In this Article
गरोदरपणाचा ९ महिन्यांचा प्रवास निःसंशयपणे एखाद्या महिलेसाठी सर्वात सुंदर अनुभव आहे. गरोदरपणात, शरीरात सतत बदल होत असतात. ह्या बदलांमुळे स्त्रियांना अस्वस्थता येते, शारीरिक वेदना होऊन चक्कर येते. गर्भवती महिलांना भेडसावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे छातीत दुखणे. गरोदरपणात छातीत दुखण्याची कारणे आणि वेदना कमी करण्यास मदत करणारे उपाय समजून घेण्यासाठी हा लेख वाचा.
गरोदरपणात छातीत दुखणे सामान्य आहे का?
गरोदरपणात छातीत दुखणे सामान्य नाही. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात छातीत दुखणे हे शरीरात होणार्या वेगवान बदलांचे प्रतिबिंब आहे. शारीरिक बदलांसोबत जीवनशैलीतील बदलांमुळे गरोदरपणात छातीत वेदना होऊ शकतात.
गरोदरपणात छातीत दुखण्याची कारणे
पुढीलपैकी कोणत्याही कारणांमुळे तुमच्या छातीत दुखू शकते
१.अपचन
छातीत दुखण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे अपचन होय. अपचनामुळे अन्ननलिकेचे थेट नुकसान होते किंवा रिफ्लक्स येतो आणि त्यामुळे छातीत दुखते.
२. छातीत जळजळ
गरोदरपणात प्रोजेस्टेरॉन मुळे छातीत जळजळ होते. ह्या संप्रेरकांमुळे अन्ननलिकेची झडप सैल होते आणि पोटातील आम्ल वाढते. त्यामुळे छातीत जळजळ होते आणि तीव्र वेदना होतात.
३. स्नायूंवर ताण
वाढत्या गर्भाशयाच्या आकारामुळे छातीच्या भागातील स्नायू आणि अस्थिबंधांवर (आणि पोट व बरगडीजवळील भाग) खूप ताण पडतो आणि त्यामुळे वेदना होतात.
४. मानसिक ताण
स्नायूंवरील ताणाव्यतिरिक्त, भावनिक ताण हा सुद्धा ह्या समस्येस कारणीभूत असणारा महत्वाचा घटक आहे.
५. स्तनांचा बदलता आकार
स्तनांचा आकार वाढू लागताच त्यांच्या छातीच्या स्नायूंवर आणि सांध्यांवर ताण येतो त्यामुळे वेदना होतात आणि श्वासोच्छवासास त्रास होतो.
६. दमा/श्वासोच्छवासाच्या समस्या
आपण गर्भवती असताना दम्यामुळे दम लागतो आणि छातीत दुखते.
७. डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी)
डीव्हीटी मुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास सहसा पाय किंवा ओटीपोटामध्ये होतो. ही रक्ताची गुठळी फुफ्फुसांपर्यंत पोहोचते त्यामुळे पल्मनरी एम्बोलिझम होतो. ही जीवघेणी स्थिती आहे त्यामुळे गर्भवती महिलांमध्ये छातीत तीव्र वेदना होऊ शकतात आणि कधीकधी मृत्यू देखील होतो. धूम्रपान करणाऱ्या, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया, लठ्ठ स्त्रिया किंवा हृदय अथवा फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या स्त्रियांना हा धोका अधिक असतो.
८. जन्मजात हृदयरोग
जर तुम्हाला गरोदरपणात छातीत दुखत असेल किंवा तीव्र अस्वस्थता येत असेल तर तो हृदयविकाराचा झटका असू शकते. इतर लक्षणांमध्ये हात पाय बधिर होणे, त्वचेवर थंड घाम येणे आणि हलकी डोकेदुखी यांचा समावेश आहे. तुम्हाला ह्या लक्षणांचा अनुभव येत असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
९. कोरोनरी हृदयरोग
रक्तवाहिन्यांमध्ये चरबी तयार झाल्यास त्यामुळे हृदयातील रक्तप्रवाह प्रतिबंधित होतो आणि परिणामी छातीत दुखते. त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका देखील येतो.
१0. महाधमनी विच्छेदन
महाधमनीच्या भित्तिका फाटल्यामुळे, धमनीच्या थरांमध्ये रक्त जमा होण्यामुळे महाधमनी विस्कळीत होते. त्यामुळे गरोदरपणात छातीत तीव्र वेदना होते. गरोदरपणात या स्थितीमुळे धोका वाढतो.
११. पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी
ह्या आरोग्याच्या समस्येमध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि त्याचे एक लक्षण म्हणजे छातीत दुखणे. ही समस्या गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात सुरू होते आणि प्रसूतीनंतर पाच महिन्यांपर्यंत सुरु राहू शकते.
१२. पित्ताशयातील खडे
जर तुम्हाला छातीत आणि ओटीपोटाच्या उजव्या बाजूस वेदना होत असतील तर त्या पित्ताशयातील खड्यांमुळे होतात. गरोदरपणात इस्ट्रोजेन हार्मोनचे वाढलेले प्रमाण ह्यास कारणीभूत असते.
गरोदरपणात छातीत दुखण्यावर उपचार
आता तुम्हाला गरोदरपणात छातीत दुखण्यामागची प्राथमिक कारणे माहित आहेत, त्यापासून मुक्त होण्यासाठी येथे काही टिप्स आहेतः
- बसून किंवा उभे असताना योग्य पवित्रा ठेवा जेणेकरुन फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचा मुक्त प्रवाह होईल.
- शरीराच्या खालच्या भागापेक्षा छातीकडील भाग उंच ठेवण्यासाठी झोपलेले असताना उशी वापरा.
- मॅग्नेशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि लोहयुक्त पदार्थ असलेला आहार घ्या.
- वंगणयुक्त किंवा मसालेदार पदार्थ टाळा आणि अल्कोहोल व कॅफिनचे सेवन प्रतिबंधित करा.
- थोड्या थोड्या अंतराने खा आणि जेवल्यानंतर लगेचच झोपू नका.
- वाढत्या गर्भाशयामुळे रक्तवाहिन्या आणि छातीवर येणारा दबाव टाळण्यासाठी आपल्या डाव्या कुशीवर झोपा.
- तणाव दूर करण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा.
छाती दुखण्यापासून सुटका होण्यासाठी घरगुती उपचार
ओटीसी औषधोपचार नेहमी उपलब्ध असतानाही, घरगुती उपचारांचा प्रयत्न करणे अधिक चांगले आहे. येथे काही घरगुती उपचार दिलेले आहेत:
- दररोज एक चमचा मधासह एक ग्लास कोमट दूध घ्या.
- कॅमोमाइल किंवा आल्याचा चहा प्या.
- बदाम खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते.
- नारळाचे पाणी प्यायल्याने ऍसिडिटी कमी होते त्यामुळे नारळपाणी नियमितपणे प्या.
मदत कधी घ्यावी?
तुम्ही वैद्यकीय मदत कधी मदत घ्यावी हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला खालील धोकादायक लक्षणे दिसली तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
- रात्री झोपताना छातीत तीव्र वेदना
- हृदयाच्या डाव्या बाजूला असह्य वेदना
- हातांना मुंग्या येऊन छातीत दुखणे, चक्कर येणे, श्वास लागणे, थंड घाम येणे, सतत उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे
- खोल श्वास घेताना, शिंका येणे किंवा खोकताना छातीत दुखणे
- छातीच्या वरच्या भागात जळजळ होणे आणि खाली वाकल्यावर ती तीव्र होणे
- एका किंवा दोन्ही पायात सूज येणे, छातीत तीव्र वेदना, पाय अचानक दुखणे
- छातीच्या मध्यभागी काही मिनिटांसाठी तीव्र वेदना होतात आणि काही काळ त्या तशाच राहणे. हा हृदयविकाराचा झटकादेखील असू शकेल.
आजार बरा करण्यापेक्षा तो होऊच नये ही काळजी घेणे उत्तम. गरोदरपणात आरोग्यविषयक समस्यांसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. छातीत दुखण्याची तीव्रता विचारात न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा:
गरोदरपणातील सर्दीवर परिणामकारक घरगुती उपाय
गरोदरपणातील खोकल्यासाठी १० परिणामकारक घरगुती उपचार