In this Article
- नको असलेल्या गर्भधारणेची कारणे
- पूर्वनियोजित नसलेल्या गर्भधारणेचे शारीरिक आणि भावनिक परिणाम
- नको असलेली गर्भधारणा थांबवणे
- प्रेरीत गर्भपात
- प्रेरित केलेल्या गर्भपाताशी संलग्न धोके
- नको असलेली गर्भधारणा कशी थांबवावी?
- नकळत राहिलेली गर्भधारणा पुढे चालू ठेवणे
- जन्मपूर्व तपासणी
- नको असलेली गर्भधारणा कशी टाळता येईल?
- अनियोजित गर्भधारणेचा सामना करणे
एखादे जोडपे गर्भधारणेसाठी खूप प्रयत्न करत असेल आणि त्यानंतर ते आई बाबा होणार आहेत असे त्यांना समजल्यास तो क्षण त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा असतो. परंतु गर्भधारणा जर पूर्वनियोजित नसेल (आणि नको असेल) तर गर्भधारणा झाल्यावर धक्का बसतो आणि अशा वेळी त्यासोबत येणाऱ्या भावना खूप वेगळ्या असतात. पूर्वनियोजित नसलेली गर्भधारणा हाताळताना भावनिक स्तरावर खूप भक्कम असले पाहिजे तसेच पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून स्त्रीला आधार, मदत मिळाली पाहिजे. नको असलेल्या गर्भधारणेची कारणे काय आहेत हे माहित करून घेण्यासाठी हा लेख वाचा म्हणजे तुम्ही ती परिस्थिती हाताळू शकता (किंवा कुणालातरी मदत करू शकता)
नको असलेल्या गर्भधारणेची कारणे
जर गर्भधारणेची योजना नसेल तर जोडपे बाळासाठी तयार नसते आणि बऱ्याच लोकांना त्यामुळे धक्का बसू शकतो. नको असलेली गर्भधारणा ‘क्षणाचा मोह‘ झाल्यामुळे, गर्भनिरोधकांचा चुकीचा वापर आणि इतर कारणांमुळे होते. ही कारणे थोडक्यात पाहुयात
- गर्भनिरोधकांचा चुकीचा वापर: जर तुम्ही किंवा पती गर्भनिरोधक वापरत असाल परंतु ते कसे वापरावे ह्याच्या सूचना नीट पाळत नसाल तर त्या चुकीची किंमत मोजावी लागते. जर गर्भनिरोधक गोळ्या हा संततिनियमनाचा पर्याय तुमची निवड असेल आणि एखादे दिवशी तुम्ही गोळी घेण्यास विसरलात तर त्यामुळे नको असलेली गर्भधारणा राहू शकते. दररोज ठराविक वेळेला गोळी घेणे हे महत्वाचे असते कारण त्यामुळे गर्भधारणेची शक्यता खूप कमी होते. जर तुम्ही सर्व्हायकल कॅप वापरत असाल आणि संभोगाआधी जर गर्भाशयाचे मुख नीट झाकले गेलेले नसेल तर ह्या चुकीचा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. काँडोम्स वापरणे ही संततिनियमनाची विश्वासार्ह पद्धत आहे परंतु तीसुद्धा नीट वापरली पाहिजे.
- सुरक्षित दिवसांची चुकीची गणना: प्रजननासाठी सर्वात योग्य दिवसांची गणना चुकीच्या पद्धतीने केल्यास पूर्वनियोजित नसलेली गर्घधारणा राहू शकते. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सुरक्षित दिवस कोणते हे तुम्हाला खात्रीशीररित्या माहिती असले पाहिजे.
- गर्भनिरोधक साधनांचा अनियमित वापर: काँडोम्स, सर्व्हायकल कॅप सारखी गर्भनिरोधक साधने संभोग करताना वापरली पाहिजेत. जर एखादी स्त्री गर्भनिरोधक गोळी घेण्यास विसरली तर गर्भधारणा राहू शकते.
- आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध नसणे: स्त्रियांमध्ये संततिनियमनासाठी आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या खूप प्रसिद्ध आहेत. तथापि, कधी कधी ह्या गोळ्या दुकानात उपलब्ध नसतात आणि काही वेळा त्यासाठी प्रिस्क्रिप्शन लागते. त्यामुळे त्या गोळ्या घेण्यासाठी उशीर होतो आणि गर्भधारणा राहण्याची शक्यता असते.
- ज्ञानाचा आभाव: स्त्रियांना बऱ्याचदा त्यांच्या शरीराविषयी जागरूकता नसते आणि कुठल्या लैंगिक क्रिडेमुळे गर्भधारणा राहील हे सुद्धा त्यांना माहिती नसते. जर लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान नसेल तर त्याचा परिणाम म्हणजे गर्भधारणेचे प्रमुख कारण असते विशेष करून किशोरवयात हे जास्त होते.
- गर्भनिरोधक नीट काम करत नाहीत: नको असलेल्या गर्भधारणेचे प्रमुख कारण म्हणजे गर्भनिरोधक साधनांचे अपयश हे होय. सर्वेक्षणाद्वारे असे निदर्शनास आले आहे की ५३% नको असलेल्या गर्भधारणा ह्या स्त्रियांनी गर्भनिरोधनाची साधने वापरून सुद्धा राहतात. हि समस्या सर्व वयोगटात आढळते. म्हणजेच किशोरवयीन स्त्रीपासून जास्त वय झालेल्या स्त्रीपर्यंत सगळ्यांच्यात ही समस्या आढळते.
पूर्वनियोजित नसलेल्या गर्भधारणेचे शारीरिक आणि भावनिक परिणाम
जर गर्भधारणा पूर्वनियोजित नसेल तर स्त्रीला भावनिक आणि शारीरिक स्तरावरील बदल हाताळावे लागतात. त्यामुळे स्त्रीच्या आरोग्यावर दूरगामी विपरीत परिणाम होतात. बऱ्याच जोडप्यांची गर्भधारणा राहिल्यास तयारी नसते आणि त्यांच्या सुनियोजित आयुष्यात बरीच उलथापालथ होते. बऱ्याच स्त्रिया मानसिकरीत्या त्यासाठी तयार नसल्याने त्यांना रात्र रात्र झोप लागत नाही, वाद होतात आणि भावनिक स्तरावर नाराजी निर्माण होते. पश्चातापाची भावना निर्माण होते तसेच औदासिन्यासारखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. गर्भधारणेविषयी नकारात्मक भावना आल्यास बाळाबरोबरच्या बंधावर खूप परिणाम होतो.
नको असलेली गर्भधारणा थांबवणे
जर तुम्ही आणि तुमच्या पतीने ही गर्भधारणा थांबवण्याचा निर्णय घेतला तर हा निर्णय दोघांचा आहे ह्याची खात्री करा आणि तो तुमच्यावर जबरदस्तीने लादला गेलेला नाही हे पहा. कुठलीही शंका किंवा अयोग्य निर्णयामुळे तुमच्या नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही गर्भधारणा थांबवण्याचा निर्णय घेतलात तर ह्या नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका कशी करून घ्यायची ह्याची तुम्हाला माहिती करून घ्यावीशी वाटेल. परंतु त्याआधी तुम्हाला शारीरिक आणि भावनिक बदलांना सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घ्या. शारीरिक त्रासासोबत,चिंता, अपराधीपणाची भावना आणि दुःख हे सर्वसामान्य परिणाम आहेत आणि बऱ्याच स्त्रियांना ते हाताळता येत नाहीत. तुम्हाला वाटणाऱ्या भीतीविषयी तुमच्या पतीशी किंवा मित्रमैत्रिणीशी मोकळेपणाने बोला आणि जरूर भासल्यास कौन्सेलर्सची मदत घ्या.
प्रेरीत गर्भपात
वैद्यकीय किंवा बाह्य हस्तक्षेपामुळे होणारे गर्भपात हे प्रेरित गर्भपात म्हणून ओळखले जातात. जर तुमची गर्भधारणा पूर्वनियोजित नसेल तर गर्भाशयाच्या पोकळीतून गर्भ काढून टाकण्यासाठी डिगोक्सीन किंवा पोटॅशिअम क्लोराईडचे इंजेक्शन दिले जाते. गर्भाला आच्छादित करणाऱ्या गर्भजल पिशवीमध्ये हे इंजेकशन दिले जाते. मिझोप्रोस्टोल सारखे प्रोस्टाग्लान्डिन गर्भाशयाचे मुख मऊ करण्यासाठी वापरले जाते. हे औषध योनीमार्गातून दिले जाते. कळा सुरु होण्यासाठी पिटोसीन किंवा ऑक्सिटोसिन ही औषधे आय. व्ही. मधून दिली जातात. गर्भपाताच्या ह्या पद्धती दुसऱ्या तिमाहीमध्ये गर्भपात करताना निवडल्या जातात.
प्रेरित केलेल्या गर्भपाताशी संलग्न धोके
गर्भजल पिशवीत वेगवेगळी औषधे दिली गेल्यामुळे प्रेरित गर्भपातामुळे खूप धोके निर्माण होतात आणि तुम्ही त्याविषयी जागरूक असले पाहिजे
- खूप जास्त रक्तस्त्राव
- इंजेक्शन पद्धत वापरल्यामुळे गर्भाशयाला हानी पोहचू शकते
- आतील अवयवांना संसर्ग होऊ शकतो
- खूप जास्त वेदना आणि नंतरचे दुखणे
- सलाईन आईच्या रक्तात मिसळू शकते आणि खूप धोकादायक होऊ शकते
नको असलेली गर्भधारणा कशी थांबवावी?
गर्भपात करण्यासाठी कुठली प्रकारची प्रक्रिया करावी हे सर्वस्वी त्या स्त्रीचे गर्भारपणाचे किती दिवस भरले आहेत ह्यावर अवलंबून असते. गर्भपाताच्या दोन पद्धती आहे आणि त्या म्हणजे औषधे देऊन गर्भपात आणि शस्त्रक्रिया करून केलेला गर्भपात. जर स्त्रीचे गर्भारपणाचे ९ आठवडे किंवा त्यापेक्षा कमी दिवस भरलेले असतील तर औषधे देऊन गर्भपात केला जातो. परंतु जर गर्भारपणाचे जास्त दिवस भरलेले असतील तर गर्भपातासाठी शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया करून केलेल्या गर्भपातामध्ये व्हॅक्युम ऍस्पिरेशन आणि शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. (गरोदरपणाच्या ८–१२ आठवड्यांसाठी). १५ आठवड्यांनंतर मधल्या तिमाहीचा गर्भपात असतो. २० आठवड्यांनंतर गर्भपात सामान्य नसतो आणि त्यास भारतामध्ये परवानगी नसते.
नकळत राहिलेली गर्भधारणा पुढे चालू ठेवणे
आपण नकळत झालेली गर्भधारणा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतल्यास काळजीपूर्वक विचार करण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत. बाळाला जन्म देणे आणि ह्या जगात नवीन आयुष्य आणणे हे बहुतेक स्त्रियांसाठी एक त्रासदायक भावना असू शकते. आपल्यावर येणाऱ्या मोठ्या जबाबदाऱ्यांबद्दल आपण चिंताग्रस्त व्हाल. अती ताण घेणे आणि परिस्थितीवर नकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देण्याने काही फायदा होणार नाही. याचा तुमच्यावर आणि बाळावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्याकडे भविष्याबद्दल विचार करण्यास आणि गर्भधारणेच्या प्रगतीप्रमाणे पालकत्वाची योजना आखण्यासाठी बराच वेळ असेल. डॉक्टरांना भेटून आपल्या गर्भधारणेविषयी जाणून घ्या. आपल्या जोडीदाराशी आपल्या भीती आणि चिंताबद्दल चर्चा करा जो या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आपल्या वित्तीय योजना करा आणि या गर्भधारणेमुळे आपल्या तात्काळ आणि भविष्यातील आर्थिक उद्दीष्टांवर काय परिणाम होईल ते तपासा.
जन्मपूर्व तपासणी
नकळत गर्भधारणेचा एक मुख्य दोष असा आहे की आपण गर्भधारणेच्या आधी आरोग्यविषयक जी काळजी घ्यावी लागते ती तुम्ही घेऊ शकला नाही. या कालावधीत, गर्भधारणा होण्यापूर्वी आईचे आरोग्य तपासले जाते आणि त्यांचे परीक्षण केले जाते. म्हणूनच, आपल्याला स्वतःची अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल कारण काळजी घेतल्यामुळे त्याचा थेट परिणाम गर्भधारणेवर होतो. जन्मपूर्व तपासणीमध्ये संतुलित पोशक आहार घेणे, मल्टी–व्हिटॅमिन घेणे, नियमित व्यायामाचे वेळापत्रक राखणे आणि तंबाखू आणि अल्कोहोल, ड्रग्जचे सेवन करणे टाळणे यासारख्या गोष्टींवर लक्ष ठेवले जाते. लैंगिक संबंधातून होणा–या रोगाच्या संसर्गाबाबतही आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि मधुमेह, उच्चरक्तदाब आणि लठ्ठपणा ह्यासारखे आजार दूर ठेवले पाहिजेत.
नको असलेली गर्भधारणा कशी टाळता येईल?
आपल्या सगळ्यांना आवडत नसलेली आश्चर्ये आवडत नाहीत जी आपल्या आयुष्यात अडथळा आणतात. आणि ह्या अश्या आश्चर्यांमध्ये नको असलेल्या गर्भधारणेचा क्रमांक सर्वात वरचा लागतो. जर तुम्हाला नको असलेली गर्भधारणा टाळायची असेल तर खालीलप्रकारे काळजी घ्या.
- जर तुम्ही अजूनही किशोरवयीन असाल तर, संभोग टाळा. तुम्ही जबाबदारी घेण्याइतपत परिपक्व होईपर्यंत वाट पहा
- जर तुम्हाला लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर, उपलब्ध असलेले गर्भनिरोधक साधनांचे सर्व पर्याय तयार ठेवा. शारीरिक संबंध ठेवताना प्रत्येक वेळेला तुमच्या पतीला कॉन्डोम वापरण्यास सांगा किंवा तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या वापरा
- जर संततिनियमनाची कुठली पद्दत वापरावी ह्याबाबत खात्री नसेल तर आपत्कालीन गर्भनिरोधक वापरा
- आपत्कालीन परिस्थितीमध्येच ह्या गोळ्या वापरायच्या आहेत. त्याची सवय लावून घेऊ नका नाहीतर तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होईल
अनियोजित गर्भधारणेचा सामना करणे
नियोजनबद्ध नसलेल्या गर्भधारणेमुळे आपले जीवन संपूर्ण विस्कळीत होऊ शकते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्यासाठी सगळेच मार्ग बंद होणार आहेत. जर आपण प्रारंभिक धक्क्यातून मुक्त होण्यासाठी स्वत: ला वेळ दिला तर आपण परिस्थितीचा सामना करू शकता. येथे काही मुद्धे दिलेले आहेत जे आपणास अशाच परिस्थितीत मदत करू शकतात
- घाबरू नका: लक्षात ठेवा नको असलेली गर्भधारणा हा जीवघेणा क्षण नाही. अर्थात ही आपत्कालीन परिस्थिती आहे परंतु आपण पहिल्यांदा घाबरून गेल्यास ती आणखी बिकट होऊ शकते.
- तर्कसंगतपणे विचार करा: अनियोजित गर्भधारणेचा सामना करावा लागतो तेव्हा दोघांच्या मनात अपराधीपणाची आणि लज्जेची पहिली भावना पहिल्यांदा येते. जर आपल्या जोडीदाराने जबाबदारी घेतली नाही तर तुम्हाला फसवल्या गेल्याची भावना वाटेल. तर्कशुद्धपणे विचार करणे आणि अपराधीपणा वाटून न घेणे हा त्यावरील उपाय आहे.
- त्यातून शिका: एकदा आपण या परिस्थितीचा अनुभव घेतल्यानंतर, आपल्यावर पुन्हा अशी वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक वेळी आपण संभोग करताना योग्य गर्भनिरोधक वापरा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार रहा.
- जबाबदारी घ्या: आपल्या कृतींसाठी जबाबदारी घ्या आणि त्यामुळे आपल्याला परिस्थिती अधिक चांगल्याप्रकारे नियंत्रणात आहे असे वाटेल.
नको असलेली गर्भधारणा म्हणजे दोघांसाठी परीक्षेचा काळ असू शकतो. बऱ्याच जणांसाठी जरी तो भावनिक दृष्ट्या आव्हानात्मक अनुभव असला तरीसुद्धा जर ही परिस्थिती परिपक्वतेने हाताळली तर तुमच्या साथीदारासोबत तुमचे नाते अधिक दृढ होते.
आणखी वाचा:
चुकलेल्या पाळीची कारणे आणि नकारात्मक गरोदर चाचणी
बाळाची निर्मिती कशी होते? – जाणून घेऊयात