Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूतीनंतर घ्यायची काळजी प्रसूतीनंतर होणारा मूळव्याध

प्रसूतीनंतर होणारा मूळव्याध

प्रसूतीनंतर होणारा मूळव्याध

गरोदरपणात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर तुमचा त्रास संपेल असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. तुमचे बाळ तुमची सर्वात महत्वाची प्रायोरिटी असली तरीसुद्धा तुम्ही स्वतः तुमच्या शरीराची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर योनीमार्गे प्रसूतीमुळे मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो.

मूळव्याध म्हणजे काय?

बाळाच्या जन्मानंतर मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते. गुदाशयाकडील भागातील सुजलेल्या नसा म्हणजे मूळव्याध होय. नसांना सूज येऊन त्या एकत्र येऊन त्यांची गाठ तयार होते. आणि ती गुदद्वारातून बाहेर पडू लागते. मुळव्याधीमुळे तीव्र खाज सुटू शकते किंवा ते वेदनादायक असू शकते. शौचाच्या वेळी गुदाशयातून रक्तस्त्राव होतो.

मूळव्याधीचा आकार भुईमुगाइतका लहान असू शकतो किंवा तो द्राक्षाच्या आकाराइतका मोठा असू शकतो. गरोदरपणात विकसित झालेला मूळव्याध प्रसूतीनंतर कमी होतो, काहीवेळा बाळाच्या जन्मानंतर मूळव्याधीची समस्या दीर्घकाळ टिकू शकते. बाळाच्या जन्माच्या वेळेला ज्या स्त्रियांना मूळव्याध होतो त्यांना मूळव्याधीची समस्या प्रसूतीनंतर सुद्धा राहते.

गरोदरपणात मूळव्याध कशामुळे होतो?

गरोदरपणात मूळव्याध वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो.

गरोदरपणात मूळव्याध कशामुळे होतो?

 • गरोदरपणात, शरीरात प्रोजेस्टेरॉनची वाढ होते त्यामुळे शिरा शिथिल होतात आणि त्यांना सूज येते.
 • प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे बद्धकोष्ठता सुद्धा होते कारण त्यामुळे आतड्यांच्या हालचाली मंदावतात.
 • बद्धकोष्ठता झाल्यास तुम्हाला शौचाच्या वेळेस त्रास होतो. ह्या ताणामुळे गरोदरपणात मूळव्याध होऊ शकतो किंवा प्रसूतीनंतर मूळव्याधीचा त्रास जास्त वाढू शकतो.
 • गर्भाशयाचा आकार जसजसा वाढत जातो तसतसे ओटीपोटाच्या भागातील नसांवर (इंफेरीअर व्हेना कावा) दबाव येतो. इंफेरीअर व्हेना कावा ही एक मोठी नस आहे, ही नस आपल्या शरीराच्या खालच्या भागातून रक्त घेते. गर्भाशयाच्या खाली असलेल्या शिरा दाबल्या जातात आणि मोठ्या होतात.
 • प्रसूतीच्या वेळी जास्त जोर दिल्याने देखील मूळव्याध होऊ शकतो.

प्रसूतीनंतर मूळव्याध झाल्याची चिन्हे आणि लक्षणे

 • गरोदरपणात मूळव्याध झाल्यावर गुदद्वारात खाज सुटते. गुदद्वाराकडील भागात उष्णता वाढते आणि जळजळ होते. शौचास होताना वेदना होतात.
 • जसजसे दिवस जातील तसतसे तुम्हाला वेदना वाढल्यासारखे वाटू शकते, विशेषतः बसलेले असताना ह्या वेदना जास्त वाढतात. ह्या कालावधीत गुदद्वाराकडील भागात वेदना सतत जाणवू लागतात.
 • शौचास साफ न होऊन त्यानंतर जळजळ आणि खाज सुटणे हे दीर्घकालीन मूळव्याधीचे प्रमुख लक्षण आहे.
 • गुदाशयाच्या सभोवतालच्या भागातील ऊतींची जळजळ होणे, क्रॅक तयार होणे आणि रक्तस्त्राव ही पुढील समस्यांची चिन्हे आहेत.

निदान

रोगाचे निदान करण्यासाठी, गुदद्वाराची एक साधी आणि जलद तपासणी आवश्यक आहे. बाह्य मूळव्याध असल्यास गुदद्वारावर गोलाकार वाटण्यासारखे भाग असतात आणि ते सहज ओळखता येतात. अंतर्गत मूळव्याधांसाठी, त्यांचा आकार आणि प्रमाण निश्चित करण्यासाठी मॅन्युअल तपासणी आवश्यक असते. एन्डोस्कोपिक चाचणी (सिग्मोइडोस्कोपी) आणि रेडिओलॉजिकल चाचणी (इरिगोस्कोपी) देखील काही प्रकरणांमध्ये आवश्यक असू शकते.

गरोदरपणानंतरच्या मूळव्याधीवर निदान

गुंतागुंत

क्वचित प्रसंगी, एखाद्याला मुळव्याधीमुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यापैकी सामान्यपणे आढळणारी गुंतागुंत म्हणजे:

 • मुळव्याधीमुळे काही स्वच्छतेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. शौचास केल्यानंतर गुदद्वाराजवळील भाग स्वच्छ करणे कठीण होऊ शकते.
 • दीर्घकाळ गुदद्वाराभोवतीच्या अस्वच्छतेमुळे इतर विविध संसर्ग होऊ शकतात.
 • रक्तस्त्राव चिंताजनक असू शकतो, परंतु त्यामुळे क्वचितच कोणतीही मोठी समस्या निर्माण होते.
 • मूळव्याध असल्यास शौचाच्या वेळी वेदना होणे ही एक सामान्य तक्रार आहे.

गरोदरपणानंतरच्या मूळव्याधीवर उपचार आणि औषधे

मूळव्याध आणि गुदद्वाराच्या दुखापतीपासून मुक्त होण्यासाठी ओव्हरकाउंटर औषधे देखील उपलब्ध आहेत.

गरोदरपणानंतरच्या मूळव्याधीवर उपचार आणि औषधे

1. तोंडाद्वारे घेता येणारी वेदनाशामक औषधे

प्रसूतीनंतर मूळव्याधीवर उपाय म्हणून तोंडातून घेता येणारी वेदनाशामक औषधे घेतली जाऊ शकतात. यामध्ये आयबुप्रोफेन, ऍस्पिरिन किंवा अॅसिटामिनोफेन इत्यादींचा समावेश होतो. ह्यामुळे प्रसूतीनंतरच्या मूळव्याधीचा त्रास मोठ्या प्रमाणात दूर होतो.

2. मूळव्याधीवर क्रीम

मुळव्याधीवरील क्रीम मुळे वेदना होणे, खाज सुटणे आणि रक्तस्त्राव ह्या सारख्या लक्षणांपासून आराम मिळतो. तुमच्या लक्षणांनुसार, लवकर आराम मिळण्यासाठी योग्य क्रीम निवडा. हायड्रोकॉर्टिसोन असलेली क्रीम्स खाज सुटण्यास मदत करतात, तर प्रमोक्सिन आणि बेंझोकेन क्रीम्स वेदनांवर प्रभावी असतात.

3. ऑस्मोटिक एजंट किंवा स्टूल सॉफ्टनर्स

स्टूल सॉफ्टनर हे स्टूल मऊ ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही आणि ताण देखील टाळला जातो. डोक्यूसेट (१०० मिग्रॅ ते ३०० मिग्रॅ) एक आठवड्यासाठी दररोज घेण्याची शिफारस केली जाते.

4. स्नेहक रेचक

गरोदरपणानंतरच्या मूळव्याधीवर उपचार म्हणून खनिज तेलासारख्या स्नेहक रेचकांचा वापर केला जातो. ते आतडे आणि मलामधील पाण्याचे प्रमाण राखण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतात. मल मऊ होत असल्याने ते आतड्यांमधून सहज जाते.

5. बल्क फॉर्मिंग एजंट

बल्कफॉर्मिंग एजंट मल मऊ करण्यासाठी आणि सहज आतड्याची हालचाल सुलभ करण्यासाठी रेचक आहेत. हे एजंट नैसर्गिक आणि सिंथेटिक स्त्रोतांकडून घेतले जातात आणि ते खाल्ल्यानंतर १२ ते ३६ तासांच्या आत कार्य करतात.

6. प्रोबायोटिक्स

प्रोबायोटिक्स हे अनुकूल किंवा फायदेशीर बॅक्टेरिया आहेत आणि ते पचन सुलभ करतात. जेव्हा एखाद्याला मूळव्याध असतो तेव्हा दही हे एक शक्तिशाली अन्न आहे कारण त्यात थेट चांगले जिवाणू असतात. केफिर हा एक दह्यासारखा पदार्थ आहे आणि तो आतड्यांसंबंधी हालचाल उत्तेजित करतो आणि निर्जलीकरण मोठ्या प्रमाणात कमी होते.

प्रोबायोटिक्स

मूळव्याधीवर घरगुती उपचार

गरोदरपणातील मूळव्याधीवर नैसर्गिक उपाय शोधत असाल तर काही चांगल्या प्रभावी उपायांसाठी पुढे वाचा.

 • आइस पॅक: त्वरीत बरे होण्यासाठी संक्रमित भागावर बर्फ लावा. बर्फाच्या पॅकवर मऊ आवरण असल्याची खात्री करा. वेदनाशामक मलम लावलेले कोल्ड कॉम्प्रेस देखील जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी एक प्रभावी तंत्र आहे.
 • शेळीचे दूध: १० ग्रॅम मोहरी आणि १९ चमचे शेळीचे दूध चांगले एकत्र करून नाश्त्यापूर्वी प्या. असे केल्याने मुळव्याधीमुळे निर्माण होणारी जळजळ आणि वेदनांमध्ये लक्षणीय बदल दिसून येतील.
 • हळद: हा नैसर्गिक घटक त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखला जातो आणि मूळव्याध बरे करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. मोहरीच्या तेलात हळद आणि थोडा कांद्याचा रस मिसळा. तात्काळ आराम मिळण्यासाठी ही पेस्ट संक्रमित भागात लावा.
 • कांदे: लाल कांद्याचा एक तुकडा बारीक चिरून घ्या. त्यात साखर घाला आणि हे मिश्रण दिवसातून दोनदा सेवन केल्याने मज्जातंतूंचा त्रास कमी होतो. रक्तस्त्राव कमी होईल आणि जळजळ देखील होईल.
 • डाळिंबाची साल: डाळिंबाची साल ठेचून त्यात गरम पाणी घाला. हे मिश्रण थंड होऊ द्या आणि मुळव्याधीपासून आराम मिळण्यासाठी दिवसातून दोनदा प्या.
 • काळी मोहरी आणि दही: एक चमचा काळी मोहरी कुटून एक कप ताज्या दह्यात घाला. न्याहारीपूर्वी त्याचे सेवन करा आणि नंतर थोडे ताक प्या. हा उपचार स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आदर्श आहे.
 • आले: अदरक, पुदिना आणि ताज्या लिंबाचा रस ह्या मिश्रणाचे दररोज सेवन केल्यास प्रसूतीनंतरच्या मुळव्याधीपासून आराम मिळतो. मिश्रण अधिक प्रभावी होण्यासाठी त्यात थोडे मध घाला.
 • सिट्झ बाथ: सिट्झ बाथ हे एक लहान प्लास्टिक बेसिन आहे आणि ते टॉयलेट सीटवर ठेवता येते. त्यात कोमट पाणी घाला आणि गुदाशयाचा भाग दिवसातून ३४ वेळा त्यामध्ये १० मिनिटे भिजवा. मूळव्याधमुळे होणारी वेदना आणि अस्वस्थता असे केल्याने कमी होईल.

उपचार प्रक्रियेस गती कशी द्यावी?

बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भविष्यात मूळव्याधीची वाढ रोखण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर ठेवणे महत्वाचे आहे. खालील सवयी तुम्हाला असे करण्यास मदत करू शकतात:

 • बद्धकोष्ठता टाळण्यासाठी दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या.
 • भरपूर फळे, भाज्या, बीन्स आणि संपूर्ण धान्य खा त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळतील.
 • केगल व्यायाम गुदाशय क्षेत्रातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. ते गुदद्वाराचे स्नायू मजबूत करतात आणि मूळव्याध होण्याची शक्यता कमी करतात. केगल व्यायाम मूत्रमार्ग आणि योनीजवळील भाग मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि त्यामुळे प्रसूतीनंतर पुनर्प्राप्ती सुलभ होऊ शकते.
 • दररोज वेगाने चालण्याच्या व्यायामाचा समावेश आपल्या दिनक्रमात करा.
 • शौचास लागल्यावर लगेच जा. ते धरून ठेवल्याने शौचास होणे कठीण होईल कारण मल अधिक कोरडा होईल.
 • आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसू नका. त्यामुळे आजूबाजूच्या भागावर मोठा ताण पडेल.

मूळव्याध कसा टाळावा?

मूळव्याध प्रतिबंध ही एक सोपी प्रक्रिया आहे आणि दैनंदिन आयुष्यात त्याचा सहज समावेश केला जाऊ शकतो. गरोदरपणात आणि नंतर ह्या घटना टाळण्यासाठी विविध पावले उचलावी लागतील.

 • गर्भधारणेपूर्वी, गरोदरपणात आणि नंतरसुद्धा सक्रिय जीवनशैली ठेवा.
 • पेल्विक स्नायूंचे व्यायाम केल्याने ओटीपोटाजवळील स्नायू मजबूत होतात आणि रक्त परिसंचरण सुधारते.
 • बद्धकोष्ठता आणि शौचास करताना जोर द्यावा लागू नये हे मूळव्याध दूर ठेवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

डॉक्टरांना कधी फोन करावा?

तुम्हाला गुदामार्गातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोला. जर घरगुती उपायांनी कुठलाही फायदा झाला नाही तर डॉक्टरांची मदत घेण्याची वेळ आलेली आहे. मूळव्याध आणि वेदना वाढणे हे देखील डॉक्टरांची मदत घेण्याचे सूचक आहेत. त्या जागी रक्ताची गुठळी झालेली असू शकते आणि ती काढण्यासाठी लहान प्रक्रियेची आवश्यकता असू शकते.

प्रसूतीनंतर होणारा मूळव्याध जीवघेणा नसतो. परंतु त्यामुळे वेदना आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. सक्रिय जीवनशैली ठेवल्यास मूळव्याध टाळला जाऊ शकतो किंवा नियंत्रित केला जाऊ शकतो. औषधांसह नैसर्गिक उपाय या स्थितीवर मात करण्यास मदत करू शकतात.

आणखी वाचा:

प्रसूतीनंतर होणारी सांधेदुखी
प्रसूतीनंतर वजन कसे कमी कराल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article