालदिन 2023: मुलांसाठी बालदिनाविषयी छोटे आणि मोठे निबंध

बालदिन हा आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासून आठवतो. प्रत्येक वर्षी १४ नोव्हेंबरला, मुले थाटामाटात आणि उत्साहाने हा दिवस साजरा करतात. बालदिन हा बालपणीचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे आणि आता तुमच्या लहान मुलाला सुद्धा ह्या दिवसाचा आनंद लुटता येईल!

तुमच्या मुलाला या दिवसाबद्दल तसेच हा दिवस कशाचे प्रतीक आहे याबद्दल थोडे अधिक शिकवण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी बालदिनाविषयी काही छोटे आणि मोठे निबंध इथे देत आहोत ते तुम्ही त्याला वाचून दाखवू शकता.

बालदिनाविषयी छोटे परिच्छेद आणि निबंध

बालदिनानिमित्त खाली काही परिच्छेद दिलेले आहेत तुम्ही ते तुमच्या मुलाला वाचून दाखवू शकता

. बालदिनाविषयी लहान परिच्छेद क्र १

बालदिन दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. त्यांना चाचा नेहरू म्हणूनही ओळखले जाते. जवाहरलाल नेहरूंना लहान मुलांची आवड होती आणि मुलेही त्यांच्यावर तितकेच प्रेम करत. त्यामुळे १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून घोषित करण्यात आला. नेहरूंनी मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्न केले, कारण त्यांना विश्वास होता की मुले ही राष्ट्राचे भविष्य आहेत.

हा दिवस साजरा करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ह्या कार्यक्रमात गायन आणि नृत्य, नाटके आणि स्किट्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि मुलांसाठी अल्पोपाहार इत्यादींचा समावेश होतो. मुलांना भेटवस्तू खेळणी, स्टेशनरी, कपडे, चॉकलेट्स आणि इतर मजेदार वस्तू दिल्या जातात आणि मुलांसाठी अनुकूल चित्रपट देखील दाखवले जातात. नेहरूंचे बालशिक्षणाचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी अनेक संस्था अनाथाश्रमांना पुस्तके आणि खेळणी दान करतात. तिथे मुले ह्या साहित्याचा वापर करू शकतात. देशभरात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

. बालदिनानिमित्त लहान परिच्छेद क्र २

राष्ट्राच्या उभारणीमध्ये मुलांचा मोठा वाट आहे असा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा असा विश्वास होता. त्यांनी मुलांचे शिक्षण महत्त्वाचे मानले, कारण केवळ शिक्षणच मुलांना देशाचे भावी नेते बनवू शकते. जवाहरलाल नेहरूंना मुलांची आवड होती आणि ते त्यांच्यावर तितकेच प्रेम करायचे मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत. अशा प्रकारे, १४नोव्हेंबर नेहरूंचा जन्मदिवस संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो.

चाचा नेहरूंचा वाढदिवस आणि भारतातील मुलांसाठी त्यांच्या स्वप्नांचे स्मरण करण्याचा एक मार्ग म्हणून, लोक बालदिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. शाळा, कार्यालये, सरकारी आणि गैरसरकारी संस्था मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांमध्ये खेळ, नृत्य आणि गायन स्पर्धा, नाटके, मुलांसाठी चित्रपट आणि अल्पोपाहार यांचा समावेश आहे. काही ठिकाणी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि भेटवस्तू देण्याच्या स्वरूपात अधिक विस्तृत उत्सव आयोजित केले जातात. मुलांना उत्तम शिक्षण देण्याचे चाचा नेहरूंचे स्वप्न पुढे नेले पाहिजे, कारण शिक्षण लहान मुलांचे मन त्याप्रमाणे तयार होऊ शकते आणि त्यांना जबाबदार, सुसंस्कृत आणि पुढचा विचार करणारे नागरिक बनवू शकते. बालदिन हा बालपणाचा आनंद साजरा करण्याचा एक प्रसंग आहे.

बालदिनाविषयी छोटे परिच्छेद आणि निबंध

. बालदिनावरील छोटा निबंध

दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा बालदिन हा बालपणाचा आनंद साजरा करण्याचा एक दिवस आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर रोजी झाला. त्यांचे मुलांवर प्रेम होते आणि ते मुलांच्या शिक्षणाचे समर्थक होते कारण त्यांचा असा विश्वास होता की मुले म्हणजे देशाची भावी पिढी आहे. पंडित नेहरूंचा असा ठाम विश्वास होता की लहान वयातच मुलांना घडवले जाऊ शकते, म्हणूनच त्यांना जबाबदार नागरिक होण्यासाठी शिक्षित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच,१९६४ मध्ये पंडित नेहरूंच्या निधनानंतर , त्यांचा वाढदिवस देशभरात बालदिन म्हणून घोषित करण्यात आला.

नेहरूंचे मुलांविषयीचे प्रेम आणि त्यांच्याबद्दलची दूरदृष्टी लक्षात ठेवण्यासाठी, देशभरात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळा नृत्य आणि गायन स्पर्धा, नाटके, फॅन्सी ड्रेस स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. निवासी संस्था, सरकारी आणि गैरसरकारी संस्था देखील आपापल्या क्षमतेनुसार असे उपक्रम आयोजित करतात. लहान मुले ह्या दिवशी उत्सव मूर्ती असतात त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो. अनेक स्वयंसेवी संस्था वंचित मुलांना अन्न, कपडे आणि पुस्तके ह्या सारखे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मोहिमेचे आयोजन करतात. बालदिन साजरा करण्याचे खरे कारण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे आणि ते कारण म्हणजे मुलांच्या शिक्षणाचे नेहरूंचे स्वप्न पुढे नेणे जेणेकरून ते राष्ट्राचे मौल्यवान नागरिक होऊ शकतील.

. बालदिनावरील छोटा निबंध

बाल दिन १४ नोव्हेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला असून मुले हे राष्ट्राचे भविष्य आहेत असे त्यांचे मत होते. त्यांचा असा विश्वास होता की ते जबाबदार नागरिक आणि भविष्यातील नेते बनू शकतात आणि ते साध्य करण्याचा मार्ग म्हणजे मुलांना चांगले शिक्षण देणे हा होता. त्यांना मुलांची खूप आवड होती आणि मुले त्यांच्यावर खूप प्रेम करतात ते त्यांना चाचा नेहरू म्हणत. १९६४ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून घोषित करण्यात आला.

आज बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संस्था, शाळा आणि अगदी निवासी संकुल मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करतात. नृत्य, गायन, बालपणाचे सौंदर्य आणि महत्त्व यावर केंद्रीत नाटकांचे सादरीकरण आणि अगदी फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात जिथे मुले त्यांची आवडती पात्रे किंवा व्यक्तिमत्वाप्रमाणे वेषभूषा करू शकतात. हा दिवस बालपणाचा आनंद साजरा करण्यासाठी असतो, त्यामुळे मुलांना भेटवस्तू, प्रशंसा आणि भरपूर स्वादिष्ट पदार्थ दिले जातात.

बालदिन हा एक प्रसंग आहे जेव्हा अनेक गैरसरकारी संस्था अनाथाश्रमात जाऊन हा दिवस साजरा करतात. त्यांचे प्रतिनिधी मुलांसोबत खेळतात, कथा कथन करतात, नृत्य करतात, गातात आणि स्टेशनरी, पुस्तके, कपडे आणि अन्न यांसारख्या गोष्टींचे वितरण करतात. हे कार्यक्रम म्हणजे मजेदार आणि आनंददायक पद्धतीने मुलांना प्रेरित करण्याचा एक चांगला मार्ग आहे

लहान मुलांसाठी इंग्रजीमध्ये बालदिनावर दीर्घ निबंध

या विभागात, आम्ही तुमच्यासाठी बालदिनावर निबंध दिलेले आहेत, हे निबंध तुम्ही तुमच्या मुलांना वाचून दाखवू शकता. तुमचे मूल मोठे असल्यास आणि बालदिनाच्या निबंध लेखनासाठी काही मार्गदर्शन हवे असल्याससुद्धा हे निबंध उपयोगी पडू शकतात.

. दीर्घ निबंध १

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी बाल दिन साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि ब्रिटिशांविरुद्धच्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्याचा भाग होते. जवाहरलाल नेहरूंना लहान मुले आवडत असत. मुलांच्या शिक्षणावर त्यांचा दृढ विश्वास होता आणि मुले ही राष्ट्राचे भावी नेते आहेत असे ते नेहमी म्हणायचे. मुले देशाचे भावी नागरिक होणार असल्याने मुलांना त्यासाठी तयार करण्यावर त्यांनी भर दिला. मुलांना चांगले शिक्षण देणे हा त्यावरील मार्ग आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. प्रगतीशील राष्ट्र घडवायचे असेल तर मुलांना शिकण्याची आणि वाढण्याची मुबलक संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, असे त्यांचे मत होते. ते मुलांमध्येही खूप लोकप्रिय होते. मुले त्यांना प्रेमाने चाचा किंवा अंकल नेहरू म्हणायचे. १९६४ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे स्वप्न स्मरणात ठेवण्यासाठी आणि ते साकार करण्याच्या दिशेने कार्य करण्यासाठी त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून घोषित करण्यासाठी संसदेत अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला.

चाचा नेहरूंची दृष्टी जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात, देशभरातील अनेक संस्था दरवर्षी मोठ्या उत्साहात बालदिन साजरा करतात.१४ नोव्हेंबर रोजी, अनेक लोक आणि अधिकारी पंडित नेहरूंच्या पुतळ्याला श्रद्धांजली वाहतात. शाळांमध्ये, पंडित नेहरूंच्या स्मरणार्थ मुलांसाठी उपक्रम आयोजित केले जातात. काही शाळांमध्ये, मुख्याध्यापक सभेमध्ये बालपण आणि शिक्षणाचे महत्व या विषयावर भाषण देतात. शिक्षक मुलांचे कौतुक करतात आणि त्यांना खेळण्यासाठी किंवा त्यांना आवडणारी कोणताही क्रियाकलाप करण्यासाठी वर्गात मोकळा वेळ देतात. काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते ज्यामध्ये विविध मजेदार क्रियाकलापांचा समावेश असतो. यापैकी काही क्रियाकलापांमध्ये नृत्य आणि गायन, नाटके आणि स्किट्स, क्रीडा स्पर्धा, निबंध आणि कवितालेखन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा इत्यादींचा समावेश असतो. शाळा अनेकदा बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या गणवेशाऐवजी रंगीबेरंगी कपडे घालण्याचे स्वातंत्र्य देतात, त्यामुळे मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो. स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण होते आणि मुलांना अल्पोपहारही दिला जातो. या अल्पोपाहारांमध्ये मिठाई आणि एखादे पेय, स्नॅक्स आणि फिंगर फूड इत्यादींचा समावेश असतो. काही शाळा फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करतात. मुलांना त्यांचे आवडते पात्र किंवा व्यक्तिमत्वाची वेशभूषा करण्यास प्रोत्साहित केले जाते.

ह्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शिक्षणाचे महत्व सांगितले जाते. त्या दिवशी सादर केलेली नाटके आणि स्किट्समध्ये मुलांना अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी कसे प्रोत्साहित केले पाहिजे यावर जोर देते, कारण यामुळे त्यांची वाढ होण्यास मदत होते. निबंध स्पर्धा, कुटुंबासह आवडत्या आठवणी, आवडते खेळ किंवा आवडते टीव्ही शो यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. खेळांपासून ते स्पर्धा आणि स्नॅक्सपर्यंत सर्व गोष्टी मुलांचा आनंद लक्षात घेऊन आयोजित केल्या जातात.

पंडित नेहरूंच्या दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी सुद्धा रहिवासी संकुले आणि गैरसरकारी संस्थांसाठीही बालदिन हा एक संधी आहे. हे सर्वज्ञात सत्य आहे की आपल्या देशात असमानता आहे अनेक मुले बेघर, अशिक्षित आणि अनाथ आहेत. अशासकीय संस्था, वंचित मुलांचे जीवन चांगले करण्यासाठी लोक योगदान देऊ शकतील असे उपक्रम आयोजित करून बालदिन साजरा करतात. या दिवशी, ते लोकांना पैसे दान करण्यासाठी किंवा मुलाचे शिक्षण प्रायोजित करण्यासाठी प्रोत्साहित करतात. अशासकीय संस्थाही अनाथाश्रमात जाऊन मुलांसोबत आनंदोत्सव साजरा करतात. ते त्यांना अन्न, खेळणी आणि खेळ पुरवतात. वाचनाची आणि कल्पनाशक्ती निर्माण करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यापैकी काही जण मुलांच्या ग्रंथालयांना पुस्तके दान करतात. संकुलात राहणाऱ्या सर्व कुटुंबांना एकत्र येण्यासाठी आणि मौजमजा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवासी संकुल बालदिनाच्या संधीचा लाभ घेतात. ते स्पर्धा आणि कार्यक्रमही आयोजित करतात आणि मुलांना त्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात. बालदिनासारखे कार्यक्रम मुलांना जाणून घेण्यासाठी आणि मजा करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.

बालदिनाच्या दिवशी सगळीकडे आनंद आणि उत्साह असतो. ह्या दिवशी बालपणाचा आनंद सगळीकडे साजरा केला जातो.

. दीर्घ निबंध २

सुरुवात

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वाचे सदस्य होते. त्यांनी इतर स्वातंत्र्यसैनिकांसोबत ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. १४ नोव्हेंबरला जवाहरलाल नेहरूंची जयंती असते. भारताच्या प्रगतीसाठी मुलांची प्रगती होणे अवश्य आहे असा पंडितजींचा दृष्टिकोन होता मुले देशाचे भावी नेते आहेत असा त्यांचा विश्वास होता. मुले ही मातीसारखी असतात असा त्यांचा विश्वास होता आणि ते राष्ट्राचे प्रामाणिक व जबाबदार नागरिक बनू शकतात आणि राष्ट्राची प्रगती करू शकतात असा त्यांचा विश्वास होता.

जवाहरलाल नेहरूंना मुलांची आवड होती आणि मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत. मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे असा त्यांचा विश्वास होता, कारण शिक्षणाद्वारेच एखादे मूल मुक्त विचारसरणीची व्यक्ती बनू शकते आणि देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम बनू शकते. संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्यानुसार २० नोव्हेंबर रोजी जगभरात बालदिन साजरा केला जातो. भारतात १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. १९६४ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जयंती बालदिन म्हणून घोषित करण्याचा ठराव संसदेत मंजूर करण्यात आला.

उपक्रम

१४ नोव्हेंबर रोजी देशभरातील शाळांमध्ये बालदिन साजरा केला जातो. हा दिवस खूप आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. अनेक शाळा या दिवशी विविध उपक्रम आयोजित करतात. बालदिनाच्या दिवशी आयोजित केलेले विविध कार्यक्रम म्हणजे हा दिवस मजेदार पद्धतीने साजरा करण्याचे एक मार्ग आहे. नृत्य, गायन, नाटक यासारखे सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी या क्रियाकलापांमध्ये भाग घेतात आणि त्याचा मनापासून आनंद घेतात. ह्या दिवशी मुले शाळेत अभ्यास करण्यासाठी नाही तर बाहेर जाण्यासाठी, नाचण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी येतात.

ह्या दिवशी अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक उपक्रम आयोजित करतात. यापैकी काही उपक्रमांमध्ये निबंध लेखन स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा इत्यादी होत. ह्या दिवशी, शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांना थोडी सवलत देतात आणि त्यांना खूप नियम न लावता थोडी मजा करू देतात. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गणवेशाऐवजी कॅज्युअल कपडे घालण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. बालदिनासाठी काय घालावे ह्या चर्चा करणाऱ्या उत्साही विद्यार्थ्यांमुळे हॉल वे गजबजून जातात.

शाळांमध्ये बालदिनानिमित्त फील्ड ट्रिप आयोजित करण्याची एक सामान्य प्रथा आहे. शाळेतून विद्यार्थ्यांना एखाद्या उद्यानात, संग्रहालयात, करमणूक उद्यानात, ऐतिहासिक स्थळे किंवा शहराबाहेर फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना वंचित मुलांमध्ये मिसळण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अनेक शाळा अनाथाश्रमात सहलीचे आयोजन करतात. शाळेमार्फत सहलींचे आयोजन करणे म्हणजे मुलांसाठी बाहेरचे जग समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. अनाथाश्रमाच्या सहली हा अनेक मुलांसाठी डोळे उघडणारा अनुभव असतो कारण त्यांना त्यांच्या विशेषाधिकाराची आणि सामाजिक स्थितीची जाणीव होऊ लागते. त्यामुळे त्यांच्यात सहानुभूतीची भावना निर्माण होण्यास मदत होते.

बालदिन अल्पोपहार आणि भेटवस्तू देऊन देखील साजरा केला जातो. शाळेतर्फे प्रत्येक मुलाला फराळ, मिठाई आणि शीतपेयांचे वाटप केले जाते. खेळणी, पुस्तके, स्टेशनरी यांसारख्या भेटवस्तूंचे वाटप केले जाते. एकूणच, मुलांवर लक्ष केंद्रित केले जाते आणि मुलांना आनंद देण्यासाठी उपक्रम आयोजित केले जातात.

इतर

बालदिन हा केवळ शाळांपुरता मर्यादित नाही विविध गैरसरकारी संस्था देखील ह्या दिवशी आनंद, उत्साह आणि जागरूकता पसरवतात. अनेक गैरसरकारी संस्था वंचित मुलांवर परिणाम करणाऱ्या समाजातील असमानतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी उपक्रम आणि मोहिमेचे आयोजन करतात. या संस्थांचे प्रतिनिधी अनाथाश्रमांना भेट देतात आणि मुलांसोबत खेळ, नाच, गाणी आणि कथा वाचण्यात दिवस घालवतात. ते पुस्तके, खेळणी, मिठाई आणि अन्नाचे वाटप देखील करतात. निवासी संकुलात राहणाऱ्या लोकांसाठी जागरुकता सत्रे आयोजित केली जातात, कारण ते देणगी आणि समर्थनाद्वारे मदत करू शकतात. बालदिनाचे विशेष कार्यक्रम दूरचित्रवाणीवर देखील प्रसारित केले जातात, त्यामुळे तो देशव्यापी उत्सव बनतो.

निष्कर्ष

पंडित नेहरूंची देशासाठी असलेली दूरदृष्टी आणि त्यांच्या आठवणी मध्ये रमण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. मुलांच्या शिक्षणातच खरी प्रगती आहे असा त्यांचा विश्वास होता आणि १४ नोव्हेंबर हा दिवस ते मान्य करण्याचा आणि ध्येयाच्या दिशेने काम करण्याचा दिवस आहे. ह्या वयात मुले प्रभावित होतात; त्यांना योग्य मूल्ये शिकवल्याने पुढील आयुष्यात त्यांना त्याचा फायदा होतो.

बालदिन हा तुमच्या लहान मुलांचे यश साजरे करण्याचा एक उत्तम प्रसंग आहे. ही परंपरा जिवंत ठेवूया आणि हा बालदिन त्याच उत्साहाने आणि उमेदीने साजरा करूया!

आणखी वाचा: बालदिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा, कोट्स, मेसेजेस आणि स्लोगन

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article