In this Article
- गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला काय अनुभव येईल?
- गरोदरपणाच्या पहिल्या महिन्याची चिन्हे आणि लक्षणे
- गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत शरीरात होणारे बदल
- पहिल्या महिन्यात तुमच्या बाळाचा विकास
- गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यातील निदान आणि चाचण्या
- गरोदरपणाचा पहिला महिना – स्वतःची काळजी घेण्यासाठी टिप्स
- गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात घ्यावयाची खबरदारी – काय करा आणि करू नका
- आपण काय करावे
- आपण काय करू नये
- गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात घ्यायची काही इतर खबरदारी
- बाळाच्या वडिलांसाठी काही टिप्स
गर्भधारणा होणे हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे. जर तुमचे हे पहिलेच गरोदरपण असेल तर शरीरात कोणते बदल होतील आणि तुम्हाला कोणती लक्षणे जाणवतील ह्याबद्दल तुम्ही विचार करत असाल. नुकतीच झालेली गर्भधारणा तुम्हाला गोंधळात टाकणारी असू शकते: मळमळ आणि मूड स्विंगमुळे तुम्हाला उदास वाटू शकते. पण काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या गरोदरपणाबद्दल सर्व काही जाणून घ्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल! ह्या लेखात, आपण गरोदरपणाची विविध लक्षणे, सावधगिरी आणि काळजीविषयक टिप्स ह्याबद्दल चर्चा करणार आहोत. ह्या सर्व टिप्स तुम्हाला तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या महिन्याचा प्रवास सहजतेने पार करण्यास मदत करतील.
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला काय अनुभव येईल?
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, बहुतेक स्त्रियांना मळमळ, थकवा, स्तन दुखणे इत्यादी अनुभव येतात. परंतु, सर्व स्त्रियांना ही लक्षणे जाणवणार नाहीत कारण ह्या काळात ही लक्षणे अतिशय सौम्य असतात. बहुतेक स्त्रियांना त्यांची मासिक पाळी चुकली की त्या गर्भवती असल्याचे कळते.
काही स्त्रियांना गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात हलके डाग दिसू शकतात. बहुतेक वेळेला हे सामान्य मानले जाते. जर तुम्हाला गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात हलके डाग दिसले तर तुम्ही स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा आणि गुंतागुंत टाळा.
गरोदरपणाच्या पहिल्या महिन्याची चिन्हे आणि लक्षणे
गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात, तुम्हाला काही चिन्हे आणि लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे मासिक पाळीच्या आधीच्या लक्षणांसारखे दिसू शकतात आणि तुम्हाला गोंधळात टाकू शकतात. तुम्हाला ह्या लक्षणांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
१. मासिक पाळी बंद होणे
मासिक पाळी बंद होणे हे गरोदरपणाच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. एखादी स्त्री गरोदर राहिल्यानंतर तिचे शरीर प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स तयार करणे थांबवते. हे हार्मोन्स मासिक पाळी थांबवण्यासाठी देखील जबाबदार असतात. मासिक पाळी न येणे हे गरोदरपणाच्या पहिल्या लक्षणांपैकी एक आहे.
२. हलके डाग
गर्भाधान प्रक्रियेत जेव्हा अंड्याचे गर्भाशयाच्या भित्तिकांमध्ये रोपण होते तेव्हा काही प्रमाणात क्रॅम्पिंग आणि स्पॉटिंगचा अनुभव येऊ शकतो. बहुधा, तुमचे गुप्तांग धुताना किंवा पुसताना हे लक्षात येऊ शकते. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात रक्तस्त्राव होणे किंवा हलके डाग पडणे ही बहुतेक लक्षणे सामान्य मानली जात असली तरी, जर तुम्हाला असामान्य प्रमाणात रक्त किंवा डाग दिसले, तर तुम्ही त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
३. स्तन कोमल होणे
तुमच्या स्तनांमध्ये वेदना होऊ शकतात किंवा स्पर्श केल्यास ते कोमल वाटतात. हे लक्षण मासिक पाळीच्या आधीच्या लक्षणांसारखेच आहे. तुमच्या स्तनाग्रांभोवतीचा भाग गडद होऊ शकतो आणि तुम्हाला तुमच्या स्तनांवर रक्तवाहिन्या देखील दिसू शकतात.
४. मनस्थिती मध्ये होणारे बदल
तुमच्या शरीरात होत असलेल्या संप्रेरकांमधील मोठ्या बदलांमुळे, तुमचा मूड लवकर बदलू शकतो असे वाटू शकते. एखाद्या क्षणी तुम्हाला खूप आनंदी वाटू शकते आणि पुढच्याच क्षणी तुम्ही खूप निराश होता. काहीही कारण नसताना काही वेळा तुम्हाला निराशा येते. ही सर्व गरोदरपणाची सामान्य लक्षणे आहेत.
५. वारंवार बाथरूमला जाणे
गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात संप्रेरकांमध्ये खूप बदल होतात परिणामी श्रोणि क्षेत्राभोवती रक्त प्रवाह वाढतो. हे गर्भाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी गर्भाशयाचे अस्तर घट्ट होण्यास मदत करते. शरीरातील वाढलेले द्रव हाताळण्यासाठी, मूत्रपिंडांना अधिक काम करणे आवश्यक आहे. हार्मोनल बदल आणि मूत्रपिंडातील बदल तसेच गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे मूत्राशयावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे वारंवार लघवीला जावेसे वाटते.
६. थकवा
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत, तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि नेहमीपेक्षा ऊर्जा कमी वाटते. थकल्यासारखे होते तसेच निद्रानाश सुद्धा होतो.
७. खाण्याच्या सवयींमध्ये बदल
तुम्हाला काही खाद्यपदार्थांची आवड निर्माण होऊ शकते आणि तिरस्कार वाटू शकतो. तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थाचा तिरस्कार असणे तुमच्यासाठी अगदी सामान्य आहे आणि तुम्हाला न आवडणारे पदार्थ आता तुम्हाला आवडू लागतील.
८. मॉर्निग सिकनेस
बहुतेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. गरोदरपणानंतर तीन आठवड्यांच्या आत हे अनुभवता येते. काही स्त्रियांना दिवसभर मळमळ जाणवू शकते तर काहींना दिवसाच्या विशिष्ट वेळी मॉर्निग सिकनेसची लक्षणे जाणवू शकतात.
९. छातीत जळजळ
गरोदरपणात छातीत जळजळ होणे खूप सामान्य आहे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे ऍसिड रिफ्लक्स येतो आणि छातीत जळजळ होते. गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात छातीत जळजळ होणे देखील खूप सामान्य आहे कारण पोटात वाढणारे बाळ वर ढकलले जाते आणि पोटातील आम्ल अन्ननलिकेकडे परत जाते.
१०. वासाची वाढलेली संवेदना
अनेक स्त्रियांना गरोदरपणात गंधाची तीव्र भावना जाणवते. तुम्हाला काही विशिष्ट वास आवडू शकतात आणि काही वास अजिबात येत नाहीत.
११. पचनाची समस्या
शरीरातील प्रोजेस्टेरॉनची वाढलेली पातळी विविध स्नायूंच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणते. ह्या बदललेल्या संप्रेरक पातळीमुळे स्नायू हळूहळू काम करू शकतात आणि त्यामुळे अन्न आतड्यांमधून हळूहळू पुढे सरकते. अनियमित मलप्रवाह किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते.
१२. चक्कर येणे
प्रोजेस्टेरॉनमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो आणि त्यामुळे चक्कर आल्यासारखे होऊ शकते.
१३. पाठदुखी
शरीरातील प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गरोदरपणात ओटीपोटाचा भाग झाकणारे अस्थिबंधन सैल होतात. तुमच्या मागच्या भागात हे सैल झालेले अस्थिबंधन पाठदुखीचे कारण बनू शकतात.
१४. भूक लागणे
गरोदरपणात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तुमचे शरीर तुम्हाला त्या दिशेने मार्गदर्शन करू शकते. तुम्हाला नेहमीपेक्षा आता जास्त भूक लागेल आणि तुम्हाला अनेकदा खाण्याची इच्छा होऊ शकते.
१५. डोकेदुखी
तुमच्या गरोदरपणात सुरुवातीला तुमच्या शरीरात बरेच काही बदलेल. वाढलेले हार्मोन्स, रक्ताचे प्रमाण आणि ताण यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते.
ही सुरुवातीची लक्षणे आहेत आणि ती तुम्हाला तुमच्या पहिल्या तिमाहीच्या सुरुवातीला जाणवू शकतात. या लक्षणांसोबतच तुम्हाला तुमच्या शरीरात इतरही अनेक बदल दिसू शकतात.
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत शरीरात होणारे बदल
तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात तुम्हाला कोणतेही स्पष्ट शारीरिक बदल दिसत नसले तरी तुमच्या शरीरात खालील बदल दिसून येतील:
- स्तनाच्या ऊतींमधील हार्मोनल बदलांमुळे तुमच्या स्तनाचा आकार वाढू शकतो.
- तुम्हाला पोट फुगलेले वाटू शकते आणि तुमचे कपडे कंबरेभोवती थोडे घट्ट वाटू शकतात.
- तुमचे स्तनाग्र आणि स्तनाग्रांभोवतीचा गोलाकार भाग गडद होऊ शकतो.
- तुम्हाला योनीतून स्त्राव वाढण्याचा अनुभव येऊ शकतो.
- अधूनमधून हलके डाग पडू शकतात (परंतु, सर्व स्त्रियांना हा अनुभव येत नाही).
- तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटू शकते.
- तुम्हाला सुस्त वाटून थकवा जाणवू शकतो.
हे काही बदल तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात अनुभवू शकता.’ बेबी बंप‘ दिसण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात तुमचे पोट बघून तुम्ही गरोदर असल्याचे वाटत नाही.
पहिल्या महिन्यात तुमच्या बाळाचा विकास
गरोदरपणात तुमच्या बाळाचा पहिल्या महिन्यात असा विकास होईल:
१. गर्भधारणेची प्रक्रिया
गर्भधारणेची प्रक्रिया लैंगिक संभोगानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांच्या आत कधीही होऊ शकते. बीजांड आणि शुक्राणू एकत्र येताच बाळ आकार घेऊ लागते. या टप्प्यावर, बाळाला तुम्ही ‘युग्मज‘ म्हणू शकता. युग्मज खूप वेगाने वाढते आणि अशा प्रकारे तुमच्या बाळाची वाढ आणि विकास सुरू होतो.
२. रोपण प्रक्रिया
अशा प्रकारे तयार झालेले युग्मज बीजवाहिन्यांमधून गर्भाशयाच्या दिशेने प्रवास करू लागतो. युग्मज तयार झाल्यानंतर चौथ्या दिवशी मोरूला हा पेशींचा संच तयार होतो. पुढील काही दिवसांत, मोरुला ब्लास्टोसिस्टमध्ये विभागला जातो आणि पोषणासाठी गर्भाशयाच्या भिंतीशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतो. जसजसे रोपण होते तसे, गर्भ योकसॅक आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याने वेढला जातो. त्यामुळे नाळ तयार होईपर्यंत गर्भाला पोषण मिळते.
३. विकासाची प्रक्रिया
तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात तुमच्या बाळाचे हृदय धडधडू लागते. तुमचे बाळ वाटाण्याच्या आकाराचे असले तरी हात, पाय आणि फुफ्फुसे तयार होऊ लागतात. बाळाचा चेहरा देखील तयार होण्यास सुरवात होईल. कान, डोळे, तोंड आणि नाक इत्यादी अवयव तयार होण्यास सुरुवात होईल.
गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यातील निदान आणि चाचण्या
तुम्ही गरोदर असल्याची शंका आल्यावर तुम्ही स्त्रीरोगतज्ञांना भेट दिली पाहिजे. तुम्हाला गर्भधारणा झाली आहे ह्याची पुष्टी करण्यासाठी तुमचे डॉक्टर खालील निदान आणि चाचण्या सुचवू शकतात:
१. वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी
- तुम्हाला तुमच्या शेवटच्या मासिक पाळीचा कालावधी, प्रवाह आणि वारंवारता शेअर करण्यास सांगितले जाईल.
- तुम्ही गर्भनिरोधक पद्धती वापरल्या असल्यास तुमचे डॉक्टर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला विचारतील.
- एक्टोपिक गर्भधारणा, ट्यूबल रोग, ट्यूबल लिगेशन, ट्यूबल मॅनिपुलेशन आणि दाहक रोग यासारख्या तुम्हाला आधी झालेल्या गरोदरपणाशी संबंधित समस्यांविषयी तुम्हाला शारीरिक तपासणी करावी लागेल.
- जर तुम्ही बाळासाठी आधी कुठलेही उपचार घेतले असतील तर तुम्हाला त्याविषयी तपशीलवार विचारले जाऊ शकते.
२. प्रयोगशाळा चाचण्या
- एचसीजी हार्मोनची उपस्थिती तपासण्यासाठी तुमच्या लघवीचा नमुना घेतला जाईल. परिणाम विश्वासार्ह नसल्यास रक्त चाचणी सुचविली जाऊ शकते.
- एचसीजी संप्रेरकांची वाढ हळूहळू किंवा कमी दराने होत आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जाते आणि त्यावरून एकटोपीक गरोदरपणाचा अंदाज लावला जाऊ शकतो.
- एचसीजीच्या उच्च पातळीचा अर्थ जनुकीय विकृती, एकाधिक गर्भधारणा हे असू शकते.
- गरोदरपणात कोणत्याही प्रकारची असामान्यता किंवा धोका तर नाही ना हे तपासण्यासाठी सीरम प्रोजेस्टेरॉन मोजले जाईल.
- शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी तपासण्यासाठी, एलिसा चाचणी वापरली जाईल.
३. अल्ट्रासाऊंड स्कॅन
गर्भधारणेला पुष्टी देण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन खूप प्रभावी आहेत. इंट्रायूटरिन गर्भधारणेसाठी ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासोनोग्राफी खूप फायदेशीर आहे. उच्च वारंवारता आणि प्रतिमेचे चांगले रिझोल्यूशन यामुळे योनिमार्ग स्कॅन करून घेणे सामान्य उदर स्कॅनपेक्षा चांगले असतात.
गरोदरपणाचा पहिला महिना – स्वतःची काळजी घेण्यासाठी टिप्स
एकदा तुमच्या डॉक्टरांनी तुमच्या गर्भधारणेची पुष्टी केल्यानंतर, गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात:
१. जन्मपूर्व काळजी
गरोदरपणात स्वतःची काळजी घेताना तुम्ही तुमच्या दिनचर्येपासून सुरुवात करू शकता. ह्या कालावधीत तुमच्या आहारात व्हिटॅमिन सप्लीमेंट्सचा समावेश असावा. फॉलिक अॅसिड हे सर्वात महत्त्वाचे सप्लिमेंट आहे. तुम्ही बाळाचा विचार सुरु केल्यानंतर ही सप्लीमेंट्स घेण्यास सुरुवात करू शकता. फॉलिक ऍसिड तुम्हाला निरोगी गर्भधारणा होण्यास मदत करेल आणि तुमच्या बाळाला न्यूरल ट्यूब दोष होण्याचा धोका कमी होईल.
२. गरोदरपणात डॉक्टरांच्या भेटी
तुम्ही तुमच्या प्रसूतीपूर्व काळात डॉक्टरांशी भेटीचे नियोजन करण्यास सुरुवात करू शकता. तुम्ही उपलब्ध असलेले विविध पर्याय निवडू शकता. त्यांची तुलना करून तुमच्या गरजेनुसार सर्वात योग्य पर्याय निवडू शकता. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकता असे योग्य डॉक्टर निवडणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि मित्रमत्रिणींकडून संदर्भ देखील घेऊ शकता.
३. केअरटेकर
तुम्ही केअरटेकर काळजीपूर्वक निवडावा. त्यासाठी मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांकडून शिफारसी घ्या.
४. स्वतःचे स्वतः औषध घेऊ नका
तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वी तुम्ही कोणतेही ओव्हर–द–काउंटर औषध घेऊ नका असा सल्ला दिला जातो. शंका असल्यास, संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
५. आरोग्य विमा
बर्याच कामाच्या ठिकाणी त्यांच्या कर्मचार्यांसाठी आरोग्य विमा योजना असतात, ह्या योजनांमध्ये प्रसूतीपूर्व काळजी आणि प्रसूतीचा खर्च समाविष्ट असतो. तुमच्या प्रसूती भत्त्यांबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी मानव संसाधन विभागाशी संपर्क साधा.
जर्नल बनवणे आणि ते अद्ययावत ठेवणे हे गरोदरपणावर लक्ष ठेवण्यासाठी चांगले असते. अशा प्रकारे, केवळ तुम्हीच नाही तर तुमचे काळजीवाहक तुमच्या प्रगतीवर आणि एकूण आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सक्षम असतील.
गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात घ्यावयाची खबरदारी – काय करा आणि करू नका
निरोगी गर्भारपण आणिबाळाच्या सुलभ प्रसूतीसाठी , तुम्हाला जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. ह्या बदलांमध्ये काय करा आणि करू नका हे तुम्हाला माहिती असल्यास त्याची तुमच्या गरोदरपणात सुरळीतपणे प्रगती करण्यास मदत होईल.
आपण काय करावे
खालील काही गोष्टी तुम्ही कराव्यात –
१. तुमचे द्रवपदार्थांचे सेवन वाढवा
गरोदरपणात हायड्रेटेड राहणे हे खूप महत्वाचे आहे कारण निर्जलीकरणामुळे गुंतागुंत होऊ शकते. हायड्रेटेड राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दैनंदिन पाण्याचे सेवन वाढवणे. तुम्ही एक अलार्म लावू शकता आणी तो तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करून देईल. तसेच, द्रवपदार्थाचे सेवन वाढवण्यासाठी फळांचे रस, भाज्यांचे रस किंवा सूप पिऊ शकता.
२. अधिक तंतुमय पदार्थ खा
बदलत्या हार्मोन्समुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे तुमच्या आहारात तंतुमय पदार्थांचा अधिक समावेश करावा असे सुचवले जाते. शेंगा, पालेभाज्या, तृणधान्ये आणि मोड आलेली कडधान्ये हे तंतुमय पदार्थ खाण्याचे चांगले मार्ग आहेत.
३. व्यायाम
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. हाच नियम गरोदरपणात सुद्धा लागू होतो. गरोदरपणात तुमच्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी तुम्ही सौम्य व्यायाम करावेत. शरीराला कोणतेही अनावश्यक श्रम न करता चालणे हा व्यायाम करण्याचा आदर्श मार्ग आहे. कोणत्याही व्यायामाचा नित्यक्रम करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.
४. पुरेशी झोप घ्या
गरोदरपणात तुमच्या शरीरात बरेच बदल होत असतात आणि यामुळे तुम्हाला खूप थकवा येतो. तुमची हरवलेली ऊर्जा परत मिळवण्यासाठी तुम्ही गरोदर असताना पुरेशी विश्रांती आणि झोप घेणे फार महत्वाचे आहे.
५. सकारात्मक रहा
तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा तुमच्या ब ळावर परिणाम होऊ शकतो. चांगलं संगीत ऐकणं, एखादं चांगलं पुस्तक वाचणं किंवा तुम्हाला आनंद देणारी कोणतीही क्रिया तुम्ही नियमित केली पाहिजे.
६. योनिमार्गाची स्वच्छता राखा
गरोदरपणात तुमच्या हार्मोनल पातळीला धक्का लागल्याने, तुम्हाला योनिमार्गातील कॅंडिडिआसिस सारखा योनिमार्गाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे, अशा प्रकारच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी योनीमार्गाची चांगली स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
आपण काय करू नये
येथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही गरोदरपणात करू नयेत.
१. कॅफिनयुक्त पेये पिणे
गरोदरपणात चहा, कॉफी किंवा कोला यांसारखी कॅफिनयुक्त पेये घेऊ नका. कॅफीनमुळे निद्रानाश, छातीत जळजळ आणि चिंता विकार होऊ शकतो. यामुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. तुमच्या बाळाचे जन्माचे वजन कमी असू शकते.
२. अस्वास्थ्यकर अन्न खाणे
अस्वास्थ्यकर किंवा जंक फूड खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे गर्भावस्थेतील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. तळलेले आणि तेलकट अन्न देखील तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करू शकतात. अस्वास्थ्यकर चरबी देखील तुमच्यासाठी किंवा तुमच्या बाळासाठी चांगले नाही. अशा प्रकारे, गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात हे पदार्थ टाळावेत.
३. दारू पिणे
ज्या माता त्यांच्या गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात अल्कोहोलचे सेवन करतात त्यांना जन्मतः दोष असलेली बाळे होण्याची शक्यता असते. बाळाला जन्मत:च जन्मजात दोष असण्याचा धोका जास्त असतो.
४. धूम्रपान
धुम्रपानामुळे तुमच्या बाळाला गंभीर आरोग्य विषयक समस्या शकते. गरोदरपणात धुम्रपान करणाऱ्या माता कमी वजनाच्या किंवा श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या बाळांना जन्म देण्याचा धोका जास्त असतो. केवळ सक्रिय धुम्रपानच नाही तर निष्क्रीय धुम्रपान देखील तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
५. घट्ट कपडे घालणे
गरोदरपणात तुमच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होतात. तुमचे शरीर आरामदायी ठेवण्यासाठी तुम्ही सैल कपडे घालावे त्यामुळे तुमचे शरीर आरामदायक राहण्यास मदत होते. तुमच्या ओटीपोटाकडील भागात घट्ट बसणारे कपडे घालू नका.
६. कठोर कामे करणे
गरोदरपणात वाकणे किंवा जड वजन उचलण्यास सक्त मनाई आहे. अशा क्रियाकलापांमुळे तुमच्या पोटाच्या भागावर अनावश्यक दबाव येऊ शकतो, त्यामुळे तुमच्या बाळाला इजा होऊ शकते.
७. लांबच्या प्रवासाला जाणे
गरोदरपणाचा पहिला महिना खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली ठेवणे टाळले पाहिजे. पहिल्या तिमाहीत लांबचा प्रवास टाळावा.
८. सौना आणि हॉट बाथ घेणे
तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात सौना किंवा गरम पाण्याचे स्नान टाळावे. तुमच्या शरीराच्या तापमानापेक्षा जास्त तापमान बाळासाठी घातक ठरू शकते. जास्त तापमान गर्भाच्या वाढ आणि विकासावर परिणाम करू शकते.
गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात घ्यायची काही इतर खबरदारी
काय करावे आणि काय करू नये ह्या गोष्टी वर नमूद केलेल्या आहेत. खाली काही सावधगिरीचा नियम दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाळू शकता.
- गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत लैंगिक संभोग करण्यापासून परावृत्त करा अन्यथा सुरक्षित पद्धतींचा अवलंब करा (त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला).
- स्वतःला कठोर रसायनांच्या संपर्कात आणू नका.
- तुमचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून, आपण योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
- मांजर, कुत्री, पक्षी इत्यादी पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळा.
- तुमचे किचन गार्डन किंवा लॉनमध्ये काम करताना सावधगिरी बाळगा. हातमोजे घाला.
- व्हिडिओ टर्मिनल डिस्प्लेच्या प्रदर्शनास टाळा.
बाळाच्या वडिलांसाठी काही टिप्स
एखाद्या आईने बाळाच्या आरोग्याबाबत जशी काळजी घेणे आवश्यक आहे तसेच वडिलांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. वडिलांसाठी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत.
१. प्रसूतीपूर्व आणि प्रसवोत्तर काळजीबद्दल जाणून घ्या
गरोदरपणाबद्दल जाणून घेणे वडिलांसाठी खूप महत्वाचे आहे. गरोदरपणाचे ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सुप्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचणे. परंतु, तुम्ही त्यासाठी इंटरनेट देखील ब्राउझ करू शकता. आपल्या विविध चिंता आणि काळजींबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोलणे देखील गरोदरपणाविषयी माहिती करून घेण्यासाठी एक चांगला मार्ग आहे.
२. पेपरवर्क हाताळणे
गरोदरपणात कागदोपत्री कामाचा समावेश असू शकतो. विशेषत: जेव्हा विमा मागितला जातो तेव्हा ते जास्त गरजेचे असते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला सर्व कागदपत्रांमध्ये मदत करू शकता. तिच्या आर्थिक बाबी हाताळण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरेल.
३. धीर धरा
गरोदरपणामुळे स्त्रिया भावनिक, चिडचिड्या किंवा विक्षिप्त होऊ शकतात. हे अगदी सामान्य आहे कारण त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. तिची अन्नाची लालसाही तुम्हाला अवास्तव वाटू शकते. परंतु शांत राहून संयम बाळगणे महत्वाचे असते. अशा परिस्थितीत तिची काळजी घेणे महत्वाचे असते.
गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात तुमच्या गर्भारपणाच्या प्रवासाला सुरुवात करत आहात. ह्या प्रवासातील अजून आठ महिने बाकी आहेत. तुम्ही जरी थकलेल्या असाल तरीसुद्धा, तुमच्या बाळाला पहिल्यांदा हातात धरल्यास तुमच्या सर्व वेदना विसरता येतील. म्हणून धीर धरा, काळजी घ्या. निरोगी गर्भारपणासाठी शुभेच्छा!
आणखी वाचा:
गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कसे झोपावे?
गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये घ्यायची महत्वाची काळजी