Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: १२वा आठवडा

गर्भधारणा: १२वा आठवडा

गर्भधारणा: १२वा आठवडा

पहिली तिमाही आता लवकरच संपणार आहे हे किती रोमांचक आहे ना मैत्रिणींनो! १२ वा आठवडा हा तुमच्या गर्भारपणाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे, तुम्ही आता ३ महिन्यांच्या गरोदर आहात. तुमच्यापैकी बऱ्याच जणींना संप्रेरकांची पातळी सामान्य झाल्याचे जाणवेल.

आणि हो, जर तुम्ही ही आनंदाची बातमी अजूनपर्यंत कुणाला सांगितली नसेल तर आता ती गोड़ बातमी सगळ्यांना सांगण्याची वेळ आली आहे. मागच्या दोन आठवड्यात तुमचे पोट अगदी कमी दिसत असले तरी तुमच्यापैकी काही जणींमध्ये मात्र पोटाचा गोल आकार दिसू लागेल.

गर्भारपणाच्या १२व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमच्या बाळाचे जननेंद्रिय आता दिसत असेल, संप्रेरकांच्या पातळी कशी आहे त्यानुसार ते अगदी सूक्ष्म दिसेल. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे बाळ वेगवेगळ्या हालचाली दाखवण्यास सुरुवात करेल उदा: तोंडात अंगठा घालणे. तुमच्या बाळाचे मूत्रपिंड कार्यरत होऊन मूत्र तयार होण्याची प्रक्रिया सुरु होईल. १२ व्या आठवड्याच्या शेवटी हातापायांच्या बोटांवर नखे दिसू लागतील.

बाळाचा आकार केवढा असतो?

बाळाचा आकार केवढा असतो?

बाळाची वाढ लक्षात आल्यावर १२ आठवड्यांच्या गरोदर असताना तुम्हाला बाळाचा आकार किती असेल ह्याविषयी उत्सुकता वाटणे साहजिक आहे.

१२ व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा आकार ऍप्रिकॉट इतका आहे. ह्याच्या अर्थ १२व्या आठवड्याच्या शेवटी २ इंच आकारापासून ३-३.५ इंच इतकी वाढ झाली आहे. तसेच बाळाचे वजन २८-२९ ग्रॅम्स इतके वाढले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या बाळाच्या शरीरात पचनसंस्था विकसित झाली आहे आणि अस्थिमज्जेने (bone marrow) पांढऱ्या पेशींच्या निर्मितीस सुरुवात केली आहे.

शरीरात होणारे बदल

सामान्यपणे आढळणारे बदल म्हणजे वजनामध्ये थोडी वाढ, म्हणजे साधारणपणे ५०० ग्रॅम्स किंवा १ किलो इतकी. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे गर्भाशयात सातत्याने वाढ होत आहे, तुमच्या ओटीपोटावरून तुमच्या डॉक्टरांच्या ते लगेच लक्षात येईल. तुमच्या शरीरावर गोलाई दिसू लागेल, जरी तुमचे पोट अगदी कमी  दिसत असले तरीहीसुद्धा तुमचे कपडे तुम्हाला घट्ट होतील.

१२व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

वेगाने वाढणारे बाळाचे आणि आईचे शरीर हे लक्षण तर आहेच, पण त्याच बरोबर १२ व्या आठवड्याच्या शेवटी आढळणारी इतर लक्षणे खालीलप्रमाणे.

  • त्वचेच्या रंगद्रव्यांमध्ये वाढ होते. संप्रेरकाच्या बदलांमुळे थोड्या काळासाठी त्वचेमधील मेलॅनिन वाढते.
  • स्तन हळुवार आणि दुखरे होतात कारण दूधनिर्मितीस ते तयार होत असतात.
  • रंगद्रव्यानमधील वाढीमुळे स्तनाग्रांभोवतीचा भाग गडद होतो.

ह्यांव्यतिरिक, जी लक्षणे तुम्ही अनुभवत आहात आणि तुम्हाला ज्या लक्षणांची आतापर्यंत सवय झालेली आहे ती खालीलप्रमाणे,

  • योनीमार्गातील स्त्राव: संसर्गापासून योनी सुरक्षित ठेवण्यासाठी योनीमार्गातील स्त्राव वाढतो.
  • डोकेदुखी: रक्तातील साखर कमी झाल्यामुळे बऱ्याच स्त्रियांना डोकेदुखीचा अनुभव येतो.
  • रक्ताचे हलके डाग: ह्याचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे रक्ताचे हलके डाग दिसले म्हणजे त्याचा अर्थ गर्भपात असा नव्हे. परंतु तरी सुद्धा तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास विसरू नका.
  • थकवा: चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे ही लक्षणे अचानक दिसू लागतात कारण बाळालासुद्धा रक्तपुरवठा होत असतो.

गर्भधारणेच्या १२ व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भधारणेच्या १२ व्या आठवड्यात पोटाचा आकार

१२ व्या आठवड्यापासून पोटाच्या आकारात वेगाने वाढ होते. जरी ते पूर्णतः दिसत नसले तरी आपल्या शरीराचे बहुतेक कपडे आपल्याला तंग होत असतील.

आत्ता पोट दिसत नसले तरीसुद्धा तुमचे ओटीपोट तुम्हाला गरोदरपरणाच्या आधीपेक्षा जड वाटेल.

गर्भधारणेच्या १२व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भधारणेच्या १२व्या आठवड्यातील सोनोग्राफी

थोडक्यात सांगायचे झाले तर बाळाचे सगळे अवयव योग्य जागी आहेत, म्हणजे इथूनपुढे फक्त त्यांची वाढ होणार आहे. ही वाढ होत असतानाच तुमच्या बाळाच्या ऊती (tissue) सुद्धा वाढणार आहेत.

बाळाचा मेंदू विकसित झाला आहे आणि येत्या काही आठवड्यात आणखी विकसित होणार आहे. तुमचे बाळ आता अंगठे वळवू शकते आणि काही बोटांच्या हालचालीसुद्धा करते, जसे की बोटे उघडणे आणि बंद करणे इत्यादी  आणि सर्वात महत्वाचे बाळ आता स्पर्शास प्रतिक्रिया देण्यास शिकले आहे उदा: पोटाला थोडेसे हलक्या हाताने मारल्यास बाळ प्रतिक्रिया देते, अर्थातच हे सोनोग्राफीमध्ये दिसते.

आहार कसा असावा?

हा प्रश्न तुम्हाला तुमच्या गर्भारपणात पुनःपुन्हा पडत असेल आणि गर्भारपणाच्या १२ व्या आठवड्यात काय खावे हा प्रश्न तुम्हाला त्रास देईल, परंतु काही हरकत नाही. तुम्ही चौरस आहार घेतला पाहिजे. खाली काही टिप्स आहेत ज्याची तुम्हाला मदत होईल.

  • व्हिटॅमिन आणि खनिजे असलेली फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा.
  • जंक फूड खाण्याचे टाळा आणि पोषक अन्नपदार्थ खा उदा: सुकामेवा, दही आणि सूर्यफुलाच्या बिया. हे अन्नपदार्थ पोषक आणि समाधानकारक आहेत तसेच हे खाल्ल्याने बराच वेळ तुम्हाला भूक लागणार नाही.
  • तुमच्या आहारात प्रथिनांचा समावेश करण्यास विसरू नका, उदा: चिकन आणि मासे. त्यामुळे बाळाची हाडे आणि स्नायू विकसित होण्यास मदत होईल.
  • कर्बोदके खा, ते तुमच्या बाळाच्या विकासासाठी जरुरीचे आहे.
  • खूप तंतुमय पदार्थ असलेले अन्न खा, त्यामुळे बद्धकोष्ठता होणार नाही. बाळ आणि तुम्ही अशा दोघांसाठी योग्य आहार घ्या.
  • तसेच खूप जास्त खाऊ नका म्हणजे वजन वाढणार नाही.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भारपणाची पहिली तिमाही पूर्ण करणे काहींसाठी खूप कठीण गेले असेल, परंतु आता मागे वळून पाहणे नाही. ह्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःला आणि तुमच्या बाळाला निरोगी आणि सुरक्षित ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या जीवनशैलीचा परिणाम तुमच्या बाळावर होणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.

हे करा

खाली काही गोष्टी दिल्या आहेत त्या गर्भारपणाच्या १२ व्या आठवड्यात करणे जरुरीचे आहे,

  • थोड्या थोड्या वेळाने थोडे खात राहा, त्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी नियमित राहील. परंतु खूप जास्त सुद्धा खाऊ नका.
  • तुमच्या दातांची काळजी घ्या, कारण तुमच्या संप्रेरकांमधील बदलांमुळे हिरडीमधून रक्त येऊ शकते.

हे करू नका

खाली काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या गर्भारपणात टाळल्या पाहिजेत,

  • धूम्रपान करू नका कारण त्यामुळे तुमच्या बाळास श्वसनाचे विकार होण्याची शक्यता बळावते.
  • मद्यपान करू नका कारण त्यामुळे बाळाच्या मेंदूच्या विकासावर आणि मेरुदंडाच्या पेशींच्या विकासावर परिणाम होतो.
  • खूप बारीक होण्याचे पर्याय निवडू नका त्यामुळे तुमच्या बाळाच्या विकासावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
  • जिथे हवा खेळती नाही,किंवा जिथे हवामान खूप गरम किंवा खूप गार असेल अशा ठिकाणी जाणे टाळा.
  • गरम टब टाळा कारण वाढलेल्या रक्तपुरवठ्यामुळे आणि संप्रेरकांमुळे शरीरास नीट घाम येत नाही, ह्याचा अर्थ असा की शरीरातून उष्णतेचा ऱ्हास योग्यरीत्या होत नाही आणि तापमान वाढल्याने त्याचा बाळावर  परिणाम होतो.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

पहिली तिमाही सम्पल्यानंतरची गर्भारपणासाठीची खरेदी ही पहिल्या दोन महिन्यांपेक्षा काही वेगळी नाही. परंतु चांगले शूज घेणे अतिशय गरजेचे आहे कारण, आरामदायी नसलेल्या बुटांमुळे त्रास होतो. शरीराच्या संतुलनास अडथळा निर्माण होतो किंवा पायाला पेटके येतात आणि पावलांना सूज येते.

तुम्ही पालकत्वाविषयीची काही पुस्तके विकत घेऊ शकता. ताणल्या जाऊ शकतील अशा ब्रा किंवा काही जणी नर्सिंग ब्रा सुद्धा आणून ठेवतात म्हणजे जेव्हा लागतील तेव्हा लगेच हाताशी असतात. आरोग्यपूर्ण आहार आणि नाश्त्याच्या गोष्टी आणून ठेवा. दातांची काळजी घेण्यासाठी योग्य उत्पादने आणून ठेवा. चांगली लोशन्स आणि मॉइश्चराझर्स खरेदी करा. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन्स आणून ठेवा ज्याची तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मदत होणार आहे.

१२ व्या महिन्याच्या शेवटी तुम्ही गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीत असता आणि डोकेदुखी आणि चक्कर येण्याने तुमचे नियमित काम अवघड वाटणार आहे. परंतु तुमचा मॉर्निंग सिकनेस बराच कमी झालेला असणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा सर्वात शेवटचा आठवडा आहे जो थोडा कठीण आहे, ह्या आठवड्यानंतर बरीचशी लक्षणे नाहीशी होणार आहेत.

मागील आठवडा: गर्भधारणा: ११वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: १३वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article