Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील बद्धकोष्ठता

गरोदरपणातील बद्धकोष्ठता

गरोदरपणातील बद्धकोष्ठता

गर्भधारणा हा एक सुंदर अनुभव आहे. परंतु हा अविस्मरणीय टप्पा काही समस्यांसह येतो. मळमळ होणे आणि मॉर्निंग सिकनेस ह्या गरोदरपणाच्या समस्यांबद्दल सर्वात जास्त चर्चा केली जाते. परंतु गरोदरपणातील इतरही काही समस्या आहेत ज्यामुळे तुम्हाला लाजिरवाणे वाटू शकते. त्यामुळे त्या समस्या आणखी वेदनादायी वाटू शकतात. पचन नीट न होणे, गॅस होणे किंवा शौचास कडक होणे ही ह्या समस्येची लक्षणे आहेत. ती समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. ह्या अवघड परंतु अतिशय सामान्य समस्येचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न आपण ह्या लेखाद्वारे करूया.

व्हिडिओ: गरोदरपणातील बद्धकोष्ठता – कारणे, चिन्हे आणि उपाय

बद्धकोष्ठता म्हणजे काय?

जेव्हा पचनक्रिया नीट होत नाही तेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठता आहे असे म्हटले जाते. बद्धकोष्ठता झाल्यास दोन वेळच्या शौचाच्या वेळेमध्ये लक्षणीय अंतर असते. जरी प्रत्येक स्त्रीची पचनक्रिया वेगळी असली, तरीही क्वचितच शौचास होणे किंवा दर आठवड्याला तीनपेक्षा कमी वेळा शौचास होणे ही चिंतेची बाब बनली पाहिजे.

सामान्यतः, मोठे आतडे आपल्या पचन झालेल्या अन्नातून पाणी शोषून घेते आणि द्रवाचे घनपदार्थामध्ये रूपांतर करते. जेव्हा पचलेले अन्न तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये दीर्घकाळ राहते तेव्हा बद्धकोष्ठता उद्भवते. जास्त पाणी शोषून घेतले गेल्यामुळे तुमचे मल कठोर आणि कोरडे होते. त्यामुळे गुदाशयाच्या स्नायूंना आणखी समस्या निर्माण होतात.

गरोदरपणातील बद्धकोष्ठतेची कारणे

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गरोदरपणात हा त्रास वाढण्याची शक्यता असते. चला आपण बद्धकोष्ठतेची काही सामान्य कारणे पाहूया,

1. हार्मोन्स

संप्रेरकांमधील चढउतार हे बद्धकोष्ठतेचे एक कारण आहे आणि त्यामुळे गरोदरपणाच्या इतर अनेक समस्या उद्भवतात. प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे बद्धकोष्ठता होते. त्यामुळे पचन संस्थेसह संपूर्ण शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे अन्नपदार्थ किंवा टाकाऊ पदार्थ आतड्यांमधून आणखी हळूहळू पुढे सरकतात.

2. अन्न

बद्धकोष्ठता निर्माण करणारे काही पदार्थ आहेत. तुम्ही आईस्क्रीम किंवा चीज ह्यासारखे दुग्धजन्य पदार्थ  कमी करून पचन प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करू शकता कारण त्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते आणि तंतुमय पदार्थ कमी असतात. अगदी ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवर, कोलार्ड ग्रीन ह्यासारख्या भाज्या देखील टाळल्या पाहिजेत. त्यामध्ये रॅफिनोज नावाची साखर असते. रॅफिनोजमुळे सूज येऊ शकते आणि पोटात वायू होऊ शकतो . तसेच, जास्त प्रमाणात लाल मांस खाणे टाळा कारण तंतुमय पदार्थ असलेल्या वनस्पतींपेक्षा आणि तृणधान्ये पचवणे सोपे असते.  जास्त प्रमाणात प्रथिने असलेले अन्न पचविणे अधिक कठीण असू शकते.

3. अशक्तपणा

तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी पुरेसे लोह नसल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे, निरोगी लाल रक्तपेशींचा अभाव असतो. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही लोहाच्या गोळ्या खात असाल. लोहाच्या गोळ्या खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणखी वाढते. ह्याचे कारण म्हणजे पूरक गोळ्यांमधून मिळणारे लोह, हे अन्न स्रोतांमधून मिळणाऱ्या लोहाइतके सहजपणे शोषले जात नाही.

4. कमी हालचाल

तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यास किंवा व्यायाम करत नसल्यास, तुम्हाला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. पचन नीट होण्यासाठी दररोज शारीरिक हालचाली होणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या मोठ्या आतड्यातून अन्न अधिक वेगाने पुढे सरकते. आणि मल मऊ होण्यास मदत होते

5. ताण

शारीरिक हालचालींव्यतिरिक्त, तणाव देखील तुमच्या पचनावर परिणाम करू शकतो. तुमच्या पचनशक्तीसाठी तसेच तुमच्या एकूण आरोग्यासाठी तणाव खूप हानिकारक असू शकतो. जेव्हा तुम्ही जास्त तणावात असता तेव्हा अन्नाचे पचन नीट होणार नाही, त्यामुळे कालांतराने बद्धकोष्ठता सुरू होईल.

गरोदरपणात सुरुवातीच्या काळात बद्धकोष्ठता होण्याची कारणे

सुरुवातीच्या महिन्यांत, तुमच्या पूरक औषधांमधून मिळणारे अतिरिक्त लोह, बद्धकोष्ठतेस कारणीभूत ठरू शकते आणि गरोदरपणात तुमचे पोट फुगलेले राहू शकते. जर तुम्ही गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी इंजेक्शन्स घेत असाल तर स्नायू शिथिल होतात आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते.

गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात बद्धकोष्ठतेची कारणे

गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात, तुमच्या शरीरात पाण्याचे शोषण वाढल्याने मल घट्ट होते. ह्या कालावधीत प्रोजेस्टेरॉन अंडाशयातून प्लेसेंटाकडे सरकते. ह्यामुळे स्रावांची पातळी वाढते आणि शौचास  घट्ट होऊन बद्धकोष्ठता होते. गुदाशयावर गर्भाशयाचा दाब वाढतो. वाढत्या दाबामुळे ही समस्या आणखी वाढते आणि  वायू तयार होतो. त्यामुळे शरीरातील मल बाहेर पडत नाही. बद्धकोष्ठतेची लक्षणे म्हणजे पोट दुखणे, पेटके येणे, पोट फुगणे आणि वायू निघणे इत्यादी होत.

गरोदरपणातील बद्धकोष्ठतेची लक्षणे

बद्धकोष्ठतेची काही लक्षणे तुम्हाला अस्वस्थ करू शकतात, म्हणून लक्षणे जाणून घेणे महत्वाचे आहे.

1. शौचास अनियमित होणे

बद्धकोष्ठतेच्या पहिल्या लक्षणांपैकी एक म्हणजे शौचास अनियमित होणे. जर तुम्हाला आधी दररोज शौचास होत असेल, परंतु अचानक एक दिवसाआड शौचास होऊ लागल्यास तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

2. शौचास घट्ट होणे

तुमच्या लक्षात येईल की अनियमित मलविसर्जनामुळे शौचास घट्ट होते. शौचास करताना वेदना होतात. तुम्हाला मालविसर्जनासाठी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे रक्तस्त्राव आणि मूळव्याध होऊ शकतो. हेमोरायॉइड ही गुदाशयातील ऊतींमधील सूजलेली नस आहे. त्यामुळे वेदना होतात आणि खाज सुटू शकते. काही दिवस हा त्रास नाहीसा होतो आणि पुन्हा सुरु होऊ शकतो. गुदाशयातून रक्तस्त्राव झाल्यास, डॉक्टरांना भेटा.

3. गुदाशयात अडथळा आल्याची संवेदना

काही स्त्रियांना गुदाशयात अडथळे आल्याची संवेदना जाणवते , ही संवेदना मल कठीण असताना जाणवते. शौचास केल्यानंतर सुद्धा पुन्हा शौचास करण्याची इच्छा होऊ शकते

4. पोटदुखी

पोटदुखी

बद्धकोष्ठता कायम राहिल्यास, शौचास करताना तुम्हाला ओटीपोटाच्या खालच्या भागात पेटके येऊ शकतात. जेव्हा शौचास होत नाही तेव्हा तुम्हाला ओटीपोटाच्या खालच्या भागात सूज येऊ शकते. तुमच्या आतड्यांमध्ये मल जमा होण्याचे हे सूचक असू शकते.

5. पोटात वायू होणे

बद्धकोष्ठता हे पोटात वायू होण्याचे आणि पोट फुगण्याचे एक सामान्य कारण आहे. वायूमुळे होणाऱ्या वेदना तीव्र असल्या तरीसुद्धा ढेकर दिल्याने किंवा वायू निघून जाण्याने आराम मिळतो. कधीकधी, वायूमुळे  छातीत दुखू शकते.

6. भूक न लागणे

पोटात गॅस झाल्याने आणि पोट फुगल्यामुळे तुम्हाला भूक कमी लागू शकते. तुम्‍हाला शौचास होत नसल्‍याने तुमचा खाण्यातील रस कमी होईल. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळणार नाहीत.

गरोदरपणात बद्धकोष्ठता कशी टाळता येईल आणि त्यावर काय उपचार करावे

उच्च फायबरयुक्त आहार घ्या. भरपूर तंतुमय पदार्थ असलेल्या अन्नाचे सेवन वाढवून तुम्ही बद्धकोष्ठता टाळू शकता कारण त्यामुळे पचन चांगले होते. विरघळणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे आतड्यांमध्ये जास्त काळ पाणी राहते  त्यामुळे मल मऊ होते आणि आतड्यांमधून पुढे सरकते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची भावना देखील प्रतिबंधित होते. त्यामुळे तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने बद्धकोष्ठता टाळता येऊ शकते. बद्धकोष्ठतेवर उपचार कसे करावे याबद्दल विचार करत असलेल्या स्त्रीसाठी हा पहिला सल्ला आहे.

1.भरपूर द्रव घ्या

पचनासाठी पाणी महत्वाचे आहे कारण त्यामुळे अन्न आतड्यांमधून फिरते. गरोदरपणात पाण्याचे सेवन दुप्पट करा आणि हायड्रेटेड रहा.

2. थोड्या थोड्या अंतराने खा

तुम्ही तुमच्या जेवणाचे पाच किंवा सहा लहान भागांमध्ये विभाजन करू शकता. त्यामुळे पचन चांगले होईल आणि अन्नपदार्थ सहज मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचतील.

3. नियमित व्यायाम करा

व्यायामामुळे अन्न आतड्यांमधून सहज पुढे सरकते आणि त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात पाणी शोषले जात नाही आणि बद्धकोष्ठतेवर उपचाराचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. कठीण, कोरड्या मलाचे विसर्जन करणे कठीण होते. जेव्हा तुमचे आतड्याचे स्नायू व्यवस्थित आकुंचन पावतात तेव्हा मल लवकर बाहेर काढण्यास मदत होते. परंतु, तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी सुरक्षित असलेले व्यायाम करा.

4. ओटीपोटाकडील भागाचे व्यायाम

कंबरेखालील बहुतेक अवयवांना ओटीपोटाकडील स्नायूंचा आधार असतो. जर तुम्ही ओटीपोटाकडील भागाचे  स्नायू योग्यरित्या सैल सोडू शकत नसाल किंवा आकुंचित करू शकत नसाल, तर बद्धकोष्ठतेची लक्षणे दिसू शकतात. जेव्हा तुम्ही टॉयलेट सीटवर बसता तेव्हा खोल श्वास घेण्याचा प्रयत्न करा आणि ओटीपोटाकडील भागाच्या स्नायूंना आराम देण्यासाठी श्वास सोडा. स्क्वॅटिंग स्थितीत बसणे सर्वात चांगले आहे, परंतु जास्त ताण देऊ नका.

5. जुलाब

गरोदरपणात वापरण्यास सुरक्षित असलेले रेचक लिहून देण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला व्यायाम मिळतो याची खात्री करण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थ समाविष्ट करू शकता.

1. लिंबू

तुम्ही एका ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू घालू शकता. असे केल्याने मोठ्या आतड्यातून विषारी पदार्थ आणि इतर न पचलेले पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. ह्यामुळे तोंडाला चव येते त्यासोबतच शौचास होण्यास मदत होते.

2. सायलियम किंवा इस्पाघुला हस्क्स

इसबगोल (किंवा इस्पाघुला हस्क्स) हे एक रेचक आहे आणि बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून प्रत्येक भारतीय घरात अनेक वर्षांपासून वापरले जाते. त्यात म्युसिलेज असते आणि ते द्रव शोषून घेते आणि शौचामध्ये द्रवाची मात्रा वाढवते. इसबगोल सोबत दररोज 8-10 ग्लास पाणी घेतले पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हा उपाय करणे चांगले.

3. जवस

ह्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात आणि त्यामुळे आपल्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करण्यास मदत होते. आहारात जर एक चमचा जवसाचा समावेश असेल तर किमान 8-10 ग्लास पाणी पिण्याचे लक्षात ठेवा.

4. मसाज

तुमच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही पोटाला मसाज करण्याचा प्रयत्न करू शकता कारण त्यामुळे स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. तुमच्या बोटांनी, पोटाची घड्याळाच्या दिशेने हलकी मालिश करा. परंतु, जर तुम्हाला अकाली प्रसूतीचा धोका असेल किंवा वार खाली सरकलेली असेल तर मसाज टाळणे महत्वाचे आहे.

5. सुकामेवा आणि जर्दाळू

तुम्ही अर्धा कप सुका मेवा उदा: जर्दाळू एक कप पाण्यामध्ये शिजवू शकता. फळे मऊ होईपर्यंत शिजवा आणि सकाळी खा. सुकामेवा हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे.

6. तेल लावा

तुमच्या गुदद्वारापाशी खोबरेल तेलासारखे सेंद्रिय तेल चोळून तुम्ही शौचास होणे सोपे करू शकता.

7. ऑलिव्ह ऑइल

एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला आणि दररोज सकाळी एकदा प्या. यापेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास अतिसार होऊ शकतो आणि पेटके येऊ शकतात. ऑलिव्ह ऑइल स्टूल सॉफ्टनर म्हणून काम करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. परंतु, जर तुम्हाला प्लेसेंटा प्रीव्हिया असेल किंवा उच्च-जोखीम असलेली गर्भधारणा असेल तर ते वापरू नका.

8. नैसर्गिक प्रोबायोटिक घ्या

अन्न व्यवस्थित पचण्यासाठी आपल्या शरीराला चांगल्या जिवाणूंची गरज असते. रोज एक कप दही खा, कारण ते नैसर्गिक प्रोबायोटिक आहे.

9. योग

बद्धकोष्ठतेसाठी अनेक योगासने आहेत. त्यामुळे गॅस आणि न पचलेले अन्न आतड्यांमधून पुढे सरकण्यास मदत होते आणि आराम मिळतो. मत्स्यासन आणि त्रिकोणी मुद्रा ही आसने तुम्ही पाचक आरोग्यासाठी करून पाहू शकता. योगासन करण्यापूर्वी योगतज्ञाचा सल्ला घेणे लक्षात ठेवा.

10. कोरफड रस

तुम्ही कोरफडीचा रस वापरून पाहू शकता कारण ते पचनसंस्थेला थंड ठेवण्यास मदत करते. बरे वाटण्यासाठी दोन चमचे कोरफड जेल घ्या.

बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करणारे पदार्थ

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकता अशा अन्नपदार्थांची यादी येथे आहे.

  • फळे: पेरू, नाशपाती, सफरचंद, बेरी, संत्री आणि टेंगेरिन्स घ्या
  • भाज्या: स्प्राउट्स, गाजर, रताळे, भोपळे, स्क्वॅश खा. पालक,  व लेट्युस इत्यादी पालेभाज्या देखील समाविष्ट करा.
  • शेंगा: सोयाबीन, मसूर आणि मटार यांचे सेवन करा
  • धान्य: संपूर्ण गव्हाचा ब्रेड, तपकिरी तांदूळ, प्रक्रिया न केलेले ओट्स खा
  • सुकामेवा आणि बिया: तुम्ही बदाम, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया आणि अक्रोड खाण्याचा प्रयत्न करा.

लक्षात ठेवा, गरोदरपणात तुम्हाला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांपैकी, बद्धकोष्ठता ही एक तात्पुरती समस्या आहे आणि प्रसूतीनंतर हा त्रास कमी होईल. तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास तुम्ही त्यास यशस्वीपणे तोंड देऊ शकता.

आणखी वाचा:

गरोदरपणातील पोटदुखी
गरोदरपणात पोटात वायू होणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article