In this Article
तुमच्या बाळाचा पहिला दात पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. पण बाळासाठी दात येणे हा एक अस्वस्थ करणारा अनुभव असू शकतो. बाळाला दात येत असताना होणाऱ्या वेदना तो तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. लहान बाळांना दात येण्याची अनेक लक्षणे आहेत. जर तुमच्या बाळाला दात येत असतील आणि जुलाब होत असतील तर तुम्ही काय करू शकता हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
बाळाला दात येत असताना जुलाब का होतात?
बाळांना दात येत असताना जुलाब होतात असे अनेक पालकांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे बाळांना दात येण्याचा जुलाब होण्याशी संबंध आहे असे मानले जाते. परंतु दात येणे आणि अतिसार ह्यांचा संबंध असल्याचे समर्थन करणारा कोणताही पुरावा नाही. दात येत असताना लाळेचे प्रमाण वाढणे हे देखील अतिसाराचे कारण असू शकते. बाळाला दात येत असताना लाळ जास्त प्रमाणात तयार केली जाते . ह्या अवस्थेत लहान मुले भरपूर लाळ गिळू शकतात. त्यामुळे अतिसार होतो. परंतु, हे देखील जुलाबाचे नेमके कारण म्हणता येणार नाही.
दात येणे आणि जुलाब होणे ह्या दोन्ही क्रियांचा एकमेकींशी संबंध आहे असे ठामपणे मानले जाते. हा एक योगायोग आहे. छोट्या मुलांसाठी दात येत असतानाचा काळ खूप कठीण मानला जातो. बाळाच्या हिरड्या शिवशिवत असल्यामुळे बाळ वेगवेगळ्या वस्तू घेऊन तोंडात घालते आणि चघळते. ह्या वस्तू स्वच्छ नसतात आणि त्यांच्यावर इतर सूक्ष्मजंतू असू शकतात. बाळांची सापडेल ते सर्वकाही तोंडात टाकण्याची प्रवृत्ती असल्याने, जिवाणूंचा शिरकाव शरीरात होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे त्यांना अतिसार होऊ शकतो. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती देखील पूर्णपणे विकसित झालेली नसते. म्हणून बाळाचे शरीर जीवाणू आणि संक्रमणांशी लढू शकत नाही आणि परिणामी, बाळाला जुलाब होऊ शकतात.
हे सांगणे सोपे आणि समाधानकारक असले तरी सुद्धा बाळासाठी त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. बाळाच्या आयुष्यातील सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये बाळाला सतत संसर्ग होत असतो. बाळाची प्रतिकारशक्ती वाढेपर्यंत बाळ, पोटाचा संसर्ग, कानाचा संसर्ग अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गाचा सामना करत असते. बाळाला दात येताना होणारे जुलाब हे संसर्गाची लक्षणे लपवतात. अस्वच्छतेमुळे जुलाब होऊ शकतात. किंबहुना ते मोठ्या संसर्गाचे लक्षण असू शकते आणि त्यासाठी तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते.
दात येत असताना सुरु होणारा अतिसाराचा त्रास किती वेळ राहतो?
बाळाला दात येण्यास सुरुवात झाल्यावर जर जुलाब होत असतील तर योग्य काळजी घेतल्यास हा त्रास कमी होईल. परंतु, एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त काळ हा त्रास होत राहिल्यास किंवा दर महिन्याला त्याची पुनरावृत्ती होत असेल तर तुम्हाला बाळाची वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे.
बाळाला दात येत असताना जुलाब (अतिसार) होत असल्यास त्यासाठी काही टिप्स
तुमच्या बाळाला दात येत असताना अतिसाराचा त्रास होत असेल तर बाळासाठी तो खूपच अस्वस्थ करणारा असतो. परंतु त्यासाठी विशिष्ट उपचारांची गरज नसते. बाळाला बराच काळ जुलाब होत असतील आणि दिवसातून ५–६ वेळा बाळ शौचास करत असेल तर त्यासाठी काही टिप्स आम्ही खाली देत आहोत.
१. तुमच्या डॉक्टरांशी बोला
तुमच्या बाळाला दात येत असताना जुलाब होत असतील तर ताबडतोब तुमच्या बाळाच्या डॉक्टरांना ते निदर्शनास आणून द्या. अशीच लक्षणे असणारा इतर कुठला संसर्ग बाळाला झालेला नाही ना हे त्यामुळे लक्षात येईल आणि त्यानुसार बाळावर उपचार करता येऊ शकतील. काहीवेळा ह्या समस्येसाठी किंवा जिवाणूंचा सामना करण्यासाठी औषधांची शिफारस केली जाते. डॉक्टरांशी बोलणे अत्यंत महत्वाचे आहे कारण अतिसारामुळे बाळाचे निर्जलीकरण होण्याची शक्यता असते.
२. स्वच्छता राखा
दात येण्याच्या प्रक्रियेमुळे बाळाच्या हिरड्यांना प्रचंड त्रास होतो. बहुतेक बाळे दात येताना रडत असतात तर काही बाळे हातातल्या वस्तू दाताने चावून स्वतःला शांत करत असतात. ह्या वस्तू म्हणजे बाळाची खेळणी असू शकतात किंवा खास दात येतानाच्या समस्येसाठी असणाऱ्या दुकानातून आणलेल्या वस्तू असू शकतात. जर ह्या वस्तू वेळोवेळी स्वच्छ करून निर्जंतुक केल्या नाहीत तर शरीरामध्ये वेगवेगळ्या सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होण्याची शक्यता असते आणि संसर्ग होऊन बाळाचे आरोग्य बिघडू शकते.
३. तुमच्या मुलाच्या आहारावर लक्ष ठेवा
जर तुमच्या बाळास दात येताना जुलाब होत असतील, तर त्याच्या आहारात बदल केल्यास त्याच्या शरीराला काही महत्त्वाचे फायदे मिळू शकतात. स्तनपान किंवा फॉर्म्युला दुधाची वारंवारता वाढवून सुरुवात करा. त्याचे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्याला पुरेसे द्रवपदार्थ द्या. तुम्ही त्याला बटाटे, गाजर आणि केळ्याची प्युरी खायला देऊ शकता. तांदळाची पेज सुद्धा देऊ शकता. ह्या सर्व पदार्थांमुळे जुलाब नियंत्रणात राहू शकतात. तसेच, जर तुम्ही तुमच्या बाळाला गायीचे दूध किंवा ज्यूस देत असाल, तर अतिसारापासून आराम मिळेपर्यंत ते देणे तात्पुरते थांबवा.
वर नमूद केलेल्या टिप्ससह, तुम्ही बाळाला जुलाब होण्यापासून रोखू शकता. दात येणे ही बाळाच्या विकासादरम्यानची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्या कालावधीत बाळाला जुलाब होऊ शकतात. पण, काळजी करू नका, कारण तुमचे बाळ काही दिवसात बरे होईल. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आणखी वाचा:
बाळाला दात येतानाचा क्रम
बाळांना दात येतानाची लक्षणे आणि घरगुती उपाय