Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे १९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

जेव्हा तुमचे लहान बाळ वयाचे पाच महिने किंवा १९ आठवड्यांपर्यंत पोहोचते तेव्हा ते एक लहान व्यक्ती बनण्याच्या उंबरठ्यावर असते आणि त्यास त्याच्या सभोवतालची जाणीव जास्त असते. तो जास्तीत जास्त वेळ खाणे, झोपणे आणि शी शू करण्यात घालवत नाही उलट तो प्रत्येक दिवसागणिक काहीतरी शिकत असतो. पुढील लेखात आपल्या १९ आठवड्यांच्या बाळाकडून काय अपेक्षित करू शकता ह्याची माहिती घेऊया.

१९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

१९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांत आपल्या बाळामध्ये वेगाने बदल होताना दिसू शकतील. पहिल्या काही महिन्यांत बाळांचा विकास खरोखरच वेगाने होतो. बाळाचा मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे वेगवान वाढ आणि विकास झालेला तुमच्या लक्षात येऊ शकतो. तथापि, सर्व बाळे वेगळ्या वेगाने वाढतात आणि तुमचे बाळ इतर बाळांच्या तुलनेत विकासाचे टप्पे वेगाने किंवा सावकाश गाठत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

१९ आठवड्यांच्या आसपास, तुमच्या बाळाचे वजन अंदाजे १४ ते १५ पौंड असू शकते आणि उंची सुमारे २४ ते २५ इंच असू शकते. गेल्या आठवड्यांपेक्षा तुमचे बाळ जास्त सक्रिय आहे आणि कदाचित तो पुढे मागे फिरेल आणि पालथा पडेल. बाळाने हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला विकसित केला आहे आणि त्यामुळे तो आपल्या पायाची बोटं धरुन ठेवतो आहे आणि ती तोंडात घालू शकतो. तो जवळपास इतर वस्तू आणि खेळणी देखील तोंडात घालू शकतो.

१९ आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

१९ आठवड्यांचे झाल्यावर तुमचे बाळ खालील विकासाचे टप्पे गाठू शकेल

  • आपले बाळ कदाचित लोकांना ओळखण्यास सुरवात करेल आणि ओळखीचे चेहरे किंवा नियमित दिसणाऱ्या लोकांसोबत हसू शकेल
  • आपले बाळ अनोळखी लोकांसोबत चिडचिड करू शकते आणि कदाचित खूप रडू सुद्धा शकते
  • बाळ त्याच्या ओळखीच्या किंवा ज्यांच्यासोबत आरामदायक वाटते अशा लोकांसोबतच आरामदायक असते असे ह्याद्वारे सूचित होते
  • तुम्ही बाळासाठी गाणे गायल्यास, त्याला एखादी गोष्ट सांगितल्यास किंवा नुसते एखादे गाणे गुणगुणल्यास बाळाला आनंद होईल. त्याला कदाचित हे समजत नसेल, परंतु ह्या सर्व क्रियाकलापांचा तो आनंद घेऊ शकेल. तुम्ही तुमच्या बाळासोबत पिकाबू सारखे खेळ खेळू शकता. तुमच्या बाळाला या वयातील क्रियाकलाप आणि खेळांमध्ये व्यस्त राहण्यास आवडते
  • तुमच्या बाळाच्या पायाचे स्नायू अधिक मजबूत होत आहेत आणि तुम्ही जेव्हा त्याचा हात धरता तेव्हा उभे राहण्यासाठी त्याचे प्रयत्न तुमच्या लक्षात येतील. पाय मजबूत करण्यासाठी या टप्प्यावर त्याला हलका मसाज देणे आणि हलक्या व्यायामांमध्ये व्यस्त ठेवणे चांगले आहे.

आपले बाळ थोडा वेळ झोप काढेल आणि कदाचित तो सक्रिय राहण्यासाठी जास्त वेळ घालवू शकेल.या काळात तुमचे बाळ सामान्यपणे कुठले विकासाचे टप्पे गाठू शकेल ह्याबाबत ह्यापूर्वीच चर्चा केली गेलेली आहे परंतु बाळाने त्याप्रमाणे विकासात प्रगती केली नाही तर घाबरू नका, प्रत्येक बाळ हे एकमेवाद्वितीय आणि वेगळे असते आणि पालक म्हणून वस्तुस्थिती जाणून घेणे आणि त्यांचे कौतुक करणे खूप महत्वाचे आहे.

दूध देणे

या वयात बहुतेक बाळे केवळ स्तनपान घेतात, परंतु कधीकधी स्तनपान घेताना बाळ चिडचिड करते किंवा दूध पिण्यास नकार देते. बऱ्याच वेळा दुधाचा पुरवठा पुरेसा नसल्यामुळे असे होते परंतु बाळामध्ये होत असलेल्या विकासात्मक बदलांमुळे सुद्धा तसे होऊ शकते. बाळाची सभोवतालची जाणीव वाढलेली असल्याने तो सहज विचलित होऊ शकतो आणि त्यामुळे बाळ चिडचिडे होऊ शकते. रात्रीपेक्षा दिवसा दूध पाजताना असे जास्त होताना दिसते. तुमचे बाळ दूध पिण्याची तीव्र इच्छा दर्शवू शकते थोड्या वेळासाठी तो स्तनांना लॅच होतो आणि पुन्हा निराश आणि चिडचिड करतो. आपल्या बाळाच्या या अनियमित वर्तनाचा अर्थ असा नाही की आपल्या दुधाचा पुरवठा कमी झाला आहे आणि तुम्ही लगेच फॉर्मुला किंवा घनपदार्थाची सुरुवात केली पाहिजे. तुमचे बाळ कदाचित वाढ आणि विकासाच्या प्रक्रियेने विचलित झाले आहे आणि त्यामुळे त्याला शांत होण्यास थोडा वेळ लागू शकतो.

आई म्हणून तुम्ही करू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या बाळास शांत करणे. जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजण्याची तयारी करता तेव्हा तो विचलित होणार नाही याची खात्री करुन घ्या. एक आरामदायक वातावरण तयार करा आणि दूध पाजण्याचा प्रयत्न करा. आईसाठीही हा टप्पा खूपच त्रासदायक असला तरीही चांगली बातमी ही आहे की, ती फक्त एक तात्पुरती अवस्था आहे आणि लवकरच ती पार होईल. धीर धरा आणि जेव्हा तुमच्या बाळाला दूध पिण्याची इच्छा असते तेव्हा बाळाला ते द्या. तुमचे बाळ दिवसापेक्षा रात्री स्तनपान घेण्यास प्राधान्य देऊ शकते त्यामुळे स्तन भरलेले वाटू शकतात. स्तनांवरील दबाव सोडण्यासाठी अतिरिक्त दूध हात किंवा पंपाच्या साहाय्याने काढून घ्या.

बाळाची झोप

दूध पिण्याच्या अनियमित वेळांमुळे बाळाच्या झोपेच्या पद्धतीवर देखील परिणाम करू शकते. मेंदूच्या विकासाच्या टप्प्यामुळे आपल्या बाळाच्या झोपेच्या वेळेवर सुद्धा परिणाम होण्यास सुरवात होऊ शकते आणि हे आणखी काही महिने टिकू शकते. तुम्ही तुमच्या बाळाशी खेळून आणि त्याला तुमच्या बिछान्यावर झोपवून त्यांचे सांत्वन करू शकता. त्यामुळे तुमच्या बाळाला अस्वस्थ वाटणे कमी होऊ शकते. तुमच्या बाळाला रात्री जास्त वेळा दूध देण्याची गरज भासू शकते आणि बाळाला तुमच्यासोबत झोपवल्यास दूध देणे सोपे होऊ शकते.

रात्रीच्या वेळीही तुमचे बाटलीने दूध पिणारे बाळ अधिक वेळा उठत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. हे कदाचित भूक लागल्यामुळे नसून ह्या वयात अस्वस्थतेच्या भावनेमुळे असे होत असावे. त्यामुळे तुम्हाला बाळाला बाटली देण्याची गरज नाही परंतु बाळाला शांत करण्याच्या तंत्रांवर काम केले पाहिजे. तुम्ही बाळाला पुन्हा झोप येण्यासाठी पॅसिफायर किंवा स्तनपान देऊ शकता.

तथापि, तुम्ही पॅसिफायरचा वापर मर्यादित केला पाहिजे आणि जेव्हा सर्वात जास्त आवश्यक असेल तेव्हाच वापरा. रात्रीचे बाळाला दूध पाजणे बाळासाठी आणि तुमच्यासाठी आरामदायक होण्यासाठी तुम्ही जास्तीच्या उशांचा वापर करू शकता. वरील टिप्स आपल्या १९ आठवड्यांच्या बाळास चांगल्या प्रकारे झोपण्यास मदत करू शकतात

१९ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

तुमच्या १९ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशा काही टिप्स

  • तुम्ही तुमच्या बाळाभोवती काही उशा ठेवू शकता आणि त्याला बसण्यास मदत करू शकता. त्याच्या समोर खेळणी ठेवा आणि त्यास खेळायला द्या
  • तुम्ही तुमच्या बाळाच्या दोन्ही हातात एक एक खेळणे देऊ शकता. तो खेळण्याला एका हातातून दुसर्‍या हाताकडे न्यायला शिकेल.
  • तुमच्या बाळाला दररोज पोटावर झोपवण्याची वेळ ठरवून घ्या. आपल्या बाळापासून थोडे दूर एक खेळणे ठेवा म्हणजे बाळ पुढे खेळण्याकडे सरकेल
  • तुमच्या बाळाला वर खाली आणि बाजूला देखील झुलवा. ह्यामुळे आपल्या बाळास आकलन आणि संतुलनाचे ज्ञान मिळण्यास मदत होते.
  • बाळ उभे राहण्यासाठी हा काळ खूपच लवकर आहे पण तुम्ही त्याच्या दोन्ही बाहूंना धरून उभे करू शकता आणि बाळाला हळुवारपणे पावले टाकण्यास मदत करू शकता
  • त्याला दोलायमान आणि रंगीबेरंगी खेळणी द्या आणि जेव्हा खेळणी थोडा आवाज करतात, किंवा खाली पडतात तेव्हा आनंद व्यक्त करताना पहा

चाचण्या आणि लसीकरण

आपले डॉक्टर आपल्या बाळासाठी लसीकरण वेळापत्रक सुचवू शकतात. या लसी आपल्या बाळाला प्राणघातक संसर्ग आणि आजारांपासून वाचवतात. वयाच्या १९व्या आठवड्यात आवश्यक असलेल्या लसींमध्ये खालील लसींचा समावेश असू शकतो.

  • डीटॅप
  • हिपॅटायटीस बी
  • एचआयबी
  • न्यूमोकोकल
  • पोलिओ
  • रोटाव्हायरस

आपल्या बाळाच्या लसीकरणाच्या वेळापत्रकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.

खेळ आणि क्रियाकलाप

तुमच्या बाळाला आई बाबांसोबत विविध क्रियाकलापांमध्ये खेळ खेळण्याचा आनंद मिळत आहे. बाळासोबत खेळणे केवळ एक क्रियाकलापच नाही तर आपल्या बाळास विविध कौशल्ये विकसित करण्यात ते मदत करते. तुम्ही तुमच्या बाळासाठी एक प्ले जिम खरेदी करू शकता आणि रंगीबेरंगी झगमगणाऱ्या गोष्टींबरोबर तो खेळण्यात बराच वेळ घालवू शकेल. तुमच्या बाळाच्या क्रिबमध्ये किंवा स्ट्रॉलरभोवती तुम्ही खेळणी ठेऊ शकता. ती खेळणी बाळ स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही बाळासोबत पिकाबू हा खेळ खेळू शकता तसेच बाळाला झुलवू शकता. बाळाच्या मनाला बरे वाटावे म्हणून तुम्ही बाळासाठी गाणे गाऊ शकता आणि वेगवेगळे खेळ खेळू शकता. बाळाशी वेगवेगळे खेळ खेळताना त्याच्या चेहऱ्यावरील बदलते हावभाव तुम्ही बघू शकता. विचारात मग्न असल्यासारखे किंवा खेळावर लक्ष केंद्रित करीत असल्याचे हे हावभाव असतील.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

बाळाचा विकास होत असल्यामुळे कदाचित तुम्हाला बाळ थोडेसे त्रासदायक आणि अस्वस्थ वाटले असले तरी, ह्या सामान्य समस्या आहेत आणि आपले बाळ वेळोवेळी यावर मात करेल. तथापि, जर आपल्या लक्षात आले की आपल्या बाळाचे वजन वाढत नाही, तो योग्य प्रमाणात दूध घेत नाही किंवा चांगले झोपत नाही तर तुम्ही त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याच वेळी, जर तुमचे बाळ या वयातील साधारण टप्पे जसे की , आधार घेऊन बसणे, पालथे पडणे आणि हातात गोष्टी घट्ट धरून ठेवणे इत्यादी साध्य करण्यात मागे पडत असल्याचे तुमच्या लक्षात तर यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा.

प्रत्येक मुलाची वाढ आणि विकास निर्देशांक भिन्न असू शकतो, परंतु तुमच्या बाळामध्ये तुम्हाला काही विकासात्मक समस्या आढळल्यास तुम्ही त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मागील आठवडा: तुमचे १८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे २० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article