Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

पालकत्व हा एक आशीर्वाद आहे आणि ही भावना तुम्हाला अधिक स्पष्टपणे जाणवेल जेव्हा तुमचे बाळ वयाच्या ४ थ्या महिन्यात पदार्पण करेल! बाळाचं गोड हसू आणि निरागस बडबड तुमचं सारं जग सुंदर करून टाकेल. तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाच्या वाढ आणि विकासाविषयीच्या तपशीलवार माहितीसाठी हा लेख वाचा.

बाळाची वाढ

बाळाच्या वाढीच्या पहिल्या वर्षातील प्रत्येक महिना हा बाळाच्या वाढीसाठी महत्वाचा असतो कारण बाळाचा मेंदू आणि शरीर ह्या दोघांचीही वेगाने वाढ होत असते. जर तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाचे वजन किती असावे ह्याविषयी तुम्ही संभ्रमात असाल तर फक्त बाळाचे जन्माच्या वेळचे वजन दुप्पट करा आणि म्हणजे बाळाचे वजन नक्की किती असेल त्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. तथापि, तुमच्या बाळाच्या वजनातील वाढ, हा बाळाची वाढ मोजण्याचे एक परिमाण आहे. जर बाळाचा चेहरा, हात किंवा कुल्य्यांवर मांस नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

बाळाचा विकास

 • बाळ जेव्हा पहिल्यांदा ह्या बाहेरच्या जगात प्रवेश करते तेव्हा बाळाची दृष्टी तितकीशी विकसित झालेली नसते. ४थ्या महिन्यापर्यंत दृष्टी स्पष्ट होते विशेष करून बाळाला रंग समजू लागतात. तुम्ही बाळाला गडद रंगांचे कपडे किंवा खेळणी घेतलीत तर बाळाला ती आवडतील.
 • बाळाचा बोलण्याचा विचार केला तर तुम्हाला असे वाटेल की काहीच प्रगती नाही. परंतु तुम्ही नीट लक्ष दिलेत तर तुम्ही जे शब्द बोलता ते बाळ बोलण्याचा प्रयत्न करू लागेल.

१६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे बाळ स्वतःचे स्वतः काही आवाज काढू लागेल आणि त्यांना समजू सुद्धा लागेल. तुमचे बाळ मामा, दादा असे शब्द बोलू लागेल. ह्या शब्दांचा अर्थ बाळाला समजत नसतो. लक्षात ठेवा बाळाची नक्कल करण्याची क्षमता वाढत आहे आणि बाळ तुमच्या शब्दांची तसेच हालचालींची नक्कल करू लागेल.

१७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

१७ व्या आठवड्यापर्यंत तुमच्या बाळाचे वजन दुप्पट झालेले असेल आणि बाळाचे पोट सुद्धा मोठे झालेले असेल. तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल तर दिवसाला ६८ वेळा दूध देणें पुरेसे आहे किंवा जर घनपदार्थ देत असाल तर ५६ वेळा दूध द्या. तथापि, बाळाचे लक्ष वेधून घेणारे आवाज आणि इतर गोष्टी सुद्धा असतील. आता बाळ स्वतःच्या हाताशी आणि पायांशी खेळू लागेल आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी घेण्यासाठी त्यांचा वापर करू लागेल. आणि आधीपेक्षा जास्त वेळ एकटेच खेळू लागेल.

१८ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे बाळ आता हसू लागेल. परंतु रडणे हे बाळाचे संवादाचे प्राथमिक माध्यम अजूनही असेल. काही मजेशीर चेहरे, आवाज किंवा पिकाबू सारख्या खेळांद्वारे बाळ उत्साही राहील आणि आजूबाजूला सुद्धा हास्य पसरवेल. बाळाला आता वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला आवडू लागेल आणि वेगवेगळ्या गोष्टींशी खेळणे आवडू लागेल. कापडाचा तुकडा किंवा खुळखुळा किंवा पाळण्यावर टांगलेली घंटा अशा गोष्टींशी खेळायला बाळाला आवडू लागेल. बाळाला रंगांमधील फरक समजू लागेल आणि रंगीबेरंगी कपडे, खेळणी आणि पुस्तकांमध्ये बाळाला जास्त रस निर्माण होईल.

१९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या छोट्या गोंडस बाळाचा पाठीचा मणका आता सरळ होत आहे आणि भोवतालच्या स्नायूंचा त्यास आधार मिळत आहे. त्यामुळे बाळाला आता मान धरता येऊ लागेल आणि जेव्हा तुम्हीं बाळाला घ्याल तेव्हा बाळाला हात उचलता येऊ लागतील. बाळाची शब्दसंपदा सुद्धा आता वाढू लागेल, त्यामुळे तुम्ही बाळाची बडबड ऐकण्यास तयार रहा. तुम्ही बाळाचा दिनक्रम अशा पद्धतीने तयार करा की झोपेसाठी तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. बाळाला भरवणे, अंघोळ घालणे, बाळासाठी गोष्टीचे पुस्तक वाचणे किंवा बाळासाठी अंगाईगीत गाणे ह्यामुळे बाळाला चांगली झोप लागेल आणि तुम्हाला सुद्धा चांगली झोप मिळेल.

बाळाचे आरोग्य

तुमचे बाळ आता ४ महिन्यांच्या लसीकरणासाठी तयार आहे. तसेच आधीच्या लसीकरणाची काही प्रतिक्रिया आली असेल तर तसेही तुम्ही डॉक्टरांना सांगणे जरुरीचे आहे. बाळाला ऍलर्जी होण्याची खूप शक्यता असते आणि त्यामुळे घनपदार्थ देण्याआधी बाळाला काही ऍलर्जी तर नाही ना ह्याची काळजी घेतली पाहिजे. स्तनपान किंवा फॉर्मुला दूध हे बाळाचे प्राथमिक अन्न आहे आणि हळू हळू बाळाला घनपदार्थांची ओळख होऊ द्या. बाळाची त्वचा जितकी कोरडी ठेवता येईल तितकी ठेऊन बाळाला नॅपी रॅश तर होणार नाही ना ह्याची काळजी घ्या. बाळाची नॅपी बदलताना कोमट पाण्याचा वापर करा.

बाळाच्या विकासाचे टप्पे ४ महिने

४ थ्या महिन्यात तुमचे बाळ खालील विकासाचे टप्पे पार करेल.

 • काळजी आणि प्रेम ह्यांना प्रतिसाद: जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला प्रेम द्याल तुमचे बाळ आनंदाने तुमच्याकडे बघून हसेल. तुमच्या बाळाला आता पापी घेतलेली समजेल आणि ते प्रेम दर्शवण्याचे एक माध्यम आहे हे सुद्धा बाळाला कळेल आणि बाळ सुद्धा तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल. तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाला आता आईवडिलांचे आणि भावंडांचे प्रेम समजेल.
 • बाळाची स्मरणशक्ती सुधारेल: बाळ आता४ थ्या महिन्यात बऱ्याचशा गोष्टी ओळखू लागेल आणि विशिष्ट खेळणी आणि लोकांना सुद्धा ओळखू लागेल. बाळ त्याला आवडत्या आणि नावडत्या गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने दर्शवू लागेल. उदाहरणार्थ बाळाला आजोबा जास्त आवडतील आणि काकी कडे जाण्यास ते नकार देईल. बऱ्याचशा खेळण्यांमधून त्याचे आवडते खेळणे किंवा गडद रंगाचा चेंडू निवडेल.
 • भावना दर्शवेल: तुमच्या बाळाला प्रेम समजेल आणि चौथ्या महिन्यात बाळ जेव्हा दुःखी असेल तेव्हा दुःख सुद्धा दर्शवू शकेल. जेव्हा तुम्ही आजूबाजूला नसाल किंवा तुम्ही बाळ असलेल्या खोलीतून बाहेर जात असाल तेव्हा बाळ रडू लागेल. आणि तुम्ही बाळाच्या जवळ गेल्यावर बाळ रडायचे थांबेल. बाळाचे भूक लागली असताना रडणे आणि दुःखी असतानाचे रडणे ह्यातील फरक आपल्याला ओळखू येऊ लागेल.
 • मान धरू लागेल: जेव्हा तुम्ही बाळाला कडेवर घ्याल तेव्हा बाळ कुठल्याही आधाराशिवाय मान धरू लागेल. बाळाचे मानेकडचे स्नायू खूप बळकट झालेले असतात आणि त्यामुळे बाळ नैसर्गिकरित्या हालचाल करू लागते. तसेच बाळाला आडवे धरल्यावर डोके कसे ठेवावे हे सुद्धा बाळाला समजू लागते.
 • स्नायू बळकट होतात: जेव्हा तुम्ही बाळाला पोटावर झोपवता तेव्हा बाळ ढोपराच्या साह्याने पुढे सरकू लागेल. बाळाच्या हाताचे, पाठीचे आणि खांद्यांचे स्नायू बळकट होऊ लागतील आणि त्यामुळे बाळाला पुढे सरकण्यास मदत होईल.
 • बाळ पालथे पडू लागेल: बाळाच्या हालचालींमध्ये वाढ झालेली असल्याने बाळ पोटावरून पाठीवर पालथे पडू लागेल. बाळाच्या शारीरिक हालचालींमध्ये हा टप्पा महत्वाचा आहे आणि खांदा व पाठीच्या भागातील स्नायू मजबूत झाल्यामुळे हे शक्य होते.
 • बाळ हसू लागेल: ४ थ्या महिन्यात बाळ हसू लागेल आणि हातापायांच्या हालचाली सुद्धा करू लागेल. एखादा आवाज किंवा अचानक झालेली हालचाल ह्यामुळे बाळाला हसू येईल आणि बाळ जोरजोरात हसू लागेल.

वर्तणूक

४ थ्या महिन्यापर्यंत तुमच्या बाळाचा तुमच्याशी आणि घरातील इतर सदस्यांशी अनुबंध तयार होईल. तुमचे बाळ तुम्हाला जसे प्रतिसाद देते तसे घरातील इतर भावंडाना सुद्धा देऊ लागेल. बाळाला एखादी गोष्ट हवी असेल तर कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हे बाळाला समजू लागेल. बाळाला टीव्ही आणि इतर माध्यमांपासून दूर ठेवले पाहिजे कारण बाळाला अशा गोष्टींची गरज नसते. तुम्ही आणि कुटुंबातील इतर सदस्य बाळाच्या मेंदूला उत्तेजना पुरवण्यासाठी पुरेसे आहात.

४ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

४ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

तुमच्या बाळासाठी खालील पैकी कुठल्याही क्रियांची निवड करा जेणेकरून बाळ व्यस्त राहील. ह्या क्रिया बाळाला स्वतःला व्यस्त ठेवण्यास मदत करतील त्यामुळे तुम्हाला सुद्धा थोडा वेळ मिळेल.

. बाळाच्या छातीवर एखादे मऊ खेळणे ठेवा आणि बाळ त्यास कसा प्रतिसाद देते ते पहा. हे खेळणे बराच काळ लक्ष वेधून घेईल, काही वेळा ते खेळणे खाली पडेल. तुम्ही बाळाच्या जवळच थांबा आणि खेळणे पुन्हा तसेच ठेवा.

. बाळाला रंगीबेरंगी मोजे घाला किंवा खुळखुळा बांधा. बाळाच्या कुल्ल्यांखाली नॅपकिन किंवा टॉवेलची गुंडाळी करून ठेवा त्यामुळे बाळाला स्वतःचे पाय सहजपणे दिसतील.

. बाळासाठी वाचण्याने बाळाचे आकलन कौशल्य सुधारते. ज्या पुस्तकांमध्ये खूप चित्रे आहेत अशी पुस्तके बाळासाठी आणा.

. जेव्हा तुमचे बाळ जागे असते तेव्हा ते सतत हात पाय हलवत असते. आपण पाठीवर झोपून त्याला उचलून अतिरिक्त कसरत करा. सभोवताली खेळणी असू द्या जेणेकरून तो स्वत: ला वेगवेगळ्या दिशेने वळवू शकेल.

. बाळाला चेंडू चे प्रचंड आकर्षण असते आणि बाळ पालथे पडून चेंडूचे निरीक्षण करत बसते. चेंडू थोडा उडवा आणि बाळाभोवती फिरवा. भिंतीवर हळूवारपणे चेंडूचे टप्पे मारा ज्यामुळे आपल्या बाळाला चेंडू काय करू शकते हे समजू शकेल.

४ महिन्यांच्या बाळाची काळजी

तुमचे बाळ आता ४ महिन्यांचे झाले आहे आणि ते आजूबाजूला पाय मारण्यास शिकले आहे. त्यामुळे काही सुरक्षिततेच्या बाबींकडे आता लक्ष दिले पाहिजे. बाळ जिथे असते ती संपूर्ण जागा निर्जंतुक केली आहे ह्याची खात्री करा तसेच काही अडथळे असतील तर ते बाजूला करा. धूळ सगळीकडे असते त्यामुळे तुम्ही बाळाचा बिछाना आणि खेळणी नियमितपणे स्वच्छ करा आणि पुसून घ्या. बाळाच्या झोपेच्या वेळा ठरलेल्या असतील तर बाळाला झोपवण्यासाठी बळेच भरवू नका किंवा पाळण्यात हलवू नका. त्यांना स्वतःचे स्वतः झोपण्यास शिकवा.

बाळाला भरवणे

तुमचे बाळ ४ महिन्यांचे झाल्यावर बाळाला भरवण्याची प्रक्रिया अजून कार्यक्षम होते. तुमच्या बाळाचे दूध पिण्याचे कौशल्य आता जास्त विकसित झाले आहे कारण बाळाच्या स्तनांना तोंड लावून दूध ओढण्याच्या क्रियेबाबत तुम्ही निश्चित असता. दूध पाजण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे आता पूर्णपणे बंद झाले असतील. तुमच्या बाळाचा विकास आणि पोषणाच्या गरज ह्या स्तनपान किंवा बाटलीतील दुधाद्वारे भागवल्या जातील. तुम्ही बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर बाळाला घनपदार्थांची ओळख करून देऊ शकता जेव्हा बाळाची पचनसंस्था मजबूत झालेली असेल आणि ऍलर्जीचा सुद्धा काही धोका नसेल.

बाळाची झोप

बाळाची झोप

तुमच्या बाळाच्या झोपेच्या वेळा आता पर्यंत निश्चित झालेल्या असतील त्यामध्ये बाळ दुपारी थोड्या कालावधीसाठी आणि रात्री सलग काही तास झोपू लागेल. तुम्हाला असे वाटू शकेल की जर बाळ दुपारी झोपले नाही तर पूर्ण रात्रभर ते छान झोपेल. तथापि, दुपारच्या झोपेमुळे रात्रीची सुद्धा झोप छान लागते आणि त्यामुळे बाळाच्या झोपेचे रुटीन छान लागते. ह्या टप्प्यावर तुम्ही बाळाला बळेच झोपवण्याचा प्रयत्न केल्यास बाळ त्यास प्रतिकार करू शकते आणि हे तुमच्यासाठी नवीन असेल. परंतु तुम्ही प्रयत्न करीत रहा आणि बाळाला झोपवण्यासाठी जे काही करत होतात ते करत रहा.

पालकांसाठी काही टिप्स

पालकांसाठी काही टिप्स

पालकांच्या काही टिपा येथे आहेत ज्या चार महिन्यांच्या मुलाचे पालनपोषण करण्याचा अनुभव वाढविण्यास मदत करतील:

 • बाळाला तुमच्या मांडीवर घ्या आणि बाळासाठी वाचायचे पुस्तक समोर धरा. गडद रंगाचे पुस्तक सर्वात चांगले कारण त्यामुळे बाळ त्या रंगांकडे आकर्षित होऊन बाळाला रस निर्माण होईल आणि त्यामुळे बाळाची दृष्टी सुधारण्यास मदत होईल.
 • बाळ बघत असलेली प्रत्येक गोष्ट, व्यक्ती ह्यांना नावाने संबोधावे. बाळाचे बाबा घरी आल्यावर बाबांना Hi म्हण!’ असे सांगावे किंवा एखाद्या खेळ्ण्याशी बाळाची ओळख करून देताना हे बघ चेंडू!’ असे म्हणावे. एखाद्या वस्तूचे नाव किंवा नवीन शब्दांची ओळख बाळाला करून देण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे.
 • जरी बाळाला त्याचा अर्थ समजला नाही तरी तुमच्या बाळाशी जितके जास्त बोलता येईल तितके बोला. अशा तऱ्हेने बाळ नवीन शब्द शिकेल.
 • तुमच्या बाळाला पोटावर झोपण्यास प्रोत्साहित करा आणि आवडती खेळणी स्वतःची स्वतः घेऊ द्यात. त्यामुळे बाळाचा व्यायाम होईल आणि पाठीचे आणि मानेचे स्नायू विकसित होतील. बाळाच्या दृष्टीक्षेपात खेळणी ठेवा त्यामुळे बाळ मान आणि डोके वळवून त्यांचा मागोवा घेऊ शकेल.
 • बाळाला हालचालींवर नियंत्रण मिळवण्यास मदत करण्यासाठी काही क्रियाकलाप करा ज्यामुळे बाळाच्या हाताच्या आणि ढोपराच्या सांध्यांच्या हालचाली होतील. बाळासाठी कविता किंवा गाणे म्हणताना बाळाचे हात धरा आणि ते एकमेकांपासून दूर न्या. तुम्ही एखादे खेळणे धरून ते बाळाला घेण्यासाठी सांगू शकता.

प्रत्येक बाळ हे एकमेवाद्वितीय असते आणि प्रत्येक बाळाच्या शरीराची ठेवण किंवा वाढ वेगवेगळी असते. काळजी करू नका योग्य वेळ आली की बाळ बरोबर योग्य ते टप्पे गाठेल. उदा: अकाली जन्मलेली बाळांना टप्पे गाठण्यासाठी वेळ लागू शकतो. तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि तुमच्या चार महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या दृष्टीने काय आवश्यक आहे हे समजून घ्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article