In this Article
जेव्हा तुमचे बाळ ७ महिन्यांचे होते, बाळाची शारीरिक प्रगती झपाट्याने होते जसे की, बाळ बसू लागते, बाळाला दात येऊ लागतात. ह्या वाढीच्या काळात बाळाला योग्य पोषण मिळणे खूप महत्वाचे आहे.
ह्या काळामध्ये बाळाला लागणारे पोषण आईच्या किंवा फॉर्मुला दुधातून आणि घनपदार्थातून मिळते. इथे ७ महिन्यांच्या बाळासाठी पोषक आहाराचे काही उत्तम पर्याय आहेत, ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात करू शकता.
७ महिन्याच्या बाळासाठी उत्तम अन्नपदार्थ
तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून दिल्यावर तुम्ही विविध पर्याय निवडू शकता आणि पुढच्या महिन्यात बाळाच्या आहारात त्याचा समावेश करू शकता. ७ महिन्यांच्या बाळासाठी खाली काही मजेदार पर्याय दिले आहेत.
१. फळांची प्युरी
फळे व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबरचा एक चांगला स्त्रोत आहेत. सफरचंद, चिकू, पपई, केळी, टरबूज, एवोकॅडो इ. फळे स्नॅक्स किंवा जेवणासाठी उत्तम पर्याय आहेत.
२. भाज्या
भाज्यांमध्ये आवश्यक असलेले बहु-जीवनसत्व आणि खनिजे असतात. भाज्या वाफवून आणि उकडून त्याची प्युरी बनवून जेवण म्हणून दिले जाऊ शकते. भाज्यांचे उकडलेले तुकडे देखील उत्कृष्ट स्नॅक म्हणून दिले जाऊ शकतात.
३. लापशी
धान्यापासून बनवलेली लापशी लहान मुलांसाठी पोषक आणि पूरक अन्न आहे. तांदूळ, गहू, ओट्स, जव, बाजरी इ. सारख्या धान्याची पावडर करून त्याची लापशी केली जाऊ शकते.
४. मांस
मटण आणि चिकन हे उच्च प्रथिने आणि कर्बोदके असलेले पदार्थ आहेत. त्याची प्युरी करून तुम्ही बाळाला देऊ शकता.
५. अंडे
चरबी आणि प्रथिनांचा अंडे हा उत्तम स्रोत आहे. अंडे उकडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही बाळाला देऊ शकता.
६. चीझ
पाश्चरायझेशन केलेल्या दुधापासून तयार केलेले चीझ बाजारात उपलब्ध आहे. चीझ मध्ये चरबी, प्रथिने आणि व्हिटॅमिन्स जास्त प्रमाणात असतात.
७. खिचडी
तांदूळ, गहू आणि डाळ ह्यांची थोडे मसाले आणि मीठ घालून केलेली खिचडी छोट्या बाळांसाठी खूप पोषक असते. मोठ्यांसाठीच्या ह्या अन्नाची बाळाला ओळख सुद्धा होते.
एका दिवसाचे अन्नाचे प्रमाण
साधारणपणे, सात महिन्यांची बाळे ३ वेळा घन पदार्थ आणि २ वेळा स्नॅक्स घेतात. स्तनपान सकाळी आणि रात्री, तसेच मध्ये काही तरी बाळाला खायला देणे हा दिनक्रम असतो.
एका वेळेला बाळ साधारणपणे १/४ कप प्युरी किंवा लापशी खाते. बाळाच्या मागणीनुसार तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता. बाळ सरासरी ८००-९०० मिली स्तनपान किंवा फॉर्मुला दूध पिते.
७ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थ तक्ता/ जेवणाचा तक्ता
खाली दिलेले वेळापत्रक तुम्हाला बाळासाठीचे अन्नपदार्थ बनवण्यासाठी तसेच त्याबद्दलची योजना करण्यासाठी मदत करेल. तसेच बाळाच्या सर्व पोषणाची गरज भागवेल अशा पदार्थांचा समावेश बाळाच्या आहारात करण्यास मदत करेल. इथे ७ महिन्यांच्या बाळाचे अन्नविषयक वेळापत्रक दिले आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा तक्ता बनवू शकता.
दिवस | सकाळी उठल्यावर | नाश्ता | सकाळी | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | संध्याकाळी | रात्रीचे जेवण |
सोमवार | सफरचंद घालून केलेली नाचणीची लापशी | तूप भात | फळांच्या स्वादाचे दही | धान्याची लापशी | |||
मंगळवार | स्तनपान किंवा फॉर्मुला दूध | पेअर प्युरी | स्तनपान किंवा फॉर्मुला दूध | दलिया | डाळीचे पाणी | स्तनपान किंवा फॉर्मुला दूध | दही भात |
बुधवार | खिचडी | दही भात | उकडलेल्या भाज्या | तांदळाची खीर | |||
गुरुवार | गव्हाच्या पिठाचे पॅनकेक्स | फिश प्युरी | गाजराची बदाम घालून केलेली खीर | नाचणीची लापशी | |||
शुक्रवार | इडली | खिचडी | केळं | मुगाच्या डाळीची खिचडी |
स्त्रोत:
- https://www.mylittlemoppet.com/diet-chart-for-7-month-babies/
- https://indianhealthyrecipes.com/indian-baby-food-chart/
७ महिन्यांच्या बाळासाठीच्या पदार्थांच्या कृती
बऱ्याच बाळांना ७ महिन्यांच्या वयात एक किंवा दोन दात येतात, जरी दात पूर्णपणे बाहेर आलेले नसतील तरी बाळांच्या हिरड्या मजबूत असतात, त्यामुळे ही बाळे फिंगर फूड बराच वेळ चावत बसतात. ७ महिन्यांच्या बाळासाठी घरी करता येण्याजोग्या काही पाककृती दिल्या आहेत.
१. गव्हाच्या पिठाचा पॅनकेक
साहित्य
- गव्हाचे पीठ – १ कप
- गुळाचा रस – १/४ कप
- पाणी – जरुरीप्रमाणे
- बडीशेप – १ टेबल स्पून
कृती
- गव्हाच्या पिठात गुळाचा रस घाला.
- थोडे पाणी घालून सरसरीत करून घ्या.
- थोडी बडीशेप घालून चांगले मिक्स करा. रात्रभर तसेच ठेवा.
- तव्याला थोडे तूप लावून घ्या आणि ह्या पिठाचे डोसे घाला.
- थोडे तूप सोडून दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या आणि वाढा
२. नाचणी आणि सफरचंदाची लापशी
साहित्य
- नाचणी पीठ – १ कप
- सफरचंद -१/२
- तूप – १ टी स्पून
- पाणी – जरुरीप्रमाणे
कृती
- सफरचंदाचे साल काढून त्याचे छोटे तुकडे करा. प्रेशर कुकर मध्ये किंवा भांड्यामध्ये उकडून घ्या आणि मॅश करून पेस्ट तयार करा.
- एक भांड्यात नाचणीचे पीठ आणि पाणी घालून पेस्ट तयार करा. मंद आचेवर उकळी येईपर्यंत शिजवा.
- ह्यामध्ये आता सफरचंदाची प्युरी घाला आणि पुन्हा ५ मिनिटे शिजवा.
- शिजल्यावर गॅस बंद करून एक चमचा तूप सोडा.
३. धान्याची लापशी
साहित्य
- घरी तयार केलेली धान्याची पूड
- पाणी – १/२ कप
- स्तनपान / फॉर्मुला दूध – १/२ कप
कृती
- एका भांड्यात, धान्याचे पीठ घेऊन त्यात पाणी घालून चांगले ढवळून घ्या. आणि गाठीविरहीत मऊ पीठ करून घ्या.
- मिश्रण गॅस वर ठेऊन चांगले शिजवून घ्या.
- उकळी आल्यावर गॅस मंद करून दूध घाला.
- स्वादासाठी आणि गोडीसाठी आपल्या आवडत्या फळाची प्युरी तुम्ही घालू शकता.
४. मुगाच्या डाळीची खिचडी
साहित्य
- हिरव्या मुगाची डाळ – १/२ कप
- तांदूळ – १/२ कप
- हळद – १ टी स्पून
- जिरे – १/४ टी स्पून
- तूप – १ टी स्पून
- पाणी – ३/४ कप
कृती
- डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि १/२ तास पाण्यात भिजत घाला.
- पाणी काढून टाका आणि चिमूटभर हळद आणि जिरे घाला.
- प्रेशर कुकर मध्ये ३/४ कप पाणी घालून शिजवून घ्या.
- मिक्सर मध्ये फिरऊन घ्या आणि भरवा.
५. पेअर प्युरी
साहित्य
- पेअर -१
- पाणी किंवा दूध १/४ कप
कृती
- पेअर स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. बिया काढून टाका.
- एका भांड्यात पाणी घेऊन ते उकळा, पेअर शिजवून घ्या आणि झाकण ठेवा.
- मिक्सर मध्ये मॅश करून घ्या.
- पाणी किंवा दूध ह्या प्युरी मध्ये घालून तुम्हाला हवे तसे करून घ्या.
बाळाला कसे भरवावे ह्याबद्दल काही टिप्स
आपल्या ७ महिन्यांच्या बाळाला कसे भरवावे ह्याबद्दल इथे काही महत्वाच्या टिप्स आहेत.
- आपल्या बाळाला जबरदस्ती करू नका. प्रत्येक बाळाची भूक आणि आवडत्या चवी वेगवेगळ्या असतात.त्यांची ओली नॅपी तपासून पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्यांना पुरेसे अन्न मिळते आहे किंवा कसे. त्यांची पोषणमूल्यांची गरज भागवण्यासाठी त्यांना भरपूर स्तनपान किंवा फॉर्मुला दूध द्या.
- नवीन अन्नपदार्थ सुरु करण्याआधी ३ दिवस वाट पहा. त्यामुळे बाळाला प्रतिक्रिया देण्यास वेळ मिळेल तसेच बाळाला ऍलर्जी तर नाही ना ह्याची खात्री होईल. जर बाळाला ऍलर्जी असेल तर काही महिने थांबून पुन्हा सुरु करा.
- जेवणासाठी एक जागा ठरवून घ्या, त्यामुळे जेवणाच्या चांगल्या सवयी लागतील. असे केल्याने जेवताना बाळाच्या मनात त्या जागेविषयी एक नातं तयार होईल. त्यामुळे बाळाला भरवणे आई बाबांना सोपे जाईल.
- बाळांना अन्न पदार्थांची ओळख व्हावी म्हणून फिंगर फूड द्या. ह्या वयात बाळांना चावण्याची खूप इच्छा होते आणि फिंगर फूड चावायला दिल्याने बाळांच्या हिरड्यांना आराम मिळतो. तसेच त्यांना अन्नपदार्थांची चव आणि पोत लक्षात येतो.
- भरवताना बाळाचे लक्ष विचलीत होऊ देऊ नका. लक्ष विचलित झाले तर जेवणाचा आनंद त्यांना घेता येणार नाही.
- जेव्हा घन पदार्थांमध्ये गाठी असतात किंवा फिंगर फूड चा एखादा मोठा तुकडा ते चावतात तेव्हा बाळांमध्ये घास अडकण्याचा खूप धोका असतो, बाळ जेव्हा जेवत असेल तेव्हा बाळावर बारकाईने लक्ष ठेवा, आणि जर घास अडकत असेल तर लगेच प्रतिक्रिया द्या.
- भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून घ्या. फळे आणि भाज्यांची प्युरी जेवणापेक्षा नाश्त्यासाठी योग्य पर्याय आहे. फळांमध्ये दूध मिसळायचे टाळा कारण त्यामुळे पचन नीट होत नाही.
- बाळाचे अन्नपदार्थ करण्यासाठी भांडी स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्या कारण बाळांना संसर्ग होण्याची शक्यता असते. बाळाच्या अन्नपदार्थातील गाठी किंवा घट्टपणा कमी करण्यासाठी चांगल्या फूड प्रोसेसर चा वापर करा.
७ महिन्याच्या बाळाला त्यांच्या वाढत्या शरीरासाठी आरोग्यपूर्ण आणि पोषक आहाराची गरज असते. त्यांच्यासाठी सुद्धा हा एक मोठा बदल असतो कारण घन पदार्थांची खाण्यास नुकतीच सुरुवात झालेली असते आणि त्यांच्या स्वादकलिका (Taste Buds) विकसित होण्यास नुकतीच सुरुवात झालेली असते. त्यांना जास्तीत जास्त फळे आणि भाज्यांची ओळख करून दिल्यास त्यांना पुढील आयुष्यात जेवणाच्या चांगल्या सवयी लागतील.
आणखी वाचा: ८ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय