In this Article
पाचवा महिना तुमच्या बाळासाठी खूप मोठ्या बदलांचा काळ आहे. बाळाने थोडी बडबड करण्यास सुरवात केली आहे आणि रांगण्यास सुरुवात करण्यासाठी ते तयार झाले आहे. तुम्ही बाळाला घ्यावे म्हणून बाळ दोन्ही हात तुमच्याकडे करेल. वयाच्या ५व्या महिन्यात तुमचे बाळ अनेक गोष्टी करेल ज्यामुळे तुम्ही अचंबित व्हाल.
५ महिन्याच्या बाळासाठी विकासाच्या टप्प्यांचा तक्ता
खाली दिलेला तक्ता, पार पडलेले आणि ह्यापुढे पार पडणारे विकासाचे टप्पे दर्शविते
पार पडलेले टप्पे | ह्या पुढील विकासाचे टप्पे |
आधार घेऊन बसते | आधाराशिवाय स्वतःचे स्वतः बसते |
आवाजाला प्रतिसाद देते | स्वतःचे नाव घेतल्यास प्रतिसाद देते |
ओळखीचे चेहरे ओळखते | ओळखीच्या लोकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करते |
स्थिर वस्तूंविषयी उत्सुक | हलणाऱ्या वस्तूंचा डोळ्याने मागोवा घेते |
पोटावर झोपवल्यास पाय ताणते | उभे धरल्यावर पायावर भर देते |
काही विशिष्ट आवाज काढते | पुनःपुन्हा एक विशिष्ट आवाज काढते |
पाठीवरून पोटावर पालथे पडते | पाठीवरून पोटावर आणि पुन्हा पाठीवर पालथे पडते |
काही मूलभूत अभिव्यक्तींद्वारे संवाद साधते | आवाजाबरोबर हावभाव वापरतात |
जीभ चवीला खूप संवेदनशील असते | ६ महिने वयानंतर काही विशिष्ट चवीना प्राधान्य देते |
मूलभूत करणे आणि परिणाम ह्याविषयी प्रयोग करते | कारणे आणि परिणाम ह्याचा वापर मोठ्या क्रिया करण्यासाठी करते |
५ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे कोणते?
५ महिन्यांच्या बाळासाठी खूप वेगवेगळे विकासाचे टप्पे आहेत
शारीरिक विकास/ हालचाल कौशल्य
- लांबच्या वस्तूंपर्यंत पोहोचणे: आधीपेक्षा तुमच्या बाळाची पकड घट्ट होईल. बाळ वस्तूपर्यंत पोहोचेल आणि वस्तू घेईल, बाळ स्वतःची दुधाची बाटली स्वतः पकडेल.
- उभे धरल्यास दोन्ही पायांवर भर देईल: बाळाला उभे धरल्यास बाळ पायावर भर देईल आणि पाय जमिनीवर घट्ट रोवेल. पायांना आराम मिळावा म्हणून मध्येच थोड्या उड्या मारेल आणि गुडघे सुद्धा थोडा वेळ लॉक करेल.
- दोन्ही बाजूला वळेल: ५व्या महिन्यापर्यंत पाठीवर झोपवल्यास बाळ पोटावर पालथे पडू लागेल आणि पोटावर झोपवल्यास पाठीवर पालथे पडेल.
- आधार घेऊन बसू लागेल: तुमचे ५ महिन्यांचे बाळ आधार घेऊन बसू लागेल आणि लवकरच आधाराशिवाय एकटे बसू लागेल
- दूरचे आणि रंगांविषयी बाळाची दृष्टी सुधारते: ५व्या महिन्यात तुमच्या बाळाची दूरची दृष्टी सुधारते आणि लवकरच एकाच रंगांच्या वेगवेगळ्या छटा बाळ ओळखू लागते.
- स्नायूंचे सुधारित समन्वय: पोटावर झोपवल्यास बाळ ढोपरांच्या साहायाने छाती वर उचलून घेते. बाळाची वस्तूंवरची पकड सुधारते, बाळ वस्तू पर्यंत पोहोचल्याचा प्रयत्न करते बोटे पसरवून वस्तू स्वतःकडे ओढते.
आकलनशक्ती विकासाचे टप्पे
- हलत्या वस्तूंचा मागोवा घेणे: ५व्या महिन्यात तुमचे बाळ हलणाऱ्या वस्तू आणि लोकांचा डोळ्याने मागोवा घेईल.
- अर्धवट लपवलेल्या गोष्टी शोधून काढते: जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा कापडामागे अर्धवट लपवता तेव्हा बाळ ते कापड ओढून तुम्ही आहात ना ते पहाते. तसेच बाळाला पीकबू हा खेळ खेळायला आवडते.
- ‘नाही’ म्हटलेले कळू लागते: तुमच्या ५ महिन्यांच्या बाळाला ‘नाही’ म्हंटलेले समजू लागते आणि त्याप्रमाणे ते प्रतिक्रिया देऊ लागते.
- कारणे आणि परिणाम: एखाद्या क्रियेचा परिणाम सारखाच आहे का हे पाहण्यासाठी बाळ एकच क्रिया अनेक वेळा करून पाहते, जेव्हा खुळखुळा आवाज करतो हे बाळाला समजते तेव्हा बाळ पुन्हा तो वाजवून पाहते कधी कधी काय होते हे पाहण्यासाठी बाळ खुळखुळा दुसऱ्या वस्तूवर सुद्धा आपटून पाहते.
- वस्तू आणि लोकांचे नीट निरीक्षण करते: बाळ वेगवेगळ्या वस्तू आणि लोकांकडे आकर्षित होते आणि त्यांचे नीट निरीक्षण करते.
- नवीन वस्तुंकडे अगदी लक्ष वेधून पाहते आणि आकर्षित होते: बाळ वेगवेगळ्या वस्तूंकडे आकर्षित होते आणि नवीन वस्तूंकडे बाळाचे लक्ष वेधले जाते.
- रात्रीचे खूप वेळ झोपते: तुमचे ५ महिन्यांचे बाळ विशेषकरून रात्री खूप वेळ झोपेल.
सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे
- लोकांच्या भावनांना प्रतिक्रिया देते: तुम्ही बाळाच्या पोटाला गुदगुल्या केल्या किंवा वेडीवाकडी तोंडे करून वेगवेगळे आवाज काढलेत तर बाळ हसू लागेल.
- तुमच्या आवाजातील चढ उतारावरून भावनांमधील फरक ओळखू शकेल: तुमच्या आवाजातील चढ उतारांवरून बाळ तुमच्या भावना ओळखू शकेल बाळाला तुमच्या वाढलेल्या आवाजावरुन काहीतरी चुकीचं घडलंय ह्याचा अंदाज येतो. तसेच तुम्ही हळू आवाजात बोलल्यास बाळ शांत होते.
- प्रतिबिंब बघण्यास आवडते: आरशात स्वतःची हलणारी प्रतिमा बाळाला बघायला आवडते.
- आनंदी असणे: ५ महिन्यांच्या बाळाची आनंद ही सर्वात पहिली भावना आहे.
- आई-बाबांसोबत खेळायला आवडते: पालकांसोबत खेळायला आवडते.
संवाद कौशल्य
- स्वतःच्या नावाला प्रतिसाद देते: ५ व्या महिन्यापर्यंत तुमच्या बाळाचे संवाद कौशल्य सुधारते. हाक मारल्यावर स्वतःचे नाव बाळ ओळखते आणि त्या दिशेने मान वळवते.
- आवाजाला आवाज काढून प्रतिसाद देते: जर तुम्ही बाळाशी बोललात तर बडबड करून बाळ प्रतिसाद देते. बाळ मध्येच मोठ्या आवाजात बोलू लागते जणू काही खरंच ते संवाद साधत आहे.
- आनंद आणि नाराजी आवाजातून दर्शवते: बाळाच्या आवाजातील बदल हे बाळाच्या भावना दर्शवतात. बाळ आनंद दर्शवण्यासाठी आनंदाने किंचाळते तर नाराजी रडून दर्शवते.
- शब्दांच्या साखळीने बडबड करणे: बाळ वेगवेगळ्या शब्दांची साखळी करते जसे की ‘ दा-दा-दा’ किंवा ‘मा-मा-मा’
संवेदना
- चवीची संवेदना वाढते – तोंडात जास्तीत जास्त मज्जातंतू असतात त्यामुळे तुमचे लहान बाळ वस्तू कशा आहेत हे समजण्यासाठी सगळ्या वस्तू तोंडात घालते. ५ व्या महिन्यात त्यांची चवीची संवेदना सुद्धा बदलते
- रंगांमधील फरक समजतो – बाळाला रंगांविषयी संपूर्ण समज येते आणि रंग आणि त्याच्या छटांमधील फरक बाळास कळू लागतो.
- ऐकण्याची संवेदना सुधारते – तुमचे ५ महिन्यांच्या बाळाचे ऐकणे सुधारते आणि आवाजाच्या दिशेने बाळ मान वळवू लागते.
- प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून पहाते आणि चव घेते: वयाच्या ५ व्या महिन्यात तुमचे बाळ सगळ्या गोष्टींना स्पर्श करू पाहिल, तसेच सगळ्या गोष्टी ओढून बघेल आणि सगळ्याची चव सुद्धा घेऊन बघेल. बाळाची सगळी खेळणी स्वच्छ, न तुटणारी असावीत. खेळण्यांचा आकार खूपही लहान नको कारण खेळणी घशात अडकण्याची शक्यता असते.
काळजी केव्हा करावी?
तुमच्या ५ महिन्यांच्या बाळामध्ये खालील गोष्टी आढळल्यास तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा:
- आवाजाला प्रतिसाद देत नसेल तर: जर बाळ आवाजाच्या दिशेने मान वळवत नसेल तर बाळाला ऐकण्याची समस्या आहे असे निर्देशित होते.
- हाताची पकड घट्ट नसणे: जर बाळ खूप ताठ/घट्ट असेल किंवा खूपच सैल असेल तर स्नायूंच्या विकासात काही बिघाड असण्याची शक्यता असते.
- आई- बाबांविषयी आपुलकी न वाटणे: असे असेल तर ते आकलन विकासास उशीर झाल्याचे निर्देशित करते अशा वेळी त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
- बाळ खूप शांत असेल आणि बडबड करत नसेल तर: बोलण्याच्या समस्येची ही सुरुवातीची काही लक्षणे असू शकतात.
- एकाच हाताचा वापर करणे: हे विकासामध्ये उशीर होत असल्याचे लक्षण आहे
- रात्रभर रडते आणि हसत नाही: हे विकासास उशीर होण्याचे लक्षण आहे आणि ते डॉक्टरांकडून ताबडतोब तपासून घेतले पाहिजे.
वयाच्या ५ व्या महिन्यात आपल्या बाळाला विकासाचे टप्पे गाठण्यासाठी मदत करण्यासाठी काही टिप्स
गेम्स खेळा आणि आपल्या बाळाशी बोला: ह्यामुळे बाळाची संवादकौशल्ये विकसित होण्यास मदत होते.
- बाळाला काही वेळ पोटावर झोपवा: बाळाला पोटावर झोपवल्याने बाळाची पाठ, मान, खांद्यांचे स्नायू मजबूत होतात कारण ढोपराच्या साहाय्याने बाळ डोके, मान उंचावते. ह्यामुळे बाळाची दृष्टी सुद्धा सुधारते कारण मान उंचावल्याने बाळाला लांबच्या वस्तू सुद्धा दिसतात.
- बाळापासून दूर बाळाची खेळणी ठेवा: त्यामुळे डोळे आणि हात ह्यांचा समन्वय वाढेल कारण बाळ लांबची खेळणी घेण्याचा प्रयत्न करेल.
- गडद रंगाची चित्रे असलेली पुस्तके वाचून दाखवा: ह्यामुळे तुमच्या ५ महिन्यांच्या बाळाची दृष्टी आणि संवाद कौशल्य वाढेल कारण गोष्ट ऐकताना बाळ गडद रंगांचा आनंद घेईल.
- तुमच्या बाळाला आवाज करणारी गडद रंगांची खेळणी द्या: ह्यामुळे तुमच्या बाळाची दृष्टी, आणि ऐकू येणे सुधारेल तसेच हातावर सुद्धा चांगले नियंत्रण येईल.
- संगीत लावा आणि बाळासाठी गाणे म्हणा: बाळ संगीताचा आनंद घेईल जेव्हा तुम्ही बाळासाठी गाणे म्हणाल तेव्हा बाळ टाळ्या वाजवेल, हसेल किंवा बडबड करेल.
- बाळाला नवीन लोकांना भेटवा: ह्यामुळे बाळाची आकलनकौशल्ये सुधारतील तसेच सामाजिक कौशल्यांमध्ये सुद्धा सुधारणा होईल.
लक्षात ठेवा प्रत्येक बाळ वेगळे आहे आणि प्रत्येक बाळाचा विकास विशिष्ट वेगाने होत असतो. दुसरे ५ महिन्यांचे बाळ एखादी गोष्ट करत असेल आणि तुमचे बाळ तीच गोष्ट करत नसेल तर काळजी करू नका. तुमच्या बाळाला जबरदस्तीने कुठलीही गोष्ट करायला लावू नका. संयम बाळगा आणि बाळाला विकासाचे टप्पे घाई न करता गाठू द्या. बाळाच्या प्रगतीवर लक्ष ठेवा आणि जर काही गंभीर समस्या असतील तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.