In this Article
सामान्यतः गरोदरपणात अनेक आव्हाने असतात आणि त्यावर तुम्ही मात करणे गरजेचे असते. सर्वात सामान्य आव्हानांपैकी एक म्हणजे गरोदरपणात निर्माण होणाऱ्या लालसांविरुद्धचा लढा. गरोदरपणात तुमच्या शरीरात बदल होतात. तुमच्या शरीरातील संप्रेरके सुद्धा बदलतात आणि त्यामुळे अत्यंत तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. ती नेहमीच चांगली नसते. जास्त खाणे हे एक आव्हान असू शकते परंतु काही वेळा तुम्हाला असामान्य गोष्टींविषयी लालसा निर्माण होते. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, ह्या स्थितीला पिका म्हणतात. ह्या लेखामध्ये पिकाबद्दल सर्व माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.
पिका म्हणजे काय?
पिका ही गरोदरपणात आढळणारी एक प्रचलित स्थिती आहे. ह्या स्थितीमध्ये तुम्हाला अन्नपदार्थांव्यतिरिक्त इतर गोष्टी खाव्याश्या वाटतात . त्यामध्ये घाण, चिकणमाती, कोळसा, लाकूड आणि स्टीलचा इत्यादींचा समावेश होतो.
अश्या प्रकारची लालसा किंवा इच्छांशी लढणे कठीण असू शकते परंतु ह्या लालसा आपल्या शरीरातील जीवनसत्त्वे किंवा खनिजांच्या कमतरतेचे सूचक म्हणून ओळखल्या जातात. अश्या प्रकारची लालसा सामान्यतः 6 महिने ते 11 वर्षे वयोगटातील लहान मुलांमध्ये दिसून येते. या लालसा 30% मुलांवर परिणाम करतात, गरोदर स्त्रियांनाही अशी लालसा असणे सामान्य मानले जाते.
गरोदरपणातील पिकाची कारणे
गरोदर स्त्रियांमध्ये पिकाची नेमकी कारणे माहित नाहीत. परंतु तुमच्या शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे किंवा इतर पोषक तत्वांची आवश्यकता आहे हे सांगण्याची निसर्गाची ही एक पद्धत आहे असे डॉक्टरांनी गृहीत धरले आहे. डॉक्टरांनी असेही गृहीत धरले आहे की गर्भवती महिलांमध्ये अनैसर्गिक लालसा ही अंतर्निहित शारीरिक स्थिती किंवा हार्मोन्समुळे उद्भवलेल्या मानसिक आजाराचे सूचक असू शकते.
सर्वात सामान्य गर्भधारणा आणि पिका लालसा
पिका मुळे असंख्य गोष्टींविषयी लालसा निर्माण होऊ शकते, काही सर्वात सामान्य लालसा खालीलप्रमाणे आहेत –
- घाण
- साबण
- वाळू
- चिकणमाती
- विष्ठा
- कागद
- केस
- टूथपेस्ट
- प्लास्टिक
- लाकूड चिप्स
- नखे
- पोर्सिलेन
- कोळसा
- प्लास्टर ऑफ पॅरिस
- लहान मुलांचे प्लास्टर
पिकामुळे तुम्हाला विशिष्ट इच्छा निर्माण होऊ शकते, जेव्हा तुम्हाला पूर्णपणे खाण्यायोग्य नसलेले काहीतरी खाण्याची अनियंत्रित इच्छा येते. तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ह्या काळात लक्षपूर्वक खाणे आवश्यक आहे. म्हणून, जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमची प्राथमिक काळजी घेणार्या डॉक्टरांशी बोलण्याचा सल्ला दिला जातो. पण त्याआधी, पिकाबद्दलच्या काही सामान्य समस्यांबद्दल वाचूया.
याचा तुमच्या बाळावर परिणाम होईल का?
तुम्ही तुमची लालसा स्वीकारल्यास पिका तुमच्या बाळावर परिणाम करू शकते. अन्नाशिवाय काहीही खाणे हानिकारक मानले जाते कारण त्यामुळे तुमच्या शरीरात पोषण–शोषणाच्या समस्या निर्माण होऊन कुपोषण होऊ शकते. ही लालसा प्लास्टिक किंवा पेंट सारख्या गोष्टींसाठी सुद्धा निर्माण होऊ शकते. ह्या पदार्थांमध्ये विषारी घटक आहेत. हे घटक तुमच्या बाळासाठी आणि तुमच्या दोघांसाठी अत्यंत हानिकारक असू शकतात.
पिकामुळे निर्माण होणाऱ्या समस्या
पिकामुळे अन्न शोषून घेण्यात अडचणी येतात. त्यामुळे शेवटी कुपोषण होते. पचायला जड असलेल्या अखाद्य पदार्थांच्या सेवनामुळेही संसर्ग होऊ शकतो. उदाहरणार्थ, काच किंवा लाकूड खाण्याची लालसा निर्माण झाल्यास, पचनमार्गाच्या दुखापती आणि अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका जास्त असतो. तुमच्यामध्ये निर्माण झालेल्या लालसेमुळे निर्माण होणारी गुंतागुंत विशिष्ट आहे. लालसा काय आहे आणि त्याचे कोणते धोके आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे.
पिका लालसा हाताळणे
घाबरू नका हे सर्वात महत्वाचे आहे कारण पिका ही एक विशिष्ट लालसा मानली जाते. आणि ती व्यवस्थापित केली जाऊ शकते आणि सामान्यतः थोड्या वेळानंतर अश्या प्रकारची लालसा नाहीशी होते. ही लालसा हाताळताना येथे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात:
- तुमच्या डॉक्टरांशी अगदी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोला. अशी लालसा निर्माण होणे हे तुम्हाला कितीही अनैसर्गिक किंवा लाजिरवाणे वाटत असले तरीही डॉक्टरांसोबत सर्व काही शेअर करा.
- तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हे सांगा. तुमच्या हट्टाला मान देण्याचे धोके आणि परिणाम याची त्यांना जाणीव आहे याची खात्री करा. प्रियजनांच्या मदतीमुळे ह्या लालसांशी लढा देणे सोपे होईल.
- तुमच्या जन्मपूर्व नोंदींचे पुनरावलोकन करण्याची आणि आवश्यक चाचण्या करण्याची आवश्यकता असल्यास तसे तुमच्या डॉक्टरांना विचारा.
- आपल्या पौष्टिक मूल्यांच्या पातळीचे निरीक्षण करा आणि आपल्या जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या पातळीवर लक्ष ठेवा.
- तुमच्या लोह आणि जस्त सेवनाचे निरीक्षण करा आणि तुमच्या शरीरातील मॅग्नेशियमवर लक्ष ठेवा. जर ते कमी असतील तर नियमितपणे पूरक आहार घ्या.
- आपले मन दुसरीकडे वळवा, टीव्ही पहा किंवा आपले मन रमवण्यासाठी काहीतरी उत्पादक करा.
- च्युइंग गम किंवा शुगरलेस कँडी सारखे पर्याय वापरून पहा कारण ते देखील समान आहेत.
पिका ही एक अतिशय सामान्य स्थिती आहे परंतु त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि लालसा दूर होईपर्यंत ती व्यवस्थापित करा. ही समस्या मानसिक स्थितीमुळे नाही हे सुनिश्चित करण्यासाठी समुपदेशकांचा सल्ला घ्या. नेहमी आपल्या प्रिय व्यक्तींना आपल्या स्थितीची माहिती ठेवण्यास सांगा आणि त्याबद्दल मोकळेपणाने बोलण्याने मदत होऊ शकते म्हणून संवाद साधत रहा. लक्षात ठेवा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरून जाऊ नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.
आणखी वाचा:
गरोदरपणात पोटावर खाज सुटणे
गरोदरपणातील रक्तक्षय (आयर्न-डेफिशिएन्सी अॅनिमिया)