Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण मुलांसाठी तेनाली रामनच्या गोष्टी

मुलांसाठी तेनाली रामनच्या गोष्टी

मुलांसाठी तेनाली रामनच्या गोष्टी

पौराणिक आणि ऐतिहासिक कथा आपल्याला नेहमीच आनंद देतात आणि जीवनविषयक मूल्ये शिकवतात. लहान मुलांना मूल्ये आणि नैतिकता शिकवण्यासाठी अनेकदा ह्या कथा वाचून दाखवल्या जातात. अन्यथा लहान मुलांना मूल्ये आणि नैतिकता शिकवणे कठीण जाते. लहान मुलांना शहाणपण शिकवण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी वाचून दाखवल्या जाणाऱ्या कथांमध्ये तेनालीरामच्या कथा प्रसिद्ध आहेत.

तेनाली रामकृष्ण हे कवी आणि राजा कृष्णदेवराय यांचे सल्लागार होते. तेनालीरामन त्याची अद्भुत बुद्धी, विनोद आणि विलक्षण चातुर्यासाठी ओळखला जात असे. तेनाली रामनच्या सर्व कथांमध्ये त्याचे राजासोबतचे नाते, त्याचे शहाणपण आणि त्याच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेबद्दल वर्णन केलेले आहे. तुमच्या मुलाला तेनाली रामनच्या छोट्या छोट्या कथा वाचून दाखवा. तुमच्या लहान मुलासाठी तेनाली रामनच्या काही नैतिक कथा ह्या लेखामध्ये दिलेल्या आहेत:

तेनाली रामन कोण होता आणि तो का प्रसिद्ध होता?

तेनाली रामन राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारातील विद्वान आणि कवी होता . तो दरबारात मंत्री होता आणि आठ कवींपैकी एक होता . तो त्याच्या चलाख बुद्धीसाठी प्रसिद्ध होता . कालांतराने त्याच्या कथा नैतिक कथांमध्ये विकसित झाल्या. मोठी माणसे आणि तसेच लहान मुले ह्या कथांचा आनंद घेतात!

तेनाली रामनच्या लहान मुलांसाठीच्या कथा

तेनाली रामनची हत्तीची कथा ही बुद्धी आणि चातुर्याची कथा आहे. ही कथा त्याच्या चांगल्या कथांपैकी एक आहे. तेनाली रामनच्या  शहाणपणावर,चलाख आणि कुशाग्र बुद्धीवर प्रकाश टाकणाऱ्या अशा मजेदार आणि मनोरंजक कथा आहेत. तुमच्या लहान मुलासोबत शेअर करण्यासाठी ह्या लेखामध्ये तेनाली रामन च्या छोट्या छोट्या गोष्टी मराठी मध्ये दिलेल्या आहेत.

1.चोर आणि विहीर

एकदा राजा कृष्णदेवराय कारागृहाची पाहणी करण्यासाठी गेले असता, तेथे बंदिवान असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांची दया मागितली. त्यांनी त्याला सांगितले की ते घरफोडीमध्ये निष्णांत आहेत आणि इतर चोरांना पकडण्यात ते राजाला मदत करू शकतात.

राजा एक दयाळू शासक असल्याने त्याने आपल्या रक्षकांना चोरांना सोडण्यास सांगितले. परंतु राजाने त्याआधी एक अट घातली. त्याने चोरट्यांना सांगितले की त्यांचा सल्लागार तेनाली रामनच्या घरात घुसून तेथून मौल्यवान वस्तू चोरू शकले तरच तो त्यांना सोडून देईल आणि हेर म्हणून त्यांची नियुक्त करेल. चोरांनी आव्हान स्वीकारले.

त्याच रात्री दोघे चोर तेनाली रामनच्या घरी गेले आणि काही झुडपांमागे लपले. रात्रीचे जेवण झाल्यावर तेनाली रामन बाहेर फिरायला आला, तेव्हा त्याला झुडपात काही खडखडाट ऐकू आला. त्यांच्या बागेत चोर शिरले आहेत हे लगेच त्याच्या लक्षात आले.

काही वेळाने तो आत गेला आणि त्याने आपल्या पत्नीला जोरात सांगितले की, मी दोन चोर पळून जाताना पहिले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. त्याने आपल्या पत्नीला सर्व सोन्या-चांदीची नाणी आणि दागिने एका ट्रंकमध्ये ठेवण्यास सांगितले. तेनाली आणि त्याची पत्नी यांच्यातील संभाषण चोरट्यांनी ऐकले.

काही वेळाने त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीपर्यंत ट्रँक ओढत नेली व विहिरीत फेकून दिली. चोरट्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. तेनाली घरात गेल्यावर चोरटे विहिरीजवळ आले आणि त्यातून पाणी काढू लागले. रात्रभर ते पाणी काढत राहिले. जवळजवळ पहाटे ट्रँक बाहेर काढण्यात चोर यशस्वी झाले परंतु त्यात दगड पाहून त्यांना धक्का बसला. तेव्हा तेनाली बाहेर आला आणि रात्री चांगली झोपू दिल्याबद्दल आणि झाडांना पाणी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तेनालीने आपल्याला फसवल्याचे दोन्ही चोरांच्या लक्षात आले. त्यांनी तेनालीची माफी मागितली आणि तेनालीने त्यांना जाऊ दिले.

बोध: एखाद्याने खोटे दावे स्वीकारणे टाळले पाहिजे.

2. लोभी ब्राह्मण

राजा कृष्णदेवरायाची आई अत्यंत धार्मिक होती. एके दिवशी तिने राजाला येऊन राजाला सांगितले की तिला दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना पिकलेले आंबे दान करायचे आहेत. राजाने आपल्या सेवकांना तिच्यासाठी आंबे आणण्यास सांगितले. त्याच रात्री राजाच्या आईचा मृत्यू झाला. राजा खूप दुःखी झाला, पण त्याला आईची शेवटची इच्छा आठवली.

राजाने सर्व आवश्यक धार्मिक विधी पार पाडले. शेवटच्या दिवशी त्यांनी काही ब्राह्मणांना बोलावून त्यांच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सुचवण्यास सांगितले. ब्राह्मण मात्र लोभी होते. चर्चेनंतर त्यांनी राजाला सांगितले की जर राजाने त्यांना सोन्याचे आंबे दान केले तरच त्यांच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल.

राजाने दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना सोन्याचे आंबे देण्यासाठी बोलावले. तेनालीने हे ऐकले. त्याला  ब्राह्मण लोभी असल्याचे लगेच समजले. त्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने ब्राह्मणांना घरी बोलावले.

दुसऱ्या दिवशी राजाकडून सोन्याचे आंबे मिळाल्याने ब्राह्मणांना खूप आनंद झाला. तेनाली सुद्धा त्यांना काहीतरी चांगलं दान करेल या विचाराने ते तेनालीच्या घरी गेले. परंतु जेव्हा ते तेनालीच्या घरात गेले तेव्हा त्यांना तेनाली हातात गरम लोखंडी पट्टी घेऊन उभा असलेला दिसला.

ब्राह्मणांना धक्का बसला. तेनालीने त्यांना सांगितले की त्यांच्या आईचा संधिवातामुळे मृत्यू झाला होता. वेदना कमी करण्यासाठी गरम रॉडने तिचे शेकण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे, आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याला ब्राह्मणांचे पाय शेकायचे होते.

तेनालीची युक्ती ब्राह्मणांना समजली. लाज वाटून त्यांनी तेनालीला सोन्याचे आंबे परत केले आणि तेथून पळ काढला. तेनालीने सर्व सोन्याचे आंबे राजाला परत केले आणि राजाला ब्राह्मणांनी कसे फसवले हे सांगितले.

बोध: लोभी नसावे आणि जे आहे त्यात आनंदी राहावे.

3. तेनाली रामन आणि शापित माणूस

विजयनगरच्या राज्यात रामय्यानावाचा माणूस राहत होता. त्याला शहरातील लोक अशुभ मानत होते. जर तो सकाळी दिसला तर त्यांचा संपूर्ण दिवस वाईट जातो असा त्यांचा विश्वास होता. आणि ते दिवसभर उपाशी राहत असत त्यांना काहीही खायला मिळत नसे.

ही गोष्ट राजाच्या कानावरही गेली. सत्य जाणून घेण्यासाठी त्याने रामय्याला आपल्या महालात बोलावले. त्याने त्याच्या सेवकांना त्याच्या खोलीच्या शेजारी असलेल्या खोलीत रामय्याच्या मुक्कामासाठी सर्व सोय करण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा कुणालाही न भेटता रामय्याचे तोंड पाहण्यासाठी त्याच्या खोलीत गेला.

दुपारी राजा जेवायला बसला, पण त्याच्या ताटावर माशी बसल्याने राजा काहीही खाऊ शकला नाही. त्याने स्वयंपाक्याला त्याच्यासाठी दुपारचे जेवण तयार करण्यास सांगितले. दुपारचे जेवण तयार झाले होते, पण कृष्णदेवरायांना आता जेवायची इच्छा नव्हती. राजाने काहीही खाल्ले नसल्याने त्याला कामात लक्ष घालता येत नव्हते. लोक जे काही बोलतात ते खरेच होते हे त्याच्या लक्षात आले. अशाप्रकारे त्याने रामय्यासारख्या माणसाने जगू नये असा निर्णय घेतला आणि आपल्या सैनिकांना त्याला फाशी देण्याचा आदेश दिला. सैनिकांना त्याला फासावर लटकवायचे नव्हते, परंतु ते त्यांच्या राजाची आज्ञा मोडू शकले नाहीत.

आपल्या पतीच्या शिक्षेबद्दल कळल्यानंतर रामय्याची पत्नी तेनालीची मदत घेण्यासाठी धावली. खूप दु:ख आणि डोळ्यातून अश्रू सांडत तिने तेनालीला सगळं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी शिपाई रामय्याला फाशी देण्यासाठी घेऊन जात असताना वाटेत त्यांना तेनाली भेटला. तेनालीने  रामय्याच्या कानात काहीतरी सांगितले आणि तो निघून गेला. जेव्हा रक्षकांनी  रामय्याला फाशी देण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारली तेव्हा त्याने सांगितले की त्याला राजाला एक चिठ्ठी पाठवायची आहे.

रक्षकाने ती चिट्ठी राजाकडे दिली. राजाने ती चिठ्ठी वाचली. त्या चिट्ठीमध्ये लिहिले होते की, माझा चेहरा पाहिल्यास दिवसभर भूक लागत नाही, तर जो माणूस राजाचा चेहरा पाहतो, त्याला सकाळी प्राण गमवावे लागते. मग अधिक शापित कोण – तो किंवा राजा? राजाला अर्थ समजला आणि त्याने रामय्याला मुक्त केले.

बोध: अंधश्रद्धेवर कधीही विश्वास ठेवू नका.

तेनाली रामन आणि शापित माणूस

4. मूठभर धान्य किंवा हजार सोन्याची नाणी

विजयनगर राज्यात विद्युलथा नावाची एक स्त्री होती. ललित कलेच्या क्षेत्रातील तिच्या कर्तृत्वाचा तिला अभिमान होता आणि गर्वसुद्धा होता. एके दिवशी तिने तिच्या घरासमोर एक पाटी लावली. पाटीवर लिहिले होते की जो कोणी तिची बुद्धी, शहाणपण आणि प्राचीन ग्रंथांविषयीचे ज्ञान ह्या सगळ्यामध्ये तिला मागे टाकेल त्या व्यक्तीला ती एक हजार रुपयांची सोन्याची नाणी देईल. अनेक विद्वानांनी आव्हान स्वीकारले पण तिला पराभूत करता आले नाही.

अनेक दिवस गेले पण तिला कोणीही हरवू शकले नाही. एक दिवशी तिच्या घराबाहेर लाकडे विकणारा एक माणूस त्याच्या आवाजात ओरडत होता. हा प्रकार बराच वेळ चालल्यावर विद्युलता चिडली आणि बाहेर आली. तिने सगळी लाकडे तिला विकण्यास सांगितले. परंतु तो माणूस म्हणाला कि त्याला लाकडे विकून पैसे नको आहेत तर त्याबदल्यात धान्य हवे आहे. विद्युलताने होकार दिला आणि त्याला सर्व लाकडे तिच्या अंगणात टाकायला सांगितली.मी काय मागितले आहे हे तुला समजले नाही असे तो माणूस तिला म्हणाला. तो पुढे म्हणाला कि आता जर ती मूठभर धान्याची अचूक किंमत देऊ शकत नसेल तर तिने हजार सोन्याची नाणी द्यावीत आणि लोकांना तिच्याशी बौद्धिक वाद घालण्यास सांगणारा फलकही काढून टाकावा. विद्युलता रागावली आणि म्हणाली, “काय मुर्खासारखे बोलतो आहेस ?”

विक्रेत्याने उत्तर दिले की हा मूर्खपणा नाही. मला काय म्हणायचे आहे ते तिला समजले नाही आणि म्हणूनच मी तिला शब्दांच्या युद्धात हरवले.

तो जे बोलला ते ऐकून तिला खूप राग आला. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाल्यानंतर विद्युलताने प्रांतीय न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्तींनी विद्युलताचे म्हणणे ऐकले. मग त्यांनी लाकूड विक्रेत्याला विचारले की तुला काय हवे आहे. त्याने न्यायाधीशांना सांगितले की लाकडांच्या बदल्यात मी तिच्याकडे मूठभर धान्य मागितले होते, म्हणजे एक धान्य जे तिच्या हाताने भरेल. एवढी साधी गोष्ट समजण्यात तिला अयशस्वी झाल्यामुळे, ती समजते तितकी शहाणी नाही आणि म्हणून तिने तिच्या घरासमोरील पाटी काढली पाहिजे.

न्यायाधीश सरपण विक्रेत्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले आणि त्यांनी विद्युलताला एक हजार सोन्याची नाणी देण्यास आणि त्याच्या घराबाहेरील फलक काढून टाकण्यास सांगितले.

हा लाकूड विक्रेता दुसरा तिसरा कुणी नसून तेनाली होता. तेनालीने गर्विष्ठ आणि धूर्त विद्याला धडा शिकवण्यासाठी स्वतःला लाकूड विक्रेत्याचा वेश धारण केला होता.

बोध: तुम्ही तुमच्या कर्तृत्वाबद्दल आणि बुद्धिमत्तेबद्दल नम्र असले पाहिजे.

5. बक्षीस आणि शिक्षा

तेनाली रामनपहिल्यांदा हंपीला आला तेव्हा त्याला राजा कृष्णदेवरायाला भेटायचे होते. आपल्या पत्नीला मंदिरात सोडून तो राजाला भेटण्यासाठी राजाच्या दरबारात गेला. जेव्हा तो राजाच्या राजवाड्याच्या बाहेर आला तेव्हा राजवाड्याच्या दारावरच्या रक्षकाने त्याला आत जाऊ दिले नाही.

राजा कृष्णदेवराय खूप दयाळू आणि उदार आहे असे मी ऐकले आहे आणि त्यामुळे मला राजाला भेटायचे आहे असे तेनालीने दारावरील रक्षकाला सांगितले. तेनाली रामन म्हणाला की तो दुरून आला असल्याने राजा त्याला नक्कीच भेटवस्तू देईल. हे ऐकून रक्षकाने तेनालीला विचारले की, जर राजाकडून भेटवस्तू मिळाल्या तर कुठल्या मिळतील? तेनालीने दारावरील रक्षकाला वचन दिले की राजा त्याला जे काही देईल ते त्याच्याबरोबर वाटून घेईल. तेव्हा रक्षकाने त्याला राजवाड्यात प्रवेश दिला.

तो राजाच्या दरबारात जाण्याच्या बेतात असताना दुसऱ्या रक्षकाने त्याला अडवले. तेनाली रामनने त्याला भेटवस्तू म्हणून मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे निम्मे देईन असे वचन दिले. हे ऐकून त्यानेही तेनालीला आत जाऊ दिले.

तेनाली राजाच्या दरबारात गेल्यावर तो राजाकडे धावला. राजाला राग आला आणि त्याने आपल्या रक्षकांना तेनालीला पन्नास फटके मारण्याचा आदेश दिला. हात जोडून, ​​त्याने राजाला सांगितले की त्याला ही भेट राजाच्या दरबारात प्रवेश करण्यास मदत करणाऱ्या रक्षकांसोबत शेअर करायची आहे हे ऐकून राजाने दोन्ही रक्षकांना प्रत्येकी पन्नास फटके मारण्याचा आदेश दिला.

तेनालीची चतुराई आणि बुद्धिमत्ता पाहून राजा खूप प्रभावित झाला. त्याने आपले महागडे कपडे त्याला भेट दिले आणि त्याला आपल्या शाही दरबारात सामील करून घेतले.

बोध: लोभी नसावे

6. गाढवांना तेनाली रामनचा नमस्कार

राजेशाही शिक्षक तथाचार्य वैष्णव पंथाचे होते आणि त्यांनी विष्णूची भक्ती  केली. श्री आदि शंकराचार्यांच्या अनुयायी असलेल्या लोकांची त्यांनी अवहेलना केली.

तथाचार्य बाहेर जाताना आपला चेहरा नेहमी कपड्याने झाकून ठेवत असत, जेणेकरून त्यांना कोणत्याही अनुयायांचा चेहरा दिसू  नये. त्याच्या या वागण्याने राजासकट सर्वजण संतापले. म्हणून, प्रजा आणि राजाने स्वतः तेनालीला हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली.

तेव्हा सर्वांचे म्हणणे ऐकून तेनाली त्यांना भेटायला तथाचार्यांच्या घरी गेला. तेनालीला पाहताच त्यांनी तोंड झाकले. ते पाहून तेनालीने त्याला विचारले की आपण आपल्या शिष्यासमोर तोंड का झाकत आहात? तथाचार्यांनी त्याला सांगितले की स्मार्त पापी आहेत आणि जर त्याने त्यांचा चेहरा पाहिला तर तो पुढील जन्मी गाढव होईल. हे ऐकून तेनालीला तथाचार्यांना धडा शिकवण्याचा मार्ग सापडला.

काही दिवसांनी तेनाली, राजा, तथाचार्य आणि सर्व दरबारी सहलीला गेले होते. ते परत येत असताना वाटेत त्याला काही गाढवे दिसली. त्यांना पाहताच तो गाढवांकडे धावला आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकला.

ते पाहून राजासह सर्वांनाच धक्का बसला. राजाने तेनालीला विचारले की त्याने असे का केले? तेनालीने राजाला सांगितले की स्मार्ताच्या चेहऱ्याकडे पाहून पाप करून गाढव बनलेल्या तथाचार्यांच्या पूर्वजांना मी नमस्कार करत आहे.

राजाला तेनालीचा विनोद समजला आणि तथाचार्यांना स्वतःचीच लाज वाटली. तेव्हापासून तथाचार्यांनी कधीही तोंड झाकले नाही.

बोध:जाती किंवा धर्माच्या आधारावर कधीही न्याय करू नका

7. सर्वात मोठा मूर्ख

राजा कृष्णदेवरायाला घोड्यांची आवड होती आणि त्यांच्याकडे काही उत्तम जातीच्या घोड्यांचा संग्रह होता.

एकदा अरबस्तानातील एक घोडे व्यापारी कृष्णदेवरायाच्या दरबारात आला. त्याने राजाला सांगितले की, आपल्याकडे काही फार चांगले अरबी घोडे विक्रीसाठी आहेत. त्याने राजाला आपल्या सोबत आणलेला घोडा पाहण्यासाठी बोलावले आणि सांगितले की जर त्याला तो आवडला तर तो इतर घोडे देखील पाठवू शकतो.

राजाला घोडा आवडला आणि राजाने त्याला त्याचे सर्व घोडे आवडल्याचे सांगितले. राजाने त्याला आगाऊ रक्कम म्हणून 5000 सोन्याची नाणी दिली आणि व्यापार्‍याने वचन दिले की तो जाण्यापूर्वी 2 दिवसात इतर घोड्यांसह परत येईल.

दोन दिवस उलटून गेले, दोन आठवडे झाले तरीही व्यापारी परत आला नाही. राजा खूप चिंताग्रस्त झाला. एके दिवशी संध्याकाळी मन शांत करण्यासाठी तो बागेत फेरफटका मारायला गेला. तिथे त्याला तेनाली रामन पेपर मध्ये काहीतरी लिहून ठेवताना दिसला. राजा त्याच्याकडे गेला आणि तो काय लिहीत आहे हे  विचारले. त्याला उत्तर मिळाले नाही. राजाने त्याची आणखी चौकशी केली. तेनालीने वर पाहिले आणि राजाला सांगितले की तो विजयनगर राज्यातील सर्वात मूर्ख लोकांची नावे लिहित आहे.

राजाने त्याच्याकडून कागद घेतला आणि सर्वात वर त्याचे नाव लिहिलेले पाहिले. तो तेनालीवर चिडला आणि त्याने स्पष्टीकरण मागितले. त्यावर तेनालीने उत्तर दिले की,एका अनोळखी व्यक्तीला 5000 सोन्याची नाणी देतो तो मूर्ख आहे. राजाने तेनालीला विचारले की तो घोडे घेऊन परत आला तर? तेव्हा तेनाली म्हणाली, अशा परिस्थितीत तो माणूस मूर्ख असेल. असे झाले तर मुर्खांच्या यादीमध्ये तो राजाऐवजी व्यापाऱ्याचे नाव पहिले लिहील.

बोध: अनोळखी लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

8. राजाचे स्वप्न

एके दिवशी सकाळी कृष्णदेवराय खूप काळजीत दिसले. तेनालीने राजाला विचारले की “महाराज तुम्ही इतके चिंतीत का दिसत आहात?” त्यावर राजाने उत्तर दिले की हे स्वप्नच त्याला त्रास देत होते. तेनालीने त्याला त्याच्या स्वप्नाबद्दल प्रश्न विचारला.

राजाने त्याला सांगितले की त्याला ढगांमध्ये तरंगत असलेल्या एका सुंदर राजवाड्याचे स्वप्न पडले. हा राजवाडा मौल्यवान दगडांनी बनलेला होता आणि त्या राजवाड्यामध्ये अप्रतिम बागा होत्या. पण अचानक स्वप्न संपले आणि राजाला ते स्वप्न विसरता आले नाही.

तेनाली राम राजाला सांगणार होता कि अशी स्वप्ने निरर्थक असतात. परंतु कृष्णदेवरायाचा दुसरा मंत्री चतुर पंडित राजाला म्हणाला की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करावे. चतुर पंडित हा धूर्त असल्याने राजाला वाडा बांधायला लावायचा आणि संधीचा फायदा घेऊन आपला खिसा भरायचा असा त्याचा डाव होता.

तेनालीला चतुर पंडितांची ही भ्रष्ट योजना समजली पण त्याने या योजनेबद्दल नाराजी दर्शवली नाही. राजाने चतुरला दुसऱ्याच दिवशी प्रकल्पाचे काम सुरू करण्यास सांगितले.

दिवस पुढे सरकत होते, पण प्रत्येक वेळी राजाने प्रकल्पाविषयी विचारले की चतुर वेगवेगळी कारणे सांगायचा. तो राजाला त्याच्या स्वप्नाबद्दल आणखी काही प्रश्न विचारात असे. आणि अधिक वेळ आणि पैशांची मागणी करत असे.

एके दिवशी कृष्णदेवरायाच्या दरबारात एक म्हातारा आला आणि त्याने न्याय मागितला. राजा अतिशय न्यायी आणि प्रामाणिक असल्यामुळे त्याने त्या माणसाला न्याय दिला जाईल असे वचन दिले.

म्हातार्‍याने राजाला सांगितले की आठवडाभरापूर्वी तो एक श्रीमंत व्यापारी होता. परंतु नंतर त्याला लुटले गेले आणि त्याच्या कुटुंबियांना मारले गेले. राजाने विचारले की असे कोणी केले हे माहित आहे का आणि त्याने सांगितले की मला माहित आहे. राजाने नाव विचारले. म्हातारा म्हणाला, काल रात्री त्याला स्वप्न पडले आणि त्याने पाहिले की तो लुटला गेला आणि त्याच्या कुटुंबाचा राजा आणि चतुर पंडित यांनी खून केला. हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने त्याला विचारले की त्याचे स्वप्न कसे पूर्ण होईल? म्हातार्‍याने उत्तर दिले की तो फक्त एका साम्राज्याचा नागरिक आहे आणि त्याचा राजा एका अशक्य स्वप्नाचा पाठलाग करत होता.

हे उत्तर मिळाल्यावर आणि जवळून पाहिल्यावर राजाला कळू शकले की म्हातारा दुसरी कोणी नसून त्याची स्वतःचा सल्लागार तेनाली रामन होता.

बोध: जंगली हंसाचा पाठलाग टाळणे चांगले.

9. तेनाली रामन आणि महान पंडित

एकदा एक मोठा पंडित (विद्वान) विजयनगरला आला. तो राजाकडे गेला. त्याने दावा केला की तो इतका जाणकार आहे की तो कोणत्याही विषयावरील वादविवादात राजाच्या सर्व मंत्र्यांचा पराभव करू शकतो.

राजाने आव्हान स्वीकारले आणि आपल्या मंत्र्यांना पंडिताशी स्पर्धा करण्यास सांगितले. मात्र, पंडित हे प्रत्येक विषयात जाणकार असल्याचे दिसत असल्याने सर्वच मंत्र्यांचा पराभव झाला.

शेवटी तेनाली रामनची पाळी आली. तेनालीने पंडिताला एका पुस्तकाच्या आकाराचे कापडाचे आवरण दाखवले आणि म्हणाली, “मी तुझ्याशी ‘तिलकस्थ महिषा बंधनम’ या महान पुस्तकातील एका विषयावर चर्चा करेन.” पंडित बुचकळ्यात पडले, कारण त्यांनी असे पुस्तक कधीच ऐकले नव्हते.

पंडिताने राजाकडे तयारीसाठी एका रात्रीचा वेळ मागितला. मात्र, पुस्तक कधीच ऐकले नसल्याने वादात हरेल अशी भीती पंडितांना वाटत होती. म्हणून त्याने सामान बांधले आणि रात्री शांतपणे राज्य सोडले.

दुसऱ्या दिवशी, राजा आणि दरबारी ह्यांनी सांगितले की रात्री पंडित निघून गेला. राजा तेनालीवर खुश  झाला आणि तेनाली ला म्हणाला की मला ते पुस्तक वाचायचे आहे. तेनाली राम हसला आणि म्हणाला असे कुठलेच पुस्तक अस्तित्वात नाही. त्यासाठी तेनालीने काही तिळाच्या काड्या आणि मेंढ्यांच्या शेणाचा वापर करून पुस्तकासारखा आकार केला आणि त्याला कापडाच्या आवरणाने झाकले. तेनालीने पुस्तकाचे नाव बनवण्यासाठी कापडाच्या आत बांधलेल्या सामग्रीची संस्कृत नावे एकत्र केली होती – ‘तिलकष्ट महिषा बंधनम’.

राजा तेनालीच्या हुशारीने प्रभावित झाला आणि त्याला बक्षीस दिले.

बोध: तुम्ही तुमच्या ज्ञानाबद्दल आणि शहाणपणाबद्दल जास्त अहंकार बाळगू नका.

10. आत्ताचा आनंद

एके दिवशी तेनाली आणि त्याचा मित्र एका झोपाळ्यावर झोपून समुद्राच्या मंद वाऱ्याचा आनंद घेत होते. तो एक सुंदर दिवस होता, आणि दोघेही हसत होते. आपल्या मित्राला पाहून तेनालीने त्याला काय हसू येतंय म्हणून विचारलं. त्याच्या मित्राने उत्तर दिले की तो खरोखर आनंदी होईल अश्या दिवसाचा विचार करत आहे.

“तो दिवस कधी येईल?” तेनालीने विचारले. त्याच्या मित्राने पुढे सांगितले की त्याला समुद्राजवळ घर, आरामदायी गाडी, मोठा बँक बॅलन्स, सुंदर बायको आणि चार मुलगे असतील, आणि ते शिकून भरपूर पैसे कमावतील तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने आनंद होईल.

त्याला मध्येच थांबवत तेनालीने विचारले, “एवढं झाल्यावर तू काय करणार?” . त्याच्या मित्राने उत्तर दिले, “हे सर्व केल्यानंतर, मी पायावर पाय ठेवून माझ्या चेहऱ्यावर पडणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या तुषारचा आणि सूर्यकिरणांचा आनंद घेऊ शकतो. ते ऐकून तेनाली रामनला खूप हसू आले आणि तो म्हणाला , “पण तू आता तेच करतो आहेस, नाही का? म्हणजे तुझी सर्व मेहनत वाया!”

बोध:आत्ताच्या क्षणात आनंदी रहा!

12. तेनाली रमणला मां कालीकडून एक भेट

एकदा, तेनाली रमणला देवी माँ कालीने एक वर दिला होता. तिने त्याच्यासमोर दोन वाट्या ठेवल्या. एका भांड्यात दूध आणि दुसऱ्यामध्ये दही. जर त्याने दूध प्यायले तर त्याला ज्ञान प्राप्त होईल आणि जर त्याने दही प्यायले तर त्याला संपत्ती प्राप्त होईल. मां कालीने त्याला दोन्हीपैकी एक निवडण्यास सांगितले. तेनाली रमनने तिला विचारले की तो निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही वाट्यांमधील पदार्थ चाखून बघू शकतो का आणि मां कालीने होकार दिला. ती त्याला थांबवण्याआधीच तेनालीने दोन्ही वाट्यांमधील सामग्री प्यायली. देवी संतापली. रामनने देवीची अवज्ञा का केली असे देवीने त्याला विचारले. तेव्हा त्याने तिला सांगितले की संपत्तीशिवाय ज्ञानाचा उपयोग नाही आणि देवी त्याच्यावर खुश झाली आणि त्याला एक महान कवी होण्यासाठी आशीर्वाद दिला कि तो त्याच्या बुद्धीचातुर्यासाठी आणि विनोदबुद्धीसाठी ओळखला जाईल.

बोध: धाडसी पाऊल उचलण्यास आणि आपल्या मनातील सांगण्यास कधीही संकोच करू नका.

13. कॅम्प फायरच्या आसपास फुशारकी मारणारे सैनिक

एके दिवशी तेनाली रमन विजयनगरला परतत असताना, त्याने काही लोक कॅम्प फायरच्या आसपास बसलेले आणि बोलत असल्याचे पाहिले. त्याला रात्री विश्रांती घेण्याची इच्छा होती आणि म्हणून तो आरामात आगीजवळ बसला. काही वेळानंतर, तेनाली रमनच्या लक्षात आले की हे पुरुष युद्धातील दिग्गज होते आणि त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत होते. एका सैनिकाने त्याने एकट्याने दहा प्रतिस्पर्धी सैनिकांना कसे मारले आणि दुसर्‍याने युद्धादरम्यान शत्रूचे संपूर्ण सैन्य कसे दूर ठेवले याचे वर्णन केले. बढाई मारण्यासारखे काहीच उरले नाही तोपर्यंत ह्या गप्पा सुरु राहिल्या. तेवढ्यात एक सैनिक तेनाली रामन कडे वळला  आणि त्याला विचारले की त्याच्याकडे असे काही किस्से आहेत का?

तेनाली रामनने त्यावर हो असे उत्तर दिले आणि ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले.

तेनाली रामनने सांगितले की एकदा तो प्रवास करत असताना त्याला एक विलक्षण मोठा तंबू दिसला. कुतूहलाने त्याने आत डोकावले तेव्हा त्याला पृथ्वीवरील सर्वात मोठा माणूस चटईवर पडलेला दिसला. तो एक खतरनाक राक्षस होता असे तेनाली रामनने सांगितले. अनेक दशकांपासून देशाच्या त्या भागात तो दहशत माजवत होता. पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी सैनिक आतुर होते.

तेव्हा तेनालीने उत्तर दिले की त्याने आपली तलवार काढली आणि त्या माणसाच्या पायाचे बोट कापले आणि नंतर स्वतःचा जीव वाचवला. हे ऐकून सैनिक हसले आणि म्हणाले की जर ते त्याच्या जागी असते तर त्यांनी त्या राक्षसाचे डोके कापले असते.

तेनाली रामन फक्त हसले आणि म्हणाले की कोणीतरी आधीच त्याचे डोके कापले होते आणि ते   त्याच्या शरीराजवळ पडले आहे.

बोध: आपण जीवनात खूप चांगल्या गोष्टी केल्या असतील, पण आपण इतरांना कमी लेखू शकत नाही.

14. तेनाली रामाने रक्षकांना मागे टाकले

तेनाली रमण हे राजा श्री कृष्णदेवरायाचे प्रिय होते, परंतु कधीकधी राजाला तेनाली रामनचा राग येत असे. जेव्हा तेनाली रामन आणि राजाचे पटायचे नाही तेव्हा राजा संतप्त व्हायचा आणि त्याला आज्ञाभंग केल्याबद्दल शिक्षा द्यायचा. अशाच एका दिवशी राजाने रक्षकांना तेनालीचा तलवारीने शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. दोन रक्षकांनी तेनालीला पकडले आणि त्याला फाशी देण्यासाठी नेले.

जेव्हा फाशीची वेळ आली तेव्हा तेनालीचा शिरच्छेद कोण करणार यावरून दोन रक्षकांमध्ये जोरदार भांडण झाले. तेनाली रामनने मध्यस्थी करून दोघांनी मिळून शिरच्छेद करावा अशी सूचना केली. रक्षकांनी हे मान्य केले आणि  तेनालीला गुडघ्यापर्यंत नदीत उभे केले. पहारेकऱ्यांनी तलवारी उगारताच तेनालीओरडला की आपली एक शेवटची इच्छा आहे.

रक्षकांनी तलवारी खाली केल्या आणि रामनची शेवटची इच्छा काय आहे असे विचारले. तेनालीने उत्तर दिले की त्याने मा कालीचे नाव घेतल्यावर रक्षकांनी त्याला मारावे असे मला वाटते. रक्षकांनीही हे मान्य केले.

तेनालीने श्वास रोखून जय मा काली असा जयघोष केला कारण आता त्याच्या मानेवर तलवारीचा वार होणार होता. मानेवर वार होण्याआधी, रमणने पटकन नदीत स्वतःला बुडवले. तलवारीचा वार चुकला आणि तलवारी एकमेकींना भिडल्या.

राजाने त्यांना फक्त एकदाच वार करण्याचा आदेश दिला आहे असे सांगून तेनालीने त्यांना अडवले तेव्हा रक्षक पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत होते. आता ते चुकले होते, ते पुन्हा प्रहार करू शकत नव्हते.

रक्षक आता कोंडीत सापडले होते. तेवढ्यात, राजवाड्यातील एक दूत फाशी थांबवण्याचे आणि तेनाली ला राजवाड्यात परत आणण्याचे आदेश घेऊन आला. तेनालीने राजवाड्यात पाऊल ठेवताच राजाने त्याला मिठी मारली आणि माफी मागितली.

बोध: रागाच्या भरात कधीही निर्णय घेऊ नका.

15. राक्षस जप स्तोत्र

तेनालीला स्पष्टपणे माहिती होते की तथाचार्यांना तेनाली रामनच्या कर्तृत्वाचा हेवा वाटत होता आणि ते तेनाली रामन विरुद्ध कट रचत होते. तेनाली फक्त दरबारी कवी होते, तर तथाचार्य हे राजघराण्याचे शिक्षक आणि पुजारी होते. तेनाली रामनने थथाचार्यांशी थेट सामना करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा आणि त्याचा प्रतिष्ठेचा नाश होईल. ज्याप्रमाणे डोंगरावर आदळल्यावर कोकरू आपले डोके फोडतो अगदी तसेच.

परिस्थितीचे बारकाईने विश्लेषण केल्यावर, रामनने तथाचार्यांशी थेट युद्ध न करता बुद्धीने त्यांचा सामना करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तेनाली राम तथाचार्यांच्या कमकुवतपणाबद्दल चौकशी करू लागला. तसे करत असताना, एके दिवशी, तेनाली रामन तथाचार्यांचा रात्रीचा पहारेकरी भद्रुडूशी बोलला. पाहरेकऱ्याशी बोलत असताना रामन च्या हातात एक छोटेसे पाकीट होते. रामनने तथाचार्यांच्या काही माहितीच्या बदल्यात त्यांना 100 वराह देऊ केले.

100 वराहांची माहिती ऐकून भद्रुदुचे डोळे चमकले. तो त्याच्या दोन महिन्यांच्या पगाराएवढा होता आणि म्हणून त्याने लगेच होकार दिला. 100 वराहांचे काय करायचे याचा विचार तो करू लागला.

रामनने भद्रुडूला संध्याकाळनंतरच्या तथाचार्यांच्या वेळापत्रकाबद्दल सहज विचारले. तेनालीने तथाचार्यांच्या वेळापत्रकाबद्दल विचारणा केल्याबद्दल भद्रुडूला त्यामागे काही वाईट भावना आहे असे वाटले नाही आणि त्याने लगेच उत्तर दिले की, रात्रीचा असा कोणताही दिनक्रम नाही. परंतु, आठवड्यातून दोनदा, अंधार पडल्यानंतर ते पूर्वेकडील रस्त्यावर जातात आणि पहाटे परततात. त्याने असेही सांगितले की आज रात्री सुद्धा तथाचार्य पूर्वेकडील रस्त्यावर जाणार आहेत. भद्रुडूला त्यांचे संभाषण गुप्त ठेवण्याचा इशारा देऊन रामन तेथून निघून गेला.

त्याच रात्री तथाचार्यांच्या आधी रामन पूर्व रस्त्यावर पोहोचला आणि एका मोठ्या झाडाच्या सावलीत उभा राहिला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना दुरूनच तथाचार्य रस्त्यावर चालताना दिसले. जुगाराच्या घरात जाईपर्यंत रामन त्याच्या मागे होता. रामन याचीच वाट पाहत होता.

रामनने तथाचार्य परत येईपर्यंत तिथे थांबायचे ठरवले. तथाचार्य पहाट होण्यापूर्वी तेथून बाहेर पडले. रामनने ताबडतोब तथाचार्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितले की “राक्षस स्तोत्र जपत आहेत” ही म्हण आता समजली आहे आणि तथाचार्यांना धमकी दिली की तो त्याचे रहस्य सर्वांसमोर उघड करेल.

तथाचार्य घाबरले आणि त्यांनी रामन ला रहस्य उघड करू नये म्हणून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तथाचार्यांनी रामनला तसे न करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली आणि रामनची इच्छा असेल तसे होईल असे आश्वासन दिले.

रामनला वाटले की आता बदला घेण्याची वेळ आली आहे. त्याला खांद्यावर घेऊन जायचे मान्य केले तर तो आधी घडलेले सगळे विसरून जाईल, असे त्याने तथाचार्यांना सांगितले. तथाचार्यांनी होकार दिला आणि राजा रायलूच्या शयनगृहाजवळच्या जाणार्‍या रस्त्यावरून चालायला सुरुवात केली.

राजा रायलू त्याच्या बाल्कनीत फेरफटका मारत होता तेव्हा त्याने तथाचार्यांना कोणालातरी खांद्यावर घेऊन जाताना पाहिले. राजाने ताबडतोब आपल्या सुरक्षारक्षकांना बोलावले. आणि खांद्यावर बसलेल्या माणसाला कोर्टात आणण्याचा आदेश दिला. त्या माणसाला मारायलाही सांगितले. सैनिकांनी लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे कृती केली.

तेनाली रामनला काय झाले ते समजले आणि तो तथाचार्यांच्या खांद्यावरून उतरला. त्यानंतर तेनाली रामनने तथाचार्यांना आपल्या खांद्यावर घेऊन जाण्याची विनंती केली. तथाचार्यांना संकोच वाटत असला तरी, तेनाली रामनने तथाचार्यांना खांद्यावर बसवायला पटवले.

रक्षक त्यांच्यासमोर हजर झाले आणि त्यांनी तथाचार्यांना जमिनीवर फेकले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी  त्यांना बेदम मारहाण केली आणि  दरबारात ओढून नेण्यास सुरुवात केली. जेव्हा सैनिकांनी तथाचार्यांना राजाच्या दरबारात आणले तेव्हा राजा संतापला. त्यांनी शिपायांना विचारले की त्यांनी तथाचार्यांना दरबारात का ओढत आणले आहे? सैनिकांनी राजाला सांगितले की ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेनाली रामनच्या खांद्यावर तथाचार्य बसले होते. दुसऱ्या माणसाच्या खांद्यावर बसलेल्या माणसाला घेऊन येण्याचा आदेश असल्याने फारसा विचार न करता तथाचार्यांना दरबारात खेचत आणले होते.

तथाचार्यांनी सगळे सांगायचे ठरवले तर आधीची सगळी गोष्ट सांगावी लागेल आणि ते त्यांचा सगळं दर्जा गमावून बसतील असे त्यांना वाटले. अत्यंत दुःखाने, थाथाचार्यांनी राजासमोर कबूल केले की ते तेनाली रामनच्या खांद्यावर बसले होते.

राजा रायलूला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला आणि त्यांनी रक्षकांना निघून जाण्यास सांगितले.

तेनाली रामनला आनंद झाला कारण त्याने तथाचार्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला होता.

बोध: दुसऱ्याच्या कर्तृत्वाचा मत्सर करू नका.

16. तेनाली रामन आणि मांजर

एके दिवशी, राजा श्री कृष्णदेवराय आपल्या दरबारात बसले होते तेव्हा त्यांना राजवाड्याच्या दाराबाहेर त्यांना गोंधळ ऐकू आला. राजाने आपल्या सुरक्षारक्षकांना काय झाले आहे हे पाहण्याची आज्ञा दिली. एका सुरक्षारक्षकाने एका माणसाला आत आणले. तो स्वतः गावप्रमुख असल्याचे सांगत होता. राजाने त्याला हे सगळे काय प्रकरण आहे असे विचारले. त्या माणसाने उत्तर दिले की गावात उंदरांचा सुळसुळाट झाला  आहे आणि उंदीर अन्नधान्य नष्ट करत आहेत तसेच अराजकता निर्माण करत आहेत. तो माणूस राजाकडे मदत मागायला आला होता.

राजाने गावप्रमुखाला आश्वासन दिले की तो आपल्या दरबारातील लोकांशी सल्लामसलत करेल आणि समस्येवर तोडगा काढेल.

राजा श्रीकृष्णदेवरायाने आपल्या मंत्र्यांना उंदरांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश दिले. एका मंत्र्याने सांगितले की, मांजरी उंदीर खातात, त्यामुळे गावातील प्रत्येक घरासाठी एक मांजर देऊन ते उंदरांच्या समस्येचे निराकरण करू शकतात.

मात्र, दुसऱ्या मंत्र्याने गरीब मांजरांना खायला कसे देणार, असा सवाल केला. त्याच मंत्र्याने मांजरांसोबत गावकऱ्यांना एक गाय देऊ शकता, जेणेकरून मांजरांचे चांगले पोषण होईल, असे सुचवले.

राजाने हा उपाय मान्य केला आणि गावकऱ्यांना मांजरी आणि गायी देण्यात आल्या. जसजसे दिवस जात होते तसतसे गावकऱ्यांनी मांजरींना दूध पाजले. त्यामुळे मांजरी निरोगी आणि आळशी झाल्या.

तेनाली रामनने हे पाहिले आणि हा उपाय काही बरोबर नाही असे त्याला वाटले.

दुसऱ्या दिवशी, तेनाली रामनने एका मांजरीसमोर दुधाची गरम वाटी ठेवली. मांजरीला दूध दिसल्याबरोबर तिने ते पिण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची जीभ पोळली. मांजर पळून गेली आणि पुन्हा दुधाला स्पर्श केला नाही. त्याच मांजरीने नंतर शिकार करायला सुरुवात केली आणि मालकाचे घर उंदरांपासून मुक्त झाले.

एके दिवशी, राजाला समस्येचा आढावा घ्यायचा होता आणि त्याने गावकऱ्यांना मांजरींना दरबारात आणण्याचा आदेश दिला. गावकऱ्यांनी तक्रार केली की त्यांच्या मांजरीने उंदरांची शिकार केली नाही आणि राजाला सांगितले की फक्त एका मालकाची मांजर शिकार करत आहे.

मांजरीला दूध पाजले का असे राजाने मांजरीच्या मालकाला विचारले. त्यावर मांजरीने दूध पिण्यास नकार दिला असे त्याने सांगितले. तेनाली रामनने राजासमोर तेच दाखवून दिले आणि नंतर समजावून सांगितले की त्याने त्याच्यासमोर गरम दुधाचे भांडे ठेवले होते. दुधाने त्याची जीभ पोळली आणि तेव्हापासून त्याने दूध पिणे बंद केले.

तू असे का केलेस असे राजाने तेनालीला विचारले. त्यावर तेनालीने उत्तर दिले की मांजर फक्त भूक लागल्यावरच उंदरांची शिकार करतात. ते दररोज दूध पीत असल्याने, मांजरी आळशी झाल्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी शिकार केली नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी मांजरीला गरम दूध दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजाला योजनेतील त्रुटी समजली आणि त्यांनी मंत्र्यांना समस्या सोडवण्यासाठी दुसरा उपाय शोधण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी रामनला बक्षीस दिले.

बोध: जरी सगळेजण करत असले तरीसुद्धा चूक ही चूकच असते.

17. वांग्याची भाजी

राजा श्रीकृष्णदेवराय यांची एक अतिशय खास बाग होती. तिथे त्यांनी विविध प्रकारची दुर्मिळ वांग्याची रोपे लावली होती. ही वांगी अतिशय चवदार म्हणून ओळखली जात होती आणि ती फक्त शाही बागेतच मिळत असत. त्यामुळे बागेला चोवीस तास पहारा होता.

एके दिवशी, राजाने आपल्या सर्व दरबारींसाठी जेवणाचे आयोजन केले आणि खास वांग्याची भाजी जेवणात दिली. तेनाली रामनने वांग्याच्या भाजीचा आस्वाद घेतला आणि त्याची चव विसरू शकला नाही. घरी आल्यावर तेनाली रामनने आपल्या पत्नीला खास वांग्याच्या भाजीबद्दल सांगितले आणि त्याच्या चवीचे कौतुक केले. त्यामुळे मोहात पडून, रामनच्या पत्नीने त्याला त्यातील काही वांगी घरी आणण्याची विनंती केली जेणेकरून ती वांग्याची भाजी घरी करू शकेल.

त्यावर रामन म्हणाला ही वांगी फक्त शाही बागेत आहेत आणि तिथे सुरक्षारक्षकांचा कडक पहारा आहे. मात्र, त्याच्या पत्नीने वांग्याच्या भाजीचा हट्ट धरला आणि त्याला ती वांगी आणण्याची विनंती केली. अनिच्छेने तेनाली रामनने होकार दिला.

एका रात्री, तेनाली राजाच्या शाही बागेत घुसला आणि त्याने काही वांगी तोडली. त्याची पत्नी वांगी पाहून आनंदित झाली आणि तिने वांगी शिजवली. मुलांनी सुद्धा ही भाजी खाऊन पाहावी असे तिला वाटले.

परंतु, मुलगा लहान आहे आणि कदाचित तो चवदार वांग्याच्या भाजीबद्दल कोणाजवळ तरी बोलेल त्यामुळे त्याला भाजी देऊ नकोस अशी पत्नीला ताकीद दिली. घरकाम उरकून छतावर झोपलेल्या आपल्या मुलाला भाजी दिल्याशिवाय तिचे मातृप्रेम तिला एकटीला जेवू देत नव्हते.

तेनाली रामनला ह्यावर उपाय सुचला.तो वरच्या मजल्यावर गेला आणि झोपलेल्या मुलावर पाण्याची बादली ओतली. जेव्हा मुलाला जाग आली तेव्हा रामनने त्याला सांगितले की बाहेर पाऊस पडत आहे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे. घरात आल्यावर आपल्या मुलाचे कपडे बदलले आणि त्याला वांग्याच्या भाजीसोबत भात दिला. त्याने पत्नीला हाक मारली, “बाहेर पाऊस पडत आहे;  मुलाला खोलीत झोपू द्या.”

दुसऱ्या दिवशी काही वांगी गायब असल्याचे बागेतील माळ्याच्या लक्षात आले आणि त्याने राजाला माहिती दिली. राजा संतापला आणि चोर कोण आहे हे शोधण्याचे आव्हान त्याने घेतले. मुख्य सल्लागार अप्पाजींना संशय आला की केवळ तेनाली रामनच असे कृत्य करू शकतो आणि त्याने आपल्या संशयाबद्दल राजाला सांगितले.

तेव्हा राजाने आपल्या रक्षकांना तेनालीला आपल्या दरबारात आणण्यास सांगितले. तेनाली दरबारात आणल्यावर राजाने त्याला हरवलेल्या वांग्याबद्दल विचारले. तेनाली रामन म्हणाला चोरीच्या वांग्यांबद्दल आपल्याला माहिती नाही. तेव्हा मुख्य सल्लागार अप्पाजींनी रामनच्या मुलाला कोर्टात हजर करण्याची सूचना केली. रक्षकांनी तेनाली रामनच्या मुलाला कोर्टात आणले. राजाने त्या मुलाला विचारले की आदल्या रात्री जेवायला काय होते. मुलाने उत्तर दिले की त्याच्याकडे वांग्याची भाजी होती आणि ती खूप चवदार होती. तेव्हा आप्पाजींनी तेनालीला आपला गुन्हा मान्य करण्यास सांगितले. परंतु, तेनाली म्हणाला त्याचा मुलगा कदाचित त्याला आलेल्या स्वप्नातील काहीतरी सांगत असेल.

त्यानंतर अप्पाजींनी तेनालीच्या मुलाला शाळेतून परतल्यानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टीचे वर्णन करण्यास सांगितले. मुलाने उत्तर दिले की शाळेतून परत आल्यानंतर तो खेळायला गेला, गृहपाठ केला आणि मग छतावर झोपला. त्याच्या वडिलांनी त्याला उठवले आणि पाऊस सुरू झाल्याने आत जाण्यास सांगितले. तो आत गेला, कपडे बदलले, रात्रीचे जेवण केले आणि नंतर घरात झोपला.

आदल्या रात्री पाऊस नसल्याने मुलाचे उत्तर ऐकून अप्पाजी गोंधळले. त्यामुळे त्या मुलाचे खरोखरच वांग्याची भाजी खाल्ल्याचे स्वप्न पडले असा सर्वांचा विश्वास होता. तेनालीची कोणतीही शिक्षा न होता सुटका झाली. मात्र, नंतर तेनालीने राजासमोर आपली चूक कबूल केली. त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाल्यामुळे राजाने त्याला क्षमा केली.

बोध: कधीही चोरी करू नये.

18. तेनाली रामा आणि शर्यतीमधील घोडा

एके दिवशी, एक अरबी घोड्यांचा व्यापारी उत्कृष्ट पर्शियन घोड्यांची जहाजे घेऊन विजयनगरला आला. घोडेप्रेमी असलेल्या राजाने असे अनेक घोडे व्यापाऱ्याकडून विकत घेतले. दरबारींनीही प्रत्येकी एक घोडा विकत घेतला.

हे सर्व होत असताना, तेनाली रामन शांत होता आणि त्याने अनास्था दाखवली. हे पाहून दरबारातील एकाने रामनला विचारले की तो इतका गप्प का आहे आणि तो घोडा का विकत घेत नाहीये.

त्यावर तेनालीने उत्तर दिले की विजयनगरचे घोडे पर्शियन घोड्यांपेक्षा श्रेष्ठ होते. हे ऐकून राजा आणि दरबारी आश्चर्यचकित झाले. राजाने तेनालीला  विचारले की त्याला ह्याबद्दल इतकी खात्री कशी आहे आणि तो सिद्ध करू शकतो का?

“नक्कीच, महाराज,” तेनाली उत्तरला.

त्यानंतर राजाने जाहीर केले की, विजयनगरातील तेनालीने प्रशिक्षित केलेला घोडा आणि बाकीच्या दरबारींनी प्रशिक्षित केलेले पर्शियन घोडे यांच्यात घोड्यांची शर्यत होईल. घोड्यांची कोणती जात श्रेष्ठ आहे हे या शर्यतीवरून ठरते.

दरबारी आपल्या घोड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि खाऊ घालण्यात खूप मेहनत घेत होते. शर्यतीच्या दिवशी घोडे रेस ट्रॅकवर रांगेत उभे होते. तेनालीने सुद्धा आपला घोडा आणला. हा घोडा अशक्त आणि कुपोषित दिसत होता. सर्वजण हसले आणि म्हणाले की तेनालीचा घोडा शर्यत हरेल. जेव्हा शर्यतीची वेळ आली तेव्हा तेनालीने घोड्यावर स्वार होण्याची घोषणा केली. मग त्याने एक लांब काठी घेतली आणि तिच्या टोकावर काही गवत बांधले. तेनाली घोड्यावर स्वार झाला आणि घोड्याच्या समोर काठीला धरले जेणेकरून घोडा गवत पाहू शकेल परंतु त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.

शर्यत सुरू झाली आणि सर्व घोडे वेगाने पळू लागले. तेनालीने घोड्यासमोर गवत झुलवले. भुकेलेला घोडा गवतासाठी धावला, पण कितीही वेगाने धावला तरी तो गवतापर्यंत पोहोचू शकला नाही. घोडा जमेल तितक्या वेगाने धावत राहिला आणि शेवटी तो पहिला आला. घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच आश्चर्य वाटले. राजाने तेनालीला विचारले की हे कसे केले? रामन हसला आणि म्हणाला की यशस्वी होण्याची भूक हीच गोष्ट कोणालाही यशस्वी होण्यास मदत करू शकते. तेनालीच्या म्हणण्याचा अर्थ राजाला समजला आणि त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल राजाने त्याला बक्षीस दिले.

बोध: यशस्वी होण्यासाठी नेहमीच तीव्र इच्छा किंवा भूक गरजेची असते.

19. स्वर्गाची किल्ली

विजयनगर शहरात एक महान ऋषी आल्याची चर्चा होती. ऋषींमध्ये जादुई शक्ती आहे अशीही अफवा होते आणि ती शक्ती वापरून ते कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतात. ऋषींना विविध स्वादिष्ट पदार्थ अर्पण करण्यासाठी शहरातील नागरिक दररोज मंदिराजवळ जमत असत.

तेनालीने ऋषीबद्दल ऐकले आणि स्वतः सत्य पाहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी, तेनाली मंदिरात गेला आणि ऋषींचे निरीक्षण करत असताना त्याने शिष्य असल्याचे भासवले. ऋषी एका झाडाखाली बसले होते, भगवे धोतर नेसले होते आणि लांब दाढी होती. रमणच्या लक्षात आले की ऋषी एक मंत्र जपत आहेत आणि तेनालीने तो मंत्र  लक्षपूर्वक ऐकला. ऋषींचे लक्षपूर्वक ऐकल्यावर त्यांना जाणवले की ऋषी फक्त एकच श्लोक पुन्हा पुन्हा सांगत आहेत. यावरून त्याला खात्री पटली की ऋषी एक भोंदू आहे.

तेनालीने हात पुढे केला आणि ऋषीच्या दाढीतून एक केस उपटला. तो केस हवेत धरून घोषित केले की ही स्वर्गाची किल्ली आहे. रमणच्या आजूबाजूचे लोक गोंधळून त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर ते म्हणाले की ऋषी इतके सामर्थ्यवान आहेत की जे कुणी हा केस आपल्याजवळ ठेवतील त्यांना मृत्यूनंतर त्याला थेट स्वर्गात पाठवले जाईल.

हे ऐकून इतर लोक ऋषींच्या दाढीतून केस काढण्यासाठी त्यांच्याकडे धावले. त्याच्याकडे गर्दी झालेली पाहून ऋषी पळून गेले आणि पुन्हा शहरात आले नाहीत.

लोकांना त्यांची चूक समजली आणि त्यांनी तेनालीने प्रबोधन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

बोध: यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. तुम्ही जे नाही ते होण्याचा प्रयत्न करू नका.

20. तेनालीरामन आणि पैलवान

तेनाली रामन आणि त्यांची पत्नी हंपीला जात असताना ते एका टेकडीच्या पायथ्याशी एका गावात थांबले. गावात प्रवेश करताच सर्व गावकरी मंदिराकडे धाव घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेनाली आणि  त्याच्या पत्नीला हा गोंधळ काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली. ते गावकऱ्यांच्या मागे गेले आणि लोकांचा एक मोठा गट उभा राहून जल्लोष करताना दिसला.

मेळाव्याच्या केंद्रस्थानी सहा फूट उंचीचा एक पैलवान होता. तो मध्यभागी उभा राहून त्याचे प्रचंड स्नायू वाकवून दाखवत होता आणि जमाव जल्लोष करत होता. त्याने  एक मोठी गोणी उचलली आणि त्याच्या स्नायूंच्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी त्याच्या खांद्यावर ठेवली. त्यानंतर तो जमावाभोवती फिरू लागला लागला.

एक वृद्ध म्हणाला की हा पैलवान खरोखरच शक्तिशाली आहे कारण तो 500 किलो तांदूळ वाहून नेऊ शकतो. त्यावर तेनाली म्हणाला हे तर काहीच नाही आणि मी हजारपट जास्त वजन उचलू शकतो. हे ऐकून पैलवानाने गोणी खाली टाकली आणि तेनालीकडे पाहिलं. जमावालाही धक्का बसला. संधी साधून रामनने सांगितले की कुणी खांद्यावर ठेऊन दिल्यास डोंगर खांद्यावर घेऊन जाऊ शकतो.

गावकऱ्यांना आता आणखी आश्चर्य वाटले. पैलवान मात्र हसू लागला. तेनाली काय करून दाखवू शकतो ते त्याने करून दाखवावे असे आव्हान पैलवानाने दिले. तेनालीने उत्तर दिले की,  मी करू शकतो, याचा अर्थ असा नाही की मी ते आत्ताच करून दाखवावे. त्याने पैलवानाला विचारले विचारले की ती गोणी  उचलण्यासाठी त्याला किती महिन्यांची तयारी करावी लागेल.पैलवानाच्या उत्तर दिले की, त्यासाठी त्याला तीन महिने लागले.

रामनने उत्तर दिले की त्याला डोंगर खांद्यावर घेऊन जाण्यासाठी सहा महिने लागतील आणि त्याच्या तयारीसाठी, त्याला भरपूर अन्न खावे लागेल आणि कोणीतरी दररोज त्याच्या शरीराची मालिश करावी लागेल.

गावच्या प्रमुखाने तेनाली आणि त्याच्या पत्नीला घर आणि त्याने मागितलेल्या सर्व गोष्टी देण्याचे मान्य केले. त्याने पैलवानाला रामनच्या शरीराची दररोज मालिश करण्याचे आव्हान दिले.

गावप्रमुखाने जाहीर केले की, सहा महिन्यांनंतर, ते सर्व रामनच्या पराक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी पुन्हा तेथे जमतील. त्या दिवसापासून, गावकऱ्यांनी तेनालीच्या आहाराच्या गरजा पूर्ण केल्या तर पैलवानाने  रामनच्या शरीराची मालिश केली.

शेवटी तो दिवस उजाडला आणि गावकरी तेनालीच्या पराक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी जमले. तेनाली आला आणि डोंगराच्या पायथ्याशी योद्धाच्या पोझमध्ये उभा राहिला आणि तो पराक्रमासाठी तयार असल्याची घोषणा त्याने केली. गावप्रमुखाने तेनालीला विचारले की” तू कशाची वाट पाहत आहेस?” त्यावर तेनालीने उत्तर दिले की तो डोंगर उचलून खांद्यावर ठेवण्याची वाट पाहत आहे.

यामुळे गावप्रमुख संतापला पण  तेनालीने त्याला काही बोलू दिले नाही. तेनालीने सांगितले की तो म्हणाला होता कि कोणीतरी खांद्यावर ठेऊन दिल्यास तो डोंगर घेऊन जाण्यास तयार आहे.

आश्चर्यचकित झालेल्या गावप्रमुखाने तेनालीला विचारले की “पण डोंगर कोण ठेऊन देणार?”  त्यावर रामनने उत्तर दिले की “ते तुम्ही ठरवायचे आहे”. काही वेळाने गावचा प्रमुख तेनालीकडे आला आणि म्हणाला की आपल्या बुद्धिमत्तेचा माणूस कैलास पर्वत देखील घेऊन जाऊ शकतो. त्याने तेनालीच्या त्याच्या बुद्धीला सलाम केला आणि इतर गावकऱ्यांनाही.

बोध: जलद विचार करण्याची क्षमता आणि बुद्धी असल्यास व्यक्ती कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकते.

तेनाली रामनच्या मराठीतील ह्या कथा अप्रतिम आहेत. ह्या कथा  शहाणपण आणि बुद्धिमत्ता दर्शवतात.  म्हणून, या कथा तुमच्या मुलांना सांगा आणि त्यांना तेनाली रामन सारख्या हुशार माणसाशी ओळख करून द्या.

आणखी वाचा:

मुलांसाठी उत्तम नैतिक लघुकथा
मुलांसाठी मराठीतून अकबर बिरबलाच्या गोष्टी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article