Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य गरोदरपणात खाऊ नयेत असे २४ अन्नपदार्थ

गरोदरपणात खाऊ नयेत असे २४ अन्नपदार्थ

गरोदरपणात खाऊ नयेत असे २४ अन्नपदार्थ

आयुष्यातील सर्वात सुंदर अश्या टप्प्यातून म्हणजेच गरोदरपणाच्या काळातून जात असताना तुमच्या शरीरात तर बदल होत असतातच परंतु तुमची संपूर्ण जीवनशैली, तुमचे प्राधान्यक्रम तसेच तुमची विचार करण्याची पद्धती ह्या मध्ये सुद्धा बदल होतात. गरोदरपणाच्या प्रवासात कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ह्याची तयारी ठेवा आणि तुमची व तुमच्या बाळाच्या चांगल्या आरोग्याची खात्री करा.

आई होताना अन्नपदार्थ हा तुमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. चांगल्या अन्नाने तुमचे आणि बाळाचे पोषण होते, परंतु काही हानिकारक पदार्थांमुळे गंभीर धोका सुद्धा पोहोचू शकतो. म्हणून गरोदर चाचणीवर त्या दोन रेघा दिसल्यापासून तुम्ही काय खाल्ले पाहिजे हे महत्वाचे आहे.

गरोदरपणात काय खाऊ नये?

निरोगी गर्भारपणासाठी गरोदर स्त्रीने पोषक अन्न खाणे महत्वाचे आहे. अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळू शकता कारण वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांमुळे तुमच्या बाळाला धोका पोहचू शकतो. गरोदरपणात काय खाणे टाळले पाहिजे ह्याची यादी करून आपण तुमच्या अन्नपदार्थांची निवड सोपी करूयात.

गरोदर असताना टाळावेत असे २४ अन्नपदार्थ

. कच्चे, कमी शिजवलेले किंवा दूषित समुद्री अन्न आणि मासे

काळजी करू नका, तुम्हाला तुमचे आवडते समुद्री अन्न संपूर्णपणे वर्ज्य करण्याची गरज नाही. परंतु तुम्ही काही प्रकारचे समुद्री अन्न टाळले पाहिजे.

  • तुमच्या आहारात कच्चे मासे नसावेत. म्हणजेच तुम्हाला सुशी खूप आवडत असेल तर तुम्ही ते खाण्याचा मोह पुढचे काही महिने टाळला पाहिजे.
  • काही मासे जसे की मॅकेरेल, शार्क्स, स्वार्ड फिश आणि टाईल फिश ह्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण खूप जास्त असते आणि गरोदरपणात पारा शरीरात गेल्यास बाळाचा विकास मंदावतो तसेच बाळाच्या मेंदूवर सुद्धा परिणाम होतो. त्या ऐवजी कमी पारा असलेले मासे योग्य प्रमाणात घ्यावेत. फ्रोझन समुद्री अन्न टाळावे कारण त्याला लिस्टेरियाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता असते आणि तो हानिकारक जिवाणू आहे. लिस्टेरियाचा संसर्ग झाल्यास तुमची अकाली प्रसूती होण्याचा धोका असतो आणि बाळापर्यंत संसर्ग पोहोचू शकतो.
  • काही मासे दूषित पाण्यामध्ये वाढतात उदा: ब्लुफिश, साल्मोन, वॉल आय, ट्राउट आणि स्ट्रिप्ड बास. हे मासे पॉलिक्लोरिनेटेड बायफिनील्स (PCB) च्या संपर्कात येतात आणि ते आई आणि बाळासाठी हानिकारक असते आणि त्यामुळे बाळाच्या प्रतिकार प्रणालीवर नकारात्मक परिणाम होतो.
  • कच्चे आणि कमी शिजवलेले शेलफिश उदा क्लॅम्स, मुसेल्स आणि ऑयस्टर. ह्या माशां मुळे आजार उद्भवतात. त्यांना शिजवल्यावर काही आजार प्रतिबंधित होतात परंतु शेवाळामुळे होणारे आजार होतातच त्यामुळे गरोदरपणात शेलफिश खाणे टाळा.

मासे ओमेगा३ फॅटी ऍसिडचे उत्तम स्रोत आहेत आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी ते मदत करतात त्यामुळे आहारात त्यांचा समावेश असणे महत्वाचे आहे. गरोदरपणात, मासे खाताना तुम्ही सावधानता बाळगली पाहिजे. गरोदरपणात स्वच्छ पाण्यातील मासे खाणे हा चांगला पर्याय आहे. ह्या मध्ये साल्मोन, श्रिम्प, ट्राउट आणि सार्डीन्स ह्या माशांचा समावेश होतो. तसेच कच्चे मासे खाण्याऐवजी, जे मासे १४५ डिग्री फॅरेनहाईट ला शिजवले आहेत असे मासे खा. शिजवल्याने बरेच संसर्ग आणि टॉक्झिन्स नष्ट होतात, आणि तुम्ही व तुमचे बाळ दोघांना धोक्यापासून संरक्षण मिळते.

. कच्ची किंवा मऊ उकडलेली अंडी

अंडी जेव्हा योग्यरित्या शिजवलेली असतात तेव्हा ती मोहक आणि खावीशी वाटतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना मऊ उकडलेली आणि कमी शिजवलेली अंडी आवडतात. तथापि, गरोदरपणात कमी शिजवलेली अंडी खाणे टाळावे कारण त्यांना साल्मोनेलाचा संसर्ग झालेला असू शकतो. ह्या जिवाणूमुळे उलट्या आणि जुलाब होतात. ज्या अन्नपदार्थांमध्ये कच्च्या अंड्याच्या वापर झाला आहे उदा: कस्टर्ड, मुसी ते पदार्थ सुद्धा खाण्याचे टाळले पाहिजे. गरोदरपणात अंडी खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अंड्याचा बलक चांगला घट्ट होईपर्यंत अंडी शिजवणे, किंवा मग अंडे नसलेली सलाड ड्रेसिंग्स, मेयॉनीज आणि अंडी नसलेले खाद्यपदार्थ निवडणे हा दुसरा पर्याय आहे. तुम्ही अंड्यांपासून संसर्ग होऊ नये म्हणून पाश्चराईज केलेली अंडी खाऊ शकता.

. कच्चे किंवा दुर्मिळ मांस

कच्चे किंवा दुर्मिळ मांस

मांसाहार घेणाऱ्या आईच्या आहारात मांसाचा समावेश करणे महत्वाचे आहे परंतु ते काळजीपूर्वक केले पाहिजे. संशोधनानुसार कच्च्या मांसामध्ये लिस्टेरिया नावाचा जिवाणू असतो आणि गरोदरपणात ते खाणे टाळले पाहिजे. कच्च्या मांसामध्ये टॉक्सओप्लास्मा गोंडी सारखे जिवाणू असतात त्यामुळे उलट्या होतात, बाळाला हानी पोहोचते तसेच गर्भपात सुद्धा होण्याची शक्यता असते.

नेहमी चांगले शिजवलेले मांस खाण्याचे लक्षात ठेवा. तसेच मांस घरी शिजवून खाणे चांगले. मांस शिजवताना थर्मोमीटरचा वापर करा. मिठाच्या पाण्याने मांस चांगले धुवून घ्या त्यामुळे सगळे जिवाणू नष्ट झाल्याची खात्री होईल.

. पाश्चराईझ न केलेले दुग्धजन्य पदार्थ

तुमच्या बाळाचा चांगला विकास होण्यासाठी तुम्ही दररोज आणि नियमित दूध पिणे हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला महत्वाची खनिजे, कॅल्शिअम आणि प्रोटीनचा पुरवठा होतो. परंतु लक्षात ठेवा की तुम्ही पाश्चराईझ केलेले दूधच घ्या. पाश्चराईझ न केलेल्या दुधामध्ये रोगजनक घटक असू शकतात त्यामुळे विषबाधा होऊ शकते. त्यामुळे पाश्चराईज न केलेले सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ टाळा.

लक्षात ठेवा की तुम्ही नेहमीच ताजे चांगले उकळलेले दूध घेतले पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवून तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता आणि गर्भारपणाचा आनंद घेऊ शकता.

. पाश्चराईझ न केलेले मऊ चीझ

ज्याने चीझ खाल्ले आहे त्या प्रत्येकाला ते आवडते. परंतु जेव्हा तुम्ही गर्भवती असता तेव्हा चीझ खाताना तुम्ही काही नियम पाळले पाहिजेत. बऱ्याच पाश्चराईझ न केलेल्या मऊ चीझ मध्ये लिस्टेरिया नावाचा बॅक्टेरिया असतो आणि त्यामुळे गरोदरपणात टाळावेत अशा पदार्थांमध्ये त्याचा वरचा क्रमांक लागतो.

मऊ चीझ ऐवजी, घट्ट चीजचा पर्याय निवडा. त्यापैकी काही म्हणजे शेडर चीझ आणि स्विस चीझ. ‘लिस्टेरियाविरहित पाश्चरायझेशनअसे लेबल असलेलेच चीझ विकत आणा.

. न धुतलेल्या भाज्या आणि फळे

गरोदरपणामध्ये फळे आणि भाज्या तुमच्यासाठी आणि बाळासाठी खूप पोषक असतात ह्यात काही शंकाच नाही. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल जगातील ७८% लोक फळे आणि भाज्या न धुता खातात. अस्वच्छ फळे आणि भाज्यांवर हानिकारक कीटकनाशके आणि जंतुनाशके तर असतातच परंतु त्यावर टॉक्सोप्लास्मा गोंडी आणि लिस्टेरिया सारखे रोगकारक घटक सुद्धा वाढत असतात. न धुतलेली मोड आलेली कडधान्ये, कोबी, लेट्युस ह्या काळात टाळले पाहिजेत.

गरोदरपणात टाळली पाहिजेत अशा फळांमध्ये पपई, अननस आणि द्राक्षे ह्यांचा समावेश होतो. किंबहुना, काही ठिकाणी गर्भारपण टाळण्यासाठी पपई हा नैसर्गिक उपाय केला जातो. आणि त्यामुळे गर्भपात होतात. कच्ची पपई ही खूप हानिकारक असते कारण त्यामुळे प्रसूतीकळा प्रेरित होतात.

तुम्ही खात असलेले प्रत्येक फळ आणि भाजी नीट स्वच्छ धुवून घेतली पाहिजे. नीट निवडून दुसऱ्या भांड्यात काढून ठेवली पाहिजेत. तसेच फ्रिजमध्ये बराच काळ भाज्या आणि फळे ठेवणे आणि खाणे टाळा. तुमच्या सगळ्या भाज्या चांगल्या शिजवून घ्या आणि पालेभाज्या चांगल्या शिजल्या आहेत ह्याची खात्री करा.

. कच्ची मोड आलेली कडधान्ये आणि ज्यामुळे ऍलर्जी होते असा सुकामेवा

कच्ची मोड आलेली कडधान्ये म्हणजे प्रथिने आणि खनिजद्रव्यांचा उत्तम स्रोत होय. परंतु गरोदरपणात खाऊ नये अशा पदार्थांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. कारण त्यामध्ये हानिकारक जिवाणू आणि विषाणू असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अन्नपदार्थातून विषबाधा होण्याची शक्यता असते. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही मोड आलेली कडधान्ये खाता तेव्हा भाजून किंवा शिजवून घ्या. थोडे सिझनिंग केल्यावर त्यांची चव चांगली लागते.

तुम्ही गरोदरपणात वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्यामेव्याचा आनंद घेऊ शकता. सुक्यामेव्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात आणि बाळाच्या विकासासाठी त्याची मदत होते. परंतु त्यातील काही सुकामेव्यामुळे शरीरावर ऍलर्जी आणि रॅशेस येतात. जरी तुम्हाला सुरुवातीला त्याची ऍलर्जी येत नसेल तर तुम्हाला त्याची पुढे जाऊन ऍलर्जी होऊ शकते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून कुठला सुकामेवा गरोदरपणाच्या आहारात समाविष्ट केला पाहिजे आणि कुठला टाळला पाहिजे ह्याविषयी माहिती करून घ्या.

. हॉटेलमधील जेवण किंवा दुकानातील सलाड

गरोदर स्त्रीसाठी हॉटेल मधून जेवण मागवताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे कारण ते पदार्थ करताना त्यामध्ये कुठल्या घटकांचा वापर केला आहे हे माहिती नसते. हॉटेल मध्ये किंवा दुकानात उपलब्ध असलेले सॅलेड किंवा अन्नपदार्थ टाळणे खूप महत्वाचे आहे. सलाड मध्ये वापरली जाणारी फळे आणि भाज्या नीट धुतल्या आहेत किंवा नाही हे सुद्धा माहिती नसते. त्या भाज्या खूप आधीच चिरून ठेवलेल्या असण्याची शक्यता असते.

तुम्ही घरी सलाड करू शकता. फळे आणि भाज्या चांगल्या धुवून घ्या आणि मांस चांगले शिजवून घ्या. तुम्हाला हवे तसे सलाड करण्याचे स्वातंत्र्य घरी मिळते.

. अस्वछतेत काढलेला फळांचा रस

तुम्ही म्हणाल की गरोदरपणात फळांचा रस घेणे हा नेहमीच चांगला पर्याय असतो. परंतु कच्ची फळे आणि भाज्यांमध्ये हानिकारक विषाणू आणि जिवाणू असण्याचा खूप जास्त धोका असतो. तुमची फळांचा रस घेण्याची इंचच तुम्ही घरी पूर्ण करू शकता जेणेकरून तुम्हाला स्वच्छ आणि ताजा फळांचा रस मिळेल.

जर तुम्ही हवाबंद डब्यातील ज्यूस आणले तर ते पाश्चराईझ केलेले आणि फ्रिज मध्ये ठेवलेले आणावेत. तुमची प्रतिकार प्रणाली मजबूत नसते आणि पाश्चराईझ न केलेल्या ज्यूस मध्ये असलेल्या जिवाणूंमुळे संसर्ग होण्याचा धोका असतो.

१०. जास्त कॅफेन

तुम्हाला जरी खूप जास्त कॉफी आवडत असली तरी गर्भारपणात तुमच्या आहारात कॉफीचा समावेश करणे चांगले नाही. कॉफी हे एक डाययुरेटिक आहे आणि त्यामुळे लघवीला जास्त होते आणि निर्जलीकरण लवकर होते. कॅफेनमुळे बाळाचे जन्मतः वजन सुद्धा कमी असते. खूप जास्त प्रमाणात कॅफेन घेतल्यास बाळाचा मृत्यू किंवा गर्भपाताची शक्यता वाढते.

दिवसातून २कप किंवा २०० मिली ह्यापेक्षा जास्त कॉफी घेत नाही ना ह्याकडे लक्ष द्या. तसेच एनर्जी ड्रिंक्स किंवा औषधांमधून कॉफीचे प्रमाण आहे का हे माहित करून घेण्यासाठी डॉकटर किंवा फार्मासिस्ट ची मदत घ्या.

११. वनौषधी आणि औषधी चहा

बरेच लोक गरोदर असताना औषधी टॉनिक किंवा चहा घेण्याचा सल्ला देतात, परंतु त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. काही वनौषधी जास्त प्रमाणात घेतल्यास तुमची अकाली प्रसूती होण्याची तसेच गर्भपाताची शक्यता वाढते. तसेच तुम्ही तुमच्यासाठी हानिकारक वनौषधी आणायची शक्यता जास्त असते कारण त्यांची गुणवत्ता चांगली आहे की वाईट हे सिद्ध करण्याचा कोणताही मार्ग नाही.

सेनामुखी, दवणा ह्यासारख्या वनस्पती टाळल्या पाहिजेत कारण दुसऱ्या औषधांप्रमाणे त्यांची चाचणी झालेली नसते. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा ऊर्जेची कमतरता भासत असेल तर तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला व्हिटॅमिन्स च्या पूरक गोळ्या लिहून देण्यास सांगा. औषधी काढे घेण्यापेक्षा तुमचा नेहमीचा चहा घ्या.

१२. हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ

गरोदरपणाच्या कालावधीत हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ घेणे टाळले पाहिजे कारण त्यामध्ये संरक्षक घटक असतात त्यामुळे ते पदार्थ जास्त दिवस टिकतात. तसेच, डब्याच्या धातूमध्ये बिसफेनॉल ए, हा रासायनिक पदार्थ असतो त्यामुळे बाळाच्या अंतर्गत स्रावांवर परिणाम होतो. हे पदार्थ जास्त काळ तसेच राहिल्याने त्यामध्ये हानिकारक जिवाणू सुद्धा असू शकतात.

तुम्हाला जे पदार्थ हवाबंद डब्यात मिळतात ते तुम्ही ताजे विकत आणू शकता. तसेच नेहमी ताज्या फळांची आणि भाज्यांची निवड करा.

१३. नायट्रेट समृद्ध अन्नपदार्थ

अन्नपदार्थ जास्त टिकावेत म्हणून नायट्रेट हे रसायन काही अन्नपदार्थांमध्ये मिसळले जाते. तथापि त्यामुळे गर्भवती स्त्रियांना आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. जर नायट्रेटची रक्तातील हिमोग्लोबिन सोबत प्रक्रिया झाली तर अशा प्रथिनांची निर्मिती होते जे नाळेला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात अडथळा आणतात. काही अन्नपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात नायट्रेट असते, जसे की डाएट सोडा, सॉसेज, गोडी वाढवणारे कृत्रिम पदार्थ इत्यादी. ह्या अन्नपदार्थांमध्ये कमी पोषण असते आणि गरोदरपणात हे अन्नपदार्थ टाळलेच पाहिजेत.

१४. खूप गोड अन्नपदार्थ

तुम्हाला गरोदरपणाच्या कालावधीत बऱ्याच वेळा आईस्क्रीम आणि चॉकलेट्स खावीशी वाटतील. तथापि, त्यामध्ये जास्त प्रमाणात साखर असल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल आणि त्यामुळे बाळास हानी पोहोचू शकते. तुम्ही दिवसातून किती साखर खात आहात ह्याकडे लक्ष ठेवा आणि साखर खाणे टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

तथापि, आईस्क्रीम कडे अगदीच पाठ वळवली पाहिजे असे नाही, कधीतरी एखादेवेळी आईस्क्रीम खाल्ल्याने काही नुकसान होणार नाही.

१५. रस्त्यावरील पदार्थ

रस्त्यावर मिळणारे तुमच्या आवडीचे पदार्थ खाणे टाळा. ते पोषक तर नसतातच परंतु त्यांच्यामुळे अन्नपदार्थांमधून विषबाधा होते आणि पचनाचे इतर प्रश्न सुद्धा निर्माण होतात. त्यापेक्षा तुम्ही ते घरीच तयार करा त्यामुळे चांगल्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची खात्री राहील.

१६. अतिरिक्त चरबीयुक्त पदार्थ

गरोदरपणात तसेही तुमचे वजन वाढणारच आहे तर तुम्ही जास्तीत जास्त चरबीयुक्त पदार्थ खाण्याची वाट पहात आहात का? तर तो मोह टाळा कारण चरबीयुक्त पदार्थांमुळे तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढेल आणि तुमची जाडी वाढून हृदयरोग होण्याची शक्यता बळावते. चरबीयुक्त पदार्थ प्रमाणात खा.

ओमेगा ३,,९ फॅटी ऍसिड युक्त अन्नपदार्थ खा कारण तुमच्या बाळाच्या विकासासाठी ते फायद्याचे असतात. अवोकाडो, सुकामेवा, ऑलिव्ह, भोपळ्याच्या बिया ह्यांचा त्यामध्ये समावेश होतो. तथापि, हे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका आणि योग्य प्रमाणात व्यायाम करा.

१७. जास्त प्रमाणात कृत्रिम गोडी वाढवणारे पदार्थ

तुम्हाला असे वाटत असेल की साखरेला हे कृत्रिम गोडी वाढवणारे पदार्थ चांगला पर्याय आहे, परंतु गरोदरपणात ते घेणे हे आरोग्यासाठी चांगले नाही. सॅकरीन हे सामान्यपणे गोडी वाढवण्यासाठी वापरला जाणारा कृत्रिम पदार्थ आहे. हा पदार्थ नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचतो, म्हणजेच बाळ सुद्धा ही कृत्रिम साखर घेते. तुम्ही हे गोडी वाढवणारे कृत्रिम पदार्थ मर्यादित प्रमाणात घेऊ शकता.

१८. डॉक्टरांनी लिहून न दिलेली व्हिटॅमिन्स

गरोदर महिलांच्या पोषणासाठी व्हिटॅमिन्स हा उत्तम स्रोत आहे, परंतु ते जास्त प्रमाणात घेतल्यास हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे बाळाची नॉर्मल वाढ होत नाही आणि अकाली प्रसूती होते. व्हिटॅमिन्स घेताना तुमच्या मनाने घेऊ नका. डॉक्टरांनी लिहून दिलेलीच व्हिटॅमिन्स घ्या.

१९. कर्बोदके

कर्बोदके

तुमच्या शरीरासाठी कर्बोदके हा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे, आणि त्यामुळे तुमच्या गरोदरपणातील आहारात सुद्धा कर्बोदके महत्वाचा भाग आहेत. तथापि, बिस्किटे किंवा कॉर्न सिरप सारख्या साध्या कर्बोदकांपासून सावध रहा. जरी अशी कर्बोदके तुमच्या बाळासाठी हानिकारक नसली तर त्यामुळे वेदनादायी बद्धकोष्ठता होऊ शकते. प्रयत्न करा आणि बारीक पिठापासून तयार केलेले पदार्थ टाळा. त्याऐवजी जास्त तंतुमय पीठे म्हणजेच गव्हाचे पीठ, तसेच ब्राऊन ब्रेड आणि संपूर्ण धान्य खा.

२०. भाजलेले बेकरी पदार्थ

जरी तुम्हाला भाजलेले पदार्थ आवडत असतील तरी गरोदरपणात असे पदार्थ टाळले पाहिजेत. कारण कच्च्या पिठामध्ये हानिकारक जिवाणूंची वाढ होऊ शकते आणि त्यामुळे विषबाधा होऊ शकते आणि बाळाला हानी पोहोचू शकते. जर तुम्हाला हे पदार्थ खूप खावेसे वाटत असतील तर प्रसिद्ध आणि सर्वश्रुत अशा बेकरी मधूनच असे पदार्थ घ्यावेत.

२१. ज्येष्ठमध

बऱ्याच पदार्थांमध्ये ज्येष्ठमधाचा वापर केला जातो, ज्येष्ठमधामुळे काही नुकसान होत नाही. परंतु गरोदरपणात त्यामुळे कळा सुरु होऊ शकतात आणि त्यामुळे अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदरपणात ज्येष्ठमध टाळण्याचा प्रयत्न करा.

२२. शिळे अन्नपदार्थ

तुम्हाला उरलेले अन्नपदार्थ फेकून देण्यास संकोच वाटेल परंतु तुम्ही ह्या नऊ महिन्यात शिळे अन्न खाणे टाळले पाहिजे. जरी हे अन्न फ्रिज मध्ये ठेवलेले असेल तर त्यामध्ये रोगकारक जिवाणू असण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी ताजे अन्न खा. जर तुम्हाला काहीच पर्याय नसेल तर शिळे अन्न दुसऱ्या एका स्वच्छ भांड्यात खाण्याअगोदर चांगले गरम करून घ्या.

२३. मसालेदार पदार्थ

होणाऱ्या आईने मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे. गरोदरपणात पित्त आणि जळजळ होण्याचा त्रास मसालेदार पदार्थांमुळे वाढू शकतो. मसालेदार पदार्थांमुळे मॉर्निंग सिकनेस होऊ शकतो. मसाले नेहमी मर्यादित प्रमाणात खा. जेव्हा तुम्ही मसालेदार पदार्थ खाता तेव्हा तुम्ही एक ग्लास दूध किंवा एक चमचा मध खा त्यामुळे जळजळ होणार नाही.

२४. मद्यपान

मद्यपान टाळणे

मद्यपान करणे हे फक्त गर्भारपणात नाही तर नेहमीच तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. पण गरोदर असताना कधीतरी मद्य घेतले तर चालेल अशी तुमची समजूत असेल तर ती संपूर्णतः चुकीची आहे.

अल्कोहोल नाळेद्वारे तुमच्या बाळापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे गर्भपात होऊ शकतो किंवा बाळाचा पोटात मृत्यू होण्याची शक्यता असते. तसेच आयुष्यभरासाठी तुमच्या बाळामध्ये शारीरिक किंवा बौद्धिक कमतरता असू शकते अशा स्थितीला इंग्रजीमध्ये Foetal Alcohol Spectrum Disorder (FASD) असे म्हणतात. गरोदरपणात मद्याचे प्राशन करणे टाळणे हे सर्वात उत्तम.

आता तुमच्याकडे २५ प्रकारचे अन्नपदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या काळात खाणे टाळले पाहिजे. वरिल कुठलाही अन्नपदार्थ टाळण्याअगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. गरोदरपणात कुठला आहार घ्यावा ह्याविषयी आहारतज्ञांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला संतुलित आहार घेण्यास मदत होईल. जर तुम्हाला गरोदरपणात काही विशिष्ट अन्नपदार्थ खावेसे वाटले तर थोड्या प्रमाणात खाऊ शकता आणि आहाराचे सुरक्षित पर्याय निवडा.

आणखी वाचा:

निरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे १५ अन्नपदार्थ
गरोदरपणात खावीत अशी १६ सर्वोत्तम फळे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article