Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य तुमच्या आईला समर्पित करण्यासाठी मराठी चित्रपटांमधील ९ सर्वोत्तम गाणी

तुमच्या आईला समर्पित करण्यासाठी मराठी चित्रपटांमधील ९ सर्वोत्तम गाणी

तुमच्या आईला समर्पित करण्यासाठी मराठी चित्रपटांमधील ९ सर्वोत्तम गाणी

मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे चंदेरी दुनिया! चित्रपट पाहताना जणू स्वप्न सत्यात उतरतात! परंतु तिथेही आई आपल्या खऱ्या आयुष्यातील आई सारखीच असते खूप काळजी घेणारी, सुरक्षित ठेवणारी आणि काहीही कारण नसताना आपल्या मुलांची काळजी करणारी.

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये १९५३ साली श्यामची आई झालेल्या वनमाला ह्यांनी मुलाला म्हणजेच श्यामला शिस्त लागावी म्हणून प्रसंगी कठोर तसेच हळवी आई साकारली होती. आत्मविश्वास १९८९ ह्या चित्रपटात नीलकांती प्रत्येक ह्यांनी कर्त्यव्यकठोर आईची भूमिका केली होती. २०११ साली प्रदर्शित झालेल्या राजमाता जिजाऊ ह्या चित्रपटात स्मिता देशमुख ह्यांनी जिजाबाईंची भूमिका केली होती. संस्कार करताना त्यांनी शिवाजीराजांना कर्तव्यासोबत राजनीती सुद्धा शिकवली होती

तुमच्या आईला समर्पित करण्यासाठी मराठी सिनेमांमधील आईची गाणी

आपल्याला चित्रपट जरी खूप आवडत असले तरी गाणी कायम लक्षात राहतात कारण ती ऐकताना छान वाटतात आणि भावनांनी भरलेली असतात इथे आम्ही मराठी सिनेमातील ९ गाणी देत आहोत जी तुम्ही तुमच्या आईला तिच्या वाढदिवशी, किंवा कुठल्या समारंभाच्या वेळी किंवा वर्षातील कुठल्याही दिवशी समर्पित करू शकता.

. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही

चित्रपट: वैशाख वणवा

संगीतकार: दत्ता डावजेकर

गायिका: लता मंगेशकर

आई ही देवासमान असते ह्याचे धडे लहान मुलांना देताना, कौसल्या, जिजाबाई आणि देवकी ह्यांची उदाहरणे ह्या गीतातून दिलेली आहेत. आईचे ऋण कधीही विसरता आयुष्यात थोर पुरुष बनून त्या ऋणांची उतराई होऊ शकते हे सुद्धा सांगितले आहे.

. आई म्हणोनि कोणी

चित्रपट: श्यामची आई

संगीतकार: वसंत देसाई

गायक: आशा भोसले, जी. एन. देसाई

कवी यशवंत ह्यांचे हे काव्य आहे. आईच्या विरहात आर्ततेने व्याकुळ होऊन आई म्हणून कुणी हाक मारली तरी मला खूप दुःख होते. तू रागावलीस तरी मी रुसणार नाही पण तू परत ये अशी हृदयापासून विनंती ह्या गीतामध्ये केलेली आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारीहे जीवनाचे सार सुद्धा ह्या गीतात आहे.

. एकटी एकटी घाबरलीस ना

चित्रपट: चिंटू

संगीतकार: सलील कुलकर्णी

गायक: शुभंकर कुलकर्णी, अंजली कुलकर्णी

संदीप खरे ह्यांचे हे गीत अलीकडच्या काळातील चिंटू ह्या चित्रपटातील आहे. आई एकटी आहेस म्हणून तू घाबरू नकोस, मला कुशीत घेऊन झोप म्हणजे तुझी सगळी भीती दूर पळून जाईल अशा भावना एक लहान मूल आपल्या आईजवळ व्यक्त करते. मूल जवळ नसते तेव्हा आई घाबरतेच, आणि मुलं कितीही मोठी झाली तरी आई मोठी होत नाही. तिच्यासाठी मुलं लहानच राहतात असे ह्या गीतात म्हटले आहे.

. आई अगं आई, काय करू सुचेना

चित्रपट: भिकारी

संगीत: मिलिंद वानखेडे

गायक: सोनू निगम

गुरु ठाकूर आणि मिलिंद वानखेडे ह्यांचे ही गीत आहे. आजारी असलेल्या आईला तू माझ्यासाठी किती मौल्यवान आहेस, एकदा तू मला हाक मार आणि रुसवा सोड ही आर्त हाक ह्या गीतामध्ये आहे. अत्यंत भावपूर्ण असे ह्या गीताचे बोल आहेत.

. हवं तुला काय मला सांग ना गं आई

चित्रपट: मान सन्मान

संगीत: चिनार महेश, प्रकाश मोरे

गायक: अनिरुद्ध जोशी, साची मुळे

आईप्रती असलेली कृतज्ञता ह्या गाण्यातून व्यक्त केलेली आहे. आईसाठी काय काय करता येईल असा विचार करत असतानाच मुलगा आईला अष्टविनायक, तुळजाभवानीचे दर्शन तुला करवून आणू का? तुला नक्की काय हवंय? कुठली इच्छा तुझ्या मनामध्ये आहे असे ह्या गीतामध्ये विचारत आहे.

. शोधू कुठे तुला मी

चित्रपट : आई पाहिजे

संगीत: अशोक पत्की

गायक: अनुराधा पौडवाल

आईशी ताटातूट झालेली असताना आई शोधू कुठे तुला मीअशी आर्त हाक मुलगी आईला देते. पक्षिणीच्या पिलांप्रमाणे संगोपनाची आठवण व्यक्त करताना तू नसताना पंख छाटलेल्या पक्ष्याप्रमाणे अवस्था झालेली आहे असे ती पुढे म्हणते. तू नसताना माझ्या वैभवाला शोभा नाही. प्रवीण दवणे ह्यांचे हे गीत अतिशय श्रवणीय आहे.

. तुझ्या पोटी जन्म घेणार मी

चित्रपट: आत्मविश्वास

संगीत: अरुण पौडवाल

गायिका: अनुराधा पौडवाल

प्रवीण दवणे यांचे हे गीत आहे. ह्या गीतात आई तिच्या लेकीला मी पुढच्या जन्मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे हे सांगते. जसे मी तुला नऊ महिने पोटात वाढवले तसे मला तू वाढव. मायलेक हे एकाच नदीचे दोन तीर आहेत आणि त्यांना जोडणारा पूल हा मायेचा प्रेमाचा असतो आणि त्यात आता मला चिंब भिजुदे असे आई तिच्या लेकीला सांगते.

. आई सारखे दैवत

चित्रपट: संसाराची माया

संगीत: देव चौहान

गायक: अनुष्का चड्ढा, विजय गटलेवार

आईच्या वाढदिवशी तिला उदंड आयुष्य लाभू दे अशी मंगलकामना केली आहे. पुन्हा पुन्हा तुझाच पोटी जन्म आम्हाला मिळू दे. आम्हा बहीण भावांमध्ये तू मायेचा बंध निर्माण केलास त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तुझा आशीर्वाद असाच पाठीशी असुदे अशी इच्छा मुले आईपाशी व्यक्त करताना दिसतात.

. आई तू भासे ठायी ठायी

चित्रपट: फोटोकॉपी

संगीत: रोहन प्रधान

गायक: रोहन प्रधान

आईविषयी प्रेम व्यक्त केले आहे. चरा चरात सगळीकडे तू भिनलेली आहेस. मला जन्मोजन्मी तूच आई म्हणून हवी आहेस अशा भावना ह्या गीतातून व्यक्त केलेल्या आहेत. थोडे आधुनिक धाटणीचे संगीत असलेले हे गीत श्रवणीय आहे.

तर ह्यापैकी आवडलेले कुठलेही गीत निवडा आणि आपल्या आईला समर्पित करा. तुम्हाला मातृदिनाच्या शुभेच्छा!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article